Ujwala Rahane

Inspirational

3  

Ujwala Rahane

Inspirational

मला गवसलेली नवदुर्गा

मला गवसलेली नवदुर्गा

5 mins
285


प्रत्येक वेळेस परिस्थितीचा बाऊ करून आणि छोट्या छोट्या गोष्टीला महाभयंकर टेंशन नावाचे फलक लावून, आपल्या अपयशाचे खापर फोडणारे, माझ्या सहवासातील माझे मित्र व नातेवाईक बघितले की वाटते हे उदाहरण त्यांच्या समोर ठेवावे.


काळाने अचानक वयापेक्षा जास्त समंजस बनवलेल्या चिमुरडीचे!


परवा सहज पेपर चाळत होते. त्यात दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा या सदराकडे माझे लक्ष वेधले.


एका एका विद्यार्थ्यांचे अनुभव खरंच मन हेलावून टाकणारे होते.


हलाखीच्या परिस्थितीशी जुळवून घेत केलेला अभ्यास, त्यातून मिळालेले यश. खुपशे अनुभव तर अगदी आपल्याच आजूबाजूला वावरत असल्या सारखे वाटत होते.


त्यातल्या एका विद्यार्थ्यांनीने तर खुपच हृदयस्पर्शी अनुभव कथन केला होता. खाली तिने तिचा मोबाईल नंबर नमुद केला होता. त्यामुळे सहज मला तिच्याशी संवाद साधता आला. 


कारण माझ्यातील लेखिका शांत बसणाऱ्यातील नव्हती. ती जागी झालीच. 


न राहवून मी तिला फोन केला. कारण कोणत्याही अपयशाचे खापर परिस्थितीवर फोडणाऱ्यांना कदाचित काही शिकवून जाईल.याची मला खात्री होती. 


तिला दहावीच्या परीक्षेत 94% मार्क मिळाले होते. तिची यशोगाथा तिच्याच शब्दात!.


आपल्या अपयशाचे खापर टेंशन नावाच्या परिस्थितीवर फोडणारे माझे मित्र व नातलग बघितले की, वाटतं देव नक्कीच काहीतरी चूक करतो का? पण माझी भोळी भाबडी आज्जी म्हणते, गायत्री चणे असतात तिथे दात नसतात, तर दात असतात तिथे चणे नसतात गं!.. आज खऱ्या अर्थाने या उक्तीची प्रचीती आली.


पेपरने मला माझ्या यशाची मनोगाथा लिहिण्यास सांगितले.. 

  

प्रथमतः मी खूप हळवी झाले. पानावर शब्द उतरवत् होते. पण डोळ्यातील पाणी ते लिहिलेले शब्द पुसत होते.


मला दहावीला 94%मार्क मिळाले. पण मी नाखुष होते कारण, मला अजुनही मार्कांची आशा होती. 


पण नैसर्गिक आपत्ती, अचानक शेवटच्या पेपरच्या काळात कोव्हिड ने थैमान घातले. अचानक lockdown? पेपर कॅन्सल. 


पण दोष कोणाला देत नाही. परिस्थिती पण काही वेळेस कारणीभूत ठरते. कारण शेवटी नशीबसुद्धा हातचे राखुनच मदत करते हे कळून चुकले.


आई-वडीलांची शैक्षणिक पात्रता कमी त्यामुळे वडीलांना कायमस्वरूपी नोकरी नाही. एक कत्रांटी कामगार, कधी कंपनी ब्रेक देईल याची खात्री नाही.


टेंशन आणि गरीबी अगदी पाचवीला पुजलेले सतत परिस्थिती विस्कळीत.


या महत्वाच्या वर्षी तर आमच्या कुटुंबाची मानसिक अवस्था फारच केविलवाणी झाली होती. कारण आर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली होती. नशीब आमची परीक्षा घेत होते.


घर पण भाडेतत्त्वावर. म्हणजे चाळ सिस्टीम. आजुबाजुला नेहमी आवाजच. या वातावरणाचा माझ्या अभ्यासावर खूप परिणाम व्हायचा. शांतता कधीच नसायची.


मी या परिस्थितीतही अभ्यास करत होती. कारण आई-बापाचे स्वप्न मला साकार करायचे होते. ही माझी पण जिद्द होती.


माझे मित्र-मैत्रिणी कोचिंग क्लासेसला जायची. व तेथील अभ्यासावर ते चर्चा करायचे. त्यांच्याकडून मला नवीन काहीतरी ज्ञान मिळायचे. मग त्याचा मला खूप हेवा वाटायचा. 


क्लासेसची आपल्याला पण खरच गरज आहे असे मला पण वाटायला लागले. 


माझी ही इच्छा बोलू का नको या संदर्भात मी एकदा आई-बाबांना बोलून दाखवलीच! 


तेव्हा बाबांचे डोळे भरून आले. ते म्हणाले बेटा झेपत नाही का गं तुला अभ्यास? कठीण जातंय का? जमेल गं! थोडा प्रयत्न कर. अग क्लास लावायचा म्हणजे केवढे पैसे लागतात? घरीच बघ. थोडं वाईट वाटले.


पण विचार केला. सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग कोठून आणणार? खरंय! शेवटी कोचिंगचा विचार सोडून देऊन परत जोमाने अभ्यासाला लागले. 


आईला माझी चिकाटी दिसली तिला वाटले या स्पर्धात्मक युगात माझी लेक मागे नको राहायला. काहीतरी करायला हावे.


पण तिचे शिक्षण आड येत होते. शेवटी तिला युक्ती सुचली. ती बाबांना म्हणाली, आपण चायनीजची गाडी लावूया का मोक्याच्या ठिकाणी? करेल मी पण मेहनत..! अगं पण? आहो त्यात काय लाज? आपण चोरी नाही करत. 


हिंमतीने तिने चायनीजची गाडी बाजारात उभी केली. हाताला तिच्या चव. हातोहात पदार्थ संपत होते.


कामापुरता पैसा हाती येऊ लागला. मी कोचिंग क्लासला प्रवेश घेतला.


पण आमची धावपळ शेजारी राहणाऱ्या आंटीच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी न राहवून विचारले? 


सत्य परिस्थिती सांगितल्यावर पुढचा भार या माऊलीने उचलला आणि माझी वेळ निभावून नेली. पण आंटीचे पैसे आईने थोडे दिवस त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम करून फेडले. पण त्या माऊलीचे उपकार अजन्म माझ्या सोबत असतील. 


कारण नातेवाईकांना मी पैसे मागू शकत नव्हते. मागितले असते तर, नक्कीच त्यांनी मला मदत केली असती. पण अगोदरच त्यांनी माझा दैनंदिन शैक्षणिक खर्चाचा भार उचलला होता. मला आता हे आणखी ओझे त्यांच्यावर लादायचे नव्हते. 


हे सगळे गुपचूप होते. काही चांगले होणार असेल तर खोटे बोलणे पाप नसते. असे मला तरी वाटते. 


याही परिस्थितीत माझ्या आईची मैत्रीण व माझ्या मित्राची आई हिने कैकवेळा माझ्या क्लासची फी गुपचूप भरली हे प्रकर्षाने नमुद करावेसे वाटते. 


कोणत्यान् कोणत्या रूपाने देव मदतीला धावून येतो. त्याचाच हा एक अनुभव. 


माझ्या यशात या सर्वांचा फार मोठा वाटा आहे हे निश्चित. 


एक सांगायचं राहुन गेले. प्रत्येकाला काही ना काही छंद असतात. तसा मलाही एक छंद. पण जरा क्लिष्ट छंद! अहो शास्त्रीय संगीत.


आवड खूप, इथे पण परिस्थिती आडवी आलीच. आई-बाबा म्हणाले, संगीत हे उदरनिर्वाहाचे साधन नाही बाळा! असे छंद मोठ्या लोकांनी जोपासावे. 


खूप वाईट वाटले. पण जिद्दीने कमी खर्चात चार शास्त्रीय संगीताच्या परीक्षा मी दिल्या व प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले. या छंदाचा भावी आयुष्यात मला उपयोग होईल व तो मी करेल. 


खूप काही लिहायची इच्छा आहे. पण सध्यातरी एवढेच. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या माझ्या यशाचे भागीदार माझी शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माझे नातेवाईक व मित्रपरिवार याची मला मोलाची साथ मिळाली. म्हणूनच एक भविष्यातील एक यशाचा टप्पा पार केला. 


अजून खूप यशाची शिखरे मला पार करायची आहेत. ही तर सुरुवात आहे.पण या सर्वांची साथ या पुढेही मला मिळेल यात शंकाच नाही. 


म्हणूनच या सर्वांचे मी आभार मानणार नाही. कारण आभारप्रदर्शन म्हणजे कर्तव्यातून मुक्ती असा अर्थ होतो. म्हणूनच या सर्वांची ऋणी राहून ऋणानुबंध जपायला मी केव्हाही पसंती देईल. 


मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. धन्यवाद


हे मनोगत वाचले. खरंच आणि क्षणभर मीच सुन्न झाले. खरंच आपण किती छोट्या छोट्या गोष्टीचा बाऊ करतो. कोणतीही गोष्ट जमली नाही किंवा आपल्या कुवतीच्या बाहेर असेल कि आपण त्याचं खापर मनस्थितीवर म्हणजेच मोठ्या शब्दात सांगायचे तर टेंशन यावर फोडतो.


आज हा अनुभव वाचला. वाटल अशा कित्येक गायत्री आपल्या आजूबाजूला वावरत आहेत.


खऱ्या अर्थाने त्याना शिकण्याची जिद्द आहे. व लहान वयातही इतरांच्या कर्तव्याची जाणीव आहे. नक्कीच भविष्यात अश्या गायत्रीच समाजात नवदुर्गा असतील! 


नाही तर आमच्यातलं पालक ज्या वर्गवारीत मी ही आहेच. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते तुम्ही आम्ही. आपण काय करतो, जेआपल्याला नाही मिळाले ते मुलांना पुरवायचे या उच्चभ्रू रोगाने पछाडतो.


पण हे विसरतो खरंच त्याची आपल्या पाल्याला गरज आहे का? त्यामुळे पाल्य विसरतात, एखाद्या गोष्टीची अमूल्य किंमत. जी साध्या साध्या गोष्टीतून आपण लहानपणापासून अनुभवली आहे.


मला वाटतं, खुपदा बसू दे ना त्यांना पण परिस्थितीचे चटके? कळू दे त्यांनाही प्रत्येक गोष्टींची किंमत. पण सगळे पण नि परंतु! 


या लेखाद्वारे मला एवढंच नमूद करावेसे वाटते की, आपण आपल्या समाजाप्रती कर्तव्यात अश्या गायत्री नामक नवदुर्गांचा शोध घेणे. जरुरीचे आहे. 


आजवर दुर्गाच आपल्या मदतीला धावली, पण आता आपण तिच्या मदतीला धावणं काळाची गरज आहे. 


कारण शेवटी अनुभवातून खूप काही शिकायचे असते हो ना?


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational