marathi katha

Drama

3.4  

marathi katha

Drama

गुराखी

गुराखी

4 mins
13.9K


एक होता राजा. त्याला शिकारीचा फार नाद. एकदा तो शिकारीसाठी गेला व रस्ता चुकला. भटक भटक भटकला. रानात त्याला एक लहानसा गुराखी भेटला. तो गायी चारीत होता, पावा वाजवीत होता. राजा त्याला म्हणाला, "मुला मला रस्ता दाखवतोस?" मुलाने विचारले, "तुम्ही कोण?" तो म्हणाला, "मी राजा." गुराखी म्हणाला, "राजासुद्धा रस्ता चुकतो! आम्ही नाही बा कधी चुकत. अंधारातसुद्धा नेमके घरी जाऊ." राजा म्हणाला, "मुला तू हुशार आहेस. कोण तुला शिकवते?" गुराखी म्हणाला, "मला, कोण शिकविणार? झाडे, माडे, फुले, पाखरे, नद्यानाले हे माझे मित्र. गायी चारतो, घरी जातो. आई भाकर देते ती खातो." राजा म्हणाला, "कोठे आहे तुझी आई?" गुराखी म्हणाला, "जवळच आहे झोपडी. येता का आईकडे!" राजा म्हणाला, "चल." दोघे निघाले. झोपडी आली. गुराखी म्हणाला, "आई, आई आपल्याकडे राजा आला. हा बघ." म्हातारी लगबगा बाहेर आली. तिने घोंगडी घातली. राजा म्हणाला, "म्हातारे, तुझा मुलगा हुशार आहे. त्याला मी नेतो, शिकवतो, पुढे त्याला प्रधान करीन." म्हातारी म्हणाली, "नको रे बाबा, आम्ही रानातले राजेच आहोत. राजाची मर्जी ढगावाणी, आळवावरचे पाणी. आता आहे, मग नाही. काडीचा भरवसा नाही." परंतु मुलगा म्हणाला, "आई, राजाबरोबर मला जाऊ दे. मी मोठा होईन. तुला मग पालखीतून नेईन." आई म्हणाली, "तुला इच्छा आहे तर जा. परंतु माझे शब्द ध्यानात ठेव." राजा व गुराखी निघाले. गुराख्याने रस्ता दाखविला. दोघे राजधानीला आले.

