न्याय अन्याय... भाग 1
न्याय अन्याय... भाग 1
शामली, नावा प्रमाणे सावळीशी,पाणीदार डोळे, धारदार नाक,सडपातळ बांधा. सतरा वर्ष पूर्ण करून अठराव्या वर्षात पदार्पण केलेली शामली साऱ्या गावाची लाडकी होती. कुणाला काही लागले,सवरले की शामली चटदिशी मदतीला धावून जात असे.
शामलीचे गाव म्हणजे मेळघाटात वसलेली ती चाळीस घरांची वस्ती नुमा गाव. दुरुन बघितले की नुसते डोंगर,दऱ्या, जंगल दिसायचे.याच जंगलात शामली आणि तिची मैत्रिणी सुरेखा गावातील गायी, म्हशी, आणि शेळ्या घेऊन जात असत. जनावरे जंगलात चरायला सोडून त्या दोघी दिवसभर जंगलात भटकायच्या, कधी खेळायच्या, कधी रानफ़ळे तोडून खायच्या. शामलीला वन औषधींची चांगलीच जाण होती. तिचे काका हे गावातील वैद्य होते. त्यामुळे लहानपणापासून शामली त्यांच्याबरोबर वन औषधी आणण्यासाठी जंगलात जायची. कुठली झाडे, फळे विषारी आहेत हे तिला माहित होते. सायंकाळपर्यंत जे जे तिला घरी आणता येईल ते ते ती घेऊन यायची. फळे, भाजी, जाळण्यासाठी इंधन, औषधी वनस्पती हे घेऊन येणे हे तिचे रोजचे काम होते.
एक दिवस तिला जंगलात जीप गाडी दिसली.आधी त्या दोघी घाबरल्या. पण शामलीला उत्सुकता लागली होती त्या गाडीला अगदी जवळून बघायची. सुरेखा मात्र खूप घाबरली होती. ती शामलीला परत मागे फिरायला म्हणत होती, पण शामली ऐकत नव्हती. त्यांना थोड्या दूर अंतरावर चार पाच मुले दिसली. विस पंचवीस वर्षाच्या आस पासची होती ती. त्यांच्या हातात दारुच्या बाटल्या होत्या आणि एका हातात सिगारेट घेऊन ते सिगारेटचे धूर हवेत उडवत बसली होती. सुरेखा घाबरली होती ती शामलीला तिकडून माघारी फ़िरण्यास सांगत होती. पण शामली ला आणखी थोडा वेळ थांबायचे होते, दोघींमधे ओढा ताण झाली आणि त्यातच शामली तिला ओरडली
शामली, अगं थांब की जरा बघू तर दे ना.... काय करतात ते तिकडे बसून?
तिचा आवाज एवढा मोठ्याने आला की जंगलातील शांततेला तो चिरत गेला. क्षणात तिच्या लक्षात आले तोवर ती मुले त्या आवाजाच्या दिशेने झेपावली होती. शामलीने सुरेखाचा हात पकडत तिथून पायाला भोवरा लागल्या गत धावत सुटली आणि क्षणात दिसेनाशी झाली.
दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. जंगलात गेल्या गेल्या त्या दोघींना गाण्याचा आवाज आला. त्या लपत छपत त्या आवाजाच्या दिशेने गेल्या आणि एका झाडाच्या मागे लपून त्या मुलांना बघत होत्या. ती मुलं छोटीशी शेकोटी करून दारूच्या बाटल्या हातात घेऊन टेपरेकॉर्डवर मोठ्या आवाज गाणे ऐकत होती. त्यातील तीन मुले गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत छान नाचतसुद्धा होती. शामलीला ते बघून मज्जा येऊ लागली. ती ही त्या गाण्यावर त्या मुलांप्रमाणे ठेका धरू लागली. सुरेखाचा हात हातात घेऊन ती नाचत होती.दोघीही हसत होत्या. त्या झाडाच्या मागून थोड्या पुढे आल्या त्यांना याचे भान राहिले नाही. पण त्या मुलांपैकी एकाची नजर तिकडे गेलीच, त्याने बाकी मुलांना बोटाच्या इशाऱ्याने त्या दोघी दाखविल्या.त्यांनी गाणे बंद केले आणि त्यांच्याकडे वळले. आवाज बंद झाला म्हणून शामलीने बघितले तर ती मुले त्यांच्या खूप जवळ आली होती, शामली ओरडली, सुरेखा पळ लवकर.
आणि त्या दोघी हवेच्या वेगाने पळाल्या. जंगलातील वाटा त्यांच्या लहानपणापासूनच्या ओळखीच्या होत्या. त्या मानाने मुलांना सर्व जंगल नवीन होते. ते रस्ता भरकटले. आणि पुन्हा तिथेच येऊन थांबले. शामली मात्र सुरेखाला घेऊन सुखरूप घरी पोहचली.मात्र धावताना सुरेखाचा पाय मुरगाळला होता. ती मुकी जनावरे सायंकाळी आपल्या रोजच्या वेळी घरी परतले.
दुसऱ्या दिवशी जेव्हा शामली सुरेखाकडे गेली तेव्हा सुरेखा खूप घाबरलेली होती आणि तिच्या पायाला खूप सुज आलेली होती, त्यामुळे ती चालू ही शकत नव्हती. तिने शामलीला विनवणी केली की आज तिनेही जंगलात जाऊ नये म्हणून. पण काकांनी काही वन औषधी आणायला सांगितल्या होत्या आणि बाकी जनावरे घेऊन तर जावेच लागणार होते. सुरेखाला घरीचा सोडून शामली आज एकटीच जंगलात गेली. तिथे गेल्यावर तिने औषधी वनस्पती शोधण्यास सुरुवात केली. आज एकटी असल्याकारणाने तिच्या चालण्यामधे रोजची ताकद नव्हती, ती रोजची चंचलता जाणवत नव्हती.अचानक ती चालत असताना तिला जाणवले की मागे कुणी तरी सोबत सोबत चालत आहे, तिच्या काळजाचा ठोका चुकला.तिला भीती वाटली. मागे कुणी आहे की काय असे तिला वाटले.सर्व हिम्मत एकवटून तिने मागे बघितले. पण मागे कुणीच नव्हते. तिला हायसे वाटले.ती स्वत:वरच हसली. "वेडीच हाय मी" असे म्हणत ती परत आपल्या कामाला लागली.
सुकलेल्या पानांवर पावलांचा तोच आवाज तिला परत आला. आणि यावेळी तो आवाज फ़ार जवळून आला. त्याच बरोबर पानांचा सळसळण्याचा आवाजदेखील तिला स्पष्ट जाणवला.ती भेदरलेल्या नजरेने इकडे तिकडे बघत होती. घाबरून तिचा जीव गळ्याशी आला होता, कधी नव्हे ते आज, लहानपणा पासुनचे ओळखीचे जंगल तिला भयाण वाटायला लागले होते.रोजच्या सवयीची झाडे तिला भीतीदायक वाटायला लागली होती. अशा परिस्थितीतही तिने हिम्मत एकवाटून विचारले,
"कोण आहे तिकडे?"
तसे ते चारही तरुण मुले झाडाच्या आडून बाहेर आली. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र विजयी हास्य होते.अाज सावज त्यांच्या जाळ्यात आपसूक गावले होते.ते हळूहळू तिच्या जवळ येऊ लागले. शामलीला आज पळायला जागाच मिळेना. भीती ने तीचे पाय कापायला लागले होते. ती त्यांच्या समोर गया वया करु लागली, "मला जाऊ द्या पुन्हा वाट्याला नाही जायची मी, माफ़ करा...... जाऊ द्या मला.......”
क्रमशः
