STORYMIRROR

Sanjay Phadtare

Inspirational

3  

Sanjay Phadtare

Inspirational

मन

मन

4 mins
1.2K


         एका राजघराण्याच्या भावकीत सामान्य व प्रामाणिकपणे शेती करणारा बजरंग होता.नुकतेच त्याचे सर्वसामान्य कुटुंबातील पण अगदी साधारण दिसणाऱ्या सुमनशी लग्न झालेले असते.कोरडवाहू शेती करीत दोघांचाही तसा सुखी संसार सुरु होता.अंथरुण पाहून पाय पसरावे याची जाणीव परिस्थितीमूळे दोघांनाही होती.कष्टाने मिळविलेल्या भाजी-भाकरीत हे जोडपे समाधानी होते.पण बजरंगाच्या प्रारब्धात काही वेगळेच लिहून ठेवलेले होते.    संस्थानाच्या तरुण राजाचे आकस्मिक निधन होते.तो अविवाहित व त्याला कोणीही भाऊ नसल्याने गादीला वारसाची शोधा-शोध करणेस सुरुवात होते.पण निवडलेले वारस काही केल्या राजमातेस पसंत पडत नव्हते.इकडे राजमातेच्या नजरेत त्यांच्या भावकीतील गरीब आणि होतकरू बजरंग भरत होता. राजमातेच्या पसंतीला साऱ्यांनी दुजोरा देताच सर्वसामान्य बजरंग राजा म्हणून गादीवर बसला.बजरंग व सुमन हे सर्वसामान्य जोडपं अचानक राजा-राणी बनते.बजरंग राजमातेच्या मार्गदर्शनानुसार सर्व कारभार चोखपणे सांभाळत होता. प्रजादेखील त्याचे कारभारावर समाधानी होती.   काही काळातच रिवाजाप्रमाणे बजरंगास दुसरी राणी करावी असे राजमातेस वाटू लागते. त्याप्रमाणे दुसऱ्या राणीची निवड होऊन लागलीच लग्नदेखील पार पडते.   सुमन ही मुळातच गरीब आणि सालस मुलगी असल्याने आणि राजा म्हंटले की राण्या असणार हे समजून गेलेली होती.    कालांतराने तिसऱ्या राणीसोबतही बजरंगाचे लग्न होते.तरीही बजरंगास केवळ एक आवडली म्हणून चौथीशी लग्न करून तिला तो पट्टराणी बनवतो.   साहजिकच पहिली बायको सुमनकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागते.असे असूनही सुमनचे मात्र बजरंगावरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नसते.    

बजरंगाचे ऐशो-आरामत दिवस चाललेले होते.एकेदिवशी राजा बजरंग दुपारचे जेवणानंतर वामकुक्षी घेत असताना त्याला एक भयाण स्वप्न पडते.स्वप्नात स्वतः यमराज येऊन त्याला बजावतात,"हे राजा, तुझा आज शेवटचा दिवस आहे.तुला उद्या माझे सोबत यावे लागेल याची तयारी कर".असे म्हणताच राजास दरदरुन घाम फुटून जाग येते. बजरंग पुरता घाबरुन गेलेला असतो. अचानक हे सारे वैभव सोडून जावे लागणार या कल्पनेने तो पार गळून पडतो.स्वतःला सावरत तो तडक पट्टराणीकडे जातो.  आपलेकडे अचानक राजा आल्याने ती त्यांची विचारपूस करते. "महाराज,काय झाले? एवढे चिंताग्रस्त का दिसता?"राजा तिला सर्व वृतांत सांगताच तिलाही वाईट वाटते.   राजा तिला म्हणतो,"मला हे अर्ध्यावर आयुष्य सोडून जाणे फार जड जात आहे.मला फार एकाकी वाटत आहे.तू तर माझी पट्टराणी, तू मला मृत्यूनंतर साथ देशील काय? तू माझ्या सोबत येशील काय?"   राजाच्या या प्रस्तावाला पट्टराणी त्वरित उत्तर दिले,"महाराज, तुम्ही आम्हांस सोडून जाणार याचे खरेच फार दुःख वाटते.पण मी तुम्हांला साथ द्यावी असे कसे काय तुम्हाला वाटले? मला हे बिलकुल मान्य नाही.किंबहुना अशी अपेक्षाच तुम्ही कशी करू शकता? अगदी प्रसंगी या क्षणाला मी जळून जाईन पण तुंमच्यासोबत येणार नाही."   पट्टराणीच्या या उत्तराने राजा क्षणात भानावर येतो.त्याचबरोबर त्याला अत्यंत वाईटही वाटते.सर्वात लाडक्या पट्टराणीकडून त्याला अशा प्रतिसादाची बिलकुल अपेक्षा नव्हती.आल्या पावलाने मागे फिरतो अन तो तीसऱ्या राणीकडे जातो.तिला सर्व प्रकार कानावर घालतो.शिवाय पट्टराणीने दिलेला नकार सांगून तू तरी माझ्या सोबत येशील काय?" असे विचारतो.     

तीसरी राणी त्यांना शांतपणे समजावते,"महाराज ,तुम्हावर खरोखरच बाका प्रसंग आला आहे.त्यात पट्टराणीचा नकार हेही फार दुःखदायक आहे.परंतु महाराज,मी मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला साथ देईन.मात्र तुमचा जीव जाईल त्याच क्षणी मी दुसऱ्याची होईन".असे म्हणताच राजा पुन्हा एकदम सुन्न होतो.   वाईट वेळ आल्यावरच आपल्या माणसाची पारख होते याची त्याला जणू प्रचिती येत होती.नाराज मनाने तेथून तो तडक दुसऱ्या राणीकडे जाऊन सर्व घटना तिला सांगत म्हणतो, "तू तरी मला साथ देशील काय"?अशी विचारणा करताच तीही त्याला म्हणते,"महाराज,तुमच्यावर फार बाका प्रसंग निर्माण झाला आहे.त्यात दोन राण्यांनी तुम्हाला साथ देऊ नये हेही फार दुःखद आहे.महाराज,मी मात्र तसे करणार नाही.मी तुमच्या सोबत आहे आणि अगदी मृत्यूनंतर ही तुमच्यासोबत असेन,तुमच्या मृत्यूनंतरही सर्व उत्तरकार्य करेन अगदी वर्ष श्राद्ध सुद्धा मी घालीन.पण तदनंतर मात्र कायमस्वरूपी तुम्हाला साथ देऊ शकणार नाही".  या राणीच्या उत्तरानेही राजा फार हताश होतो.या सर्व पार्श्वभूमीवर पहिली राणी सुमनकडे जाण्याचे त्याला धाडसही होत नाही.त्यामुळे तो आपल्या महालाकडे परत फिरतो.   महालात येऊन खिडकीकडे तोंड करून स्वगत बोलू लागतो."माझ्या या राण्या ज्या जिवंतपणी माझी किती काळजी घेत होत्या,पण अचानक येणाऱ्या मृत्यूनंतर कोणीही सोबत देऊ शकत नाहीत.काय उपयोग या माझ्या राजेपणाचा? कोण देईल मला आता साथ?" त्याचवेळीपाठीमागून आवाज येतो, "महाराज,मी आहे ना.मी देईन तुम्हाला शेवटपर्यंत साथ".   राजा मागे वळून पहातो तर ती होती पहिली राणी सुमन.या सर्व प्रकाराने राजा मनोमन खजील होतो.जिच्या सोबत आपण खऱ्याअर्थाने सुखीसंसाराची सुरवात केली होती,ती हीच सुमन.अन आपण मात्र तिला राजेपद येताच दुर्लक्षित केले.  राणी सुमन म्हणाते,"महाराज,मी सदैव आपल्या सोबत होते.आताही आपल्या सोबत आहे. येथुन पुढेही सदैव आपल्या सोबत मी रहाणार आहे.मी कायम केवळ तुमचाच विचार केला आहे.मात्र दुर्दैवाने तुम्हीच माझा कधीही विचार केला नाहीत".   

यासर्व प्रकाराने राजाला त्याची चूक उमगते,पण तोपर्यंत वेळ गेलेली होती.   मित्रहो,या गोष्टीचा मतितार्थ असा की, सर्वात लाडकी 'पट्टराणी' म्हणजे आपले 'शरीर,रूप,सौंदर्य' जे नश्वर असुन ते कधीच चिरकाल टिकत नाही.ते कधीही ते मृत्यूनंतरही साथ देऊ शकत नाही.   तीसरी राणी म्हणजे,आपले 'पद, समाजातील आपले स्थान'.हे आपण पाय उतार होताच दुसरा ती जागा पटकावतो.मिळालेले पद कधीच सतत आपले असत नाही.   दुसरी राणी म्हणजे,आपले 'आप्तगण, नातेवाईक,संगे सोयरे,मित्र' जे आपल्या मृत्यूनंतर ते अगदी वर्ष श्राद्ध देखील ते करतील पण तदनंतर मात्र ते आपोआप तुम्हाला विसरतील किंबहुना ते क्रमप्राप्तही असते.  मित्रहो, पहिली राणी 'सुमन' म्हणजे आपले 'मन' ज्याचा आपण कधीच गांम्भिर्याने विचार करीत नाही.मन सतत आपल्या सोबत असते व असणार आहे.पण आपणच बऱ्याचवेळा मनाविरुद्ध बऱ्याच गोष्टी करीत असतो जे निश्चितच हितकारी नाहीत.मनाला योग्य वाटेल तेच आपण सर्वानी केले पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational