The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

marathi katha

Classics Drama

1.0  

marathi katha

Classics Drama

न्याय जिवंत झाला!

न्याय जिवंत झाला!

7 mins
9.9K


"मग तू देतोस की नाही तुझे शेत? मी म्हणून तुला इतकी किंमत देत आहे. अरे, आजूबाजूला आता सगळीकडे माझी जमीन! मध्ये तुझेच हे शेत आडवे येते. मी सांगतो ऐक. आढेवेढे नको घेऊस!" केशवचंद्र म्हणाले.

"माझी जमीन विकणार नाही. गावातली सगळी जमीन तुम्ही या ना त्या मार्गाने आपलीशी केलीत. आता माझ्या या सोन्यावाणी तुकड्यावरही तुमची गिधाडी दृष्टी आली. राग नका मानू दादा; परंतु खरे ते मी सांगतो. वाडवडिलांपासून चालत आलेली ही जमीन. ही का मी विकू? जमीन म्हणजे आई. आईला का कोणी विकतो? राहू द्या एवढी जमीन. पोटापुरे ती देते. मुलेबाळे तेथे येतात, खपतात, खेळतात. सत्तेची जमीन सोडू नये, दादा!" भीमा म्हणाला.

"भीमा, जमीन नाही ना देत?"

"कशी द्यायची?"

"द्यायची की नाही ते सांग!"

"नाही, त्रिवार नाही!"

"याद राख! तुझी ही मगरूर वृत्ती तुला मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. माझी गिधाडी दृष्टी तुला भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही!"

"देव काही मेला नाही, केशवबाबा!"

"जेथे सत्ता नि संपत्ती असते तेथे देव असतो, समजलास! देव माझ्या तिजोरीत आहे!"

"माझा देव सर्व जग व्यापून राहिलेला आहे!"

"बघतो तुला वाचवायला कोण देव येतो ते! हे तुझे शेत गेले समज आणि तुला पैही न मिळता. आज मी तुला तू मागशील ती किंमत द्यायला तयार झालो होतो; परंतु तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू तरी काय करशील? ठीक तर!" असे धमकीचे भाषण करून केशवचंद्र निघून गेले.

शेतातील विहिरीच्या काठी भीमा बसला होता. त्याचे ते लहानसे शेत; परंतु खरेच सोने पिकवी. भीमाच्या वाडवडिलांच्या हातची तेथे झाडे होती. त्यानेही दोन-चार कलमे लावली होती. विहिरीच्या कडेला फुलझाडे होती. पलीकडे त्याचा लहानसा गोठा होता. भीमाचा शब्द ऐकताच गोठ्यातील गाय हंबरायची. खरोखरच त्या शेतावर भीमाचे जीव की प्राण प्रेम होते. ते विकणे त्याच्या जिवावर येत होते. केशवचंद्रांनी गावातील जवळजवळ सारी जमीन गिळंकृत केली होती. सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले. पाचाचे दहा झाले, दहाचे शंभर झाले आणि मग ते देणे कधी फिटायचे? शेताचे मूळचे मालक मजूर झाले. अजून हा भीमाच काय तो तेथे स्वाभिमानाने आपल्या शेताचा मालक म्हणून नांदत होता. केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते. गोडीगुलाबीने भीमा शेत विकतो का ते ते बघत होते; परंतु काही केल्या जमेना. आज सकाळी ती शेवटची बाचाबाची झाली. सावकार का ही जमीन लाटणार? या जमिनीचा मी मालक. उद्या मला येथे मजूर म्हणून का कामासाठी यावे लागेल? भीमा विहिरीच्या काठी बसून विचार करीत होता. त्याचे तोंड चिंतेने जरा काळवंडले.

इतक्यात त्याची वडील मुलगी भीमी लहान भावंडाला घेऊन आली.

"बाबा, आईने घरी बोलावले आहे." ती म्हणाली.

"कशाला ग, पोरी?"

"सावकार आला आहे घरी."

"काय म्हणतो तो?"

"आईला म्हणाला, 'हजार रुपये घ्या व शेत द्या!' आणि मला म्हणाला, 'तुझ्या बापाला काही कळत नाही.' बाबा, शेत का तुम्ही विकणार?"

