Shilpa Dange

Abstract Others

4.0  

Shilpa Dange

Abstract Others

आईपण

आईपण

7 mins
353


वटपोर्णिमेच्या पुजेला बाहेर पडलेली समिधा घरात आली ती डोळे लाल होऊनच.घरात येताच बेडरूममध्ये गेली दरवाजा ढकलला अन् रडत बसली. रडता रडता तिला झोप लागली.

बाहेरून सासूबाई- " समिधा झोपलीय का गं ? "

आवाज येताच समिधाला खाडकन जाग आली.

ती पटकन बाहेर आली आणि "दुपारचा चहा राहीलाच आई?" म्हणत लगबगीने चहा केला आणि चहाचा कप घेऊन आली. सासूबाईंना खूर्चीवर बसवले आणि चहा बशीत ओतून थोडा थंड करून हातात दिला.

समिधाने पोर्चमध्ये व्हीलचेअरमध्ये बसलेल्या समीरला चहा दिला.चहा घेऊन झाल्यावर

समीर- "दुपारपासून दिसलीच नाहीस ,कुठे गेली होती? आणि तुझे डोळे इतके लाल कसे झाले?"

समिधा -"आज वटपोर्णिमा. वडाची पुजा करायला गेली होती. दुपारी कधी झोपत नाही आज झोपली, त्यामुळे डोळे लाल झाले असतील".

समीर- "कशाला ती पूजा ? या बिछान्यावर पडलेल्या अधू जिवासाठी? तू कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असलीस तरी मला तुझ्या डोळ्यांकडे बघूनच तुझं दु:ख कळतं. तुला नक्कीच पुजेला भेटलेल्या बायका मूलबाळ नाही यासाठी बोलल्या आणि तू रडल्यामुळे डोळे लाल झाले. तुझी आई होण्यासाठीची तळमळ मी नेहमीच बघतोय समिधा. पण ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींसाठी किती झुरायचं? मला माहित आहे तुला सुध्दा हे सगळं कळतं पण हा समाज एका स्त्रीला मूल नसेल तर 'वांझ' हाच ठपका लावतो...अगदी ती स्त्री बाकी सर्व गुणांनी समृध्द असली तरीही..


अपघात झाल्यावर एका जागेवर पडलेल्या नवर्‍याला सोडून गेलेल्या कित्येक बायका मी उघड्या डोळ्यांनी बघितल्यात .पण समिधा तू माझं अगदी लहान मुलासारखं सगळं करतेस तेही निरपेक्ष ,निःस्वार्थ भावनेनं मनापासून. जशी एक आई लहान बाळासाठी करते तशीच. वास्तविक या वयात तुझ्या आयुष्याकडून, माझ्याकडून वेगळ्याच अपेक्षा असतील पण त्यांना दूर ठेवून तू माझ्यासाठी सगळं करतेय.


लहान बाळानं रात्री कितीही जागवलं तरी, आईच दुसर्‍या दिवशी लवकर उठून बाळाचं सगळं उत्साहानी करते .मुलांचे सगळे नखरे ,रूसवे फुगवे आईच सहन करते . बाळ कसंही असलं म्हणजे अधु-अपंग,कुरूप-सुंदर,काळं-गोरं तरीही फक्त आईच 'माझं' बाळ म्हणून लाड करते. रात्री बाळ शांत झोपलंय का बघत पांघरूण नीट करते.तशी तू माझी आई बनून 2वर्षांपासून रात्रीही मला बघते. अंगावरचं पांघरूण नीट करते. अपघातात पाय व हात मोडले त्यावेळी मला तू मायेनं भरवलंस, माझी चिडचिड,राग सगळं सहन केलं अगदी जसं लहान बाळाचं किंचाळणं,रडणं,आकांत आई सहन करते. मला चालता येत नसतांना हात धरून चालवलंस .


माझ्या आईची तू मनापासून सेवा करते .तू आमचा सांभाळ आईप्रमाणेच करते आहे. आमच्या मनाच्या जखमांवर हळूवार मायेनं फुंकर घालून आमचं दु:ख कमी करते.अजुन काय हवं असतं गं आई होण्यासाठी?

  

मनं जुळली की शरीरं जुळलीच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? खरं तर जगरहाटीप्रमाणे मन आणि शरीर जुळले की पती-पत्नी चांगले साथीदार बनतात .पण चांगल्या साथीदारांमध्ये या गोष्टी असाव्यातच असं काही नसतं. याची जाणीव तू करून दिली सतत दु:ख-संकटांमध्ये माझ्या सोबत राहून, तुझ्या सगळ्या ईच्छांना मारून.

  मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आणि करू शकणारही नाही हे माहीत असतानाही तू माझ्यासाठी वडाची पूजा केलीस ".

समिधा -"मला पुढील सर्व जन्मात तुमचीच साथ हवी आहे."

समीर हळवा होत- "तूला खरं तर मी कुठल्याही प्रकारचं सुख दिलं नाही उलट त्रासच दिला आहे. या अधू जीवाला तूझं हे प्रेम ,मायाच जगण्याचं बळ देतं."

समिधा वाॅकरने घरातच फिरत असलेल्या समीरला 

"आपल्या माणसांचा कधी त्रास होतो का? तुम्ही फक्त आराम करा. डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे थोडा व्यायाम करा आणि लवकर बरे व्हा".

  समिधा घरात गेली. सासूबाईंना जागेवर झोपण्यास मदत करत होती तोच दारावरची बेल वाजली. समिधाने दार उघडलं. देशमुख काकू आल्या होत्या.

"देशमुख काकू या. बसा. पाणी आणते." समिधा पाणी आणण्यासाठी निघून गेली.

 सासूबाईंना देशमुख काकू "वहिनी कशा आहात?तुम्हालाच भेटायला आलीय मी".

सासूबाई - "मी मजेत. तूम्ही कशा आहात?"

देशमुख काकु -" मी पण अगदी मस्त दोन्ही मुलांची लग्न झाली .सगळे एकत्रच राहतो. सोबतच नातवंड आहेत छान खेळायला! खूप आनंदात आहे"

देशमुख काकू जरा बिचकतच - "वहिनी एक विचारू का? पण वाईट नका वाटून घेऊ?"

सासूबाई - "विचारा हो .जे काय मनात असेल नि:संकोच बोला."

देशमुख काकू- " समिधाच्या लग्नाला 15-16 वर्ष झाले असतील नाही?पण मुलबाळ..काही treatment सुरू केलीय का?"

तेवढ्यात समिधा पाणी घेऊन आली, पण शेवटचे शब्द ऐकताच तिचे डोळे भरून आले.

  आत जायची हिंमतच नाही झाली .दुपारी पूजेला गेली, तिथेही साऱ्यांचा विषय हाच ,त्या बायकांची ती कुजबूज. मनात असंख्य प्रश्न.... तिच्यावरचा ठपका... वांझपणाचा .

  तेवढ्यात तिला सासूबाईंचे बोलणे ऐकू आले.

सासूबाई -"त्याची तिला काय गरज आहे? देशमुख काकु जग आई होण्यात,बाळाला जन्म देण्यातच बाईचं बाईपण ठरवतं.पण खरं तर आईपण प्रत्येक स्त्रीला जन्माने स्त्रीत्व लाभल्यापासूनच आलेलं असतं.तिला शरीराचं सौंदर्य,मनाचं औदार्य,सहनशक्ती लाभलेली आहे प्रकृतीकडून.

देशमुख काकू आश्चर्याने फक्त ऐकत राहिल्या.

समिधाच्या मनात एवढ्या वेळात असंख्य प्रश्नांचा गोंधळ उडाला.

सासूबाई - "देशमुख काकू,समिधा माझी सून नाहीच. ती आई झाली जेव्हा ब्रेन ट्यूमर च्या आॅपरेशनमधून मी वाचले, पण दोन्ही डोळे गमावून आंधळी झाले आणि पॅरलीसीसच्या झटक्याने शरीर निकामी झाले.

लेकानं कुठलाही विचार न करता हॉस्पिटल मध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला. जीव वाचला आॅपरेशनमध्ये डोळे कायमचे गमावले . त्यावेळी माझा जीव फक्त मृत्युसाठी आसुसलेला, पण समिधा-माझी आई जिने फक्त वाट बघीतली माझ्या बरी होण्याची तिच्या चेहर्‍यावरचा आनंद ते सांगत होता. म्हातारपण म्हणजे लहानपण असतं ऐकलंच होतं .पण हे लहानपण चांगल्या रितीने अनुभवतेय मी ते ह्या माझ्या आईमुळे .


देशमुख काकूंचे डोळे भरून आले. सासूबाई पुढे सांगू लागल्या. "ही आई सकाळी लवकर उठून माझं स्वतःच्या हातानं सगळं करते. माझं कधी काही दुखलं तर मी रात्रभर झोपत नाही तेव्हा ती जागी राहते न कंटाळता. रोज दोन तीन तासांनी जे हवं ते गरम गरम बनवून खाऊ घालते. हे सगळं फक्त एक आईच करते....एवढा संयम,सहनशीलता ...फक्त एका आईत असते.

ती आई परत आई झाली ती माझ्या मुलाचा अपघात झाला तेव्हा. लग्न झालं की मनं जुळले की साथ कायम राहते अगदी कितीही भयंकर संकटं आले तरी, याची जाणीव या आईनं करून दिली. नाहीतर शरीरं जूळून केवळ मुलाबाळांसाठीच सोबत राहणारे कितीतरी जोडपे आपण बघतोच.

 

 समीरचा अपघात झाल्यावर त्याची अवस्था तिला बघवत नसतांनाही त्राण आणून तो बरा होण्यासाठी काय काय केलं तिनं हे मी डोळ्यांनी बघितलं जरी नाही तरी त्याची मला कल्पना आहे. ती हरली नाही ,रडत बसली नाही ,धडपडली तिचे तिने मार्ग शोधले. त्या लेकाचं करताना ह्या लेकीला काहीही कमी पडू दिलं नाही तिने.आणि आमच्यासाठी हे सगळं करतांना तिने केलेल्या तडजोडीमध्ये पश्चातापापेक्षा प्रेमाचीच जाणीव जास्त आहे .तिच्या मनाच्या तळामध्ये आमची जागा किती खोलवर आहे याचं मोजमापच होणार नाही.


  कुठलीही हेळसांड न करता या आईनं माझी आणि समीरची सेवा केली .हे सगळं करतांना तिच्या डोळ्यातलं प्रेम बघूनच आम्हाला अजून जगावेसे वाटते. तिच्या एकटीवर घराची जबाबदारी आहे. घरातली बाहेरची सगळी कामं करून कुठलिही कुरबूर न करता दोघांचं एवढं कोण करते फक्त आईच .


किती हळूवारपणे सांभाळले तिने हे नाते. आईचं मन ते फक्त आनंद द्यायचा. दुःख सारं मनाच्या तळाशी लपवून ठेवायचं. दाटलेले ढग सहज मोकळे होऊन जातात. पण दाटलेले मन सहजासहजी मोकळे होत नाही. फक्त स्वतःच्या पोटात नऊ महिने जीव वाढवून जन्म दिला एका जीवाला की आई होता येतं का? आपण सगळेच वांझ आहोत विचारांनी.नविन विचारांना, नविन बघण्याच्या दृष्टीला आपण थाराच देत नाही. समाजात जे आई-वडिलांना सांभाळत नाहीत, त्यांच्याकडे आजारपणात, त्यांच्या दुःखाच्या काळात बघत नाहीत, वर्षानुवर्षे नातेवाईक ,मित्र ,मैत्रीणी ,एकमेकांशी बोलत नाहीत ते सगळे नाते वांझ आहेत. उसवलेले धागे तुटायला अजून सैल करण्याची गरज जशी नसते तसंच आईपण कळायला आई होण्याचीच का गरज असावी?


 समिधाच्या -माझ्या आईच्या मायेचं मोजमाप नाही करू शकत . तिला वांझ ठरवणारे आपण कोण? स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच, पण माझ्यासारख्या आंधळ्या, अधू म्हातारीची आई होणं... त्यासाठी असलेल्या समिधाच्या मनाची श्रीमंती अन् शुद्धतेची कल्पनाही कोणीच करू शकत नाही.


  अशा अवस्थेत मुलंही वृध्द आईला वृद्धाश्रमात पाठवायला मागे -पुढे पाहात नाहीत.  माझ्याच पोटची मुलगी अन् दुसरी सुन फक्त चौकशी करून निघून जातात. त्यांचा संसार, मुलंबाळं सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे?जन्म देवून ही मी आई झालेच नाही का?, हा प्रश्न माझा मलाच पडतो. 


   दुसऱ्यांच्या मुलांमधील उणीवा काढताना आपल्यातल्या उणीवा,दोष, पडक्या बाजू सोयीने लपवायच्या ,का तर ती आई झाली नाही.आईपण फक्त स्वत:च्या बाळाची होण्यातच नाही. एक बाळ आणि आई ह्या पलीकडे जाऊन संपूर्ण घराची आई होण्यात असतं. ह्या घराला जिने घरपण दिलं, ह्या म्हाताऱ्या लेकीला जिने जगण्याचं बळ दिलं, त्या लेकाला जिने आयुष्यात परत उभं राहण्यासाठी आधार देऊन नवीन जीवन दिलं ती वांझ कशी असेल....तीच खरी आई आहे.आपण तिचं आईपण शोधतोय तोच आपल्या मनाचा कोतेपणा आहे,आपल्यातल्या माणूसकीतला कमीपणा आहे.



हे सारं ऐकून देशमुख काकूंचे डोळे गच्च भरलेले होते. समिधाच्या चेहर्‍यावर समाधान आणि जबाबदारीची जाणीव दिसत होती ती आईपणाची. हे नातं सांभाळण्यासाठी ती नव्या उमेदीने, विश्वासाने तयार झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract