नवं चैतंन्याचा पाउस
नवं चैतंन्याचा पाउस
पाउस नवंचैतन्याचा , पाउस धरतीला बिलगून नवअंकुर उमलण्याचा , पाउस बेधुंद मनावर बरसणारा , पाउस इच्छा - आकांक्षा पूर्ण करणारा , पाउस तणाला बिलगून मनापर्यंत पोहचणारा , पाउस सुप्त जुन्या आठवणीना उजाळा देणार . असा असतो पाउस , सर्व भरूनही रिकामा असल्या सारखा , खरच पाउस आठवणीना उजाळा देतो , दरवर्षी नव्याने जरी आला तरी जुन्या आठवणीना उजाळा देऊन जातो . असाच पाउस माझ्या आयुष्यात येउन गेला कायमच्या आठवणी मनात साठउन ठेवण्यासाठी ,
माझं आणि सीमाचं लग्न मुळात २ ७ जुलै २ ० १ १ रोजी झालं. भर पावसाळ्यात लग्न ठरल्यापासून मनात बेचैनी सुरु होती . बेचैनी तर सगळ्यांच्या मनामध्ये होत असते . पण माझ्या मनामध्ये मात्र वेगळीच बेचैनी चालु होती . ती म्हणजे लग्नादिवशी पाउस थांबणार का ? कारण भर पावसाळ्यात लग्न आमच्या दारात होतं. आता दारात लग्नं; आणी पाउस जर थांबला नाही तर सगळा बट्याबोळ होणार संपूर्ण गैरसोय होणार याचं टेन्शन मला जाम आलं होतं. त्यामुळं मी कुटुंबासोबत चर्चा केली की लग्न एखादया हॉल मध्ये घेऊ . तेवढ्यात भाऊ म्हणाला तुझं जर नशीब असेल तर त्या दिवशी पाउस पडणारच नाही बघुया काय होतंय ? आता सर्व नशिबावर अवलंबून होतं .
तसं लोक म्हणतात ना 'नशिबात लागतं बाबा ' मला जाम टेन्शन आलं आता नशिबात काय आहे हे आगोदर कसं कळणार , आणि जर नशिबाने धोका दिला तर ? मग काय बोंबच. तशी आंम्ही पावसापासून बचावाची तयारी कशी करायची याचं नियोजन केलं होतं पण टेन्शन काही केल्या जात नव्हतं . लग्नाचे ८ ते १ ० दिवस बाकी होते . आणि पावसाने तर हाहाकार माजवला होता . आज पाउस कमी येईल, उद्या पाउस कमी येईल असं आम्ही मनात म्हणायचो आणि जसा नवा दिवस उजाडलं तसा पाउस कहरच करायचा. अंगणात सगळीकडे चिकचिक दलदल माजली होती . माझ्या मनात मात्र एकच प्रश्न सतत येत होता 'तुझं नशीब असलं तर पाउस थांबल' . आता कशाचं नसीब आणि कशाचं काय ; पाउस जसा दिवस जवळ येईल तसा जास्तच पडत होता . आणि आम्हाला पावसातही घाम सुटत होता . एक एक वेळ मनाला असं वाटू लागलं झक मारली आणि पावसाळ्यात लग्नाची तारीख धरली.
पूर्वी पावसाळ्यात लग्न का होत नव्हती याची तंतोतत प्रचीती मला रोज येत होती . सासरवाडी कडच्यानां कदाचित माझ्या इतकं टेन्शन आलंच नसेल. कारण आमची सासरवाडी सातारा जिल्ह्यातील तळबीड गाव , तिथ पाउस आमच्या पेक्षा कमीच आणी उघडझाप करणारा आणि आमच गाव पन्हाळ्याच्या पायथ्याशी मिठारवाडी हे गाव, त्यामुळं पावसाचं प्रेम अतोनात; आणि त्याच्या या प्रेमात आमची फजिती होत होती . पण नशिबान साथ दिली २६ तारखेला पाउस अचानक उघडला आणि आमच्या मनाला सुखद गारवा मिळाला , सूर्याच्या किरणाबरोबर आमच्या मनाच्या विचार किरणांनी आपले आनंदी पंख सुखदपणे पसरले . नशिबाची दारे लख्ख प्रकाशाने न्हाउन निघाली . आणि बघता बघता लग्न घटिका जवळ आली. सर्व कार्य व्यवस्थित पार पडू लागले . सूर्य देवतेने आपल्या असंख्य किरणांनी आम्हा नव दाम्पत्यांना सुभ आशीर्वाद दिले. वरून देवाने सदैव आपली कृपादृष्टी राहील याची ग्वाही देऊन आम्हाला आशीर्वाद दिला . आणि लग्न घटिका पार पडली .
लग्नानंतर पूजा होई पर्यंत पाउस पडलाच नाही . पूजे दिवशी आम्ही नव दाम्पत्य जोतिबाच्या दर्शनासाठी सकाळी जोतिबावर गेलो .आमच्या सुखी संसारासाठी देवाकडे मागणं मागितलं आणि आम्ही बाहेर पडलो . बाहेर सुंदर गार वारा वाहत होता धुकं इतक दाटलं होतं की पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्यासारख वाट्त होतं. इतक्यात सीमा म्हणाली इतक्या सुंदर वातावरणात फक्त हलकासा पाउस असता तर किती बरं झालं असतं . आम्ही डोंगराच्या दक्षिणेकडील बाजूस निवांत गुजगोष्टी करण्याच्या निमित्ताने निघालो आणि वरून राजाने आपली कृपादृष्टी दाखवली आणि हलक्या सारी आमच्या तान-मनाला चिंब भिजउ लागल्या ते निसर्ग सौदर्य आम्ही डोळ्यांनी पिऊ लागलो . एकमेकाकडे स्मितहाष्याने पाहू लागलो पाहता पाहता मला एक कविता आठवली
डोळे कशासाठी ?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी
सरी कशासाठी ?
तुला बिलगुन भिजुन जाण्यासाठी .
आणि आम्ही जसे एकमेकांना बिलगलो, तसे स्वर्ग सुंदर धुके आमच्या पासून अलग झाले . त्या स्वर्ग सुंदर धुक्या पलीकडे निसर्ग सौंदर्याची हिरवीगार खान नयन पटलावरती साम्राज्य करू लागली . किती सुंदर क्षण होता तो, जसा निसर्गान आपल्या सौंदर्याचा शालू आमच्या नव दाम्पत्यांच्या अंगावर आहेर म्हणून चढवला असावा .त्या सुंदर शालू मध्ये आमचं सौंदर्य अधिकच खुलावं असा क्षण होता तो.आणी पावसाच्या अगणीत थेंबानी आमच्यावर सुगंधी अत्तराचा वर्षाव करावा आणि त्या सुगंधात आम्ही बेधुंद व्हावे, असा क्षण होता तो आणि आम्ही त्यात बेधुंद होऊन त्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होतो. आजही ते क्षण आम्हाला त्या त्या क्षणी आठवतात, आणि जुन्या आठवणी नुकत्याच उमललेल्या फुलापरी सुवासिक व ताज्या होऊन जतात.असा होता तो आमच्या आयुष्यातील नवं चैतंन्याचा पाउस.

