STORYMIRROR

Ajay Nannar

Horror Inspirational Thriller

3  

Ajay Nannar

Horror Inspirational Thriller

नशीब - एक हृदयस्पर्शी अनुभव

नशीब - एक हृदयस्पर्शी अनुभव

2 mins
264

त्या दिवशी तब्येत ठीक नसल्याने ऑफिसमधून लवकरच घरी यायला निघालो होतो. नेहमीच्या वेळापेक्षा लवकर निघाल्यामुळे ट्रेनला गर्दी बरीच कमी होती. कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. रोजच्या कटकटीपासून आज लवकर सुटका मिळाली असा विचार करत खिडकीतून प्लॅटफॉर्म वरच्या गर्दीला न्याहाळत होतो. तितक्यात साधारण १० वर्षांचा मुलगा कडेवर ७-८ महिन्याच्या बाळाला घेऊन घाईघाईत ट्रेनमध्ये चढला. त्याच्या कपड्यावरून आणि सगळ्या अवतारावरून त्याची आर्थिक परिस्थिती किती हलाखीची आहे याचा अंदाज आला. 


ट्रेनमध्ये चढल्यावर २-३ धापा टाकत तो काही क्षण तसाच उभा राहिला. कडेवरच्या बाळाला सावरत त्याने दुसऱ्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीत हात घातला आणि ४-५ पेन बाहेर काढून विकू लागला. त्याच्या कडेवरचे ते बाळ उठून खूप रडू लागले. माझ्या समोर असलेल्या काही बायका त्याला नको ते बोलायला लागल्या. आई – वडील असे मुलांना कामाला लावून स्वतः काय करतात? वगैरे वगैरे. का कोण जाणे पण मला अगदी विचित्र वाटले. पण तो काहीही न बोलता निमूटपणे पेन विकायचे त्याचे काम करत होता.


माझ्या जवळ आल्यावर मी न राहवून त्याला विचारले की बाळ का रडतेय इतके? आणि तुझी आई कुठे आहे. तो म्हणाला “आई ४ महिन्यापूर्वी गेली आणि वडिल नाही मला, ही माझी लहान बहीण आहे. माझी आई फुलं विकायची प्लॅटफॉर्म बाहेर. हिला खूप भूक लागली असेल कालपासून काही खाल्ले नाही आम्ही”. तितक्यात पुढचे स्टेशन आले तसे तो त्या बाळाला तिथेच ठेवून खाली उतरला आणि धावत जावून अजुन एक पिशवी घेऊन आला. त्यात दुधाची बाटली होती. मी त्याची परिस्थिती बघून गहिवरून गेलो होतो. काय नशीब असते एकेकाचे. मी त्याला काही पैसे देऊ केले त्यावर तो काय म्हणाला माहितीये, ”दादा तू आज मला पैसे देशील पण उद्या माझे मलाच करायचे आहे.“


त्याचे बोलणे ऐकून डोळ्यातून टचकन पाणी आले. जड अंतःकरणाने मी ट्रेनमधून उतरलो आणि घराकडे जात असताना देवाकडे एकच प्रार्थना केली “मला जे दिले आहेस त्या साठी मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन आणि यापुढे जास्त काही मागणार ही नाही पण अशी परिस्थिती पुन्हा कोणावर ओढवू देऊ नकोस”.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror