पाऊलवाट
पाऊलवाट
"काय करतेयस गं ? सकाळपासून स्टडी टेबलवर जाऊन बसलीयेस ते!" पियू आज उठल्यापासून काहीतरी लिहित होती , कसलीतरी चित्रं काढत होती. कळायला मार्ग नव्हता .
"आई, बाबा आलाय नं काल रात्री घरी ? आज सुट्टी आहे का त्याला ? कधी उठेल तो ? "
"अगं हो आलाय काल. आज आहे दिवसभर घरी असं म्हणत होता. 9वाजले नं! उठेलच आता. "
आम्ही एवढं बोलतोय तेवढ्यात केदारची हाक आलीच.
"पियूड्या, मी आलोय गं !"
"बाबाऽऽऽऽऽऽऽऽऽ " असं ओरडतंच पियू बाहेर गेली.
शेजारच्या खोलीतून बाहेर येऊन एकदम फ्रेश झालेला केदार पायरीवर मस्त पाय पसरून बसला होता. त्याच्यासमोरच्या पायरीवर पियू एकदम खुशीत बसली. खरं तर तिला बाबाला मिठी मारायची होती पण सध्या तो आमच्यापासून जरा लांबच राहात होता. बंगल्याच्या आवारातच जरा बाहेरच्या बाजूला एक स्टोअर रूम होती. मी आणि पियूने ती स्वच्छ करून छान सजवली होती. त्या रूममधे तो राहायचा. जेव्हा तो घरी यायचा तेव्हा आम्ही बंगल्यासमोरच्या अंगणात येऊन समोरासमोर पायरीवर बसून मस्त गप्पा मारायचो.
चला, आज दिवस थोडा वेगळा सुरू झाला असं मनाशी म्हणत मी चहा आणि नाष्टा आणायला आत वळले.
"बाबा , कसा आहेस तू ? आज एकदम फ्रेश वाटतोयस"
" हो. आज फ्रेश वाटतंय पियुड्या . बरेच दिवस नीट झोपच मिळाली नव्हती गं हॉस्पिटलमध्ये. मग काय चाललंय तुमचं ? कुठले कुठले पिक्चर्स पाहिले?"
" खूप पाहिले पण आता कंटाळा आलाय. तू रोज घरी कधी येणार रे ? आणि असं लांब नाही . आमच्याबरोबर राहायला कधी येणार ?"
नाष्टा करता करता केदार आणि पियूचं बोलणं अगदी रंगात आलं होतं.
" बाबा, तू म्हणालास , लहान लहान मुलं सुद्धा ॲडमिट होतायेत. मग ती कशी राहतात रे आईबाबाशिवाय ? "
" नाही. एक केअरटेकर असतो नं त्यांच्याबरोबर "
"बाबा, मला एक कल्पना सुचलीये. बरं झालं तू आज दिवसभर घरी आहेस ते. जेवण झालं की मी सांगते तुला"
पियूचं बोलणं ऐकून केदारने माझ्याकडे पहात प्रश्नार्थक नजरेने भुवया उडवल्या. मलाही माहित नव्हतं पियू काय सांगणार आहे ते. पण पियूच्या डोक्यात काहीतरी भन्नाट कल्पना आहे हे तिचा चेहरा पाहून वाटत होतं. जेवणं झाली आणि पियूने स्टडी टेबलवरचं सगळं साहित्य अंगणात आणलं. बरीच ग्रिटिंग कार्ड्स, काही छोटी छोटी पत्रं , जाड कागदाची खेळणी, दोन तीन पेन ड्राईव्ह असं बरंच काय काय होतं. मी आणि केदारने एकमेकांकडे पाहिलं.
"आईबाबा, काल मला एक कल्पना सुचलीये. खरं तर हे कितपत शक्य आहे ते नाही मला माहिती पण बाबा , तुम्ही सगळे जणं एवढे कष्ट करताय तर मला वाटतं मी पण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी आज सकाळी लवकर उठून हे सगळं तयार केलंय. हे बघ , तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे पेशन्टस् आहेत त्यांना आठवड्यातून एकदा हे गेट वेल सुन चं ग्रिटिंग कार्ड द्यायचं. ही छोटी छोटी खेळणी लहान मुलांना द्यायची. जी मुलं वाचू शकतात त्यांना एकेक पत्र द्यायचं."
"पियू , अगं किती सुरेख ग्रिटिंग कार्ड्स केली आहेस तू . खूपच मस्त. आणि फ्रॉम एक छोटी मैत्रीण? एकदम भारी." मला खरं तर प्रचंड आश्चर्य वाटत होतं आणि केदार भलताच खुश झाला होता.
"पण असं करणं शक्य आहे का? आणि माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. "
"बोल नं ."
"हे बघ, हे 4 पेन ड्राईव्ह आहेत. त्याच्यात मी लहान मुलांना आवडतील अशा छोट्या छोट्या गोष्टी वाचून मी त्याचे ऑडिओ करून ठेवले आहेत. सध्या यात 5 गोष्टीच आहेत. ते पण तुमच्या हॉस्पिटलमधल्या लहान मुलांना ऐकवता येतील. नुसतंच बेडवर पडून राहण्यापेक्षा ती गोष्टी ऐकतील. आणि लहान मुलांना गोष्टी ऐकायला आवडतातच हे तुम्हाला माझ्यावरून माहितीच आहे." पियू हसत माझ्याकडे पहात म्हणाली.
"अगं पिल्लू, किती विचार केला आहेस गं बाळा " मी पियूला एकदम जवळच घेतलं. केदार ते सगळं साहित्य हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.
दुःखाने भरलेल्या जमिनीवर पियू निर्माण करू पहात असलेली ही आनंददायी पाऊलवाट होती. या पाऊलवाटेने कदाचित आशेचा हमरस्ता दिसू शकेल.
