ओझं-अपेक्षेचं
ओझं-अपेक्षेचं


"बरबादियो का सोग मनाना फजुल था।
मनाना फजुल था।
बरबादियो का जशन मनाता चला गया।
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया."
पुण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर रोज गाणी गाऊन आपलं पोट भरणारा एक भिकारी राहुलकडे आला.
तसं पाहिलं तर या नश्वर जगात आपण सर्वच आपल्या जीवनाच्या खऱ्या दिशा म्हणजे योग्य करिअर साठी, स्वस्थ आरोग्यासाठी आणि मुख्य म्हणजे पैसा कमवण्यासाठी भटकत आहोत. असो.......
राहुल तसा नागपूरकर, पुण्याला आयटीमध्ये नोकरी करायला आलेला. सोमवार ते शुक्रवार 9 ते 6, कंपनीत आयटी जॉब करणारा राहुल दिवाळीला घरी जायच्या तयारीत होता. थोडा उत्साहित पण तेवढाच nervous पण.
28 वर्षाच्या राहुलला आता घरचे लग्न कर म्हणून मागे लागले होते...... त्यात हे गाणं त्याला जणू त्याच्या परिस्थितीशी मेळ घालणार वाटतं होतं.
जॉब - ही एक बरबादी....
लग्न - ही एक बरबादी.....
लहानाचे मोठे होणं - ही त्याच्या दृष्टीने एक बरबादी.... (असं त्याचं मत).....
तेवढ्यात........... एक अनाउन्समेंट होते...
प्लॅटफॉर्म नंबर 6 वरून सुटणारी "नागपूर-गरीबरथ" निर्धारित वेळेपेक्षा 2 तास उशिरा चालत आहे.....
आपल्याला झालेल्या असुविधेबद्दल आम्हाला खेद आहे!!!
हा हा हा..... असुविधेबद्दल खेद!!!
परत एकदा ट्रेनने लवकर घरी पोहोचण्याचा सर्व passenger च्या "अपेक्षेवर" पाणी फेरलं.
ही आपली मानसिक tendency असते. पहिले अपेक्षा बिल्डअप करणं आणि नंतर जर ते पूर्ण होत नसेल तर आम्हाला खेद आहे, असं म्हणून माफी मागणं.
असो.....
राहुलचं बालपण तसं खूप दुःखात गेलं, लहानपणीच पित्याचं छत्र हरवलं. दोन बहिणी, आई यांची जबादारी लवकरच त्याच्यावर आली. कुठल्याही कार्यक्रमात गेला की नातेवाईक म्हणायचे, "तुला खूप अभ्यास करून लवकर नोकरीवर लागायचे आहे, आता घरचा कर्ता-धर्ता तूच.... आईची आणि बहिणीची जबादारी आता तुझीच (तसे आहोत आम्ही तुझ्या मदतीला)....पण खरं पाहता कोणी कोणाचं नसतं. त्याच्या बालसुलभ मनात कधी मोठपणाची जाणीव आली कळलंच नाही.
आपले बालपण तो कुठंतरी हरवून बसला होता. शाळेतून घरी आल्यावर आईला घरकामात मदत, अशी आईची अपेक्षा.... रविवारी भाजी, किराणा, काही दुरुस्तीचे काम ते संपवण्याची अपेक्षा..... लहान बहिणींना फिरायला घेऊन जाणे, त्यांचे लाड-कौतुक करणे ही एक अपेक्षा....
बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून राहुलला खरं तर M B B S करून डॉक्टर बनायचे होते. पण त्याच्या या निर्णयात घरच्या मोठ्या लोकांची "अपेक्षा" जरा वेगळीच, त्यांनी राहुलच्या डॉक्टर बनण्याच्या निर्णयाला विरोध केला. कारण....
1) डॉक्टर बनायला लागतात 5 वर्षे.
2) आणि त्यानंतरही स्वतःचं हॉस्पिटल उभारणं म्हणजे स्वतःची भली मोठी जागा, वेगवेगळ्या मशिनरीज... खूप खर्च...
झालं... आल्या करिअरच्या "अपेक्षा"....
शेवटी सर्वांच्या "अपेक्षेला" मान देऊन आणि या विचारात हे अपेक्षेचं ओझं कधीतरी संपेल.... सगळ्यांच्या सहमतीने इंजिनीअरिंग करायचा विचार केला. म्हणजे 4 वर्षात नोकरी हमखास मिळणारच.
नागपूरला रामदेवबाबा कॉलेजमध्ये आपले graduation पूर्ण करून तो अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षातच इंटर्नशिपसाठी पुण्याला गेला. इंटर्नशिपनंतर तीच कंपनी तुम्हाला नोकरी देणार ही राहुलसह सर्वांची "अपेक्षा" पण काही कारणास्तव राहुल तिथे नोकरी करू शकला नाही. असेच सहा महिने निघाले....... आता परत नोकरीच्या शोधात.
एक International company मध्ये त्यांना हवी तशी प्रोफाइल मिळविण्याची कंपनीची वेगळी "अपेक्षा"...
शेवटी राहुलला तीस दिवसाच्या आत एका कंपनीमध्ये त्याला हवी तशी नोकरी मिळाली. त्याला वाटलं, चला, आता तरी अपक्षांचं ओझं थोडं कमी होईल. पण......या सर्वात मोठी जबादारी होती त्याच्यावर ती म्हणजे.... दोन्ही बहिणींच्या लग्नाची. आता कंपनीमध्ये त्याच्या वयाचे, त्याच परिस्थितीत जॉईन करणारे कितीतरी मुलं, मुली.... यात चांगलं काम करून छान salary package वाढवून घेण्याची राहुलची कंपनीकडून "अपेक्षा"....
या सर्व "अपेक्षेवर" खरे उतरून राहुलने पाच वर्षात आपल्या दोन्ही बहिणींची लग्न चांगल्या कुटुंबात करून दिली. आता तो आपला स्वतःचा फ्लॅट घेऊन आईला पुण्याला बोलवून तिथेच settle व्हायच्या तयारीत होता.
प्लॅटफॉर्मवर 2 तास कसे गेले काही कळलंच नाही... तेवढ्यात ट्रेनच्या हॉर्नचा आवाज आला.... आणि तो आपल्या विचारांच्या तंद्रीतून जागा झाला.
3AC च्या आपल्या बर्थवर जाऊन बसतो..... आणि आता छानपैकी झोपायचं या विचारात तो झोपायची तयारी करतो..... तेवढ्यात आईचा फोन.... "बेटा, या सात दिवसांच्या सुटीत आपण तीन, चार स्थळ बघायची.... आणि त्यातलीच एक मुलगी पसंत करून या वर्षी लग्न आटपुया.... पण मुलगी मात्र सर्वांना घेऊन चालेल, सर्व छान सांभाळेल अशीच हवी हं....”
“हो गं आई, जशी तुझी इच्छा...”
आईला होकार तर दिला.... पण तो स्वतःच मनोमन पुटपुटला.......
"ओझे हे अपेक्षांचे
कधीही न संपणारे
कधीही न संपणारे....”