Pratibha Tarabadkar

Crime

2  

Pratibha Tarabadkar

Crime

मुखवटे

मुखवटे

11 mins
119


 घड्याळाचा काटा दहाच्या पुढे सरकू लागला तशी मानसी अस्वस्थ झाली.ऑफिसला जायला उशीर होत होता.दहा मिनिटे झाली तरी रांग तसूभरही पुढे सरकत नव्हती.मानसीच्या गावातील ही एकुलती एक राष्ट्रीयीकृत बँक असल्याने येथे कायमच गर्दी असे.पण आज मात्र सहनशीलतेचा अंत पाहिला जात होता.मानसीने काऊंटर जवळ जाऊन पाहिले.काऊंटरपलीकडचा कर्मचारी मोबाईलवर गप्पा मारत होता.जणू काऊंटर पलीकडची रांग त्याला दिसतच नव्हती.मानसीचा संताप झाला.तिरीमिरीने ती बॅंक मॅनेजरच्या केबिनमध्ये घुसली.

  'येस्स! व्हॉट कॅन आय डू फॉर यू मॅडम?'टेबलावरील लॅपटॉप पलीकडून आवाज आला.एक तिशीचा, सोनेरी काड्यांचा चष्मा घातलेला तरुण तिला विचारीत होता.मानसी त्याला पाहून गोंधळली.आपण केबिनमध्ये कशासाठी आलोय हेच तिला आठवेना. 'इथले पारेकर सर कुठे गेले?'तिने चाचरत विचारले.तो तरुण गालातल्या गालात हसला.'त्यांची ट्रान्स्फर झाली.आता मी इथला मॅनेजर आहे.माझं नाव अजय पाटील ',तो तरुण मॅनेजर जरी मराठीत बोलत होता तरी त्याच्या उच्चारांचा दक्षिणी ढंग मात्र लपत नव्हता.मानसी हळूहळू नॉर्मल झाली.केबिनमधील गारव्याचा परिणाम असेल कदाचित!

   'तो काऊंटर वरचा कर्मचारी काम सोडून मोबाईल वर गप्पा मारतोय.मला ऑफिसला उशीर होतोय,'मानसीने एका दमात सांगून टाकले.मॅनेजरच्या कपाळावरची शीर तटतटली.ताड्कन् उठून तो केबिन बाहेर आला.काऊंटरसमोरची रांग बघून तो ताडताड पावले टाकत कर्मचाऱ्याजवळ जाऊन उभा राहिला.कर्मचारी त्याला पाहून चपापला आणि मोबाईल खाली ठेवून कामाला लागला.मात्र मानसीला आता खूपच उशीर झाला होता.आता उद्याच येऊन बॅंकेतील काम करू असे ठरवून तिने स्कूटी वर टांग मारली आणि ऑफिसच्या दिशेने भरधाव सोडली.

  दुसऱ्या दिवशी मानसी जेव्हा बॅंकेत पोहोचली तेव्हा तिला बॅंकेतील वातावरणात फरक दिसून आला.सर्व कर्मचारी आपापल्या कामात मग्न होते.बॅंकेत तुरळक प्रमाणात माणसं दिसत होती.मानसी स्वतः शीच खुद्कन हसली.कालच्या तक्रारीचा परिणाम झाला होता तर!मानसीचे काम पाच मिनिटांत झाले.परत जाण्यासाठी ती वळली तोच बॅंकेचा प्यून तिला बोलवायला आला.मानसीला आश्चर्य वाटले.जरा भांबावूनच ती मॅनेजरच्या केबिनमध्ये शिरली.मॅनेजर अजय पाटीलने तिला समोरच्या खुर्चीवर बसण्याची खूण करीत विचारले,'झाले का काम?काल तुम्ही अचानक निघून गेलात?' त्याच्या दाक्षिणात्य हेलांची मजा वाटून आलेले हसू दाबत मानसीने मान डोलावली.

