मानवता हाच खरा धर्म!
मानवता हाच खरा धर्म!
एमडी कॉलेज हे शहरातील मोठे प्रसिद्ध कॉलेज होते. तिथे ऍडमिशन मिळावे म्हणून विद्यार्थी जीवाचे रान करायचे. कारण ह्या कॉलेजमध्ये कसलीही आणि कोणाचीही शिफारस चालत नसे. जो विद्यार्थी मेहनत करून जास्त मार्क मिळवीत असे त्या विद्यार्थ्यालाचं ह्या कॉलेजमध्ये मान होता. मग तो श्रीमंत असो वा गरीब इथे सगळे सारखेच आणि ह्याचे सगळे श्रेय जाते ते इथले प्रिन्सिपल मेघदूत वाघ ह्यांना. गेल्या पाच वर्षामध्ये मेघदूत सरांनी एमडी कॉलेजचे नाव ज्या उंचीवर नेऊन ठेवले होते त्याला तोड नव्हता.
मेघदूत हा पण एमडी कॉलेजचा माजी विद्यार्थी. तो अभ्यासात खूप हुशार होता. पण त्याची घरची परिस्थिती खूप गरिबीची होती. त्यावेळेला ह्या कॉलेजमध्ये असलेल्या ससाणे सरांनी ह्या हिऱ्याची पारख केली आणि त्याला योग्य ती मदत आणि मार्गदर्शन केले. म्हणून तर आज मेघदूतने यशाचे शिखर गाठून तो शिकत असलेल्या कॉलेजचा मुख्याध्यापक होण्याचा सन्मान मिळविला होता. हे त्याच्या मेहनतीचे आणि कष्टाचे तर चीज होते!!
असे म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते ते काही खोटे नाही. मेघदूत कॉलेजमध्ये असताना शलाखा चितळे ही त्याची अगदी जवळची मैत्रिण होती आणि तिच पुढे जाऊन शलाखा मेघदूत वाघ झाली. ती सुद्धा ह्याच कॉलेजमध्ये आता विज्ञान शाखेची प्रमुख आणि त्याचबरोबर त्या कॉलेजची ट्रस्टी आहे.
शलाकाची घरची परिस्थिति खूपच चांगली होती. तिचे वडील कस्टम ऑफिसर होते त्यामुळे तिला कशाचीही कमी नव्हती. त्या उलट मेघदूतचे वडील एका वसाहतीचे वॉचमन होते. त्यामुळे त्यांची मिळकत दोन वेळेचे जेवण, अंगभर झाकायला कपडे आणि राहायला एक छोटेस खोपट इतकीचं होती. त्यामुळे कधी कधी त्यांच्या कुटुंबाला पोटभर खायला ही मिळत नसे. पण याबद्दल मेघदूत, त्याची आई आणि त्याच्या दोन बहिणी कधीही तक्रार करत नसत.
मेघदूतचे वडिल नेहमी विचार करीत, एकदा मेघदूतचे शिक्षण पूर्ण झाले की, त्याचाही ह्या घराला हातभार लागेल. त्या वेळेला कॉलेजमध्ये श्रीमंत व गरीब असा भेदभाव चालत होता. त्यामुळे काही श्रीमंत बड्या बापाच्या मुलांची त्या कॉलेजमध्ये वट होती. त्यांचे वडील म्हणे भरभरून कॉलेजला डोनेशन द्यायचे, तर काही जणांचे आई-वडील हे त्या कॉलेजचे ट्रस्टी होते. त्यामुळे मुख्याध्यापक ही त्या मुलांच्या चुकांवर पांघरून घालत असत. पण ह्या सर्वांमुळे गरीब विद्यार्थ्यांवर खूप अन्याय होत होता. मेघदूतला या सर्व गोष्टींची फार चीड येत असे. पण त्यावेळी परिस्थितीमुळे तो हतबल होता.
तो नेहमी शलाकाला म्हणत असे, “एक दिवस मी अस कॉलेज काढेन जिथे फक्त विदयेला मान असेल आणि श्रीमंत-गरीब असा भेदभावही नसेल. तिथे ससाणे सरांसारखे अनेक शिक्षक असतील जे माझ्यासारखे अजून कित्येक मेघदूत घडवतील.”
मग शलाका त्याला शांत करत असे आणि त्याचा हात स्वत:च्या हातात घेऊन म्हणे, “मी नाही आपण अस कॉलेज काढू”.
“हो ग बाई, आपण”, असे म्हणत मेघदूत तिच्या हातावर आपले ओठ टेकवित असे. अखेर मेघदूतचे शिक्षण पूर्ण झाले. त्याला दुसऱ्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यांनंतर न थांबता तो यशाची शिखरे गाठत राहीला. काही वर्षानी त्याने शलाकाशी लग्न केले आणि दोघांनी मिळून मुंबईत स्वत:चे घर घेतले व त्याचबरोबर घराची संपूर्ण जवाबदारी ही घेतली. मेघदूतचे कुटुंब खूप आनंदी होते. त्याच्या वडिलांचे कष्ट फळाला आले होते. अशीच प्रगती करत तो काही वर्षातच त्या प्रसिद्ध कॉलेजचा मुख्याध्यापक झाला. काही दिवसांनी तो ब्रेकफास्ट करत असताना न्यूज चॅनेलवर त्याने एमडी कॉलेज लवकरच बंद होणार अशी बातमी ऐकली.
त्याने लागलीच ससाणे सरांना फोन केला. ससाणे सर रिटायर्ड होऊन दोन वर्षे झाली होती. तरी त्यांनी एक-दोन ठिकाणी फोन लावून कॉलेजबद्दलची बित्तंबातमी मिळविली. मिळालेल्या माहितीनुसार मॅनेजमेंटमध्ये ताळमेळ नसल्यामुळे आणि काही ट्रस्टींनी हळूहळू त्या कॉलेजमधून काढता पाय घेतला होता. त्यामुळे कॉलेजला फंडची कमी पडत होती. तसेच कॉलेज चालवणेही अशक्य होतं होते. म्हणून हळूहळू हे कॉलेज बंद होण्याच्या दिशेने वाटचाल करत होते.
मेघदूतने एकवार शलाकाकडे बघितले. तिला लगेच समजले तो काय विचार करत होता ते. तिने लागलीच हो म्हटले. तिने पहिला फोन तिच्या बाबाला लावला आणि मेघदूत काय विचार करतोय हे सांगितले. तसाही तिचा बाबा रिटायर्ड झाला होता आणि त्याला ही कल्पना आवडली. तो लागलीच तयार झाला.
याप्रमाणे मेघदूत, शलाका, ससाणे सर आणि शलाकाचे वडील ह्यांनी एकजुटीने एमडी कॉलेजचा ताबा मिळविला. शलाका आणि तिचे वडील हे कॉलेजचे ट्रस्टी झाले. ससाणे सर हे त्या कॉलेजचे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार होते आणि मेघदूत त्या कॉलेजचा मुख्याध्यापक बनला.
मेघदूतने पूर्ण मॅनेजमेंट बदलली. तसेच ससाणे सरांनी उत्तम शिक्षकांची टीम बनवून त्यांना योग्य ते ट्रेनिंग दिले आणि सुरुवात झाली ती एमडी कॉलेजच्या नव्या अध्यायाची.
खरंच, मनात आणलं तर माणूस काय नाही करू शकत. मेघदूतने हे करून दाखविले. आज तो आणि त्याच्या टीममुळे विद्येला जपणारा तो प्रत्येक विद्यार्धी यशाची शिखरे गाठू शकत होता. ह्यालाच तर म्हणतात, "मानवता हाच खरा धर्म!!"