Santosh Bongale

Others

5.0  

Santosh Bongale

Others

खळं

खळं

4 mins
614


आभाळात हळूहळू काळेभोर ढग जमा होऊ लागले. बाजीराव आप्पा आपल्या ज्वारीच्या कणसांनी गच्च भरलेल्या खळ्याभोवतीचा पालापाचोळा लगबगीने गोळा करू लागले. खराट्याने गोळा करत समद्या पालापाचोळ्याचा गंजीच्या एक बाजूला ढीग लावला. खळ्याभोवतीने पाचुंद्याचे ढीग आदीच लावून झाले होते. आणि मधोमध कडब्याची कणस बायकांनी दिवसभर मोडून आधीच टाकली होती. हळूहळू हवेत गारठा दाटून वाऱ्याची झुळूक येत होती.


    आप्पाच्या डोक्यात मात्र एकच विचार सारखा वळवळत होता. फक्त आजची रात्र तेवढी पावसानं कळ काढली म्हणजे झालं. एरव्ही पाउस यावा म्हणून नवस करणारा आप्पा आज मात्र मनातल्या मनात देवाकडे पावसाने येऊ नये म्हणून मागणं मागत होता. खळ्याभोवातीचा पालापाचोळा गोळा करताना एखादं लुंग्याचं कणीस सापडलं तर खळ्यात भिरकावत होता.


   दुपारच्या चार वाजून गेलेल्या. पारूबाई घराकडे कधीच गेल्या होत्या. पाचसहा थोटकं पाचुंद आणून गंजीच्या कडेला आणून टाकलं आणि चेहऱ्यावर आलेला घाम डोक्याला आवळलेल्या तडूफाने पुसत तिथंचं बुड टेकलं. अन पारूला तेथूनच ओरडून आप्पा म्हणाला, “अगं झाला का नाही अजून च्या.” आप्पा चहा येईल म्हणून वाट पाहत होता.


“होय, होय.” म्हणत घराकडेच या म्हणून पारून सांगितलं.


   आप्पा लगेच उठले. हौदाजवळ जाऊन हातापायावर पाणी मारलं आणि वट्यावर ठेवलेल्या बाजेवर येऊन बसले. कान तुटलेला चहाचा कप हातात देत पारूबाई म्हणाल्या, “दळण नीट करून ठेवलय. तेवढ दळून आणता का?'' 

   “बर” म्हणून आप्प्पा च्या पिऊ लागला.

   हातातला चहा गटागटा पिऊन टाकला आणि दळणाचं गठुडं उचलून घेतलं. व गावाकडची वाट चालू लागला.

  ''रामराम काका'' असं म्हणत गठुडं गिरणीत ठेवलं. 

  “लय अर्जंट हाय बर का काका, पावसाचं काय खरं नाय. खळं तसचं उघडं हाय, लवकर गेलं पाहिजे वस्तीवर.”

  “काय आप्पा, जवा यील तवा गडबड. कधीतरी बसता जा लेका निवांत. झाक्चील कि गेल्यावर खळं, काढ पान काढ आधी.” काका बोलत होतं.


 “तसं नव्हं काका, ज्या त्या येळंला जी ती कामं केली तर बरं असतंय.” 


   आप्पानं वेळेचे महत्व सागितलं अन पान खाण्यासाठी बटवा काढला. दळण दळायला नंबर यायला अजून उशीर होता. काका आप्पाच्या गप्पा रंगत गेल्या अन अचानक लाईट गेली.


  “हा तिच्या मायला. नकटीच्या लग्नाला सतरा इग्न.” चेहऱ्यावर नाराजी भाव व्यक्त करत आप्पा उठले. व काकाला बोलले,


 “लाईट आली कि दळून ठेवा, आणि जरा बारीक दळायच बर का?” सकाळी पारी लकवर येतो म्हणून आप्पाने घरचा रस्ता धरला.


  आभाळ मात्र काळ कुट्ट झालं होतं. दहा बारा मिनिटात ढासळेलं कि काय अशी परिस्थिती झाली होती. वाऱ्याने वेग घेतला होता. वारं सुसाटपणे वाहताना थांबायचं नावचं घेत नव्हतं.


  आप्पाने आपल्या पावलांचा वेग वाढवला. तडातडा चालू लागलं. तेवढ्यात डोक्यावर थेंब गळू लागलं. पूर्वेला ईज चमकून गेली. अन क्षणभर लक्ख झालं. पळत पळतच आप्पा घराकडे आले. वट्यावरचा कागुद घेऊन खळ्याकडे धावले व पारूला हाक मारली.


''चल ग लवकर, खळं झाकायला. कणसं भिजाय लागल्याती.”


 पारूने आणि आप्पाने कागुद खळ्यावर नीट झाकून ठेवला. थोटकं कडबा त्यावर ठीऊन दोघंही घरात आली. पावसानं चांगलाच सूर धरला होता. दोघंही भिजून गेलेली. पावसाचा जोर वाढतच चालला, पत्र्यावर दगडं टाकल्यावाणी आवाज येत होता.


  पावसाकडे बघत आप्प्पा मनाशीच पुटपुटले. “हा जर थांबला नाहीतर अवघड हाय गड्या.'' 

 वट्यावर पडलेली भाडीकुंडी गोळा करत पारूबाई अप्पाला म्हणाल्या. “आवं शेर्डी तेवढी घ्या आत. कधीपास्नं ओरडायला लागलीया, कळत नाय व्हय.”


  मुकाट्याने आप्पा उठले आणि शेळीला गोठ्यात आखडून बांधलं, व परत बाजेवर येऊन बूड टेकवलं. तेवढ्यात पुन्हा वीज चमकली, लक्ख उजेड झाला, कडकडाट साऱ्या आसमंतभर झाला. पावसानं आणखीनच जोर धरला. सर्वत्र पाणी पाणी दिसू लागलं. 


   आतामात्र आप्पाचा जीव खालीवर होऊ लागला. ''खळ्यात जर पाणी शिरलं तर काय खरं नाय गड्या.”


  रात्रीच्या आठ वाजून गेलेल्या. पारुबाईने कोरड्यास चुलीवर ठेवलं आणि भाकरी करायला काठवटीत पीठ घेतलं.


आप्पा मात्र पाऊस थांबायची वाट पहात इकडंतिकडं बघत होते.


 थोड्याच वेळात स्वयंपाक झाला. कसातरी घास तुकडा खाता खाता दिवळीत ठेवलेला मोबाईल आवाज करू लागला. पारुबीने फोन घेतला. फोनवर कोल्हापूरला शिकायला गेलेला मुलगा आईला बोलत होता. '' आई ज्वारी केली का ग? ह्या आठवड्यात दोन हजार परीक्षा फि भरायची हाय?

 ''आर पावसाने इकडं धुमाकूळ घातलाय. खळंं अजून तसचं हाय.'' पारू सांगत होती.


अप्पा माय लेकरांच्या फोनवरील संवादाकडे टक लावून बघत होते.


जेवणं आटोपली अन पारूने खरकटी भांडी धुवून काढली आणि कोपऱ्यात ठेवली.


घराला आतून कडी लावून दोघंही अंथरुणावर आडवी झाली. पडल्या पडल्या दिवसभराच्या कामानं कधी डोळा लागला कळलंसुद्धा नाय.


कोंबड्याने बाग देऊन पहाटे अप्प्पाला जागं केलं. आप्पांनी उठून चुलीवर पाणी तापायला ठेवलं. तसाच थोडावेळ चुलीपुढंं शेकत बसला. पारूबाई उठून घर झाडू लागल्या.


चागलं फटफटीत झालं होतं. आप्पा चुलीपुढून उठले आणि खळ्याकडे पावसानं काय केलंय हे बघायला गेले. खळं पाहून आपाच्या डोळ्यात पाणीच आलं. रात्री झाकलेला कागुद वाऱ्यामुळे गंजीकडं जाऊन पडला होता. साऱ्या खळ्यात पाणी साठलं होतं. पावसाच्या पाण्याने कणसं साऱ्या रानभर पसरली होती. काबाड कष्ट करून गोळा केलेल्या कणसाची रास साऱ्या चिखलात पसरलेली पाहून आप्पाला गरगरायला लागला.


दुष्काळात पिण्याची ताराबळ आणि आता कसतरी हातातोंडाशी आलेलं पिक आसं रानभर झालेलं. चार दाणं घरात येतील म्हणून हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केलेलं. पण सारं वाया गेलं.


  आप्पा आणि पारूला आयुष्यभर जगवणारं खळं पावसानं विस्कटलं होतं. आप्पा पावसाने विस्कटलेल्या खळ्याकडं कवरच्याकवर तसचं बघत होता. 


Rate this content
Log in