'परत काही प्रॉब्लेम आला तर मला भेटा'.'बरं'असे पुटपुटत खुर्ची सरकवत मानसी उठली.

 मानसीचे गाव तालुक्याचे ठिकाण असून धान्याची मोठी बाजारपेठ असल्याने लाखोंची उलाढाल होत असे.मानसी बी.कॉम.होऊन गावातील एका सी.ए.कडे असिस्टंट म्हणून नोकरी करीत होती.मानसीचे साधे सरळ वडील नगरपरिषदेत कारकून होते तर आई गृहिणी होती.मानसीला नववीत शिकणारा भाऊ होता.

     मानसीला ऑफिसच्या कामासाठी वेळोवेळी बॅंकेत जावे लागे.ती बॅंकेत जाई तेव्हा बहुतेक वेळा बॅंक मॅनेजर केबिनमधून बाहेर येऊन तिच्या कडे परिचयाचे हास्य फेकून जात असत.एकदा ती पासबुक अपडेट करण्यासाठी बॅंकेत गेली असता मॅनेजर साहेबांनी बोलावले आहे असा निरोप घेऊन प्यून आला.आपल्याकडे त्यांचे काय काम असावे असा विचार करीत मानसी केबिनमध्ये शिरली.'आमचा प्रिंटर खराब झाला आहे.पासबुकमध्ये व्यवस्थित प्रिंट झाले आहे का हे तपासून पहाण्यासाठी बोलाविले', मॅनेजर अजय पाटलांच्या खुलाशावर मानसीने न बोलता पासबुक पुढे केले आणि मॅनेजरच्या नावाची पाटी निरखत बसली.दोन मिनिटांत अजय पाटील यांनी पासबुक परत केले.मानसी 'धन्यवाद'असं यांत्रिकपणे म्हणून केबिन बाहेर पडली.बॅंकेच्या पायऱ्या उतरता उतरता ती पासबुक चाळू लागली तोच पासबुकातून एक कागद पडला.कसला कागद म्हणून मानसीने कुतूहलाने उचलला.कागदावरुन नजर फिरवताच मानसीच्या हृदयाची धडधड वाढली.नजर विस्फारली.तिने ते पासबुक आणि तो कागद पट्कन पर्समध्ये कोंबून स्कूटी जी भरधाव सोडली ती ऑफिस आल्यावरच थांबवली.

  मानसी तो कागद एकटीच असतांना हळूच उघडून वाचत होती.

   आप आते नहीं तो

वक्त गुजरता क्यों नहीं

आप आते हो तो

वक्त ठहरता क्यों नहीं?


या दोन पंक्तींनंतर एक मोबाईल क्रमांक होता.बस्स! एव्हढेच!खाली नाव,सही वगैरे काहीच नाही.

  नक्कीच बॅंक मॅनेजर अजय पाटील यांचेच ते काम होते! मानसी मोहोरलीच! तिला आजवर एव्हढे रोमॅंटीक कोणी भेटलेच नव्हते.कॉलेजमध्ये‌ असतानादेखील थोड्या कॉमेंट्स ,थोडे फ्लर्टींग इतपतच,पण आता पंचविशीत,ते ही एखाद्या बॅंक मॅनेजरला आपल्याबद्दल असे वाटावे!

  दिवसभर मानसीची अवस्था सैरभैर झाली होती

काम करताना मधूनच टेबलाच्या खणात ठेवलेल्या पर्समधून तो कागद काढून वाचत होती आणि स्वतः शीच खुदूखुदू हसत होती.

    ऑफिसचे काम संपले आणि मानसीने हळूच आजूबाजूला नजर फिरवली.जो तो आपल्या कामात दंग होता.मानसीने कागदावरील नंबर फिरवला.पलीकडून ताबडतोब उचलला गेला.

  ' हॅ...हॅ... हॅलो ',मानसी चाचरत म्हणाली.ती इतकी घाबरली होती की तिच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्टपणे ऐकू येत होते.'बोल मानसी,'पलीकडून अजय पाटलांचा आवाज ऐकू आला.मानसीला काही सुचेना.ती गप्पच राहिली.'मानसी, उद्या शनिवार, म्हणजे तुला हाफ डे असेल ना?आपण असं करू, उद्या दुपारी तीन वाजता गांधी रोडवरील तृप्ती कॅफे मध्ये भेटू.मला तुझ्याशी काही बोलायचंय.येशील ना?'मानसी गांगरली पट्कन हो म्हणून तिने फोन बंद केला.

   दुसऱ्या दिवशी मानसीने तिचा आवडता पंजाबी ड्रेस घातला.'आज काही विशेष?'असं आईने टोकल्यावर ', काही नाही ग, आमच्या ऑफिसमध्ये एक वाढदिवसाची पार्टी आहे तर मला आज घरी यायला उशीर होईल' असे सांगून आईने आणखी काही चौकशा करण्याच्या आत मानसी सटकली.एव्हढ्या सफाईदारपणे आपण कसे खोटं बोलू शकलो याचे मानसीला हसू आले.

   दुपारी बरोबर तीन वाजता मानसी तृप्ती कॅफे मध्ये शिरली व शोधक नजरेने इकडे तिकडे पाहू लागली तोच कोपऱ्यातील टेबलावरुन अजय पाटीलने हात केला.मानसी त्यांच्या समोरील खुर्चीवर बसली.'काय घेणार? चहा की कॉफी?''कॉफी'मानसी तोंडातल्या तोंडात पुटपुटली.अजयने वेटर कडे बघून 'दोन कॉफी 'अशी बोटं दाखवली.वेटरने कॉफीचे कप ठेवले आणि मानसी भानावर आली.'सर, तुम्ही मला का बोलावले?'मानसीच्या या प्रश्नावर अजयसर गंभीर झाले.

'मला तू आवडतेस.माझ्याशी लग्न करशील का?'त्यांनी एका दमात विचारले.मानसी उडालीच.'काय?पण सर , तुम्ही मला कुठे ओळखता?'मानसी त्यांच्या या रोखठोक प्रश्नावर‌ एकदम बावरुन गेली होती.'तुमच्या वाड्यातील कुलकर्णी काकूंकडून माझा डबा येतो जेवणाचा शिवाय तुझे बॉस लोढा सर,आधीचे बॅंक मॅनेजर पारेकर सर यांच्या कडून सगळी माहिती घेतली आहे तुझ्या बाबत! माझं होमवर्क तयार आहे ',अजयसर हसत म्हणाले. 'आणि माझ्या बद्दल म्हणशील तर माझं संपूर्ण नाव अजय मधुकर पाटील.माझे आईवडील धारवाड जवळ सुंगलहळ्ळी गावात रहातात.मी एकुलता एक आहे आणि माझे शिक्षण एम.कॉम.व फायनान्स मध्ये एम.बी.ए. आहे.माझे आप्पा आणि अम्मा येत्या रविवारी मला भेटायला येणार आहेत.तुला जर मी पसंत असेन तर पुढील हालचाल करता येईल.'अजयसरांनी एका दमात सांगून टाकले.त्यांच्या या आकस्मिक प्रस्तावाने मानसी एकदम गडबडून गेली.घरी आईबाबांना सांगते असे पुटपुटत ती पर्स घेऊन उठली.

 संध्याकाळी मानसीच्या घरी बैठक जमली.मानसीचे गावातील मामा मामी, वाड्यातील कुलकर्णी काकूही आल्या होत्या.वातावरण गंभीर झाले होते.

