मिलन (भाग १)
मिलन (भाग १)
पोलीस चौकीत पुन्हा एकदा गर्दी जमली होती. सगळा गडबड गोंधळ चालू होता. पुन्हा एकदा एका अवैध लॉजवर छापा टाकून सर्वांना पकडून आणण्यात आले होते. सर्वांची चौकशी करून नावे नोंदवण्याचे काम चालू होते. कोणी खोटी नावं सांगत होते, तर कोणी आपला चेहरा लपवून बसले होते. पोलिसांसाठी आणि पकडलेल्यांमधील बहुतांशी लोकांसाठी ही कार्यवाही नेहमीचीच होती. त्यांच्या पद्धतीने सर्व कामे चालू होती. फक्त त्या मुलींमधील एक जण अव्याहतपणे रडतच होती. गेला एक तास झाला, तिचे रडणे चालूच होते. रडताना मधूनच ती समोर बसलेल्या एकाकडे बघत आणि पुन्हा रडायला सुरुवात करत. तो मात्र गंभीर मुद्रेत बसला होता. तिच्याकडे अत्यंत विश्वासाने बघत होता. जणू कसलेसे आश्वासन देत असावा !
थोड्याच वेळात त्या दोघांनाही चौकशीसाठी बोलावले. आपण पती-पत्नी आहोत असे त्यांनी सांगितले. पोलिसांना हे उत्तर नेहमीचेच असल्याने, त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. पती-पत्नी असल्याचा पुरावा त्यांनी मागितला जो दोघांकडेही त्या क्षणी उपलब्ध नव्हता.घरी फोन करून मागवावा याचा काही प्रश्नच नव्हता. कुठल्या तोंडाने फोन करणार आणि वरून घरी खोटं सांगून बाहेर पडलेले. दोघेही तसेच शांतपणे आपापल्या जागेवर जाऊन बसले.
गणेश एका गाडीवर चालक म्हणून कामाला होता. पगार जेमतेमच. त्यावर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी. आई- वडील आणि लहान बहीण. लग्नानंतर अजून एक व्यक्तीची जबाबदारी वाढली होती. चाळीतली ती दहा बाय दहाची खोली आणि ह्या खोलीत हे एवढे मोठे कुटुंब राहत होते. मुंबईची ती प्रचंड गर्दी आणि त्या गजबजलेल्या चाळी. अशा ठिकाणी राहण्याची आलिशान सोय असणे हे जरा विचाराच्या पलीकडचेच..... त्यात गणेशच्या तुटपुंज्या पगारात तर हे होणे स्वप्नातही शक्य नव्हते. या कारणास्तव आपल्या लग्नाचा विषय गणेशने बराच लांबवून धरला होता. त्याच्या एकट्याच्या पगारात कुटुंबाचा खर्च मोठ्या मुश्किलीने भागत होता. त्यात वडिलांच्या दवाखान्याच्या खर्च, बहिणीचे शिक्षण, या सगळ्यामुळे दुसऱ्या कुठल्या बाबींचा विचार करण्याचीही त्याची हिंमत होत नसे.
दोन-तीन वर्षं अशीच गेल्यावर आईने न राहवून लग्नाचा विषय काढला. तिच्या ह्या बोलण्यामागे कारणही होते. शेजारच्यांची खोली काही दिवसांत रिकामी होणार होती. ती जर घेता आली तर संसार वाढवायला काहीच हरकत नाही, असे तिचे म्हणणे होते. तिच्यानेही आता काम होत नसे. घरात सून यावी अशी तिचीही इच्छा होती. शेवटी खोलीच्या बातमीची खात्री करून गणेशही लग्नाला तयार झाला. मुलगी बघितली, पसंत पडली आणि लग्नही झाले. सुधादेखील गरीब कुटुंबात वाढलेली मुलगी. त्यामुळे तिच्याही अंगी समजूतदारपणा भरपूर होता. आपल्या नव्या घरात कराव्या लागणाऱ्या सर्व त्यागांची तिला कल्पना होती.
दोघांचाही संसार सुरु झाला. दिवसांमागे दिवस जाऊ लागले. शेजारचे खोली सोडायचं नाव घेत नव्हते. गणेशचा पूर्ण दिवस कामात जात असे. कामावरून घरी आल्यावर त्याच्या अंगात कसलाही त्राण उरत नसे. सुधाही दिवसभर घरातले काम अन दुपारच्यावेळी संसाराला हातभार म्हणून धुण्या-भांड्याचीही कामे करू लागली होती. लग्नाला इतके दिवस झाले, पण दोघांची पहिली रात्र अजून सोबत गेली नव्हती. सुधा आपले मन मारून राहत असे. गणेशलाही त्या गोष्टीची कल्पना होती. जीवाची तगमग होत असे; पण त्याच्या हातात काहीच नव्हते ! शेवटी एक दिवस शेजाऱ्यांनी खोली सोडणार नसल्याचे कळवले. त्यांचा पैशांचा प्रश्न होता; तो मिटल्याचे समजले. हे ऐकून मात्र गणेश फार मोठ्या पेचात पडला.... त्याने एक दिवस वेळ पाहून सुधाशी हा विषय छेडला अन तिला रडूच कोसळले. त्याने तिला शांत केले आणि आपण काहीतरी करू असे आश्वासन दिले....