Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Nilesh Jadhav

Romance


3  

Nilesh Jadhav

Romance


मनातला कृष्ण

मनातला कृष्ण

5 mins 170 5 mins 170

गोकुळाष्टमीचा दिवस होता. शनिवार आणि लागूनच रविवार आल्यामुळे मी गावाला निघालो होतो. सातवीपर्यंतच शिक्षण गावात झालं. पुढच्या शिक्षणासाठी मी मामाच्या गावाला होतो. मामाचं गाव शहरानजीक असल्यामुळं बऱ्यापैकी सुख-सुविधा मिळायच्या. आणखी महत्त्वाचं कारण म्हणजे घरी वाट्याला आलेलं अठराविश्व दारिद्र्य होतं. मामाच्या गावच्या आणि आमच्या गावच्या मध्ये भला थोरला डोंगर आहे आणि तिथूनच गावी जावं लागायचं. मी घाईतच निघालो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. श्रावण मास सुरू होता. डोंगर हिरव्या दुलईत हरवले होते. सकाळी सकाळी आभाळ काळवंडून गेलं होतं. पाऊस जोरदार बरसणार असं दिसत होतं आणि त्यात पण मला त्याची फिकीर नव्हती. मी निघालो होतो वाऱ्याच्या वेगाने. कारण गावाला जायची ओढ अस्वस्थ करत होती. डाव्या बाजूच्या डोंगरावर काळ्याकुट्ट ढगांन तांडव सुरू केलं होतं. पण त्या डोंगराहून सरकत पाऊस समोरच्या धरेला येण्याअगोदर मला जायचं होतं. त्या मागचं कारणही तसंच होतं. त्या अल्लड वयात प्रेमाचा अर्थही कळत नव्हता तरीही मनावर कोणीतरी राज्य करत होतं. कित्येक रात्री तिचीच स्वप्न पाहत या डोळ्यांना जागवत होतं. ते नाव म्हणजे माधवी...


माधवी आमच्या गावच्या भगवानराव पाटलाची लेक. भगवान पाटील गावची प्रतिष्ठित असामी होती. चांगलं पीक निघेल एवढी शेतजमीन, बापजाद्यांची इस्टेट, बैलजोडी, म्हशी त्यामुळे सोबतीला दूध व्यवसायही होताच. त्यातून तो रगेल आणि पैशाचा माज असलेला होता. माधवीला जेमतेम सोळावे लागलेले पण वयाच्या मनाने तिचे हाडपेर मोठे होते. काळ्याभोर डोळ्यातली चमक तर निराळीच. गोरा रंग इतका की एखादवेळी उन्हाने पडलेल्या तापीवर सळसळ करत पिवळी जर्द नागीण निघावी असाच भास व्हायचा. लांबसडक केस आणि गालावर आलेली बट तिचं सौंदर्य आणखी खुलवायची. गावातल्या पोरांच्या नजरा आताशा तिच्याकडे वळू लागल्या होत्या. पण तिच्या बापाचा जरब इतका की तिच्याशी थेट बोलायची कोणाची हिंमतच व्हायची नाही. आणि त्यातल्या त्यात बापाच्या माघारी पोरगी पण तेवढीच आघाव आहे असं अख्खा गाव म्हणायचा. पण तिच्या मनातला चांगुलपणा, निरागसपणा, हळवेपणा तिचाच बाल मित्र असलेल्या मलाच माहीत होता. कारण माधवी माझी बालमैत्रिण होती.


माधवीचं आणि आमचं घर शेजारीच होतं, म्हणूनच आम्ही लहान पानापासून एकत्र वाढलेलो. आमची परिस्थिती जेमतेमच होती. शेतात राबून बाप्पु आणि आई काय मिळवतील त्यातच आमची गुजराण व्हायची. शेती पोटापुरतीच होती. आणि दावणीला बांधलेली हरणी गाय एवढंच काय ते पदरात होतं. आज बऱ्याच दिवसांनी मी गावाला चाललो होतो. खरंतर मनात एक वेगळीच कालवाकालव चालली होती. त्याबरोबर नजरेत भीतीसुद्धा येऊन थांबली होती. दुपारच्या वेळी मी गावात शिरलो तेव्हा मनात एकच इच्छा होती की पहिल्यांदा माधवीच दिसावी. घरात शिरताना पण माझी नजर तिच्या घराच्या दारातच होती पण या इच्छेवर पाणी पडलं. घरी आलो तेव्हा पाऊस पडून गेला होता. समोरच्या डोंगरावरून कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र कड्यावर श्रावणातलं ऊन चमकत होतं. हलक्याशा वाऱ्याच्या झुळकीने झाडाच्या पानांची सळसळ चालूच होती. 


थोडावेळ बसून मग आईला सांगून मी शेताकडे निघालो. गावातली पोरं पावसाळ दिवसाला आपापल्या कामात व्यस्त असतात म्हणून कुठल्याच मित्राला न घेता एकटाच निघालो. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार भातशेती नटलेली होती. पक्ष्यांचा मंजुळ आवाज फाड्यावरून खळखळ करत पडणाऱ्या पाण्यात हरवत होता. बांधाच्या कडेला भात खायला आलेल्या खेकड्या चाहूल लागताच बोळात शिरत होत्या. मधेच एखादं फुलपाखरू रानफुलांवर बसलेलं दिसत होतं. एखाद्या वाऱ्याच्या झुळकीने झाडाच्या पानावर पडलेले पावसाचे थेंब अंगावर पडून शहारा उमटवत होते. आणि अचानक मी स्तब्ध झालो कारण या अस्सल निसर्ग सौंदर्याला लाजवणार सौंदर्य साक्षात समोरून येत होतं. मनाच्या खोल गाभाऱ्यात रुतलेली माधवी समोर होती. बऱ्याच दिवसांनी मी तिला पाहत होतो. तिचे नेहमीचे पाणीदार डोळे या श्रावणात पडलेल्या उन्हात आणखी चमकदार दिसले. गुलाबाचं सुंदर फुल कळी असते तेव्हा नाजूक, तर पूर्णतः उमलून येते तेव्हा त्या दिसणाऱ्या सौंदर्याला शब्दच नसतात. अशीच काहीशी ती दिसत होती. अचानक मला पाहून ती थोडी भांबावून गेली. नकळत काळजाचे ठोके वाढले होते. जरी आम्ही बालमित्र होतो तरीही अलीकडच्या काळात एकमेकांशी थोडं अबोल झालो होतो. ओठांवर शब्द धडका मारत होते. आणि तेवढ्यात तिच्याच आवाजाने मी भानावर आलो.


थोडंस काचरतच ती बोलली, "कधी आलास?"


"आत्ताच आलोय," मी बोललो.


"मग इकडे काय करतोयस."


"तुलाच शोधत वाट चुकलोय."


"गप रे तू सुधारला नाहीस अजून."


"का काय झालं..?"


"मला चिडवतोयस ना..?"


यावर मी निःशब्द होऊन पुढे चालू लागलो. खरं तर मला मनातलं सांगायचं होतं, बोलायचं होतं, मोकळं व्हायचं होतं पण भीतीसुद्धा वाटत होती. ती ही खाली मान घालत तिच्या नाजूक ओठांच्या पाकळीतून थोडंसं हसत चालू लागली. तितक्यात मीच तिला परत आवाज देऊन म्हणालो, "संध्याकाळी भेटशील..? बोलायचंय तुझ्याशी." मानेनेच होकार देत ती निघून गेली. थोडासा इकडे तिकडे करून मीही घरी निघून गेलो.


संध्याकाळ झाल्यानंतर मी दारातल्या ओसरीवर बसलो होतो. लोकांची धारा काढून दूध घालायला जायची तयारी सुरू झाली होती. अंधार पडून गेला तरी माधवी काही दिसली नाही. माझी नजर सारखी माधवीच्या घराकडे घिरट्या घालत होती. तितक्यात ओटीवर बांधलेल्या झोक्यावर ती येऊन बसली. इकडचा तिकडचा अंदाज घेत तिने मला हातानेच तिच्याकडे येण्याचा इशारा केला. मी मनात एकदा सगळं बळ एकवटून तिच्यापाशी गेलो. घरात तिचा तापट बाप नव्हताच म्हणा तरीही मी तिला विचारलं.


"अण्णा नाहीत ना गं घरात..."

 

त्यावर ती खळखळून हसत म्हणाली, "एवढा घाबरतोस अण्णांना..?"


"छे मी का घाबरू.?" पण खरंतर मी घाबरलेलोच होतो. आणि हे तिनेही हेरलं असावं.

 

"ते गेलेत दूध घेऊन, तुला काय बोलायचं होतं..?"


मी थोडा वेळ शांतच उभा राहिलो. तीही वर तुळईकडे पाहत झोका घेत होती. लहानपणी याच झोपाळ्यावर बसून झोका दे रे म्हणत ऐटीत हुकूम सोडणारी माधवी आत्ता मात्र शांत होती. वातावरणात गारवा पसरलेला होता. अधून मधून पावसाच्या सरी कौलावर आवाज करून जात होत्या. विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात गोकुळाष्टमीच्या भजनाची तयारी चालू झाली होती. त्याचाच आवाज रातकिड्यांच्या आवाजात एकवटून पावसाच्या थेंबाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होता. बराच वेळ शांततेत गेला आणि माझ्या तोंडातून शब्द निसटले. "मला तू आवडतेस."


हवेच्या झुळकीबरोबर अलगद चाललेला तिचा झुला मधेच थांबला. तिने या गोष्टीचा विचारही केला नसेल बहुदा. क्षणभर तिच्या डोळ्यात मला निखाराच दिसला. ती चटकन तिथून उठली आणि ताडकन निघूनही गेली. माझं काही तरी चुकलं, हो चुकलंच. कदाचित हा विचार करत धडधडत्या हृदयाने मी घरी गेलो. बाहेर पावसाला चांगलाच जोर चढला होता. कसं तरी जेवण आटोपून मी गोधडीत शिरलो पण झोप काही येत नव्हती. तिच्या चेहऱ्यावरचा राग तिच्या त्या बोलक्या डोळ्यातला अंगार झोप येऊच देत नव्हता. मंदिरात भजन चालू झालं होतं आणि राधा-कृष्णाच्या गवळणीही गायल्या जात होत्या. मी मात्र अगदीच सुन्न झालो होतो. 


सकाळ झाली आईने मला उठवलं. मी सगळं आवरून बाहेर पडलो. आज दिवस मित्रांबरोबर घालवायचा असं मनाशी ठरवून पारावर गेलो. एवढ्या दिवसात आज मी माधवीच्या दाराकडे पाहिलंही नाही. कालच्या प्रसंगाने मी हादरूनच गेलो होतो. पुरता बिथरलो होतो. गोपाळकाल्याचा दिवस असल्यामुळं पोरांनी ठरवलं होतं दहीहंडी बांधायची. दुपारपर्यंत सगळी तयारी झाली. गण्याच्या अंगणात हंडी बांधली होती. टेप लावून गाण्याच्या तालावर पोरांनी ताल धरला होता. पोरीही आल्या होत्या. घोळक्याने उभ्या राहून पाहत होत्या. रिमझिम पाऊस चालूच होता. वळचणीला लावलेली भांडी पोरांच्या अंगावर रिकामी होत होती. मी तिथेच उभा होतो माझं लक्षच नव्हतं या सगळ्यात. तेवढ्यात माधवी शेजारी येऊन उभी राहिली. अचानक कानात कोणीतरी गरम तेल ओतावे आणि खुप वेदना व्हाव्यात असं ती बोलून गेली. ती म्हणाली "अरे या राधेच्या मनातला कृष्ण कोणी वेगळाच आहे तू नाहीस..." मी क्षणभर तसाच उभा राहिलो. यावेळी डोळ्यातल्या भीतीची जागा आसवांनी घेतली होती. वाढलेली धडधड थांबली होती. थोड्या वेळाने भानावर येत मी त्या रिमझिम पावसात जाऊन उभा राहिलो कारण डोळ्यातल्या पावसाला आता उधाण आलं होतं. तेवढ्यात वळचणीचं एक भांडं माझ्यावर उपडं झालं. आणि मग मी त्या नाचणाऱ्या पोरांच्यात स्वतःला झोकून दिलं.


Rate this content
Log in

More marathi story from Nilesh Jadhav

Similar marathi story from Romance