मायेचं मृगजळ
मायेचं मृगजळ
आयुष्य जगत असताना जवळच्या व्यक्तींचा आपल्याला लळा लागलेला असतो.. आनंद असो वा दुःख सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगुन व्यक्त होत असतो.. घरात म्हणा की मित्रमंडळीं जर एखाद्याशी भांडण झाले तर बोलणार नाही, तोंड बघणार नाही म्हणतो खरे.. पण सॉरी म्हणत पुन्हा एकमेकांची गळाभेट घेत असतो..
जशी व्यक्तींच्या चुकांना माफी असते.. तशी माफी झाडांना देखील असती तर.. कारण वर्षानुवर्ष सावली देणारे झाड जेव्हा कालांतराने फळ, फुलं द्यायचे बंद होते.. वादळ वाऱ्यात मुळासकट उपटून पडते.. काही कारणास्तव त्रासदायक ठरू लागते.. तेव्हा त्या झाडाला नष्ट करण्या खेरीज दुसरा कुठलाच पर्याय नसतो.. परंतु अश्यावेळी झाडांना सुद्धा एक नवी संधी देत त्यांची देखील लडिवाळ गळाभेट घेता आली असती तर किती बरे झाले असते ना.. मायेचं मृगजळ भासलेल्या कडूलिंबाच्या झाडाशी निगडित स्पृहाची कहाणी..
स्पृहाला अगदी लहानपणापासून झाडांची आवड.. तिची आवड जपण्यासाठी तिची आई चाळीतल्या कॉमन गॅलरीत छोट्या कुंड्यात रंगीबेरंगी फुलझाडं आणुन लावायची. सगळ्या झाडांची देखरेख स्पृहाच्या नियंत्रणाखाली असायची.. तेवढ्याच आनंदाने ती त्या झाडांना जपायची.. निसर्गप्रेमी स्पृहा प्रत्येक झाडाच्या प्रेमात होती.. मामाचं गाव म्हटलं की, तिच्या चेहऱ्यावर उत्साह असायचा.. झुक झुक अगीन गाडीत खिडकीपाशी बसुन निसर्गरम्य हिरवळीचे फोटो टिपण्याचा आनंद पुरेपूर घ्यायची..
खूप वर्षापूर्वी गावात एक प्रथा होती.. मुलगी लग्न करून सासरी गेल्यावर तिची आठवण म्हणून एखादे झाड लावण्याची.. जेव्हा स्पृहाची आजी सासरी गेली.. तेव्हा आजीच्या आई वडिलांनी म्हणजे स्पृहाच्या पणजीआजी व पणजोबानी अंगणात एक कडूलिंबाचे झाड लावले.. वर्षानुवर्ष त्या झाडाचा जपुन सांभाळ करत राहिले.. कालांतराने पणजोबा नंतर पणजी आजीला देवाज्ञा झाली.. त्यांच्या आठवणीत झाडाला एकटक पाहत आजी नेहमी बोलायची.. "अंगणातलं कडुलिंबाचं झाड फक्त झाड नसुन मायेच्या छत्रछायेचं भासलेलं एक मृगजळ आहे.."
सुट्टीत गावी गेल्यावर आजी कडूलिंबाच्या पानांचा रस जबरदस्तीने पाजायची.. ओरडा पडू नये म्हणून स्पृहा नाक दाबुन कडु रस गटकन पिऊन जायची.. हातावर थोडी साखर टेकवत आजी म्हणायची, "नावा प्रमाणे कडु असलं तरी बहुगुणी आरोग्यास नेहमीच लाभदायक असतं.. आईवडील मुलांना चार गोष्टी कठोर बोलतात.. पण ते मुलांच्या हितासाठी नेहमी योग्य असतात.."
काळ लोटत गेला तशी लहान मंडळी मोठी अन् मोठी वयोवृद्ध होत चालली होती.. आजीचा मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडं मुंबईला राहत होती.. आजीला पहिल्या पासुन गावाकडची ओढ.. म्हणून एकटी तर एकटी ती गावी राहत होती.. आजीचे वय जवळपास ऐंशी वर्ष होऊन गेले होते.. झाडावरून पडणारी पानं कचरा होऊन सगळीकडे सैरावैरा धावायची.. आजीला मात्र पहिल्या सारखे एकटीला अंगण झाडायला जमत नव्हते.. तरीसुद्धा लळा लागलेल्या झाडाची ती सेवा करायची.. हळूहळू झाडाला कीड लागून लाल मुंग्यानी झाडावर साम्राज्य निर्माण केलं.. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुंना त्रास नको म्हणुन आजीने ग्रामपंचायती मध्ये अर्ज देऊन प्रशासनाच्या मदतीने कडुलिंबाचे झाड कापुन काढले..
काही महिन्यांनी स्पृहा गावी आल्या नंतर तिला कडुलिंबाचे झाड नजरे आड झाल्याचे खुपच दुःख झाले.. कारण रात्रीच्या शीतल चंद्र प्रकाशी झाडाखाली चटई अंथरून कडूलिंबाच्या झाडाचं देखणं रुप स्पृहाने पाहिलं होतं.. पुरातन काळाच्या गोष्टी आणि 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई' हे गाणं आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन अगदी झोप लागे पर्यंत ऐकलं होतं.. ते दिवस अगदी बंध भावनांचा जिव्हाळा जपत प्रत्येक ताऱ्या प्रमाणे लुकलुकणारे होते..जड अंतःकरणाने पाणावलेल्या डोळ्यांनी तिने आजीला विचारणा केली.. "आजी!! तुला झाडाची रिकामी जागा बघवते का गं.."
आजीने हृदयस्पर्शी उत्तर दिले.. वर्षानुवर्ष पाऊसधारां झेलत उन्हाचा तापता पारा झाड सहन करत होतं.. दवबिंदू मुळे प्रत्येक पानाच्या कडा देखील त्याच्या पाणावत होत्या.. पण त्याचे दुःख ते कोणाला सांगेल? गळणाऱ्या पानाचा त्रास आजुबाजूच्या लोकांना होत राहतो.. माणसं निघुन गेली पण झाड समोर लाऊन आठवणीं सोडून गेली.. डोळ्या देखत असणाऱ्या गोष्टीने जास्त त्रास होत असतो.. आठवणीं जपत अजुन जीवाला देखील किती त्रास दयायचा? आपल्या आई वडिलांचे प्रेम देखील असेच असते.. आपल्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करून संसाराचा गाढा चालवत असतात.. मात्र त्यांचा वरदहस्त डोक्यावरून कायम गेला की, अंखड सावली देणाऱ्या झाडाची छाया हरपल्याची जाणीव होते.. आई वडील असे पर्यंत मुलांना किंमत असते.. नंतर कोणी कोणाला विचारत नसतं.. इतर लोकं मुलांकडे पोरक्या नजरेने पाहत असतात.. अगदी सख्खी नाती सुद्धा..
स्पृहाच्या मनात एक विचारसरणी सुरू झाली.. बालपणातल्या लडिवाळ क्षणाचा आनंद घेत असताना तरुणपणाची पायरी येते.. तरुणपणात आयुष्याच्या उपभोगाची शिडी चढत असताना वयोवृध्द पणाच्या टोकाशी येऊन पोहचतो.. माणसां प्रमाणे झाडाचे देखील तेवढेच वय असते.. स्वतःची समजुत घालत आठवणींचं गाठोड मनाशी बांधुन घेतलं..
स्पृहाचे लग्न झाल्यानंतर ती सासरी आली.. तिच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा टवटवीत झाल्या.. कारण एक कडुलिंबाचे झाड स्पृहाच्या सोसायटीच्या आवारात घरातील खिडकी समोर सदाहरित बहरलेलं.. कायम सळसळत लळा लावणारं होतं.. एकटी विचारात मग्न असली की, त्या झाडाला सगळं मनमोकळे पणाने व्यक्त करत होती.. निराश असताना धुंद एकांतात येणारा तो पवन स्पर्श देखील तिच्या मनाला हर्षमय करून जात होता.. पुन्हा स्पृहा कडुलिंबाच्या झाडाशी एकरूप झाली होती..
काही वर्षांनी एक दिवस भर उन्हाळ्यातील मे महिन्यात अचानक संकटी वादळाने थैमान घातलं.. पाऊस अन् वारा अवेळी येऊन चक्रीवादळ प्रचंड नुकसान करत निघुन गेलं.. तीन दिवसांनी सगळं काही शांत होऊन गेल्यानंतर कडुलिंबाचं झाड अचानक पानगळीने निष्पर्ण होऊ लागलं.. वैशाख वणवा पेट घ्यावा अशी झाडाची अवस्था पाहून स्पृहाच्या डोळ्यांत अश्रुधारा येऊन उभ्या राहिल्या.. झाडावर काही पानं शिल्लक राहिली पण ती सुद्धा सुकेलेली..अगदी म्हाताऱ्या आजी आजोबांची सुरकुत्या पडलेली त्वचा आणि पांढरे केस पाहून मनाकडे एक वेगळंच मायेचं मृगजळ पसरतं अगदी तसंच ते झाड दिसायला लागलं होतं.. कडुलिंबाचे झाड पुन्हा व्यवस्थित दिसणार की नाही? ह्या चिंतेने स्पृहाचा श्वास गहिवरून आला होता..
झाडाची खिडकी समोर असणारी उपस्थिती वर्षभर प्राणवायू ओसंडून वाहताना निरोगीपणाची पोचपावती देत होती.. कदाचित कडूलिंबाच्या झाडाला सगळ्यांचे मिळालेले आर्शिवाद अन् त्याने जगावं म्हणून केलेली प्रार्थना ह्यामुळे काही दिवसांत दोन बाजुच्या दोन फांदीशी नवी पालवी फुटली..
वर्षांनुवर्षे एका जागेवर सदाहरित डोलणारे झाड जेव्हा दृष्टीआड होते.. तेव्हा दाटलेल्या आठवणींनी त्याच्या नसण्याचा कमीपणा मनाला चिंब भिजवुन जात असतो.. घरातील वडीलधारी व्यक्ती कायम जगाचा निरोप घेऊन जाते.. त्यांची नियमित बसण्याची खुर्ची रिकामी दिसते.. त्या जागेवर नंतर कोणीही येऊन बसतं.. पण त्या व्यक्ती बद्दलची आपल्या मनातील रिकामी जागा भरून काढण्यासाठी कोणी नसतं.. प्रेमळ आठवणीची माती मनाच्या मुळांना घट्ट पकडुन बसलेली असते.. वाडवडीलांची असणारी पुण्याई अन् त्यांचे आशीर्वाद त्यामुळे कुठ्ल्याही संकटकाळानंतर आपल्या आयुष्यात एखादी नवी संधी आशेचा किरण घेऊन येतेच..
