मनीच्या कानी १२
मनीच्या कानी १२
हाय मनी ,
कसा चाललाय अभ्यास? तुम्ही दोघ सध्या खूप बिझी आहात ना? म्हणून सारखं फोन करून त्रास देत नाही. पण त्यातही तुम्ही तुमच्या कलेला आणि खेळांना वेळ देताय हे महत्वाच. अग, परवा मजाच झाली. आपले ड्रायवर काका म्हणाले, "म्याडम, आज मी तुमचं काम करू शकणार नाय. मी लयी बीजी हाय." मी म्हटलं "का? कश्यामुळे एवढे बिझी?" तर म्हणाले, "साहेबांच्या आज खूप मिटिंग हायत, म्हणून मला टाईम नाय." हसून कोसळले मी, त्यांना पण बिझी असण्याची किती मानसिक गरज होती बघ..
जग खरच वेगाने पळतंय. त्यात आपल्याला काम नाही, किंवा वेळच वेळ आहे, हे सुद्धा काही जणांना सोसवत नाही.
“वेगे वेगे धावू , नि डोंगरावर जाऊ , ही शर्यत रे आपुली “, हे ऐकतच आपण लहानाचे मोठे होतो. या गाण्यातला ससा वेगाने धावून थकतो, अवेळी झोपतो ( अति आत्मविश्वासाने किंवा थकल्याने ...ससा कुठेच बोलला नाहीये, का ते ? ) आणि स्पर्धा हरतो. कासव हळूहळू , एकाग्रतेने, आणि सातत्याने चालून स्पर्धा जिंकत., अशी ही गोष्ट. गोष्ट ऐकून आमच्या पिढीलाच पन्नास वर्ष झाली. गेल्या पन्नास वर्षात सगळ्यांच्याच आयुष्याला भन्नाट गती मिळाली.
म
ेट्रोसिटीतल्या माणसांविषयी तर बोलायलाच नको. उरी फुटेस्तो माणस धावायला लागली.कोणी पैश्यासाठी, कोणी पदासाठी, कोणी प्रतिष्ठेसाठी. या धावण्याच्या वेगाने एक वावटळ तयार केली, त्या वावटळीच्या धुराळ्यात माणसाच माणूसपण पाला पाचोळ्यासारखं उडून गेलं. त्या वावटळीच एका अजस्त्र चक्रात रुपांतर झालं. तो उभा मनोरा गोल गोल फिरत पिढ्या न पिढ्या गिळंकृत करतोय.
या वादळातून स्वतःचा बचाव करायचा असेल तर पाय घट्ट जमिनीवर रोवले पाहिजेत. आपल्या संस्कारांची बैठक मजबूत पाहिजे. मनावर आलेली जळमट वारंवार स्वच्छ करायला पाहिजेत. आपल्याला आयुष्यात नक्की काय हवंय याचा विचार असला पाहिजे. असलेल्या चोवीस तासांच उत्तम नियोजन केलं पाहिजे. आपल्या लक्ष्याचा कधी विसर पडू देता कामा नये. त्या दिशेन ठाम पावलं पडली पाहिजेत. मग ह्या वेगाच्या भस्मासूराशी, तुम्ही दोन हात करू शकता, फारशी पडझड न होता. सश्याचा चपळपणा आणि कासवाच विचारी सातत्य, दोन्हीची मोट बांधली, तो जिंकला.
कधी कधी जरा फिलोसोफिकल होतंय का ?
हा..हा! आईपणा मधेच डोकं वर काढतो ना? बर. आज साठी एवढंच.
बाय.
लव यू .
मम्मा .