महिलादिन
महिलादिन


"आटप भराभर. तुला सांगितलं होत का ना... आज तुझ्या हस्ते महिला दिनानिमित्त बायकांचा सत्कार हाय म्हणून." आपल्या बायकोला दरडावत सरपंच घाई करू लागले.
तशी गडबडीने स्वयंपाक उरकत पैठणी नेसून, दागिने घालून सरपंचांची पत्नी तयार झाली.
तोपर्यंत वाड्या वस्तीतून कार्यकर्त्यांनी पन्नास-एक बायका गोळा केल्या होत्या. "आता कुठं बाबा कामाच्या वक्ताला?" या बायकांच्या विनवणीकडे लक्ष न देता ...सरपंचांचा धाक दाखवत पन्नास बायका त्यांनी कार्यक्रम स्थळी आणल्याच.
कार्यक्रम मोठ्या झोकात पार पडला. सरपंचानी महिलांबद्दलचा आदर व्यक्त केला. साऱ्या पुरुषांनी स्त्रियांचा मान ठेवलाच पाहिजे हे ठणकावून सांगितले.
सरपंचाच्या पत्नीच्या हस्ते साडी व श्रीफळ देऊन बायकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम संपला.
" जावा आता घरला... आमच्या जेवणाचं बघा." बायकोला पुन्हा दरडावत सरपंचानी घराकडे पिटाळले.
साऱ्या बायका साड्या व नारळ घेऊन घरी पोहोचल्या. दारातच नवऱ्याकडून "कुठं गेलीती मिरवायला नटून थटून ? कामं नायती का घरात ?" अशी बोलणी खात ...गप घरात येऊन पुन्हा कामाला लागल्या.
इकडे पारावर 'आजचा महिला दिन फारच छान साजरा झाला.' अशा गप्पा सरपंच आणि कार्यकर्त्यांत पानतंबाखू खाता खाता रंगल्या.