राजाने गुराख्याला शिकविण्यासाठी एक शिक्षक ठेवला. हळूहळू तो गुराखी हुशार झाला. राजाने त्याला मुख्य प्रधान केले. गुराखी मुख्य प्रधान झाला, परंतु त्याला गर्व झाला नाही. तो गरिबांची काळजी घेई, त्याने विहिरी बांधल्या. धर्मशाळा बांधल्या. तो कोणाला नाही म्हणत नसे. लोक त्याला दुवा देत. परंतु राजाचे जुने नोकर त्याचा हेवा करु लागले. ते राजाला म्हणत, "राजा, भिकारडा गुराखी, त्याला तू प्रधान केलेस हे बरे नव्हे. तो प्रामाणिक असू शकणार नाही. लोकांना मदत करतो, विहिरी बांधतो. धर्मशाळा बांधतो. कोठून आणतो हे पैसे? तिजोरीतील चोरीत असेल." राजा हलक्या कानांचा नव्हता. तो लक्ष देत नसे. परंतु पुढे तो राजा मेला व त्याचा मुलगा गादीवर आला. या नव्या राजाजवळ ते जुने नोकर नाना गोष्टी सांगू लागले. एक दिवशी म्हणाले, "महाराज, तुमच्या वडिलांनी ऐकले नाही व या भिकारड्या गुराख्याला प्रधान केले. हा लफंगा आहे. तुमच्या वडिलांची हिऱ्यांच्या मुठीची एक तलवार होती. ती याने लांबविली. विचारा याला ती कोठे आहे म्हणून." नव्या राजाने गुराखी प्रधानाला बोलाविले व सांगितले, "ती रत्नजडित मुठीची तलवार घेऊन ये." प्रधानाने शोध शोध शोधली. तलवार सापडेना. परंतु त्याला आठवले की एकदा पूर्वीच्या राजानेच ती मोडून नवीन दागिने केले. त्याने ती हकीगत सांगितली. नव्या राजाचा विश्वास बसेना. तो म्हणाला, "प्रधानजी, चार दिवसांनी सर्व खजिन्याचा हिशेब घेईन. पैशाची अफरातफर असेल तर मान उडवीन." प्रधान म्हणाला, "महाराज, चार दिवस नकोत. आताच घ्या. चार दिवसांची मुदत द्याल, परंतु माझे शत्रू म्हणतील की नेलेले पैसे आणून ठेवले असतील, पुन्हा संशयाला जागा नको." राजा म्हणाला, "ठीक तर, आताच खजिना पाहू." राजा निघाला. तो प्रधान निघाला. सारी जुनी कारभारी मंडळी निघाली. खजिना मोजण्यात आला. पाव आण्याचीही चूक नाही. मत्सरी मंडळींची मान खाली झाली. परंतु त्यातील एकजण धीर करुन राजाला म्हणाला, "राजा, या प्रधानाच्या घराची झडती घ्या. खात्रीने चोरलेली हिरेमाणके तेथे सापडतील." राजा म्हणाला, "चला." सारे प्रधानाच्या घरी गेले. ओटीवर साधी चटई होती. ना गालीचे, ना हंड्याझुंबरे, राजा म्हणाला, "यांचे घर तर साधे दिसते." मत्सरी मंडळी म्हणाली, "लबाड लोक वरुन असेच असतात. बगळे दिसायला ढवळे परंतु आत काळे." राजा म्हणाला, "बरे. घरात शिरु या." घरात कोठे काही सापडले नाही. परंतु शोधता शोधता एका खोलीत एका कपाटाला भले मोठे कुलूप होते. मंडळी म्हणाली "केवढे मोठे कुलूप! यात असेल चोरीचा माल." राजाने विचारले, "प्रधानजी, यात काय आहे?" प्रधान म्हणाला, "महाराज, माझी सारी संपत्ती यात आहे." राजा खवळला. रागाने लाल झाला. तो ओरडून म्हणाला, "फोडा ते कुलूप." कुलूप फोडण्यात आले. परंतु आत काय होते? तेथे एक फाटकी घोंगडी, एक काठी व एक फाटका वहाणांचा जोड होता. राजाने रागाने विचारले, "कोठे आहे संपत्ती? राजाची थट्टा करतोस?" प्रधान नम्रपणे म्हणाला, "महाराज, हीच माझी खरी संपत्ती. तुमच्या वडिलांनी मला रानातून आणले तेव्हा एवढ्याच वस्तू माझ्याजवळ होत्या. बाकीचे माझे वैभव तुमचे होते. ते मी सारे लोकांस देत असे. आई म्हणाली होती, 'राजाची मर्जी म्हणजे अळवावरचे पाणी. राजाची नोकरी म्हणजे सुळावरची पोळी.' तिचे शब्द खरे झाले. मी पुन्हा रानात जातो व रानातील राजा होतो." राजाला वाईट वाटले. त्याला त्या दुष्ट कारभारी मंडळींचा राग आला. त्याने गुराख्याला सांगितले, "तू जाऊ नकोस. या चांडाळांनाच मी दूर करतो. तुझ्यासारखा प्रधान असेल तरच राजाच्या हातून भले होईल. लोकांच्या कल्याणासाठी तरी तू रहा." गुराख्याने ऐकले. दुष्ट मंडळी दूर गेली. प्रजा सुखी झाली. गुराख्याने आपल्या आईलाही रानातून आणिले. तो दिवसा लोकांचे कल्याण करी व रात्री आईचे पाय चेपून तिचा आशीर्वाद घेई.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama