Pratibha Tarabadkar

Horror

4.6  

Pratibha Tarabadkar

Horror

निर्वाण

निर्वाण

6 mins
542


 संदेशला हळूहळू जाग येऊ लागली.आपण कुठे आहोत तेच त्याला कळेना.दाट झाडीच्या झरोक्यातून चंद्रप्रकाशाचे कवडसे आजूबाजूला विखुरले होते.रातकिड्यांचे गायन एकसाथ चालू होत होते आणि अचानक थांबत होते. संदेशला जाणीव झाली की तो एका रानात पडला आहे.पण आपण इथे कसे काय आलो? त्याला हळू हळू आठवू लागले.

आपल्या स्टेशनरीच्या दुकानाच्या मालाच्या खरेदीसाठी तो मुंबईच्या होलसेल मार्केट मध्ये गेला होता.दिवसभर मार्केटिंग करून तो रात्रीच्या गाडीने परत आपल्या गावी सुरवाडीला येण्यासाठी निघाला होता.गावाला गाडी पहाटे पाच वाजता पोहोचते म्हणून साडेचार वाजताच उठून त्याने सीटखाली साखळीने बांधलेल्या बॅगचे कुलूप काढले, मोबाईल खिशात आहे की नाही याची खात्री केली तोच.... कचकचाट करीत गाडीला जोरदार हादरा बसला, अचानक लाईटस् गेले आणि गाडी कोलांट्या घेत आडवी तिडवी होत कोसळली. किंकाळ्या, रडारड, रात्रीच्या काळोखात लोक एकमेकांना हाका मारत आकांत करीत होते.संदेशचीही त्या कोलाहलात शुद्ध हरपली.

संदेशला अपघाताची आठवण आली आणि तो नखशिखांत हादरला. त्याच्या बॅगमध्ये खरेदीच्या पावत्या होत्या. त्या दाखविल्या नाहीत तर माल कसा मिळेल? चांगला दोन लाखांचा माल खरेदी केला होता त्याने.शिवाय मोबाईल?

संदेश झिडपिडत उठला.चंद्राच्या प्रकाशात त्याला भराव घालून केलेल्या उंचवट्यावरुन जाणारे रुळ चमकतांना दिसत होते.कष्टाने तोल सावरत तो त्या रुळांकडे जाऊ लागला.तेव्हढ्यात त्याला म्यॅंव असा आवाज आला.रात्रीच्या त्या नीरव शांततेत अनपेक्षित असा तो आवाज ऐकून संदेश इतका भयचकित झाला की नकळत त्याच्या तोंडून किंचाळी उमटली.

रुळांसाठी भराव घातलेल्या उंचवट्याखाली पावसाचे पाणी जाण्यासाठी सिमेंटचा पाइप होता आणि त्यात बसून एक मांजर त्याच्याकडे रोखून पहात होती.तिचे घारे डोळे त्या काळोख्या अंधाऱ्या रात्री पाचू सारखे चमकत होते.संदेशला हसू आले.या यःकश्चित मांजरीला आपण भ्यालो? त्याने गमतीने मांजराला चुचकारले आणि काय आश्चर्य,ती मांजर त्याच्याजवळ येऊन अंग घासू लागली.कदाचित तिला त्या एकांत जागी संदेशची सोबत सुरक्षिततेची भावना निर्माण करीत असावी.

हळूहळू फटफटू लागले आणि संदेशला रुळांच्या कडेचा दगड दिसला.'बाहेगाव २कि.मी.संदेशने विचार केला,बाहेगावच्या स्टेशन पर्यंत रुळांच्या कडेकडेने चालत जाऊ आणि तिथून पुढे सुरवाडीला कसे पोहोचायचे ते ठरवता येईल. बाहेगाव आणि सुरवाडीमध्ये फक्त पाच किलोमीटरचे तर अंतर आहे. संदेशने रुळांच्या कडेने चालावयास सुरुवात केली.तोच मागून म्यॅंव असा आवाज आला.संदेशने‌ वळून पाहिले.त्याला ती मांजर मागोमाग येताना दिसली.संदेशला मोठी गंमत वाटली.त्याने त्या मांजरीला उचलून घेतले.'काय गं मनीमाऊ, आमच्या घरी येण्याचा विचार आहे की काय तुझा? तुला पाहून साकेत आणि सानिका तर आनंदाने उड्याच मारतील.खूप हट्ट करत होते दोघेही आपण मांजर पाळूया म्हणून पण आम्ही सगळ्यांनी विरोध केला म्हणून हिरमुसले होते बिचारे.'संदेशच्या डोळ्यासमोर तेव्हाचे रुसून बसलेल्या साकेत,सानिकाचे चेहरे आले आणि त्याच्या ओठांवर स्मित उमटले.

रुळांवरून चालतांना त्या निर्मनुष्य,शांत वातावरणात कोणाशी तरी बोलतोय एव्हढंच समाधान संदेशला पुरेसं होतं. साहजिकच आहे,एका स्टेशनरीच्या दुकानाचा मालक होता तो! खरेदीला येणाऱ्यांशी सतत बोलण्याचा सराव होता त्याला . मांजर तर मांजर! समोर कोणीतरी आहे ना ऐकायला मग झालं‌ तर!आणि ती पांढरीशुभ्र मनीसुद्धा मध्येच म्यॅंव म्हणत त्याला साथ देत होती.जणूकाही संदेश बोलत होता ते तिला कळतच होतं! नाही तरी त्या रुळांजवळ होतंच कोण? एखादा सुळकन् धावत अदृश्य होणारा सरडा नाही तर आपलं बोजड शरीर सावरत जमीन हुंगत चालणारी एखादी घूस.

बाहेगाव स्टेशनचा प्लॅटफॉर्म दिसू लागला.अगदी छोटेसे स्टेशन होते बाहेगाव म्हणजे.फक्त पॅसेंजर गाड्या थांबत तिथे.त्यामुळे स्टेशन कायम शांत आणि निर्मनुष्य!

संदेश मनीमाऊला कडेवर घेऊन प्लॅटफॉर्म वर आला.एक पिण्याच्या पाण्याची टाकी, खाली दोन तीन नळ, थोड्या फार फुलझाडांच्या कुंड्या,तिकीटघर, स्टेशन मास्तरांचे ऑफिस आणि एक पेपरचा स्टॉल.

संदेश पेपर स्टॉलपाशी गेला.स्टॉलवरील विक्रेता वर्तमान पत्रात डोके खुपसून बसला होता.संदेशने त्याला शुकशुक केले.पण तो वाचनात इतका तल्लीन झाला होता की त्याने संदेश कडे पाहिलेच नाही. संदेशने कंटाळून त्याचा नाद सोडला आणि तो तेथून निघाला.जाता जाता त्याची नजर पेपरच्या हेडलाईनकडे गेली.'रेल्वे अपघातातील मृतांची संख्या १००च्या वर. घातपाताचा संशय, विरोधी पक्षांनी केली रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी'.

'नेहमीचे तेच ते घिसे पिटे मथळे,' संदेश मनात म्हणाला. तोच त्याचे लक्ष स्टेशन मास्तरांच्या केबिनसमोर बसलेल्या पोर्टर कडे गेले.पण हाय रे दैवा,पोर्टरने तंबाखूची गोळी दाढेखाली सरकवली आणि तो समाधि अवस्थेत गेला.आता साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी तो डोळे उघडणार नव्हता.तेव्हढ्यात त्याला काळा बोर्ड दिसला.'या मार्गावरील रेल्वे वाहतूक अनियमित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.तरी तसदी बद्दल क्षमस्व.आज्ञेवरुन. संदेश प्लॅटफॉर्म वर हताशपणे उभा राहिला.आता सुरवाडीला घरी कसं जायचं? या बाहेगाव स्टेशनला फक्त गाडीच्या वेळेतच रिक्षा, बस येत असत.

 संदेशने कपाळाला हात लावला. म्हणजेआता सुरवाडीपर्यंत आपल्याला चालत जावं लागणार तर!'काय मनीमाऊ, जायचं का चालत सुरवाडीला? ''म्यॅंव' मनीने उत्तर दिले आणि त्यांची जोडगोळीचा पुन्हा रुळांवरून प्रवास सुरू झाला.

थोडे अंतर चालून गेले नाही तोच दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला. हळूहळू तो आवाज जवळ येऊ लागला तशी मनीमाऊ घाबरून संदेशला बिलगून बसली.संदेश पण घाबरलाच. ही कुत्री आपल्यावर हल्ला तर करणार नाहीत ना? त्यांनी जर आपल्यावर हल्ला केला तर आपला मागमूसही रहाणार नाही.नकळत त्याने मनी ला घट्ट धरलं.संकटात एखादा छोटासा आधारही मानसिक बळ देतो तसंच काहीसं!

ती कुत्र्यांची झुंड वेगाने पळत आली. एक कुत्रं बिचारं जिवाच्या आकांताने धावत होतं आणि पंधरा सोळा कुत्र्यांची झुंड जिभा लवलवत त्याचा पाठलाग करीत होती.संदेश आणि मनी डोळे विस्फारून एका जागी खिळल्यागत ते दृष्य बघत होते.कुत्र्यांची ती झुंड वेगाने त्या कुत्र्याच्या मागे भुंकत निघून गेली.सुदैवाने एकाही कुत्र्याचे लक्ष भांबावलेल्या संदेश आणि मनी कडे गेले नव्हते. संदेशने सुटकेचा निःश्वास टाकला.

आता मात्र संदेश वेगाने पावले उचलू लागला.मनाची अस्वस्थता घालविण्यासाठी मनीशी गप्पा मारू लागला.'बरं का गं मने, पुढच्या वेळी मुंबईहून येताना साकेतसाठी क्रिकेटची बॅट आणि सानिकासाठी बार्बी डॉल आणायचं प्रॉमिस केलंय दोघांना. मात्र परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे अशी अट सुद्धा घातली आहे नाही तर बसतील हुंदडत दिवसभर अभ्यास सोडून.आणि संयुक्ताला म्हणजे माझ्या बायकोला छानसा पंजाबी ड्रेस शिवाय आई आणि आप्पांना काशी यात्रेला जाण्यासाठी चाकांची बॅग पण आणणार आहे पुढल्या खेपेला मुंबईहून.काय करु गं, जास्त दिवस जाता येत नाही मुंबईला.स्टेशनरीचं दुकान आहे ना माझं! त्यात दुकानात काम करणारा गण्या, एकदम कामचुकार. गप्पा हाणत बसतो दुकानात मित्रांचं टोळकं जमवून मी नसलो की! मग आप्पांना बसावं लागतं सकाळपासून दुकानात. मला पटत नाही गं ते. म्हणून नेहमी धावतपळत येतो मुंबईस्नं. पण आता ठरवलंय, एक दिवस जादा रहायचं आणि सगळी खरेदी करून मगच परतायचं सुरवाडीला.'संदेशची टकळी चालू होती.मनीमाऊ मधून मधून म्यॅंव म्हणत त्याला प्रतिसाद देत होती.सुरवाडी जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या तशी घरच्या ओढीने संदेशच्या पावलांनी अधिकच वेग धरला.लेव्हल क्रॉसिंग चे फाटक उघडे होते.त्यातून सायकली, बाइक्स,रिक्षा, ट्रॅक्टर ची ये जा चालू होती.संदेशने मनीला कडेवर घेऊन काळजीपूर्वक रस्ता क्रॉस केला.स्टेशनच्या बाहेरच जितूची चहाची टपरी होती. नेहमी मुंबईहून पहाटे सुरवाडीला पोहोचल्यावर संदेश आधी जितूच्या टपरीवर चहा पिऊन ताजातवाना होऊन घरी जात असे.पण आज उशीर झाला होता त्यामुळे 'जितू निघतो रे 'म्हणत त्याने जितूला हात केला पण जितू लोकांना चहा देण्यात गर्क असल्याने त्याचे लक्ष गेले नाही. संदेशचे घर स्टेशनपासून जवळच असल्याने तो कधीच रिक्षा करीत नसे.संदेश झपाझप पावले उचलू लागला.घरापाशी वळताना त्याला एक हार घातलेला काळा फळा दिसला.दुःखद निधन असेही त्याने ओझरते वाचले पण कधी एकदा घरी जाऊन सगळ्यांना भेटतोय असे त्याला झाले होते. मनीला हातात धरून तो गेट पाशी आला.

'हे काय? घरात माणसांची एव्हढी गर्दी कशी काय?सगळ्यांचे गंभीर चेहरे, एकमेकांशी कुजबुजत बोलणे....संदेशचे मन एखाद्या अशुभ शंकेने भरुन गेले.आई आप्पांची तब्येत ठीक आहे ना?त्याने गेटच्या आत पाऊल टाकले तोच समोरून आई आप्पांना कोणीतरी धरुन आणत होते.दोघेही अगदी वाकून गेले होते, वयस्कर दिसू लागले होते.सरुआक्का तोंडात पदराचा बोळा कोंबून हुंदका दाबायचा निष्फळ प्रयत्न करीत होती.संदेश बेचैन झाला. नक्की काय झालंय? त्याला दरदरून घाम फुटला.आपली बायको, दोन्ही मुलं कुठे आहेत? त्यांना तर काही झालं नाही ना?तो पुढे होणार इतक्यात साकेत आणि सानिका घरातून बाहेर आले.दोघांचेही चेहरे रडून रडून म्लान झालेले.मग संयुक्ता?

संदेशची वाचा बसली.त्याने मनी ला घट्ट आवळून धरले.त्याच्या पायांनी जणू संप केला होता.काय करावे ते त्याला सुचेना.आपण मुंबई ला गेलो तेव्हा कसं हसतं खेळतं घर होतं आणि आता?

'संयुक्ता, संयुक्ता' संदेशचे मन आक्रोश करू लागले.तेव्हढ्यात जमलेल्या माणसांत एकच कोलाहल झाला.सगळीकडून हुंदके, आक्रोश ऐकू येऊ लागला.

समोर संयुक्ता उभी होती.पांढरी साडी, मोकळं कपाळ,ओकाबोका गळा,भुंडे हात आणि रडून रडून सुजलेले डोळे, म्लान चेहरा आणि हातात फुलांचा हार घातलेला फोटो!

संदेश डोळे फाडफाडून बघत राहिला.तो फोटो...तो फोटो त्याचा होता.हो हो,तो फोटो संदेशचा होता!

'दुकानाच्या कामाला मुंबईला गेलेला आमचा संदेश ट्रेनच्या अपघातात गेला हो',आप्पा रडत रडत सांगत होते.'म्हातारपणात आपल्या कर्त्या मुलाचा मृत्यू बघणे या सारखं दुर्दैव नाही हो,'आप्पा कळवळून बोलत होते.

संदेश एखाद्या दगडासारखा स्तब्ध झाला होता.'म्हणजे...म्हणजे मी जिवंत नाही?मी मेलो आहे? त्या ट्रेन अपघातात?'

म्हणजे  तो पेपर स्टॉलवरील माणूस,पोर्टर,कुत्री यांनी मला पाहिलंच नव्हतं?मी बोललेलं त्यांना ऐकू येत नव्हतं?कोपऱ्यावरचा तो हार घातलेला काळा फळा माझ्या दुःखद निधनाची बातमी देत होता? पण मग ही मनी माऊ ,ही मला कशी काय बघू शकते? ती मला बघू शकते म्हणजे ती...ती सुद्धा मे.. .ले.. .ली आहे? संदेशचे अंग हुंदक्यांनी गदगदू लागले.तो जमिनीवर कोसळला.त्याचा आक्रोश आणि मनीची केविलवाणी म्यॅंव कोणालाही ऐकू येत नव्हती.

अगदी कोणालाही!


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror