माझी प्राथमिक शाळा
माझी प्राथमिक शाळा


ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि शिक्षण ही ज्ञानाची गंगोत्री आहे. पण पेन्शीने काळ्या पाटीवर क, ख, ग, घ शिकविणारे गुरुजी, अखंड ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षकच लहानपणापासून मुलांना कुंभाराने जसा चिखलाच्या गोळ्याला सुंदर आकार द्यावा आणि सुंदर मूर्ती तयार व्हावी तसा आकार देत असतात. आजच्या धकाधकीच्या समाजजीवनामध्ये प्रत्येकजण स्वतःशी आणि जगाशी स्पर्धा करतजगत असतो. आपल्या विध्यार्थ्याने एखाद्या स्पर्धेत यश प्राप्त केल्यास शिक्षकाचाही आनंदाने ऊर भरून येतो याचा प्रत्यय नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा ) परीक्षा मराठी विषयातून पास झालो त्यावेळी आला. १५ ऑगष्टला पिंपळखुंटे या माझ्या गावातील प्राथमिक शाळेच्या गुरुजींनी माझा सत्कार केला होता. त्यावेळी माझ्या मनात २० वर्षापूर्वीची शाळा येत होती. सत्कार स्वीकारून घरी जात असताना मोठेपणाचं प्रचंड ओझं मनावर दडपण आणत होतं. ज्या शाळेनी ज्ञानाची गंगोत्री माझ्या जीवनात आणली त्या सगळ्या जुन्या बालपणीच्या आठवणींचा सोनेरी चित्रपट माझ्या डोळ्यासमोर तरळू लागला होता. शाळेसमोर पटांगणात बसलेल्या निरागस बालकांमध्ये माझं बालपण मला खुणावत होतं.
१९९१ च्या वर्षी मी चौथीच्या वर्गात शिकत होतो. तशी शाळा गावातल्या मुख्य चौकात. गावाच्या पश्चिमेला. सकाळची कोवळी पिवळी धमक सूर्यकिरणे शाळेत हळूहळू शिरत होती. शेजारी लक्ष्मी नृसिंहाचे पुरातन मंदिर, शेजारीच शेवटच्या घटका मोजणारे भलेमोठे चिंचेचे झाड, झाडाभोवतिचा सुंदर दगडी पार, शाळेच्या पुढेच भलीमोठी तालीम. शाळेची इमारत खूप जुनी पण चौकात उठून दिसायची. वर पत्रे टाकलेले पण भोके पडलेले. दिवसभर कवडशांचा लपंडाव चालू असायचा. धुळीच्या कणांनी तो अधिक सुंदर व मजेदार वाटायचा. प्रत्येक शनिवारी शाळा शेणानी सारवावी लागे. त्यामुळे गुरुजी मुलांना शेण गोळा करायला पाठवीत. काहींना हातपंपावरून बादलीत पाणी आणायला सांगत. तर मोठ्या मुलींना शाळा सारवावी लागे.
त्यावेळी गुरुजी आम्हाला अनेक प्रकारची कामे सांगत. मुले आणि मुली अतिउत्साहाने कामे करत असत. कोणत्याही कामाला नकार द्यायचा नाही हे तत्व त्यांनीच आम्हाला शिकवले. काही वेळा गुरुजी दुकानातून गायछाप आणायला पाठवत असत. बक्षीस म्हणून दहा पैसे देत असत.
शाळेची मधली सुट्टी झाली की मैदानात मुलांची गर्दी जत्रा भरल्यागत वाटायची. चिंचेचा कट्टा लेकुरवाळा व्हायचा. खेड्यातील शाळा असल्याने अनेकजण सकाळी शाळेत येताना लवकरच निघत. येता येता बोरं, चिंचा, कवठं, हरभरा, बोकरं असं काय हाताला लागेल ते आणत असत. आपल्या जवळच्या मित्रांना रानमेवा देण्यात त्यांना आभाळभर आनंद होत असे. दुपारच्या सुट्टीत जेवणाला मंदिराभोवतीच्या पायऱ्यावर मुले जेवणास बसत असत. सर्वजण डब्यातून आणलेले पदार्थ एकमेकांना देत भोजनाचा आनंद घेत.
शाळेत त्यावेळी आम्हाला सुकडी मिळत असे. ती खूपच चविष्ट असल्याने आम्हाला ती जास्त मिळावी असे वाटत असे. एकमेकांच्या सहवासात सारा दिवस मौज मजा मस्ती करण्यात जात असे. पण गुरुजींनी सांगितलेला अभ्यासही वेळेवर करावा लागे. नाहीतर ओल्या निरगुडीच्या छडीचा मार खावा लागे. एखाद्या मुलाला गुरुजी मारायला लागले की बाकीची जीव मुठीत धरून बसत. मनात छडीची जबरदस्त भीती असे. पण गुरुजींच्या बाबतीत कमालीचा आदर होता.
अजूनही आठवतायत ते बालपणीचे दिवस. तेव्हा शाळेत बसायला रंगीत भास्करपट्ट्या असायच्या. नव्या पट्टीवर बसण्यासाठी हुशार मुलांचा नंबर लागे. तेव्हाच्या बालमनाला वाटायचे नकोतच या पट्ट्या दुजाभाव करणाऱ्या. सरळ सर्वांनी सारवलेल्या गुळगुळीत जागेवर मस्तपणे ठाण मांडून बसावे.
कधी कधी गुरुजींचा मूड खूप छान असायचा. म्हणजे गुरुजी शाळेत लेमन गोळ्या घेऊन येत आणि सर्वांना वाटत असत. गोळ्या मिळाल्या की मी काय करू काम गुरुजी? म्हणून मुलं काम मागायची. मुलांमध्ये उत्साह संचरायचा. मग हळूच गुरुजी अवघड विषय सोप्पा करून शिकवू लागायचे. फळा पुसण्यासाठी झुंबड उडायची. मग मात्र गुरुजी नंबर लावायचे. मीच फळा पुसावा, मीच खडू आणावा असे प्रत्येकाला वाटायचे. मुलांना कविता शिकविताना स्वतः गाऊन नाचून दाखवायचे. सारा वर्ग ताल पकडून डोलू लागायचा. त्या भावविश्वात मुले आनंदाने तल्लीन व्हायची.
त्यावेळी आम्हाला चौथीची परीक्षा ही बोर्डाची असल्याने दुसऱ्या गावी चालत जावून द्यावी लागे. त्यामुळे गुरुजी दुपारनं रोज सराव करून घेत असत. एक एक धडा पाच पाच वेळा लिहायला लावत. तसेच एकाच प्रकारची पंचवीस गणिते सोडवून घेत. काही वेळा अभ्यास सांगून गुरुजी बाहेर निहून जात ते पुन्हा तास संपेपर्यत येत नसत.
शाळेच्या घंटेचा नाद आजूनही तसाच कानात घुमतोय. घंटा द्यायची वेळ झाली की आम्ही घंटा देण्यासाठी धडपडायचो. घंटा वाजवताना खूप मजा वाटायची. अशा अनेक रम्य आठवणी मनात थैमान घालत होत्या.
सत्कार स्वीकारल्या नंतर माझाआनंद गगनात मावेनासा झाला होता. आजची शाळा मात्र खूप बदलली होती. आजच्या शाळेत घंटा नाहीतर बेल आहे, शाळा सारवण्याची मजा हरवली आहे, आता चकाकणारी फरशी आहे, आता शाळा रंगीबेरंगी झाली आहे, मोडलेल्या खुर्च्या जाऊन चियर्स आल्या आहेत. भिंतीवरचा काळा फळा जाऊन ब्ल्याक बोर्ड आला आहे, गावात खूप लहान मुलं असूनही शाळेतील मुलांची संख्या घटलेली आहे. सर्वांची पावलं आता इंग्लिश मिडीयम कडे वळताना दिसतात. असे असले तरी मनात मात्र प्राथमिक शाळा आजूनही घर करून आहे. अजूनही आठवते गुरुजींची पाठीवर पडणारी शाब्बासकीची थाप, आताचे गुरुजीही आपल्या अथक प्रयत्नातून प्रामाणिकपणे सुसंस्काराची बाग फुलवत आहेत. उद्याची संस्कारशील फुले ज्ञानाच्या सुगंधाने अधिकच फुलावीत म्हणून. मनात संस्काराची पेटलेली ज्योत अशीच तेवत रहावी म्हणून कुसुमाग्रज यांच्या,
‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा''
या ओळी गुणगुणत केव्हा घरी पोहचलो हे कळेलच नाही. घरात आलो तरी मनाच्या गाभाऱ्यात आठवणींची शाळा गच्च भरली होती.