Sunita madhukar patil

Horror Tragedy

4.6  

Sunita madhukar patil

Horror Tragedy

मोकळं आभाळ तिच्या हक्काचं-भाग३

मोकळं आभाळ तिच्या हक्काचं-भाग३

4 mins
730


ऋग्वेदी आता सहा महिन्याची झाली होती आणि रांगु लागली होती. आरती अगदी डोळ्यात तेल घालुन तिची काळजी घेत होती. तिला एक क्षण ही नजरेआड होऊ देत नव्हती. एक दिवस आरतीच लक्ष नाही अस पाहून तिच्या सासुने झोपलेल्या ऋग्वेदीला उचलुन नेऊन बाथरूममध्ये भरलेल्या पाण्याच्या टबमध्ये नेऊन बुडवलं आणि बाहेर येऊन मोठ्या आवाजात TV पाहू लागली. जेणेकरून तिचा रडण्याचा आवाज बाहेर येऊ नये.


ऋग्वेदी दिसत नाही तिचा आवाज ऐकु येत नाही म्हणुन आरतीची शोधाशोध सुरू होते. ती पुर्ण घरभर तिला शोधते.पण ऋग्वेदी तिला कुठेच दिसत नाही. इतक्यात तिची नजर बाथरूमकडे जाते, ती रांगत रांगत बाथरूममध्ये तर गेली नसेल ना!!! असा विचार करून ती बाथरूमकडे वळते आणि आत डोकावून पाहते तर काय!! ऋग्वेदी श्वास घेण्यासाठी तडफडत असते. तिच्या नाकातोंडातुन पाणी आत चाललेलं असतं. ती गटांगळ्या खात असते, धडपडत असते, तिच्या नाकातोंडात पाणी जात असल्यामुळे तीला नीट श्वास घेता येत नव्हता आणि आवाज ही बाहेर पडत नव्हता. आरती घाईघाईने तिला टब मधुन बाहेर काढते. तिला पालथं करून तिच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आपल्याला ऋग्वेदीला शोधायला आणखी थोडा वेळ झाला असता तर काय घडलं असतं नुसत्या विचारानेच आरतीला घाम फुटतो. ती आतुन खुप घाबरलेली असते. आणि तिची सासू हे सगळं लांबुन पहात असते आपला ऋग्वेदीला या जगातुन घालवण्याचा हा प्रयत्नदेखील फसला म्हणुन आरतीवर दात ओठ खात असते. 


आरती झालेला सगळा प्रकार डॉ. स्मिताला फोन करून सांगते. " ऋग्वेदी आता कशी आहे, मी येते तिला बघायला तु काळजी करू नकोस तुझा पत्ता मला सांग, काही काळजी करू नकोस सारं काही ठीक होईल." स्मिता आरती कडून पत्ता विचारून घेते आणि तिला भेटायचं ठरवते.


राजीव दुपारी जेवायला घरी आलेला असतो, तेंव्हा जेवता जेवता आरतीची सासु राजीवच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढते. " अरे!!!आपल्या लांबच्या पाहुण्यात एक मुलगी आहे, चांगली संस्कारी आहे आणि विशेष म्हणजे खुप श्रीमंत स्थळ आहे, भरपूर हुंडा भेटेल. काय म्हणतोस शब्द टाकू का तुझ्यासाठी."

" अगं पण आई कसं शक्य आहे पाहिलं लग्न झालं असताना मला मुलगी कोण देणार."

आरती गप्प होती ती फक्त त्या दोघांचं बोलणं गुपचूप ऐकत जेवण वाढत होती.

" अरे!!! त्यात काय एवढं घटस्फोट देऊन टाक तिला, त्या अवदसेपासून पण सुटका भेटेल आपल्याला. किती प्रयत्न केले तरी मरत नाही. घट्ट चिकटून बसली आहे गोचिडासारखी." 


आता मात्र आरतीचा संयम सुटतो. ती ओरडुन राजीवला निक्षून सांगते, " तुम्ही दोघे माणूस म्हणवुन घ्यायच्या लायकीचे देखील नाही. माझ्या पोरीच्या जीवावर उठलात, हे कमी होत म्हणुन आता तुम्हाला घटस्फोट हवा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला घटस्फोट देणार नाही आणि इथे राहणार सुद्धा नाही. पोलिसात तुमच्याविरोधात एक तक्रार केली असती ना तर आतापर्यंत तुम्ही दोघेजण खडी फोडायला गेला असता. पण तुम्ही बदलाल अशी आशा वाटत होती म्हणुन सगळं सहन करत आले पण आता बस्स!!! आता नाही !!! मी जातेय हे घर सोडून".


"तु तक्रार करणार आमच्या विरोधात पोलिसात." म्हणत राजीव तिच्यावर हात उगारतो. आरती वरच्यावर त्याचा हात पकडते " बस्स!!! आता नाही, हात नाही उचलायचा माझ्यावर."


राजीव रागाने फणफणत होता, आजवर गपगुमान मार खाणारी आरती आज प्रतिकार करत होती हा त्याच्या पुरुषी अहंकाराला बसलेला सगळ्यात मोठा धक्का होता.

"जा!!! खुशाल जा कुठे जायचं तिकडे उद्या पोटाला कमी पडायला लागलं की येशील परत नाक घासत."


"नाही येणार परत, माझ्या मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं आहे मला. तिला एक चांगलं भविष्य द्यायचं आहे, ती माझ्यासारखी कुढत, बुक्क्यांचा मार सहन करत नाही जगणार. तिला पण जगायचा अधिकार आहे. तिला तीच मोकळं आभाळ तिच्या हक्काचं देणार आहे. त्या मोकळ्या आभाळात ती मोकळा श्वास घेईल, मोठी भरारी घेईल आणि तिच्या पंखांना बळ मी देणार आहे." आरती आज रडत नव्हती, तिच्या डोळ्यात एक निश्चय, आत्मविश्वास होता.

"जा आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरातुन!!! चार दिवसात परत येशील. मग बघतो तुझ्याकडे. कुठे जातेस आणि काय करतेस मलापण बघायचचं आहे." राजीव तावातावात बोलत होता.

"ह्या घरचा उंबरठा जर तु आज ओलांडलास तर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायम बंद होतील.पुन्हा या घरात परत यायचं नाहीस. परत माघारी वळून बघायचं नाहीस तु इकडे." आरतीची सासु तिला हात धरून बाहेर ढकलत होती.

"नाही येणार ती परत इथे आणि ती इथं परत येऊ नये याची काळजी किंवा खबरदारी मी घेईन." डॉ. स्मिता आरतीचा हात पकडून बोलत होती. आरतीकडुन पत्ता घेतल्यानंतर ऋग्वेदीला बघायला म्हणुन ती इथे आली होती. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता, बाहेर उभे राहुन ती आत चाललेलं सगळं बोलणं ऐकत हाती.

एका हाताने स्मिताचा हात पकडुन कडेवर ऋग्वेदीला घेऊन आरती मागचा पुढचा विचार न करता घरातुन बाहेर पडली एका नव्या वाटेवर.

बाहेर मोकळं आभाळ वाट पहात होत तिच्या हक्काचं.


स्मिताने आरतीला तिच्या आऊटहाऊसमध्ये रहायला एक रूम दिली, आरतीला आपल्या क्लिनिकमध्ये काम दिलं. आरती स्मिताच्या घरीसुद्धा तिच्या घरचं काम करायची. तिच्या कामाचा मोबदला म्हणुन स्मिता तिला महिन्याच्या शेवटी एक ठराविक रक्कम देऊ करायची आणि आरतीच्या शिक्षणाची जवाबदारी स्मिता आणि तिच्या नवऱ्याने उचलली होती. स्मिताच्या नवऱ्याला तिने घेतलेल्या निर्णयाचा अभिमान होता. आरतीने ऋग्वेदीला राजीव पासून लांबच ठेवलं. एक दोन वेळा राजीवने आरतीला भेटण्याचा प्रयत्न केला पण आरतीने त्याची दाद लागू दिली नाही. ऋग्वेदी पण दोन दोन आयांच्या मायेच्या पंखाखाली वाढू लागली. ती अभ्यासात खुप हुशार होती. 

आणि आज या सगळ्या संघर्षाचा फळ त्या दोघींना ही मिळालं होत. ऋग्वेदी आज MBBS डॉक्टर बनली होती. आतापर्यंतचा सारा प्रवास स्मिता आणि आरतीच्या नजरेसमोरुन गेला. राजीवला आज त्याच्या वागण्याचा पाश्चाताप होत होता.


तर मैत्रिणींनो स्त्रीचं शारीरिक आणि शैक्षणिक सबलीकरण, आर्थिक सबलीकरण, वैचारिक सशक्तीकरण आणि सामाजिक सशक्तीकरण या सगळ्या पैलूंनी स्त्री जेव्हा सशक्त होते आणि त्याचा उपयोग सकारात्मक दृष्टीने समाजासाठी केला जातो तेव्हाच खर्‍या अर्थाने स्त्रीचं सशक्तीकरण, सक्षमीकरण झालं असं म्हणता येईल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror