Neelima Deshpande

Comedy Thriller

4  

Neelima Deshpande

Comedy Thriller

पाठलाग

पाठलाग

6 mins
346


चालता चालता माधवराव दोनवेळा थांबले, कुणीतरी पाठलाग करतय असा त्यांना भास झाला म्हणून...पण मागे वळून पाहल्यावर तर तिथे कुणीच दिसायचे नाही. असे दोन चार वेळा झाले. आधीच इच्छा नसताना बळजबरीने रमाने म्हणजे त्यांच्या बायकोने ताकीद दिली म्हणून शेवटी आता भांडण नको वाटून जरा वैतागूनच घराबाहेर पडले होते. आज नाईलाजच झाला त्यांचा! रमाला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.


"कोणी पाठलाग करत नाही तुमचा! उगाच कारण सांगू नका मला! तुम्ही जास्तच आळशी होत चालला आहात. आजपासून टीव्ही कमी बघा आणि बाहेर चक्कर मारायला जा नाहीतर टीव्ही कायमचा बंद करुन टाकायला सांगते मी!" 


अशी धमकी देत त्यांना बाहेर पाठवले होते. आवाज वाढला तसे घाबरून ते त्यांच्या शेजारी राहऱ्याला मित्राच्या म्हणजे रमेशच्या घरी गेले. 



घाम फुटलेला आणि बोबडी वळालेला मित्र पाहून त्याला धीर देत खाली बसवून रमेशने बायकोला चहा टाकायला आणि माधवच्या घरी निरोप द्यायला सांगितले. उजेडात थोडा धीर आला तेंव्हा झालेला प्रकार रमेशला सांगत माधवराव बराच वेळ त्याच्याकडे बसले. आपल्याला भास झाला नाही तर झाडीतून खरच पावलांचा आवाज 'मी' ऐकला हे रमेशला कितीही वेळा सांगून काही पटेना. 


"माधव तू कधीही आवडीने फिरायला जाणारा माणूस नाहीस.दिवसा बाहेर न पडणारा तू आज रात्री कसा फिरायला बाहेर गेला आणि त्याच वेळी कसं कोणी तुझा पाठलाग करायला आले रे ? तू कशासाठी बाहेर पडला ते सांग आधी! " 


असे माधवला, रमेश विचारत असताना, तिथेच खेळत बसलेल्या रमेशच्या नातवाने माधवच्या हातातले घड्याळ पाहिले आणि ते ओळखूंन त्याने विचारले हे घड्याळ तुम्ही तुमच्या नातवाला चिनूला दिले होते का? कारण मी हे घड्याळ मागचा आठवडाभर त्याच्या हातात पाहिले." त्याने पाहू दिले नाही आम्हाला पण आजोबांनी मला मी वेळेवर घरी परत यावे म्हणून वेळ बघायला दिले आहे असे सांगितले होते."



आधी पावलांचा आवाज, त्यात माधव आता काल पासून रात्री फिरायला जातोय आणि हे दोन्ही दिवस कुणीतरी त्याचा पाठलाग करत आहे यावरुन नेमके काय झाले याचा अंदाज बांधत असलेल्या रमेशला एक धागा मिळाला तो घड्याळाचा! कदाचित हे घड्याळ चोरण्यासाठी कुणी माधवच्या मागे येत असेल हे वाटल्याने माधवकडे वळत त्यांने विचारले,



"काय रे कोणते घड्याळ म्हणतो आहे हा? ईतके महागाचे घड्याळ घालून रात्री बाहेर मिरवायची काय गरज आहे तुला? थांब मी वहिनींनाच विचारतो, काय प्रकार आहे हा सगळा? त्यांनीच दिले म्हणतोस ना तुला हे घड्याळ, आता त्याच सांगतील का दिले ते? आणि नाही घातले तर का चालणार नाही त्यांना? तुझ्या सोबत मोबाईल असताना, त्यात वेळ पाहते येते तरी वेगळे घड्याळ देण्याची आणि असे रात्री तुला फिरायला पाठवायची काय कारणे आहेत? तू कितीही म्हणालास की, आमच्या वहिनी आता पुर्वी सारख्या साध्या आणि मवाळ नाही राहिल्यात, तरी आमचा यावर विश्वास नाही. रोज आमच्या हिला सकाळी फिरण्यासाठी बोलवायला येतात ना त्या, तेंव्हा भेटतो मी त्यांना. त्यांच्यात काहीही फरक झालेला नाही, त्या प्रेमळच आहेत अजुनही! तुझ्या एकट्यासाठी कशाला त्या खाष्ट आणि कडक झाल्यात ते सांग? त्याच्या मागचे कारण तुला माहिती नाही, त्याच सांगू शकतील म्हणालास म्हणून हिने केलाय त्यांना कॉल थोड्या वेळापुर्वीच. येतीलच तुझ्या नातवासोबत त्या आता...मग बोलू आपण, तोवर चहा घे "



आवडता चहा समोर असुनही माधवराव मात्र आधी पेक्षा जास्तच अस्वस्थ झाले. पण रमा म्हणजे त्यांची बायको येईपर्यंत घरी एकट्याने जाण्याची हिंमत होत नव्हती त्यामूळे वाट पाहत ते रमेशकडे थांबले. 



" या डोळ्यांची दोन पाखरे....फिरतील तुमच्या भवती, पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती!...... "



हे हळूहळू वाजणारे गाणे जरा जास्तच स्पष्ट ऐकू यायला लागल्यावर माधवराव त्यांच्या मित्राला म्हणाले,


 

" बघ! आता तरी विश्वास ठेवशील ना माझ्यावर! हेच गाण मला अधून मधून ऐकू येत होत आणि त्या पाठोपाठ पावलांचे आवाज! आणि मी मागे वळून पाहिलं की दोन्ही गायब होत होते पण आता मला शोधत, माझा पाठलाग करत माझ्या मागे बहूदा तुझ्या घरा पर्यंत आलं हे!" 



तो आवाज कुणाचा आहे आणि कुठून येतोय हे पहायला रमेशने दार उघडले तर समोरुन त्याला रमा वहिनी त्यांच्या नातवासोबत, 'चिंनू सोबत' येताना दिसल्या. त्या घरात आल्या. 



रमेशने त्यांना माधव त्यांच्या घरी थोड्या वेळापुर्वी आल्या पासून त्याच्याशी झालेले बोलणे सांगितले. अगदी माधवचा कोणीतरी पाठलाग केला आणि त्यामूळे घाबरून माधव कसा घरी आला इथपासून ते आत्ता गाण ऐकून तो कसा घाबरला हे सगळं आणि माधवच्या मते तुम्ही त्याला आजकाल फार त्रास देता, कडक शिस्तीत ठेवता हे माधवने केलेले त्याच्या (एका) बाजूचे वक्तव्यही ऐकवले. 



पत्नी आणि मित्र माधव सोबत उत्तराची वाट पाहत असलेल्या रमेशने वहिनींना "आता काय खरे आहे ते तुम्हीच सांगा..." म्हणत त्यांची यातली (दुसरी) बाजू काय आहे? विचारली.



रमाने कबूल केले की माधवने तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळं खर आहे. हे कबूल करून रमाने ती तसे का वागत आहे हे सांगायला सुरुवात केली....




" रमेश भावोजी, आजकाल यांचे गुडघे दुखतात म्हणून यांना मी डॉक्टरकडे नेले तेंव्हा पुर्ण चेकअपही करुन घेतलं होतं." 



"नियमित चालत राहिलात तर गुडघे दुखणार नाहीत आणि शुगरही वाढणार नाही" 



हे डॉक्टरांनी यांना सांगूनही हे मनावर घेत नव्हते. मी आग्रह केला तर मलाच ओरडले,



"हे पहा, आता हे अती होतय हं तुझं! मला नाही जमणार रोज उठून सकाळी फिरायला जायला! मला झोपायला आवडतं, थोडा आरामही हवा असतो मला. दिवसभर मी ऑफिसमधे काम करतो, पुरे झाला की एव्हढा व्यायाम मला! उगाच तुला आवडते फिरायला म्हणून माझ्या मागे भूनभून लावते तू... 'काय तर म्हणे मला कामामुळे आवड असूनही कॉलोनीतल्या मैत्रीणींसोबत निवांत सकाळी ताज्या हवेत रोजच्या रोज नियमित फिरायला जाणे जमत नाही पण तुम्ही तरी जा... नाहीतर रात्री तरी चला माझ्या सोबत, नुसते काय सतत झोपता नाहीतर टिव्ही समोर बसता ! नातवंडांची ही अभ्यासाची वेळ असते, पण ते सोडून तुमच्या सोबत तेही रेंगाळतात मग टिव्ही समोर! त्यापेक्षा आपण दोघे रात्री फिरत जावू म्हणजे त्यांचा अभ्यास होईल आणि आपला व्यायाम! जितका वेळ जमेल तितके मी सकाळी देखील जाते फिरायला, पण तुम्ही ना सकाळी येता ना रात्री! यावर हे मला काय म्हणाले विचारा यांनाच! "



