गोविंद ठोंबरे

Romance

3  

गोविंद ठोंबरे

Romance

मैना

मैना

3 mins
9.3K


ढोलकीच्या तालाचा अन घुंगरांच्या नादाचा आवाज साऱ्या रानमाळावर घुमत होता.लख्ख प्रकाशाने माळ नाहून निघाला होता.गाणं लयात आलं होतं अन ओसाड माळ आज सांजेच्या सोबतीने घुमत होता.माळवाडीच्या माळावर तमाशाच्या फडानं तळ ठोकला होता पाच दिवसांसाठी!मैनाबाईच्या तमाशानं गर्दी भरवली होती त्या माळावर ! गावाबाहेर तमाशप्रेमींची एकच लगबग उडाली होती.पाय आपोआप गावाबाहेरच्या माळाकडे ओढ घेऊ लागले होते.त्या गर्दीत मनोहरही मोठ्या आकर्षणाने धाव घेत निघाला होता.मनोहरसाठी हा तमाशाचा पहिलाच अनुभव होता.याआधी फक्त मित्रांच्या तोंडून तमाशाचं मादक वर्णन त्यानं ऐकलं होतं.

मैनाबाईचं गाणं सुरू होतं..आणि तिचे पाय त्या गाण्यावर थिरकत होते.

साजना..मनोहरा लई दिसानं येणं केलं

प्रितीच्या पाखरा लई वरसांनी येणं केलं

अंगाच्या घामानं भिजवून मनानं

पानाच्या ईडयानं ओठाच्या लालीनं

माझ्या पिसाट काळजाला येड लावलं...

हे बोल जणू काही मनोहरासाठीच होते .मनोहर मोहरून गेला होता मनोमन!मनोहराचे सोबती त्याला चिडवू लागले.."मन्या मैनेणं तुझ्यासाठी घेतलं का रं हे गाणं!" मनोहर अजूनच जीव आखडून गुदगुल्या झाल्यागत मैनेच्या सौंदर्याला निहाळू लागला.मैना सौन्दर्याची खाणच होती!तितकीच मादक,मोहक लावण्यवती!

आजची रात्र मनोहराला जड जात होती.सारखं मैनेच्या घुंगरांच्या बोलानं मन विचलित होत होते.मैना डोळ्यासमोरची मावळतच नव्हती .कसाबसा दिवस ढकलून मनोहर लगबगीनं माळ गाठत निघाला होता. दुसरा आणि तिसरा दिवसही तो अगदी माणसाची गर्दी सारून मैनेला जवळून निहाळण्यासाठी अगदी समोर बसला होता. मैना तालावर थिरकत चालली होती.पण तिचंही सारं लक्ष मनोहरकडे होतं.मनोहराचं पिळदार रूप तीला भावलं होतं!एवढ्या गर्दीत तीने मनोहराच्या नजरेतली चमक ओळखुन सोडली होती! ती जसं काही मनोहरासाठीच बेभान होऊन नाचत होती. पडद्या आड गेल्यावर गावच्या एका पोराकडून तीने मनोहराची बातमी काढली.तमाशा झाकल्यावर सगळी गर्दी गायब झाली पण मनोहर तिथंच चित्त हरवून बसला होता. मैनेनं कोणाकडे तरी सांगावा पाठवला आत येण्याचा!

मनोहर दबक्या पावलांनी आत गेला.मैना वेणीला मागे सारत मनोहराला खुनवुन बसायला सांगते.अन पानाचा विडा पुढे करून त्याला हसऱ्या अदबीने विचारपूस करते.मनोहर घाबर्या ओठांनी मैनेला म्हणतो,"मैनाबाई!तुम्ही खूप देखण्या आहात हो!तुमचं नाचणं,गाणं मनाला वेड लावतं. अप्सरा या माळरानावर उतरली आहे आणि या ओसाड जागेला अमृत जीव पाजत आहे असं वाटतं!माझा जीव जडलाय तुमच्यावर!तुमच्या

घुंगरावर,नाचावर,सौन्दर्यावर अन मनावर!" मैना मध्येच उद्गारते,"मनोहरराव!माझं बी असंच झालंय समजा!एवढ्या समद्या गर्दीत माझं चित्त तुमच्यावर हरवलं ! खरं सांगू तर लई पाहिले माझ्यापुढं आपली मुराद मांडणारे पण तुमच्यावानी जीवाला पीसं लावणारा ह्या माळावरच गावला!" मनोहर मनोमन आनंदाच्या लहरीत वाहत मैनेच्या हाताला धरत म्हणाला,"मैनाबाई!या जीवाला थारा द्या तुमच्या जवळ ,नाहीतर या माळवाडीत माझ्यासोबत आयुष्याला वाहून घ्या!मरेर्यंत साथ नाही सोडणार!" "लई नशीबवान हाई मी.तुमच्यासारखा जिवलग लाभला तर माझं सोनंच होईल!उद्या फड मोडतोय आमचा . उद्या दुपारच्याला या!तुम्हाला माझं उत्तर मिळण!"

मनोहर मोठ्या आशेने दुसऱ्या दिवशी माळावर पोहोचला.फड मोडला होता.सामानाची आवराआवर चालू होती.वाहनात सामान लादली जात होती.मनोहराने मैनेची चौकशी केली. ढोलकीची थाप मारत ढोलकीवाल्याने मनोहराला जवळ बोलवलं.हातात कसली तरी चिठ्ठी देत तो मनोहरास सांगत होता,"मैना सकाळच्यालाच गेली म्होरं!फड मालक आणि आमची अक्का तीला जीपीत घेऊन सकाळीच गेली साताऱ्याकड!तीनं ही चिठ्ठी तुमाला द्यायला सांगितली!"मोठ्या निराशेने मनोहराने चिट्ठी उघडून पहिली...

"मनोहरराव ,माझा जीव मी तुमच्या जवळ ठेऊन जातेय.लई अवघडल्यावानी वाटतंय!पण मी तमासगिरीन बाई!नावाचीच मैना..आज हितं अन उद्या तिथं.माझ्यासंग तुमच्या जीवाची नगं व्हरपळ व्हायला. असं समजा तुमची अप्सरा सपान बनून आली होती अन सपान बनुनच गेली!नगा जीवाला लावून घेऊ.जीवाला जपा.तुमची मैनाबाई!" मनोहराने चिट्ठी मुठीत आवळून डोळ्याला आवरतं केलं! तमाशाच्या गाड्या धूळ खात लांबवर धावताना दिसत होत्या. मनोहर एकटक त्या वाटेकडे पाहत चिट्ठीला कुस्करून मागे सरकत होता...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance