मलाजपूर येथील भुतांची जत्रा
मलाजपूर येथील भुतांची जत्रा


काहींच्या हातात बेड्या आहेत, काही नाचत आहेत तर काही शिट्ट्या वाजवून चिडवत आहेत, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर 'भूत' स्वार आहे. हे दृश्य आहे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मलाजपूर गावाचे, जिथे 'भुतांची जत्रा' भरते. या गावात देशाच्या विविध भागातून लोक दृष्ट आत्म्यांना दूर करण्यासाठी येथे येतात. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात दरवर्षी जानेवारी महिन्यात एक अद्भुत जत्रा भरते.
मलाजपूरच्या या बाबाच्या समाधीभोवती असलेल्या झाडांच्या झुकलेल्या फांद्या उलट्या लटकलेल्या भुतांची आठवण करून देतात. कोणत्याही भूतबाधाने त्रस्त झालेल्या व्यक्तीला येथे सोडल्यानंतर बाबांच्या समाधीला एक-दोन प्रदक्षिणा घातल्यानंतर त्याच्या शरीरात असलेली प्रेत आपोआपच त्याच्या शरीरातून बाहेर पडते आणि जवळच्या झाडाला उलटी लटकते, अशी श्रद्धा आहे.
दरवर्षी मकर संक्रांतीनंतरच्या पौर्णिमेच्या दिवशी या भुतांच्या जत्रेला येणाऱ्या पर्यटकांमध्ये देश-विदेशातील पर्यटकांची संख्या मोठी असते. जगभरातील लोकांच्या उपस्थितीत दरवर्षी भरणाऱ्या या जत्रेत लोक भीतीपोटी तिथे घडणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात. गुरु साहेब बाबांच्या समाधीस्थळी भरणाऱ्या जगातील भुतांच्या एकमेव जत्रेत पौर्णिमेच्या रात्रीचे महत्त्व मोठे आहे. ही जत्रा महिनाभर चालते, याचे आयोजन ग्रामपंचायत मलाजपूर करते. अनेक ब्रिटीशांनी या जत्रेचा उल्लेख पुस्तकांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये आणि आठवणींमध्ये केला आहे. या परदेशी लेखकांच्या कथांमुळे दरवर्षी बैतूल जिल्ह्यात असलेल्या मलाजपूरच्या गुरू साहेबांच्या जत्रेला परदेशी लोकसुद्धा येतात.
सातपुडामधील मध्यप्रदेशच्या दक्षिणेकडील गोंडवाना प्रदेशातील एक जिल्हा बैतूल, विविध संस्कृती आणि विविध परंपरा मानणाऱ्या जाती आणि जमातींसह अनेक धर्म आणि संस्कृती मानणाऱ्या लोकांनी भरलेला आहे. पिढ्यानपिढ्या या परिसरात वास्तव्य करणाऱ्या लोकांची गुरुसाहेब बाबांची समाधी ही त्यांच्या अतूट श्रद्धेचे केंद्र असल्याचे सांगितले जाते.
या गावात राहणाऱ्या सर्व प्रकारच्या जाती आणि धर्माच्या लोकांमध्ये एकत्रितपणा आणि समजूतदारपणा शतकानुशतके प्रचलित असलेल्या श्रद्धांमुळे अजूनसुद्धा बळकट आहे. इथल्या लोकांची देवाप्रती असलेली अतूट श्रद्धा आजही दिसते. विशेषत: आदिवासी भागातील गोंड, भिल्ल आणि कोरकू जमातींमध्ये, ज्यामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या टोना-टोटका, झाड-फुंक आणि भूतप्रेत-चुडेल यासारख्या गोष्टी लांब किंवा नष्ट करण्यासाठी करत असलेले अनेक विधी आजही येथे आढळतात.
भूत - प्रेत किंवा आत्मे अशक्त हृदयाच्या लोकांच्या शरीरात प्रवेश करून त्याची मानसिक व शारिरीक स्थिती असंतुलित करून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मार्गांनी ती व्यक्तीची हानी करते, असे अनेकदा दिसून येते. आणि याच प्रकारच्या भूतबाधा निवारण्यासाठी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मलाजपूर गावात असलेली गुरुसाहेब बाबांची समाधी आता जगभर प्रसिद्ध आहे. आतापर्यंत फक्त भारतातील विविध गावांमध्ये राहणारे भारतीयच येथे जमायचे, पण आता परदेशातील परदेशी पर्यटक त्यांच्या टीमसह व्हिडिओ कॅमेऱ्यासह येथील गोष्टी रेकॉर्ड करण्यासाठी पण येऊ लागले आहेत.
मलाजपूरच्या गुरुसाहेब बाबांच्या पौराणिक इतिहासाविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. बैतूल जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ३४ किमी अंतरावर असलेले चिचोली हे वनउत्पादनाचे व्यापारी केंद्र म्हणून
प्रसिद्ध आहे. या चिचोली विकास गटापासून 8 किमी अंतरावर मलाजपूर गाव आहे जेथे येथील सर्व जनतेचे श्रद्धास्थान श्री गुरु साहेब बाबांची समाधी आहे.
उपलब्ध माहितीनुसार या ठिकाणचा पौराणिक इतिहास असा आहे की, सुमारे ३७८ वर्षांपूर्वी म्हणजे १६४४ च्या समकालीन काळात गुरुसाहेब बाबांचे पूर्वज मलाजपूरजवळील कटकुही गावात येऊन स्थायिक झाले. बाबांचे वंशज महाराणा प्रताप यांच्या काळात राजस्थानातील आदमपूर शहरातील रहिवासी होते. अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात झालेल्या घनघोर युद्धाच्या परिणामी बाबांचे वंशज तेथून निघून भटकत-भटकत बैतुल जिल्ह्यातील इसुरस्थ भागात स्थायिक झाले. बाबांच्या कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव रायसिंग आणि पत्नीचे नाव चंद्रकुंवर बाई होते, त्या बंजारा जातीतील कुशवाह घराण्यातील होत्या. त्यांना अनुक्रमे मोतीसिंह, दमनसिंह, देवजी (गुरुसाहेब) आणि हरिदास असे चार पुत्र होते.
श्री देवजी संत (गुरुसाहेब बाबा) यांचा जन्म विक्रम संवत १७२७ फाल्गुन सुदी पौर्णिमेला कटकुही गावात झाला. बाबांची लहानपणापासूनच राहणीमान आणि खाण्यापिण्याची पद्धत चित्र - विचित्र होती. लहानपणापासूनच श्रीगुरुसाहेब बाबा भगवंताच्या भक्तीत लीन राहायचे, मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यातील खिरकिया गावातील संत जयंता बाबा यांच्याकडून त्यांनी गुरुमंत्राची दीक्षा घेतली आणि तीर्थयात्रा करत करत ते अमृतसरला काही दिवस त्यांच्या देवाच्या उपासनेत मग्न राहिले. गुरुसाहेब बाबांना लोक 'देवला बाबा' या नावाने देखील ओळखतात आणि आजही त्यांच्या स्मरणार्थ तेथे दरवर्षी मोठी जत्रा भरते. या जत्रेत भुताच्या अडथळ्यांनी त्रस्त असलेल्या लाखो लोकांना भूतबाधांपासून मुक्ती मिळते. गुरु साहेब बाबा वरील ठिकाणांहून काही दिवसांसाठी भगवान विश्वनाथांच्या पवित्र नगरी काशीला गेले होते, जिथे गायघाटजवळ बांधलेल्या दरभंगा राजाच्या कोठीजवळ बाबांचे मंदिर आहे.
बाबांच्या चमत्कारांवर आणि आशीर्वादावर श्रद्धा असलेल्या आणि भूतबाधा आणि टोना-टोटका सारखे अडथळे दूर करण्याच्या प्रक्रियेवर श्रद्धा असलेल्या महाराष्ट्रातील भक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, पुणे येथे बाबांचे भव्य मंदिर बांधले आहे, असे वर्णन मिळालेल्या माहितीमध्ये आहे, असेल तर नक्कीच सांगा पुणेकरांनो....
कौटुंबिक परंपरेनुसार त्यांचे ज्येष्ठ बंधू महंत गप्पादास हे गुरु साहेब बाबांच्या समाधीची देखभाल करण्यासाठी कौटुंबिक परंपरेनुसार गुरू गादीचे महंत झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा परमसुख याने हा भार सांभाळला, त्यांच्यानंतर अनुक्रमे सुरत सिंग, नीलकंठ हे महंत झाले, त्यांची समाधीही तिथेच बांधलेली आहे. सध्या महंत चंद्रसिंग हे 1967 पासून महंत म्हणून गुरु गादीवर विराजमान आहेत. येथे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सध्याचे महंत वगळता, भूतकाळातील सर्व बाबांच्या वारसांनी बाबांना अनुसरून जिवंत समाधी घेतल्या आहेत.
आता या ठिकाणी येणाऱ्या आणि इलाज करवून घेणाऱ्या लोकांच्या बाबतीत,
ज्या व्यक्तींचा अशा गोष्टींवर विश्वास आहे त्यांना श्रद्धा वाटेल.
ज्या व्यक्तींचा अशा गोष्टींवर विश्वास नाही त्यांना अंधश्रध्दा वाटेल.
जे व्यक्ती विज्ञानवादी किंवा डॉक्टर असतील त्यांना मानसिक रोगाने ग्रस्त पेशंट वाटतील...
प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात, तरीही जर कधी तुमचा या गावी किंवा नजिक जाण्याचा योग आला तर एकवेळा जरूर भेट द्या...