मृद्गंध
मृद्गंध
"काय सारखं तेच तेच. नाही जाता येणार कुठे. पियू , काळजी घ्यायला हवी नं ! "
पियू माझी 10 वर्षाची लेक. गेले वर्षभर आजूबाजूला जे चाललंय त्याने फार कंटाळली आहे. मी तरी किती समजावून सांगू ?
" आई , बाबा कधी येणारे ? "
हा दिवसभरातला तिचा जवळपास 15 वेळा विचारला गेलेला प्रश्न .
" पियू , तुला माहिती आहे नं तुझा बाबा डॉक्टर आहे. त्याला कधी घरी येता येणार हे त्यालाही माहित नाही तर मी तुला काय सांगणार. बरं चल आपण काहीतरी मस्त वाचूया का ? वाटल्यास मी वाचते आणि तू ऐक"
" नको, आई , कितीतरी दिवस आपण दोघीच आहोत घरात. तेच तेच खेळ , पुस्तकं , व्हिडिओ किंवा जास्तीत जास्त रेसिपी आणि माझा ड्रॉईंगचा क्लास यापेक्षा वेगळं काही करतोय आपण ?कधीतरी आजीला व्हिडिओ कॉल लावतो इतकंच."
खरं तर मला पियूचं बोलणं तंतोतंत पटत होतं . पण या परिस्थितीत मी तरी काय करणार होते ? पियूला एकटीला आजीकडे सोडणं शक्य नव्हतं . मी तिच्याबरोबर गेले असते तर इकडे केदार आठवड्यातून एक दोनदा घरी यायचा तेव्हा त्याच्याशी हलक्याफुलक्या गप्पा मारायला घरात कुणीतरी असणं आवश्यक होतं. तो किती तणावाखाली काम करतोय हे मला जाणवायचं.
"काय करू या? तू सांग. "
" आई, मला एक कल्पना सुचलीये. पण त्यासाठी आपल्याला बाबाची मदत घ्यावी लागेल. मी उद्या तुला सांगते नीट. आता झोपू या."
पियूच्या मनात नक्की काय चाललंय याचा मला अंदाजच येत नव्हता. पण खूप दिवसांनी तिच्या डोळ्यात पूर्वीची चमक पाहिली आणि एकदम मस्त वाटलं. अगदी कडक उन्हाळ्यात पावसाची एखादी सर येऊन जावी , सगळीकडे मृदगंध पसरावा आणि उन्हाची तल्खली कमी व्हावी तसं गाढ झोपलेल्या तिचा चेहरा पाहून मला वाटलं.