"प्राण गेला तरी विकणार नाही. तुझी आई काय म्हणाली?"

"ती म्हणाली, 'त्यांना विचारा.' आणखी आई त्यांना म्हणाली, 'पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत, जमीन कायमची सत्तेची. ती विकून कुठे जायचे?' "

"शहाणी आहे तुझी आई!"

भीमा मुलीबरोबर घरी आला. सावकार निघून गेला होता. बायकोने सारी बोलणी भीमाच्या कानावर घातली.

"साप आहे तो मेला! तो आपला सत्यानाश केल्यावाचून राहणार नाही!" तो म्हणाला.

"गावातील सारे शेतमालक मजूर झाले. त्यांच्या बाबतीत देव मेला, तसा आपल्या बाबतीतही मरायचा!"

"त्यांनी हिंमत सोडली म्हणून त्यांचा देव मेला! जो सत्यासाठी उभा राहतो त्याचा देव मरत नाही. समजलीस?"

काही दिवस गेले. केशवचंद्राने न्यायालयात फिर्याद केली. भीमाकडे असलेली जमीन वास्तविक आपली आहे. जुने कागदपत्र सापडले आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे, वगैरे त्याचे म्हणणे. न्यायाधीश केशवचंद्रांच्या मुठीतले. पैशाने कोण वश होत नाही! भीमाला न्यायालयात बोलावण्यात आले. केशवचंद्राने म्हातारे शेतकरी पैशाने विकत घेऊन साक्षीदार म्हणून आणले होते. त्याने आपली बाजू मांडण्यासाठी कायदेपंडितही आणला होता. भीमाची बाजू कोण मांडणार? तो न्यायाधीशास एवढेच म्हणाला,

"महाराज, देवाधर्माला स्मरून मी सांगतो की ही माझी जमीन आहे. वाडवडिलांपासून ही चालत आली आहे. सावकाराला बघवत नाही. हजार रुपये द्यायला तयार झाला होता..."

"हजार रुपये? थापा मार! त्या तुकड्याचे का कोणी हजार रुपये देईल?"

"देवाला माहीत आहे!"

"देव दूर आहे आभाळात. येथे तुम्ही आम्ही आहोत. कागदपत्रं काय सांगतात? हे म्हातारे शेतकरी साक्षीदार का खोटे सांगतात?" वकील म्हणाला.

न्यायाधीशाने भीमाची मालकी काढून घेतली. केशवचंद्राचीच जमीन आहे, असा त्याने निर्णय दिला. भीमा बाहेर येऊन आकाशाकडे हात करून म्हणाला,

"तुझ्या जगात देवा, का न्याय नाही?"

"न्याय आमच्या हातात असतो, भीमा. देवबीव सत्तेजवळ असतो, संपत्तीजवळ असतो." वकील कुऱ्याने म्हणाला.

भीमा दु:खाने घरी गेला. तो कपाळाला हात लावून बसला.

"काय लागला निकाल?" बायकोने विचारले.

"आपण चोर ठरलो नि चोर मालक ठरला. आपण उद्यापासून मजूर झालो." तो दु:खाने बोलला.

त्या गावातील सारे गोरगरीब केशवचंद्रांच्या नावे खडे फोडीत होते. परंतु करतात काय?

या प्रांताचा राजा दौऱ्यावर निघाला होता. केशवचंद्राने वशिला लावून राजा आपल्या गावी येईल असे केले. गाव शृंगारण्यात आला आणि एक सुंदर सभामंडप उभारण्यात आला. तेथे राजासाठी सिंहासन तयार करण्यात आले होते. राजाच्या सत्कारसमारंभासाठी आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील शेकडो मोठमोठी माणसे येणार होती. सरदार-जहागीरदार, सावकार, व्यापारी येणार होते. तेथे फक्त गरिबांना येण्यास बंदी होती. केशवचंद्राला गावातील लोकांची भीती वाटत होती. राजाच्या कानावर ते कागाळ्या घालतील, अशी त्याला शंका होती. म्हणून त्याने सर्वांना ताकीद दिली की, त्या दिवशी घराबाहेर फिरकू नका. राजा जाईपर्यंत आपापल्या झोपड्यांत बसून राहा.