रमेशने खुण करुन माधवला विचारलं तेंव्हा, माधवने कबूल केले की तो रोज फिरायला जायचे टाळण्याचा प्रयत्न करत होता. अगदीच हारतो की काय अशी भिती वाटून त्यांनी उगाच खोटं डाफरत रमाला म्हटले होते की,



"तुला ना माझे झोपणेच बघवत नाही बघ...जेंव्हा पहावे तेंव्हा मला माझ्या झोपेवरुन ऐकवत असते... नुसती हुकूमशाही आहे सगळीकडे, घरी तुझी आणि ऑफिसमधे बॉसची! चार महिन्यांनी रिटायर झालो की एका बॉसचे ऐकावे लागणार नाही पण तुझे काय करु? फार बदलली आहेस तू "



चिनूला गंमत वाटत होती...त्याने मग पुढचा खुलासा केला...



"म्हणून आजोबा सकाळी उठणे टाळण्यासाठी मला घेवून रोज संध्याकाळी बागेत जायचे. तिथे ते त्यांच्या मित्रांशी गप्पा मारत बसून रहायचे. मला खेळायला पाठवताना ते मला आठवणीने त्यांचे घड्याळ देत आणि सांगत, "ही आपली गंमत आहे, तुला वेळ कळावी आणि तू वेळेवर परत यावे यासाठी घड्याळ घाल माझे आणि आलास की मला दे." मग आपण सोबतच घरी जाऊ पण परवा मी त्यांना घड्याळ परत करायचे विसरलो आणि घरी आजीला समजले की रोज जे घड्याळ आजीला दाखवून आजोबा त्यांना खात्री करुन देत होते की 'ते त्यावर दिसत आहेत तितकी पावले चालून आले आहेत ती त्यांनी चाललेली नसून माझ्या खेळण्याचे आणि मी किती चाललो याचे रिकॉर्ड आहे !' आजोबा तर गप्पा मारत एकाच जागी बसून असतात. "




"आजीने मला मग समजावले की तिला आजोबांच्या तब्येतीची काळजी आहे आणि त्यासाठी ती आता खोटं खोटं त्यांच्याशी कडक वागणार आहे आणि मला तिला यात मदत करायची आहे."



रमाने माधवरावांची माफी मागून कबूल केले की, 



" मी फक्त डॉक्टरने सांगितल्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी या विचारापोटीच तुमच्याशी खोटे भांडले आणि कडक वागले. माझे तुम्हाला बदलण्याचे सगळे प्रकार करुन, मी थकल्यावर तुम्ही चालत जाताय की नाही हे बघायला मीच तुमचा पाठलाग करत होते. पण तुमच्याशी खोटं बोलले की असं कोणी पाठलाग करत नसतं, फिरायला जा...

खर तर घड्याळ चिनूला देवून तुम्ही खोटेपणा केला हे मला आवडलं नाही. त्यामूळे पून्हा असचं काहीतरी युक्ती करुन तुम्ही 'फिरायला जाणे, चालणे' टाळता की काय अशी भिती वाटत होती. मग मी स्वत:च तुमचा पाठलाग करुन तुमच्या सोबत रहायचे ठरवले जेणेकरून माझाही व्यायाम व्हावा आणि मला तुमची सोबत मिळावी पण तुम्ही यासाठी तयार नव्हता म्हणून मग मी गुपचूप मागे आले आणि तुम्हाला चिडवायला माझ्या मोबाइलवर हे गाण लावायचे!"



सगळे खळखळून हसले...कधी कधी एक बाजू ऐकून गैरसमज होतो त्यामूळे कोणत्याही गोष्टीची दूसरी बाजू समजून घेणे गरजेचे असते. रमाला शेजारी ओळखत होते त्यामूळे गैरसमज न होता माधवरावांची व्यायाम टाळण्याची बदमाशी समोर आली. रमाने त्यांना सर्वांसमोर फर्मान सोडले,



"यानंतर माझ्याशी भांडलात किंवा खोटे वागलात तर प्रत्येकवेळी एक किलोमीटर चालावे लागेल! आणि मी येईलच मागून गाण म्हणत....




या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती... पाठलाग ही सदैव करतील....असा कुठेही जगती...."


 



* सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत.


*आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह जरूर करावी.


*आपला अभिप्राय खुप महत्वाचा, तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधे आपले मत जरूर कळवा.


* फोटो साभार Google and Pixabay


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy