नातं बाप लेकीचं
नातं बाप लेकीचं
बाबा आणि मुलगी यांचं नातं अगदी जवळचं आणि जिव्हाळ्याचं असतं. बाबांसाठी मुलगी लक्ष्मीच असते जणू. प्रत्येक बाबा आपल्या मुलीचे लाड, हट्ट पुरवतातच कुठल्याही परिस्थितीत.असेच माझे बाबा आहेत आणि आता माझ्या मुलीचे बाबा मी माझ्या नवर्यात बघते. आम्हाला मुलगी झाली आणि आमचं आयुष्यच बदललं.मुलगी खूप गोड आणि हसर्या चेहर्याची तिच्या गालांवर खळी पडते हसते तेव्हा निसर्गाचं देणं ते. बाबांचं आणि तिचं दिसणं, वागणं सगळं सारखंच. मुलीला बघितलं की दु:ख,वेदना,थकवा विसरून जातात तिचे बाबा.एवढं निरागस आणि निस्वार्थ प्रेम फक्त बाबाच करतात मुलीवर.पण तरीही काळाप्रमाणे आणि जगाच्या रितींप्रमाणे नात्यांचे संदर्भ बदलत जातात.
मुलगी लहान असतांना मी तिच्या बाबाला नेहमी म्हणायची मुलीला अंंघोळ घालत जा, तेल मालिश करत जा.मुलगी लगेच मोठी होईल.मग तुझी वेळ आणि संधी निघून जाईल. म्हणजे बाप म्हणून तू तोच असशील ,तुझा स्पर्शही निरागस असेल पण वयाने संदर्भ बदलतील.स्पर्शांची भाषा कळायच्या आतच फक्त तू तिला अंघोळ घालू शकतो हे तेवढंच कडवट सत्य आहे , तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं खरं, पण ही जगाची रितच आहे.आपल्या आयुष्याला या रितींची मर्यादा रेखा आवश्यकच असते.त्यामुळेच नात्यांना घट्टपणा येतो. असं बापलेकीचं नातं विश्वास आणि प्रेमावर पुढे जातं.