सभामंडप भरून गेला होता. आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील साऱ्या संपत्तीचे तेथे जणू प्रदर्शन होते. नटूनथटून श्रीमंत मंडळी आली होती. आणि बारा वाजले. राजा आला वाटते? हां, हे बघा घोडेस्वार! आणि वाद्ये वाजू लागली. जयघोष कानावर आले. सारे शेतकरी भीतीने घरात बसून आहेत; परंतु भीमा कुठे आहे? गावाबाहेर एक जुने देवीचे मंदिर होते. त्या मंदिरात एक प्रचंड घंटा होती. गावात कोणी मेले, तर ती घंटा वाजविण्यात येई. भीमा आज त्या मंदिरात गेला आणि ती घंटा दाणदाण वाजवू लागला.

"कोण मेले?" म्हाताऱ्या गुरवाने विचारले.

"न्याय मेला." भीमा म्हणाला.

"खरेच, न्याय उरला नाही." देवीचा तो पुजारी म्हणाला.

घंटेचा आवाज ऐकून देवीच्या देवळाकडे शेतकरी येऊ लागले, 'कोण मेले' म्हणून विचारू लागले. 'न्याय मेला' असे जो तो उत्तर देऊ लागला.

"मोठ्याने घंटा वाजवा. न्याय मेला!" तरुण म्हणू लागले. एक थकला की दुसरा वाजवू लागे. तो थकला की तिसरा. सारा गाव दणाणून गेला.

तिकडे सभामंडपात राजाचा सत्कार होत होता. मानपत्र वाचले जात होते. परंतु त्या घंटेचा दाणदाण आवाज तेथे ऐकू येत होता आणि मानपत्र मात्र कोणालाच ऐकू जाईना.

"कसला हा आवाज?" राजाने विचारले.

"कोणी तरी मेले असावे. गावचा रिवाज आहे की, कोणी मेले तर घंटा वाजवायची." केशवचंद्र नम्रपणे म्हणाला.

"आमचे येणे म्हणजे अपशकुनच झाला म्हणावयाचा. कोण मेले, चौकशी तरी करा." राजा म्हणाला.

दोन घोडेस्वार चौकशीसाठी पाठवण्यात आले. देवीच्या देवळाजवळ अपार गर्दी होती.

"काय आहे भानगड? कोण मेले!" घोडेस्वारांनी विचारले.

"न्याय मेला!" लोक गर्जले.

ते घोडेस्वार आश्चर्य करीत आले. त्यांनी येऊन राजाला सांगितले, "महाराज, न्याय मेला!"

"मी जिवंत आहे तोवर न्याय कसा मरेल? चला, मला पाहू दे काय आहे भानगड ती!"

राजा रथातून निघाला, त्याबरोबर सारेच निघाले. कोणी घोड्यावरून, कोणी पायी निघाले. तिकडे भीमाने काय केले ते ऐका. तो लोकांना म्हणाला,

"आपण न्यायदेवाची एक प्रतिमा करून ती तिरडीवर ठेवू या. खांद्यावरून ती नेऊ या. 'न्याय मेला, हाय हाय; न्याय मेला, हाय हाय' असे दु;खाने म्हणू या!" सर्वांना ती कल्पना आवडली. एक तिरडी तयार झाली. तिच्यावर न्यायदेवतेची एक प्रतिमा निजवण्यात आली. खांद्यावर घेऊन लोक निघाले. 'न्यायदेव मेला, हाय हाय,' असे करीत ती प्रेतयात्रा निघाली.

तिकडून राजा हजारो शेटसावकारांसह, शेकडो सरदारजहागीरदारांसह येत होता आणि इकडून ती न्यायदेवाची प्रेतयात्रा येत होती. दोघांची वाटेत गाठ पडली. राजा रथातून खाली उतरला व तो शेतकऱ्यांकडे जाऊन म्हणाला,

"तुम्ही हे काय म्हणता? मी जिवंत असताना न्याय कसा मरेल?"

"या गावात तरी न्याय नाही!" भीमा म्हणाला.

"काय आहे तुमची तक्रार?" राजाने विचारले.

"महाराज, या गावचे शेतमालक आज मजूर झाले. ज्या केशवचंद्राने तुमचे स्वागत आज मांडले आहे, त्यानेच आमचे संसार धुळीला मिळविले. पाचाचे पन्नास केले नि साऱ्या जमिनी तो बळकावून बसला. महाराज, या गावातील सर्वांच्या जमिनी गेल्या तरी माझी उरली होती. केशवचंद्र म्हणे, 'हजार रुपये घे परंतु ती मला विकत दे!' मी जमीन विकायला तयार नव्हतो. तेव्हा खोटा खटला भरून माझ्याजवळून जमीन हिसकावून घेण्यात आली. न्यायाधीश पैशांचे मिंधे. वकील म्हणाला, 'देव आकाशात नसतो, पैशाजवळ असतो!' महाराज, खरेच का देव उरला नाही? न्याय उरला नाही? तुमच्याभोवती दागदागिन्यांनी सजलेली ही बडी मंडळी आहेत, आणि ही इकडची गरीब मंडळी पहा. या आयाबाया, ही आमची मुले. ना पोटभर खायला, ना धड ल्यायला. कसे जगावयाचे? श्रमणारे आम्ही. परंतु आम्हीच मरत आहोत. आम्ही सारे पिकवतो आणि हे खुशालचेंडू पळवतात. न्याय, कोठे आहे न्याय? वाडवडील म्हणत, 'जो नांगर चालवील तो खरा मालक.' परंतु आज गादीवर बसणारा मालक ठरला आणि आम्ही श्रमणारे चोर ठरलो, अन्नाला महाग झालो. महाराज, कोठे आहे न्याय? या केशवचंद्राने आम्हाला आज घरातून बाहेर पडू नका म्हणून बजावले. आम्ही तुमच्या कानांवर गोष्टी घालू अशी त्याला भीती वाटली; परंतु मला घंटेची आठवण झाली. न्याय मेला, तुम्हास कळवावे म्हणून आम्ही सारे घंटा वाजवीत बसलो."

"चला त्या मंडपात. मी सारी चौकशी करतो." राजा म्हणाला. सारी मंडळी सभामंडपात आली. एकीकडे श्रीमंत बसले. एकीकडे गरीब बसले. राजाने सारी चौकशी केली. केशवचंद्राचे गुन्हे सिद्ध झाले. तो पैसेखाऊ न्यायाधीश, तो वकील, सारे तेथे अपराधी म्हणून उभे राहिले.

"यांना कोणती शिक्षा देऊ? तोफेच्या तोंडी देऊ?" राजाने विचारले.

"त्यांना मारण्याची जरुरी नाही. ते आमच्यात राहोत. आमच्याबरोबर खपोत, श्रमाचे खावोत, त्यांची बुद्धी आमच्या कामी पावो, आमचा हिशोब ठेवोत. महाराज, या गावची जमीन साऱ्या गावाच्या मालकीची असे करा. सारे मिळून श्रमू. येथे स्वर्ग आणू. येथे नको कोणी उपाशी, नको कोणी चैन चालवणारा." भीमा म्हणाला.

"तुमचा प्रयोग यशस्वी करा. भरपूर पिकवा. नवीन नवीन उद्योग शिका. तुमचा गाव आदर्श करा. तुम्हाला छळणाऱ्यांवरही तुम्ही सूड घेऊ इच्छित नाही, ही केवढी उदारबुद्धी! मला राजालाही आज तुम्ही खरी दृष्टी दिलीत. सूडबुद्धीनं शेजारच्या राजाशी मी युद्ध करायच्या विचारात होतो; परंतु आता दुसऱ्या भल्या मार्गाने जाईन. शाबास तुमची! तुमचे समाधान झाले ना?" राजाने प्रेमाने विचारले.

"होय, महाराज!" लोक आनंदाने उद्गारले.

"मग आता काय घोषणा कराल?" राजाने विचारले.

"न्याय मेला होता, परंतु जिवंत झाला, अशी घोषणा करू." लोक म्हणाले.

राजा निघून गेला. केशवचंद्र व भीमा प्रेमाने एकमेकांस भेटले. तो गाव सुखी झाला, तसे आपण सारे होऊया.


Rate this content
Log in

More marathi story from marathi katha

Similar marathi story from Classics