Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

marathi katha

Children Classics


2  

marathi katha

Children Classics


मोरु

मोरु

6 mins 7.9K 6 mins 7.9K

मोरु म्हणून एक विद्यार्थी होता. आईबाबांपासून दूर एका शहरात तो विद्येसाठी राहत होता. त्याने एक खोली घेतली होती. तो फारसा श्रीमंत नव्हता, म्हणून तो हातानेच स्वयंपाक करी. त्याच्या खोलीत बिजलीची बत्ती नव्हती. साधा देशी कंदीलच होता. त्याच्या खोलीत तेलचूल (स्टोव्ह) नव्हती; साधी मातीचीच चूल होती. त्याच्या खोलीत फरशी नव्हती; साधी जमीनच होती. मोरुची खोली लहानशीच होती. मोरु व्यवस्थित नव्हता. त्याला कामाचा अक्षयी कंटाळा. चूल कधी सारवायचा नाही. जमीन सारी उखळली हेती. कंदिलाची काच काळी झाली होती. अंगातील कपडे मळले होते, निजावयाची सतरंजी, तिच्यात खंडीभर मळ साचला होता. तरी मोरु तसाच राहत होता. अगदीच ओंगळ व ऐदी.

एके दिवशी मोरु फिरायला गेला होता. एकटाच लांब फिरायला गेला. एका वडाखाली एक मनुष्य बसला होता. मोरु त्याच्याकडे पाहू लागला. त्या माणसाच्या डोळ्यांतून पाणी येत होते. मोरुने त्याच्याजवळ जाऊन "तुम्ही का रडता?" असे विचारले. त्या मनुष्याला जास्तच हुंदका आला.

मोरु- तुम्ही असे मुलासारखे ओक्साबोक्शी का रडता? मनुष्य- आजूबाजूचे रडणे ऐकून मलाही रडू आले. मोरु- कोण रडत आहे? मला तर कोणाचे रडणे ऐकू येत नाही. मनुष्य- तुझे कान तिखट नाहीत. तुम्ही सारे बहिरे झालेले आहात. तुमच्या कानात मळ भरला आहे. मोरु- माझ्या कानात बिलकूल मळ नाही. मनुष्य- दुसऱ्याची उपेक्षा करण्याचा मळ सर्वांच्या कानांत सारखाच भरुन राहिला आहे. माझ्या आजूबाजूला मला सारखे रडणे ऐकू येत आहे. मोरु- मला दाखवा, मला ऐकवा. मनुष्य- हे झाड रडत आहे. ती पलीकडे चरणारी गाय रडत आहे. मोरु- हे झाड काय म्हणते? मनुष्य- 'सारे लोक माझी फुले व फळे तोडून नेतात. एक सुद्धा माझ्याजवळ ठेवीत नाहीत. सारे मला लुटतात. परंतु मला पाणी कोणी घालीत नाही. माझ्या मुलांना खाली अंधारातून पाण्यासाठी किती लांबवर धडपडत जावे लागते. परंतु माणसांना माझे कष्ट दिसत नाहीत. खुशाल येतात, दगडधोंडे मारतात. फुले तोडतात, फळे पाडतात, पाने ओरबाडतात,' असे म्हणून झाड सारखे रडत आहे. मोरु- ती गाय का रडत आहे? मनुष्य- तिला प्यायला पाणी नीट मिळत नाही, खायला पोटभर मिळत नाही. तिचा मुलगा गाडीला जोडतात. नांगराला जोडतात. व त्याच्या अंगात बोट बोट खोल आर भोसकतात! बिचारा बैल! त्याला नाही पोटभर दाणावैरण. तो किती ओढील? किती चालेल? मुलाचे हे हाल पाहून गाय रडत आहे. स्वत:च्या दु:खाचे तिला फारसे वाटत नाही, परंतु मुलाच्या दुखाने ती वेडी झाली आहे. तिच्या डोळ्यांतील पाण्याचा भूमातेवर अभिषेक होत आहे. मोरु- तुम्हाला ऐकू येते, तसे मलाही येऊ दे. मला ही शक्ती द्या. मनुष्य- मनुष्य विचारी झाला, मनाने निर्मळ झाला की, त्याला ही शक्ती येते. सर्व चराचराची भाषा त्याला समजू लागते, तारे आणि वारे, पशू आणि पक्षी, दगड आणि धोंडे, नद्या आणि नाले, झाड आणि माड साऱ्यांची सुख-दु:खे मग तो जाणतो. तुमच्या गावातील नदी तर सारखी रडते. तिचे पाणी ते तिच्या अखंड गळणाऱ्या आसवांचेच जणू आहे. मोरु- ती काय म्हणते? मनुष्य- लोक तिच्यात घाण करतात. जणू तिचं सत्वच पाहतात. तिच्यात शौच करतात. लघवी करतात! शेतातील शेंगा वगैरे आणून तिच्या पात्रात धुतात, सारे पाणी घाण करतात. तिला का बरे वाईट वाटणार नाही? परवा तहानलेली पाखरे चोच वासून आली; परंतु त्यांनाही ते पाणी पिववेना; तहानलेली वासरे आली; परंतु पाणी हुंगून निघून गेली. माणसाला शिव्याशाप देत ती निघून गेली. सारी सृष्टी आज माणसाला शिव्याशाप देत आहे. मोरु- तुमची शक्ती एक दिवस तरी मला द्या. मनुष्य- बरे, तू आज गेलास की, ही शक्ती तुला येईल. काम करून, जेवण करून व अभ्यास करून अंथरुणावर पडलास की, तुला ही शक्ती येईल. आजच्या रात्रभरच फक्त ही शक्ती राहील. सकाळ होताच ती निघून जाईल. मोरु- बरे, मी जातो.

त्या मनुष्याला नमस्कार करून मोरु लगबगीने घरी आला. केव्हा एकदा आपल्याला त्या शक्तीचा अनुभव येतो, असे त्याला झाले होते. खोलीत येऊन तो काळाकुट्ट कंदील त्याने लावला. त्या उखळलेल्या चुलीवर भात करून तो जेवावयास बसला. भराभर जेवण करून त्याने ती भांडी तशीच तेथे गोळा करून ठेवली. नंतर आपली पथारी पसरून तो तिच्यावर पडला. अजून ती शक्ती आली नव्हती. तो वाचीत पडला. त्याने दिवा बारीक केला. मोरुच्या चेहऱ्यात तो पहा फरक पडू लागला.

मोरुला हळूहळू ऐकू येऊ लागले. त्याने डोळे ताठ केले व तो पाहू लागला. मागे, पुढे, खाली, वर सर्वत्र त्याला आवाज ऐकू येऊ लागले. एकाएकी दीनवाणे शब्द त्याच्या कानावर आले. त्याच्या समोर कंदील होता. तो रडत होता. मोरुला ते रडणे ऐकू आले. मोरु कंदिलाला म्हणाला, "का रे तू रडतोस?"

कंदील म्हणाला, "अरे तुझ्यासाठी मी काळा होतो. तू वाचावेस, ज्ञानाने तुझे तोंड उजळ व्हावे, म्हणून माझे तोंड काळे होते. परंतु तू मला कधी पुसतोस का? सकाळ होताच मला पुसून ठेव. पुन्हा रात्री तुझ्यासाठी तापेन; काळा होईन. सकाळी पुन्हा स्वच्छ कर. तू मला किती घाणेरडे केले आहेस बघ. मी रडू नको तर काय करू?"

इतक्यात मोरुला अगदी जवळच रडणे ऐकू आले. जणू त्याच्या अंगातून ते निघत होते. त्याच्या अंगातील सदरा व नेसूचे धोतर; तीही रडत होती.

मोरु म्हणाला, "अरे, माझ्या सदऱ्या, का रे रडतोस?"

सदरा म्हणाला, "तुझा घाम लागून मी घामट झालो, तुझ्या अंगाचे रक्षण करून मी मळलो. धूळ व धूर मी अंगावर घेतो. परंतु तू मला कधी धूत नाहीस. मला स्वच्छ करीत नाहीस. पूर्वी पाण्यात पडताच मी ओला होत असे, आता पाणी माझ्यात शिरत नाही, ते सुद्धा जवळ येण्यास लाजते, इतका मी गलिच्छ झालो आहे. आणि हे सारे तुझ्यासाठी. मी रडू नको तर काय करू?"

धोतर म्हणाले, "त्या दिवशी तू उडी मारीत होतास, त्या वेळेस तुझ्या अंगात काटे बोचू नयेत म्हणून मी पुढे झालो व माझे अंग फाडून घेतले. परंतु मला चार टाके घातलेस का? तसेच ते शाईचे डाग माझ्या अंगावरचे धुतलेस का?"

सतरंजी व घोंगडी, त्याही बोलू लागल्या. "अरे, आमच्यात तुझ्या पायांची धूळ किती रे भरलीस? तुझे ते घाणेरडे पाय ते आमच्यावर ठेवतोस. आम्हांला जरा झटकून तरी टाकीत जा."

खालची जमीन म्हणाली, "अरे, माझे सारे अंग सोलून निघाले. तू माझ्यावर बसतोस, उठतोस, नाचतोस, कुदतोस. मला शेणामातीने कधी सारवतोस का? ते मलम अंगाला मधून मधून लावीत जा रे. सारे अंग ठणकते आहे. काय तुला सांगू? किती वेदना, किती हाल?"

चूल म्हणाली, "तुझ्यासाठी मी तापते. भाताचा कड जाऊन माझे अंग पहा कसे झाले आहे? अरे, रोज सकाळी मला सारवीत जा. माझ्यावरून हात फिरव. अशी दीनवाणी नका रे मला ठेवू!"

ती खरकटी भांडी म्हणाली, "मोरु, तू जेवलास, परंतु आम्हाला सकाळपर्यंत अशीच खरकटलेली ठेवणार ना? चिखलात बरबटलेले बसून राहायला तुला आवडेल का रे? ही तुझी आमटी, हे ताक, हे शितकण-सारे तसेच आमच्या अंगावर. आम्हाला रात्री कधी झोप येत नाही. आम्हांला घासूनपुसून ठेवीत जा. तुझ्यासाठी चुलीवर आम्ही काळी होतो. तुझ्या जेवणामुळे आम्ही ओशट होतो. कृतज्ञता नाही का रे तुला?"

पिशवीतील पुस्तक म्हणाले, "अरे, तुला मी ज्ञान देतो. पशूचा मनुष्य करतो. परंतु माझी दशा बघ काय केली आहेस ती! पानन् पान सुटले आहे. शाईचे डाग पडले आहेत. तुला नाही का रे दयामाया?"

मोरुला खोलीतील प्रत्येक वस्तू काहीतरी गाऱ्हाणे करीत आहे असे दिसले. साऱ्यांचा त्याच्यावर आरोप. 'तू कृतघ्न आहेस. तुझ्यासाठी आम्ही झिजतो, श्रमतो, काळे होतो. तू आमच्यासाठी काय करतोस?' असे सारी म्हणत होती.

एकाएकी सारे आवाज बंद झाले. मोरु अंथरुणावर गंभीरपणे बसला. शेवटी खोलीतील सर्व वस्तूंना त्याने रडत रडत गहिवरून साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून तो म्हणाला, "माझ्या उपकारकर्त्यांनो, आजपासून तुमची काळजी घेईन, तुम्हाला स्वच्छ राखीन. तुम्ही क्षमावान आहात. या मुलाला चुकल्यामाकल्याची, झाल्यागेल्याची क्षमा करा. आजपासून मी कृतज्ञता दाखवीन. सर्वांचे उपकार स्मरेन. रडू नका, रुसू नका, या मुलावर प्रसन्न व्हा."

दुसऱ्या दिवसापासून मोरु अगदी निराळा मुलगा झाला. सर्वांना त्याच्यातील फरक पाहून आश्चर्य वाटले. ते म्हणत, "मोरु, अलीकडे सूर्य पश्चिमेस उगवू लागला?" मोरु म्हणे, "तुम्हांला काय माहीत आहे? मी केवढा थोर अनुभव घेतला ते?" ते विचारीत, "कोणता?" मग मोरु ही सारी हकीगत सांगे व ती ऐकून त्याचे मित्रही गंभीर होऊन घरी जात व नीट वागत.

मोरु व त्याचे मित्र वागू लागले, तसे आपणही सारे वागू या.


Rate this content
Log in

More marathi story from marathi katha

Similar marathi story from Children