marathi katha

Children Classics

1.3  

marathi katha

Children Classics

मधुराणी

मधुराणी

5 mins
8.9K


एका राजाचे दोन मोठे मुलगे आपापल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी राजधानी सोडून दूर जगात मुशाफिरीला गेले. वाटेत ते नाना प्रकारच्या फंदात सापडले. वेडेवाकडे वागू लागले. घरी येण्याचे भान त्यांना राहिले नाही. त्यांचा तिसरा एक भाऊ घरी होता. तो अगदी बुटबैंगण होता. हा बटुवामन आपल्या दोघा भावांचा शोध करण्यासाठी बाहेर पडला. हिंडता हिंडता त्याची व त्या दोघा भावांची गाठ पडली. त्याला पाहून ते पोट धरधरून हसू लागले. ते थट्टेने म्हणाले, "अरे वेड्या, तू कशाला जगाच्या यात्रेला निघालास? तुझं पाऊल मुंगीचं. आमची दहा पावले व तुझी शंभर बरोबर." तरीपण त्यांच्याबरोबर तोही निघाला. तिघे प्रवास करू लागले.

ते हिंडता हिंडता एका मुंग्यांच्या वारुळाजवळ आले. त्या दोघा मोठ्या भावांना ते वारूळ पाहून जमीनदोस्त करण्याची इच्छा होती. मुंग्यांची कशी त्रेधा व तिरपीट उडेल, आपली अंडी तोंडात घेऊन त्या कशा सैरावैरा धावपळ करू लागतील, याची गंमत त्या आडदांड बंधूंना पाहण्याची इच्छा होती. परंतु तो धाकटा बुटका भाऊ म्हणाला, "नका रे पाडू, किती कष्टाने व मेहनतीने ते उभारलेले आहे! पाडणे सोपे, पण उभारणे कठीण जाते. आपला होईल खेळ, परंतु मुंग्यांचे होईल मरण. गरीब, उद्योगी मुंग्या, राहू द्या त्यांना सुखाने. नका त्यांच्या वाटेस जाऊ! त्यांनी काय तुमचे केले?"

त्या दोघा भावांचे त्याने मन वळवले. ते तिघे पुढे चालू लागले. वाटेत एक सुंदर सरोवर होते. त्या सरोवरात दोन बदके खेळत होती. आनंदाने आवाज काढीत होती. त्या दोघा भावांच्या मनात आले की, त्या बदकांना पकडावे, भाजून, परतून खाऊन टाकावे. परंतु बटूवामन म्हणाला, "नका रे त्यांना पकडू. कसे नावेसारखे डोलत आहेत. त्यांना सुखाने नांदू द्या, पाण्यात खेळू द्या, डुंबू द्या. त्यांनी रे तुमचे काय केले?"

त्या भावांनी ऐकले व ते तिघे पुढे गेले. एका वडावर मधाचे पोळे होते. त्यात इतका मध साठला होता की, मधाच्या धारा खाली गळू लागल्या होत्या. ते दोघे भाऊ म्हणाले, "या, आपण त्या मधमाश्या जाळू व पोळे काढून मध पिऊ." तो धाकटा भाऊ म्हणाला, "नका रे नका. हजारो फुलांजवळ जाऊन, गोड गोड बोलून त्या थेंब थेंब मध जमवितात. अशा उद्योगी मधमाश्यांना का जाळावे? आपणास हे शोभत नाही. राहू द्या त्यांना सुखाने, जमवू द्या मध आनंदाने."

त्या दोघा भावांनी ते मानले व ते पुढे गेले. जाता जाता ते एका किल्ल्याजवळ आले. त्या किल्ल्यात ते शिरले. तेथे घोड्यांचे तबेले होते. परंतु त्या तबेल्यांतील सारे घोडे आरसपानी दगडांचे होते! तेथे आजूबाजूस कोणी माणूस दिसेना. तेथील सर्व खोल्या व दिवाणखाने ते शोधू लागले. शेवटी एका दरवाजाजवळ ते आले.

त्या दरवाजाला तीन कुलपे होती. त्या दाराला फटी होत्या, त्या फटीतून आतील सारे दिसत होते. त्यात एक म्हातारा मनुष्य टेबलाजवळ बसलेला होता. त्या भावांनी त्याला एक-दोन हाका मारल्या, परंतु म्हाताऱ्याने ऐकले नाही किंवा मुद्दाम लक्ष दिले नाही. त्यांनी पुन्हा एकदा एक मोठ्याने हाक मारली. म्हातारा उठला व बाहेर आला.

तो काही एक बोलला नाही. सारे मुक्याने चालले होते. त्याने त्यांचे हात धरून त्यांना एका टेबलाजवळ नेले. त्या टेबलावर नाना खाद्यपेये होती. त्या सर्वांचा यथेच्छ समाचार त्या भुकेलेल्या तिघांनी घेतला. त्या म्हाताऱ्याने त्यांना एका शेजघरात नेले. तेथे ते तिघे भाऊ रात्री गाढ झोपी गेले.

सकाळ झाली. त्या तिघांतील जे सर्वांत वडील भाऊ होता, त्याच्याजवळ तो म्हातारा गेला. म्हाताऱ्याने त्याचा हात धरून त्याला एक टेबलाजवळ नेले. त्या टेबलाजवळ तीन फळ्या होत्या. त्या तिन्ही तुकड्यांवर काही लिहिलेले होते. त्या किल्ल्यावरची घातलेली जादू कशाने दूर होईल, हे त्या तीन लेखांत लिहिलेले होते, तेथे जी पहिली फळी होती तिच्यावर पुढील मजकूर होता-

'रानातील दलदलीखाली राजाच्या मुलीची हजार मोती आहेत. सूर्यास्तापर्यंत ती सारी शोधून काढली पाहिजेत. एकही जरी कमी भरले तरी शोधणारा संगमरवरी दगड होऊन बसेल!'

सर्वांत मोठा भाऊ रानात गेला व मोत्यांचा शोध करू लागला. दिवस मावळण्याची वेळ होत आली, पाखरे घरट्यात जाऊ लागली. परंतु हजार तर दूरच राहिली, शंभर सुद्धा मोती त्याला मिळाली नव्हती. सूर्य सर्व खाली गेला व तो भाऊही दगड होऊन पडला!

दुसऱ्या दिवशी मधला भाऊ त्या कामगिरीवर निघाला. परंतु भावाची गत तीच जी त्याचीही झाली. मोठ्या भावाने शंभर मोती जेमतेम गोळा केली होती; त्यात आणखी शंभराची मोठ्या मिनतवारीने या भावाने भर घातली. परंतु अट पुरी झाली नाही. दिवस मावळला, गाई गोठ्यात गेल्या, पाखरे घरट्यात गेली. बाहेर अंधार पडला व हा मधला भाऊही दगड होऊन पडला!

शेवटी त्या बुटक्याची पाळी आली. त्या दलदलीजवळ येऊन तो शोधू लागला, पाहू लागला. तो आधीच लहान व अशक्त. मोती शोधून काढणे मोठे दगदगीचे व कंटाळवाणे काम होते. शेवटी वैतागून तो बसला एका दगडावर व रडू लागला. त्याने ज्या मुंग्यांचे वारूळ वाचवले होते, त्या मुंग्याच्या राजाला ही गोष्ट कळली. पाच हजार कामकरी मुंग्या घोऊन तो जातीनिशी तेथे मदतीस धावून आला. लौकरच मोत्यांची रास त्यांनी तेथे तयार केली! परंतु तेथे दुसरी फळी होती, तिच्यावर पुढीलप्रमाणे लिहिलेले होते-

'राजकन्येच्या शयनमंदिराची किल्ली सरोवरात आहे ती काढून आणली पाहिजे.'

तो बटूवामन सरोवराच्या काठी आला. ते खोल सरोवर, किती लांब व रुंद. ती कशी सापडणार? परंतु ती दोन कृतज्ञ बदके त्याच्याजवळ आली व म्हणाली, "तू आम्हाला वाचविलेस. आम्ही तुला वाचवू. चिंता करू नकोस." ती बदके गेली पाण्यात. बुड्या मारून त्यांनी किल्ली शोधून काढली. ती त्यांनी त्या राजपुत्राजवळ आणून दिली.

परंतु अजून तिसरी फळी होती. तिच्यावरची अट फारच कठीण होती. तिच्यावर पुढील मजकूर होता-

'राजाच्या तीन मुली सारख्याच सुंदर दिसत होत्या. त्यांच्यात कोणताच फरक दिसत नव्हता. अगदी हुबेहूब एकमेकांची जणू बिंबप्रतिबिंब. त्या राजपुत्राला एक गोष्ट मात्र सांगण्यात आली होती. ती गोष्ट म्हणजे 'सर्वांत वडील मुलीने साखरेचा तुकडा खाल्ला आहे, मधलीने गोड सरबत घेतले आहे व धाकटीने चमचाभर मध घेतला आहे.' ही होय. आता मध घेणारी कोणती, हे ओळखून काढावयाचे होते.

ती मधमाश्यांची राणी आली. ज्या मधमाश्यांना त्याने जाळू दिले नाही, त्यांची राणी त्याच्यासाठी धावून आली. ती मधमाशी त्या तिघी मुलींच्या तोंडाचा वास घेऊ लागली व शेवटी जिने मध घेतला होता तिच्या ओठावर ती बसली! धाकट्या भावाने धाकटी मुलगी शोधून काढली.

तिन्ही अटी पूर्ण झाल्या. जादू निघून गेली. जे दगड होऊन पडले होते ते सारे पूर्वीप्रमाणे होऊन उभे राहिले, त्या बुटबैंगणाचा त्या सर्वांत लहान असलेल्या मुलीशी विवाह झाला. त्या दुसऱ्या दोन राजकन्या त्याच्या दुसऱ्या भावांना देण्यात आल्या. त्या मुलींचा बाप मेल्यावर तो बिटुकला राजा झाला. सारे सुखी झाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children