बाप-लेकीचं नातं
बाप-लेकीचं नातं
बाप आणि लेकीचं नातं खूप जवळचं ,जिव्हाळ्याचं असतं.प्रत्येक बाबांसाठी त्यांची मुलगी लक्ष्मीच असते जणू.बाबाला जाणीव असते मुलगी परक्याचं धन असतं याची म्हणून प्रत्येक बाबा मुलीला हवं ते देतात अगदी कुठल्याही परिस्थितीत तिचे सर्व हट्ट ,लाड पुरवतात.असेच बाबा माझे आहेत आणि आता मी तेच बाबा माझ्या नवर्यामध्ये बघत असते.
आम्हाला पहिली मुलगी झाली आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं.ती पण ईतकी गोड दोन्ही गालांवर खळी पडणारी,हसर्या चेहर्याची. तिच आमचं दोघांचं जग. पण बाबा आणि लेक यांचं सगळं सवयी,वागणं,दिसणं सारखंच.लेक म्हणजे बाबाची सावलीच जणू. ती लहान असताना मी तिच्या बाबांना म्हणायची मुलीला अंंघोळ घालत जा, मालिश करत जा.पोरगी पटकन मोठी होईल.मग तुमची वेळ अन् संधी निघून जाईल. म्हणजे बाप म्हणून तुम्ही तोच असाल ,तुमचा स्पर्शही निरागस,स्नेहार्द्र असेल पण वयाने त्या स्पर्शाचे संदर्भ बदलतील.स्पर्शांची भाषा कळायच्या आतच फक्त तुम्ही तिला अंघोळ घालू शकता हे सत्य कटू आहे. पण ही जगरहाटीच आहे.या जगरहाटीला आपण बदलू शकत नाही कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणाला,नात्याला कुठेतरी मर्यादेची रेखा असावीच लागते. तरच ते नातं फुलतं, घट्ट होत जातं, त्या त्या वेळी त्या नात्याची किंमत कळते.