 मानसीचा विवाह ही घरातील जटील समस्या बनली होती.गेली तीन चार वर्षे मानसी साठी वरसंशोधन चालू होते.पण यश मात्र मिळत नव्हते.कधी उंचीवरून तर कधी सावळ्या रंगावरून तर कधी तुटपुंज्या पगारावरुन , कधी पत्रिकेची सबब पुढे करून नकार येत होते.त्यामुळे सारेजण चिंतेत होते.

   'अहो, काही काळजीच करू नका.'कुलकर्णीकाकू ठासून म्हणाल्या.'बॅंकेचे हे मॅनेजर अतिशय सज्जन, निर्व्यसनी आहेत.एव्हढ्या मोठ्या पदावर असूनही गर्व नाही.हिशेबाला एकदम चोख!'डबेवाल्या काकूंनी निर्वाळा दिला.

   सर्वांनुमते अजयसरांना आणि त्यांच्या आईवडिलांना घरी बोलावण्याचे ठरले व त्यानुसार मानसीच्या बाबांनी अजयसरांना फोन केला.'मुलगा नम्र वाटतोय बोलण्यावरुन,'मानसीच्या बाबांनी अभिप्राय दिला.

  रविवारी मानसीच्या घरी धांदल उडाली होती.घरातील पसारा आवरणे, नव्या चादरी,पडदे बाहेर आले.आजूबाजूच्या घरातून जादा खुर्च्या आणवल्या.मानसीने साडी नेसावी का पंजाबी ड्रेस घालावा याबाबत स्त्री वर्गात खल चालू होता.बघता बघता चार वाजले आणि दारात रिक्षा उभी राहिली.

   रिक्षातून अजय उतरले, पाठोपाठ त्यांचे आईवडील उतरले.आज अजय टी.शर्ट व जीन्स मध्ये होते.त्यांचे आईवडील साठीच्या आतबाहेर असतील.त्यांच्या आईच्या नाकातील चमकी आणि कानातील कुड्यांवर सूर्याची किरणे पडताच त्या लख्खकन चमकल्या.

   'या,या.घर सापडण्यास त्रास तर झाला नाही ना?'मानसीच्या आईवडिलांनी स्वागत करीत विचारले.'नाही.मी कुलकर्णी काकूंकडे एक दोनदा येऊन गेलोय 'अजय उत्तरले.

   अजयच्या आईने आल्या आल्या एक भलेमोठे पुडके मानसीच्या आईच्या हातात दिले.'अहो हे काय?'मानसीची आई संकोचून म्हणाली.

  'काय नाही वोss पयल्यांदा आलोय म्हणून खाऊगिऊ आणलंय बगा! आमचं धारवाडचं पेडं गिडं!'अजयच्या आईचं भारी मराठी ऐकून मानसीचा भाऊ रोहन हसू दाबत आत पळाला.

   वातावरण हळूहळू सैलावले.'मी तुमचं माफी मागतंय बगा, आमचं मराटी तेव्हढं च्यांगलं नाही,'अजयचे आप्पा हात जोडून म्हणाले.'अहो त्यात काय एवढं?'मानसीचे बाबा घाईघाईने बोलले,'तुम्हाला एव्हढं तरी मराठी येतं, आम्हाला तर तुमच्या कानडीचा ओ की ठो सुद्धा येत नाही.'यावर सारेजण खळखळून हसले.सर्वांचे चहा पाणी, खाणेपिणे झाले आणि आता मुद्द्याचे बोलावयाचे म्हणून सर्वजण गंभीर झाले.

    'आमचं अजयनी तुमचं मानसी आवडलंय असं सांगिटलंय.

'आमाला पण पसंत आहे.तुमचं फॅमिली पण छान आहे तर पुढे काय करायचं?आमी सुंगलहळ्ळी गावात रहातंय,शेतीगिती करतंय बगा.तुमाला काय चवकशी करायची असेल तर यू आर वेलकम टू अवर प्लेस.विचार करा आणि सांगा ',अजयचे अम्मा, आप्पा उठले.मानसीचे बाबा त्या तिघांना सोडण्यासाठी बाहेर पडले.

 'मी म्हणते,काय हरकत आहे पुढे जाण्यास?'मानसीची आई म्हणाली.'मुलगा चांगला राष्ट्रीयीकृत बँक मध्ये मॅनेजर, शिवाय त्याचे आईवडील मानसीला रीतसर बघून गेले.त्यांच्या गावी येण्यासाठी आमंत्रण दिलं,मग त्यांच्या गावी जाऊन त्यांचं घर बघून येऊ.'

  'ताई,मला पण अजयसर, त्यांचं आप्पा, अम्मा आवडलं बरं का!'रोहनच्या या टिप्पणीवर गप रे म्हणत मानसीने डोळे वटारले व सगळे हसू लागले.

   पुढचे आठ दिवस खूपच धामधुमीत गेले.मानसीच्या बाबांनी शक्य तिथून अजयची माहिती गोळा केली.सर्वांनी मुलगा अतिशय सुसंस्कृत आहे अशी हमी दिली.नंतर अजयला भेटून त्यांच्या गावी येण्याजाण्याच्या तारखा फिक्स केल्या.

   मानसी या घडामोडी पहात होती.अचानक घडणाऱ्या घटनांनी ती गडबडून गेली होती.

   सुंगलहळ्ळी गाव म्हणे धारवाड पासून फक्त पाच किलोमीटर वर होते.तिथवर कसे जायचे याचा खल चालू असतानाच बॅंकेचा प्यून अचानक धारवाडपर्यंतची रेल्वेच्या फर्स्ट क्लासची तीन तिकिटे घेऊन आला.मॅनेजरसाहेबांनी पाठविली आहेत म्हणाला.सर्वजण गडबडले.मानसीच्या बाबांनी ताबडतोब अजयना फोन लावला तर ते म्हणाले, त्यांना आप्पांनीच तसे करावयास सांगितले होते.

   मानसी आणि तिचे आईबाबा रेल्वे स्टेशन वर आले तेव्हा त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.अजय स्वतः त्यांना निरोप देण्यासाठी स्टेशन वर आले होते.

   मानसीच्या वडिलांचे उत्पन्न तुटपुंजे असल्याने दोन तीन वर्षांनी कुलदेवतेस जाणे इतपतच पर्यटन त्यांना परवडत होते.त्यामुळे धारवाड पर्यंतचा प्रवास त्यांना नाविन्यपूर्ण वाटतं होता.

    गाडीने मिरज सोडले आणि सर्वत्र कानडीचा प्रभाव जाणवू लागला.स्टेशनवरील कानडी पाट्या,गाडीत चढणारे,कानडीत आपसात संवाद करणारे प्रवासी यामुळे बावरलेल्या मानसी आणि तिचे आईबाबा यांनी धारवाड स्टेशन आले तशी सुटकेचा निःश्वास टाकला.आता सुंगलहळ्ळीला कसं जायचं याचा विचार करीत ते इकडे तिकडे पहात असतानाच त्यांच्या नावाची पाटी घेऊन उभा असलेला एक माणूस त्यांना दिसला.ते तिघे त्याच्या जवळ गेले असता सुस्वागतम असे म्हणून तो माणूस त्यांना एका आलिशान गाडी जवळ घेऊन गेला.पंधरा वीस मिनिटात गाडी मुक्कामाला पोहोचली.अजयचे आप्पा आणि अम्मा त्यांच्या स्वागतासाठी सुहास्य मुद्रेने उभे होते.'प्रवास नीट झाला ना ', आप्पांच्या प्रश्नावर तिघांनी नुसत्या माना हलवल्या कारण त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते.आप्पा आणि अम्मांच्या मागे एक प्रशस्त राजवाडाच होता जणू! निःशब्द, भारलेल्या अवस्थेत त्यांनी आत प्रवेश केला.आतली ऊंची सजावट मालकाच्या श्रीमंतीची साक्ष देत होती.

चहापाणी झाल्यावर आप्पांनी सगळा बंगला फिरुन दाखवला.देवांसाठीही एक मोठी खोली होती.स्वयंपाकघर आधुनिक होते पण त्यात सर्व दाक्षिणात्यांसाठी 'मस्ट'असलेला इलेक्ट्रीक रगडा ही होता.

थोडी विश्रांती झाल्यावर आप्पांनी तिघांना आपली शेती दाखवावयास नेले.बोलण्याच्या ओघात ते एक प्रगतीशील शेतकरी असून त्यांच्या भाज्या,फळे एक्सपोर्ट होतात हे कळले.गोऱ्यापान, पांढरे केस असलेल्या आप्पांची नजर शेतात काम करणाऱ्या कामगारांवरुन घारी सारखी फिरत होती.एखाद्या कामचुकारावर ते कानडीतून ओरडत होते.त्यांची करारी मुद्रा,हुकूमत गाजवण्याची पद्धत पाहून मानसी थोडी धसकलीच!

  घरी आल्यावर सर्वजण ताबडतोब जेवावयास बसले.अम्मांनी खास कानडी पदार्थ केले होते.

'तुम्ही एव्हढे कष्ट कशाला घेतले?'मानसीची आई संकोचून म्हणाली.

 'छेss हो, मी नुसतं देखरेख केलं बगा.आमचं गंगव्वा सगळं करतंय'.अम्मांनी हाक दिली.चाळीशीची एक बाई आतून आली.तिने सर्वांना नमस्कार केला.

 'हे गंगव्वा,दिवसभर माझ्या जवळच असतंय बगा'!

  मानसी आणि तिचे आईबाबा आप्पा आणि अम्मांच्या अतिथ्यशील, आपुलकीच्या वागण्याने भारावले.

 मानसीच्या वडिलांनी हळूच लग्नाचा विषय काढला.'आप्पासाहेब, तुम्ही खूप श्रीमंत आहात

आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती.मी एक साधा कारकून.मला हुंडा, थाटामाटात लग्न... काहीसुद्धा परवडणारं नाही.'

'अवो,आमाला फक्त मुलगी आणि नारळ पाहिजे बगा.लग्नाला फक्त दहा माणसं आणू.इतकं लांब कोण येणार?मग इकडं मोठ्ठं रिसेप्शन घालून सोडतंय बगा!काय अजयच्या अम्मा, बरोबर आहे ना?'अम्मांनी हसून संमती दर्शविली.आप्पा

थोडं थांबून म्हणाले,'अजयला मुलगी आवडली ना मग झालं! त्याला आमच्या कर्नाटकचं कुटलंच मुलगी आवडलं नाही.तुमचं मानसी बघिटलं आणि तिच्याशीच लग्न करायचं म्हटलं ', आप्पांनी डोळे मिचकावले तेव्हा मानसी लाजली.

सुंगलहळ्ळीहून निघतांना अम्मांनी भाज्या, मसाल्याचे पदार्थ,खाऊ म्हणून मांडे, मानसी आणि तिच्या आईला ऊंची, रेशमी धारवाडी साड्या तसेच तिच्या वडिलांना शर्ट पॅंटचे कापड दिले.संकोचाने तिघांचा जीव मुंगी एव्हढा झाला.परतीच्या प्रवासात तिघेही आनंदाने फुलले होते.'नशीब काढलं मानसीने'असं आई पुन्हा पुन्हा म्हणत होती.घरी आल्यावर आप्पांना होकाराचा फोन गेला.आणि पंधरा मिनिटांत अजयचा टेक्स्ट मेसेज मानसीला आला.एक उर्दू शेर आणि संध्याकाळी भेटण्याचा संदेश होता. मानसी व अजय एकमेकांना भेटले तेव्हा त्यांच्यातील परकेपणाच्या भिंती गळून पडल्या.ते दोघे नियमित भेटत होते,बाइकवरुन फिरायला जात होते.साऱ्या गावाला त्यांचे लग्न ठरल्याची बातमी कळली होती.घरात कितीतरी वर्षांनी आनंद पसरला होता.पुढील महिन्यात पंधरा तारखेला साखरपुडा करण्याचे निश्चित झाले.अजयचे आप्पा, अम्मा आणि थोडे नातेवाईक येणार होते.मानसीची साडी खरेदी झाली.तिच्यासाठी दोन लाखांची हिऱ्याची अंगठी अजयने घेतली.मानसीच्या वडिलांनी आपल्या ऐपतीप्रमाणे जावयाला अंगठी,कापड घेतले.

   मानसीची अवस्था एखाद्या स्वप्न पाहतेय अशी झाली होती.अकल्पितपणे अजयसारखा देखणा, श्रीमंत, राष्ट्रीयीकृत बँकचा मॅनेजर तिला पती म्हणून मिळाला होता.आईची व्रतवैकल्ये, उपासतापास अखेर फळाला आले म्हणायचे!

आणि अचानक....

क्रींग ss क्रींग ss

  मध्यरात्रीच्या नीरव शांततेत बेलचा कर्कश्श आवाज घुमला आणि मानसीच्या घरातील सर्वजण खडबडून जागे झाले.आत्ता, या अवेळी कोण आले असेल बरं? सर्वांनी भेदरुन एकमेकांकडे पाहिले.'क् कोण आहे?'मानसीच्या वडीलांनी धीर एकवटून विचारले.

  'पोलीस, दार उघडा लवकर.'बाहेरुन खणखणीत आवाजात उत्तर आले.'पोलीस? आणि आपल्या कडे?'मानसीच्या बाबांनी भीत भीत दार उघडले.दारात खरंच दोन पोलीस उभे होते.'तुम्हाला तिघांना चव्हाण साहेबांनी चौकीत बोलावले आहे.पाच मिनिटांत तयार होऊन बाहेरच्या जीपमध्ये बसा.'पोलीसाने फर्मावले.पोलीसचौकीत शिरले तेव्हा तिघांचेही पाय लटपटत होते.चव्हाणसाहेबांचा आडदांड देह,राकट चेहरा आणि त्यावरील भरघोस मिशा पाहून तिघांचे अवसानच गळाले.भेदक नजरेने तिघांचे निरीक्षण करीत चव्हाण साहेबांनी त्यांना खुर्चीवर बसण्याची खूण केली तशी ते धप् दिशी खुर्चीवर कोसळले.त्यांची ती अवस्था बघून चव्हाण साहेब गालातल्या गालात हसले.'पांड्रंग पाणी आण ', पांडुरंगने तत्परतेने पाणी आणले.कोरड्या पडलेल्या घशाला पाण्याने बरं वाटलं आणि मानसीच्या बाबांनी खोल आवाजात आपल्याला का बोलावले ते विचारले.

   चव्हाण साहेबांनी ड्रॉवर मधील फोटो काढून तिघांसमोर टाकले आणि विचारले,'यांना तुम्ही ओळखता?'

'हो.हे आप्पा, अम्मा आणि आणि हे आमचे जावई अजय पाटील.'

  'कसला जावई?'चव्हाणसाहेब गरजले.'आता कर्नाटक पोलिसांचा जावई झाला आहे तो! एका फॉरेनरचा बलात्कार आणि खून केला आहे त्याने.गेली आठ वर्षं पोलीसांना गुंगारा देत होता भ** '

 'काय?'मानसी आणि तिच्या आईबाबांचे डोळे भयाने विस्फारले.'पण साहेब,अजय पाटील तर एका बॅंकेत मॅनेजर....'

   'खोटं नाव आहे त्या मा****चं'चव्हाणसाहेब गरजले.'त्याचं खरं नाव आहे वेंकटेश उर्फ विकी मूर्ती.त्या आप्पाचं आणि अम्माचं नाव आहे अनंत मूर्ती आणि वासंती मूर्ती.हा बाप बंगलोरला बिझनेस करत होता पण आपल्या कार्ट्याने पराक्रम केला तेव्हा पुत्र प्रेमापोटी गाशा गुंडाळून त्या छोट्या खेड्यात जाऊन भूमीपुत्र झाला रांडेचा!मुलावर प्रेम करावं पण इतकं आंधळं? त्या दोघांना पण अटक केली आहे गुन्हेगाराला मदत केल्याबद्दल. आणि तो त्यांचा कुलदीपक? कॉलेज ड्रॉप आऊट आहे भो**चा.म्हणे बॅंक मॅनेजर! त्याला खोटी सर्टिफिकेटं कोणी पुरवली त्याचा तपास चालू आहे.'

   'काय हो, चव्हाण साहेबांनी आता आपला मोहरा मानसीच्या आईबाबांकडे वळवला.'मुलीचं लग्न जुळवतांना चौकशी केली नव्हती? खुशाल आपल्या मुलीला एका बलात्कारी आणि खुन्याच्या गळ्यात बांधायला निघालात?'

मानसीच्या आईबाबांनी एकमेकांकडे अगतिकतेने पाहिले.इतका वेळ निग्रहाने आवरून धरलेले अश्रू मानसीच्या गालांवरुन ओघळू लागले.हुंदक्यांनी तिचे शरीर हेलकावू लागले.चव्हाणसाहेबांचे लक्ष तिच्या कडे गेले आणि चट्कन उठून ते तिच्या जवळ गेले व ते तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले,'आय अॅम सॉरी बेटा, काय करू,सतत गुन्हेगारांच्या सहवासात राहून असा रांगडेपणा आलाय बघ माझ्यात.मीसुद्धा तुझ्या एव्हढ्या मुलीचा बाप आहे.या सर्व प्रकरणात तुमची काही चूक नाही हे मी जाणतो.तुमच्यासारख्या सरळमार्गी लोकांना हे गुन्हेगारी जग पूर्णतः अनोळखी आहे हेही मला ठाऊक आहे.सत्य कळल्यावर तुझ्या मानसिक स्थितीची जाणीव होण्याइतका मी नक्कीच संवेदनशील आहे,पण बाळा, आता असा विचार कर की हे सर्व आधीच कळलं ही देवाचीच कृपा नाही का?जर लग्नानंतर उघडकीस आले असते तर? तेव्हा जे घडले ते एक दुष्ट स्वप्न समजून पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात कर.माझे तुला आशीर्वाद आहेत.'

'बरं, आता उजाडायला लागले आहे तर तुम्हाला घरी सोडू का जीपनं?'

   'नको नको, आम्ही जातो चालत घरी.'मानसीचे बाबा घाईघाईने म्हणाले आणि तिघेजण पाय ओढत घराच्या दिशेने चालू लागले.

  आपले लग्न होण्याआधी सत्य कळले म्हणून भाग्य मानायचे की आपण हातोहात फसवले गेलो म्हणून दुःख मानायचे? ज्यांना आपण प्रेमळ अम्मा,करारी आप्पा समजत होतो ते त्यांचे केवळ मुखवटे होते? आपल्या गुन्हेगार मुलाला संसारसुख मिळावे म्हणून आपला बळी देणार होते?ज्याला आपण जन्माचा साथीदार मानत होतो तो अजय पाटील...नव्हे वेंकटेश मूर्ती...नव्हे विकी मुखवटा घालून वावरत होता? फक्त आणि फक्त मुखवटे?

    मानसीच्या पायाखालची वाट सरता सरत नव्हती आणि मनातील प्रश्नांची मालिकाही!


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime