STORYMIRROR

Santosh Bongale

Abstract

3  

Santosh Bongale

Abstract

मानवी जीवनाचे वैश्विक सत्य :क्षण हिरवे निसटून जाताना...

मानवी जीवनाचे वैश्विक सत्य :क्षण हिरवे निसटून जाताना...

4 mins
771


क्षण हिरवे निसटून जाताना

हिंदोळलेले स्वप्न मनी

किती किनारे सरकून गेले

उरल्या लाटांच्या आठवणी


संथ उन्हाच्या काठावरती

पिवळी छाया ओघळली

सौख्याची चव घेताना मग

दुःखाची चव बोथटली


झुकल्या थकल्या फांदीआडुनी

एक चांदणी लखलखते

काळोखाची भिंत फोडुनी

पैल ओढीने थरथरते


झुरणे उरले शब्दांसाठी

मौनावरती रूसताना

मीणमीणती समईचे डोळे

लपवित आसू हसताना


पायही थकले , थकल्या वाटा

दिवसांचा या काय गुन्हा ?

थकल्या मातीच्या देहावर

हंगामाच्या गाढ खुणा

      प्रा. मीनल येवले


      मानवाचे जीवन सर्व प्राण्यांमध्ये वैविध्य आणि वैचित्र्यामुळे वेगळे ठरते. जन्मलेला प्रत्येक सजीव उत्पत्ती, विकास आणि लय या सृष्टीच्या निरंतर चक्रामध्ये आपले जीवन व्यतीत करतो. परंतु मानव आपल्या बुद्धिचातुर्यामुळे प्राप्त जीवनामध्ये सुखाचे हिरवे कोंदण निर्माण करण्याचा अहोरात्र प्रयत्न करत असतो. त्याच्या कर्मयोगामुळे त्यांच्या आयुष्यात आलेले सुखाचे हिरवे क्षण तो अत्यानंदाने उपभोगत असतो. परंतु नियतीच्या अंतरंगात काय चाललेले आहे याची त्याला चाहूलही नसते. तेव्हा हाती आलेले क्षण आपल्या आयुष्यातून निसटून जाताना त्याला दुःख नाही झाले तर नवलच. माणुस जीवनाला सजवताना नानाविध भूमिका पार पाडतो आणि मनात रूजत असलेले स्वप्न हिंदोळ्यावर झुलता झुलता दुःखाच्या लाटांवर स्वार होऊन कधी किनाऱ्यावर येऊन पडते हे त्याला अनंतकाळ लोटला तरी उमगत नाही. अशा माणसांच्या आयुष्यातील सुखदुःखाच्या चढउतारांचे वास्तव वर्णन नागपूर येथील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. मिनल येवले यांनी 'क्षण हिरवे निसटून जाताना' या कवितेत उत्तमरित्या केलेले आहे. 


     प्रत्येक माणूस भूतकाळातील घटनांतून काही बोध घेऊन वर्तमानात जगताना भविष्याची स्वप्ने रंगवतो. तेव्हा संपूर्ण आयुष्याचे गणित वेगवेगळी वळणे घेत कसे मातीवर येऊन पूर्ण होते. असा अन्वयार्थ विषद करणारी ही कविता मानवी जीवनाचे सार कथन करते हे या कवितेचे सारतत्व आहे. 


क्षण हिरवे निसटून जाताना 

हिंदोळलेले स्वप्न मनी 

किती किनारे सरकून गेले 

उरल्या लाटांच्या आठवणी 


आयुष्याच्या उत्तरार्धात जन्मापासून उपभोगलेल्या कित्येक क्षणांच्या आठवणी त्याला अस्वस्थ करून सोडत नाहित काय ? बघता बघता संपूर्ण आयुष्यात आलेले किनारे आता अंतर्मनात गाज करत नसतील काय? या प्रश्नाला काव्यरूप देताना कवयित्री म्हणतात कि, 


संथ उन्हाच्या काठावरती  

पिवळी छाया ओघळली 

सौख्याची चव घेताना मग 

दुःखाची चव बोथटली 


जरासे मानवाने गतजीवनाकडे पाहून चिंतन केले तर उन्हे झेलून सावलीचा शोध घेताना आपण नकळतपणे परिपक्वतेकडे झूकत जातो हे सहज लक्षात येईल. 'पिवळी छाया' हे परिपक्वतेचे लक्षण आहे.  दिनरात्र कष्ट करून सुखकारक गोष्टीत मन रमताना दुःखाचे ओझे हलके होऊन जाते. हा अनुभव प्रत्येकाने कधीतरी घेतेलेलाच असतो. 


    एक दिवस या सृष्टीतून आपली सुटका होणारच आहे हे वैश

्विक सत्य माहीत असतानाही जीवनाकडे पाहण्याचा मानवाचा कल सकारात्मकच असतो. परंतु अंतकाळी मनःपटलावर भूतकाळाचा चित्रपट तरळून जात असतो. तेव्हाही त्याला संसाराच्या भवसिंधुमध्ये माणुसपणाची एक चांदणी स्वयंप्रकाशित करत असते. आपल्या कुटुंबातील प्रत्येकासाठी दुःखाची काळोखी भिंत फोडून सुखाचा क्षण त्याने वेचलेला असतो. मात्र अंतकाळी आधारासाठी कोणी नसते तेव्हा गात्र सारी थरथर करू लागतात. म्हणून कवयित्री म्हणतात कि, 


झूकल्या थकल्या फांदी आडूनी 

एक चांदणी लखलखते 

काळोखाची भिंत फोडुनी 

पैल ओढीने थरथरते 


    तंत्रज्ञानाच्या आधुनिक कालखंडात खरे तर मानवी जीवनच यंत्रवत झाले आहे. अखंड धावाधाव करूनही माणसांच्या हाती शून्य लागण्याचीच शक्यता जास्त. प्रत्येकजन स्वमध्ये गुंतून जात असताना प्रेमाचे खराखुरा संवाद हरवल्याची खंत कधीतरी मनाला सालत असतेच. तेव्हा मौनावरती रुसून मायेच्या शब्दांसाठी झूरत राहणे एवढेच हाती उरते. उरलेले आयुष्य मात्र आसू लपवित चेहऱ्यावर कृत्रिम हासू आणण्याशिवाय पर्याय तरी काय असू शकतो. मीणमीणती समईचे डोळे प्रतिमा वापरून कवयित्रीने पुढील काव्यओळीत जीवनाच्या उत्तरार्धाचे अचूक सूचन केले आहे. 


झुरणे उरले शब्दांसाठी 

मौनावरती रूसताना 

मीणमीणती समईचे डोळे 

लपवित आसू हसताना 


तरुणपणी माणुस उदंड इच्छाशक्तीने, 

ध्येयाने प्रेरित होऊन स्वप्नपूर्तिसाठी वाटचाल करत असतो. पण म्हातारपणी त्याला आपले शरीर साथ देत नाही. तेव्हा येणाऱ्या दिवसांचा कोणताच गुन्हा नसतो. आपल्याला आता काहीच करता येत नाही याची खंत सतावत असते. नवी उमेद, नवी आशा आता उरलेली नसते. परंतु मनावर गतआयुष्याच्या अनंत खुणा जिवंत असतात. कवितेच्या शेवटी कवयित्री म्हणतात कि, 


पायही थकले, थकल्या वाटा 

दिवसांचा या काय गुन्हा ? 

थकल्या मातीच्या देहावर 

हंगामाच्या गाढ खुणा.


    एकंदरीत एक ना एक दिवस हा देह पंचतत्वात विलीन होणारच आहे. याची जाणीव माणुस विसरला तरी हे एक वैश्विक सत्य कोणालाच नाकारून चालणार नाही. प्रा. मिनल येवले यांनी कवितेत 'क्षण हिरवे', 'सरकणारे किनारे', पिवळी छाया', थकली फांदी', काळोखाची भिंत', समईचे डोळे', थकल्या मातीचा देह' अशा विविध निसर्ग प्रतिमातून मानवी जीवनातील घटनांचे संवेदन सूचित केले आहे. कवयित्री प्रा. मिनल येवले यांचा सूक्ष्म निरीक्षण आणि चिंतनातून झालेला हा काव्यात्म आविष्कार वाचकांच्या मनाला वैचारिक खाद्य पुरवितो आणि जीवनविषयक सजगता प्रदान करतो.


    प्रस्तुत कवितेत केवळ निसर्ग संवेदन नाही तर मानवी जीवनातील ताणेबाणे, हर्षविमर्श, सुखदुःख यांचे वास्तव प्रतिबिंब संवेदनशीलतेने शब्दबद्ध झालेले पहावयास मिळते. जीवनभानाच्या व्यापकते बरोबरच काव्याशयाने गंभीरता धारण केल्याचे दिसते. कवितेतील शब्दयोजना वाचकांच्या मनात विचारांची अर्थवलये निर्माण करते यातून कवयित्रीच्या अनुभवांची प्रगल्भता दिसून येते. सदर कविता वाचक रसिकमनाला जीवनातील अंतिम सत्याचे आत्मभान देईल असा विश्वास वाटतो. कवयित्री प्रा. मिनल येवले यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! ! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract