Santosh Bongale

Others

3  

Santosh Bongale

Others

दादा

दादा

1 min
817          न्यू इंग्लिश स्कूल ,पिंपळखुंटेच्या शाळेत शिकत असतानाची गोष्ट. इयत्ता नववीची परीक्षा देत असताना माझे वय अंदाजे चौदा वर्षे होते. गणिताचा पेपर देऊन नुकताच घरी आलो होतो. आम्ही रानात वस्ती करून एकत्र राहत होतो. आई, दादा, 

आजी, आजोबा, चुलते असे आमचे एकत्र कुटुंब. आईला चुलीवर स्वयंपाक करावा लागे. त्यासाठी सरपणाची खूप गरज पडत असे. शाळेतून मी घरी येताच आई मला म्हणाली, "दफ्तर खुटीला अडकीव अन चल माझ्याबरोबर लव्हाराच्या रानातून  सरपण आणूया. उरक  लवकर".  शाळेचा सदरा काढून जुना सदरा अंगात घालतच आईबरोबर सरपण आणण्यासाठी निघालो. दादा अगोदरच तेथे बाभळीच्या खोडाच्या ढलप्या काढत होते. ढलप्या गोळा करून आई आणि मी सरपणाच ओझं घेऊन घरी आलो. दादा तेथेच कुऱ्हाडीने ढलप्या काढत होते. "चल, अजून एक खेप करू". आई मला म्हणाली. तसा मला राग आला अन "मी येणार नाही, तूच जा, उद्या इंग्रजीचा पेपर हाय".  असं मी म्हणालो. आई निघून गेली. मी अभ्यास करत घरातच बसलो.

        "संतू, ह्यांना जरा तांब्या भरून घेऊन ये इकडे".  थोड्याच वेळात आईचा आवाज कानावर आला.

        मी जागचा हललो नाही तसाच अभ्यास करत बसलो. पाणी दिले नाही म्हणून दादा रागावले होते. थोड्या वेळाने दादा 

घरात आले अन क्षणाच्या आत कुत्रे हाकलण्यासाठी दारात ठेवलेल्या काठीने मला मारू लागले. मला काहीच कळेना, मी मोठमोठ्याने बोंबलत होतो, दादा म्हणत होते की, "शिकून लई दिवं लावणार हाई, सांगितलेलं काम करायची आक्कल नाही, लय कलेक्टर होणार हाईस." असे म्हणतच काठीचे दणके माझ्या पाठीवर बसत होते, मी रडून रडून बेजार झालो होतो. "दादा मला मारू नका, पाया पडतो, सगळं काम करतो, पण मारू नका." असं मी रडत रडत म्हणत होतो.

        माझ्या मोठ्याने रडण्याच्या आवाजाने चुलते (नाना) धावतच आले आणि दादांच्या हातातील काठी हिसकावून घेतली. "आरं अजून त्याला काय कळतंय का तरी, बैलाला बडवल्यावाणी धोपटतोय, मेलं बिलं  म्हंजे काय घ्या, करतोय अभ्यास तर करू द्यायचा.” असे नाना दादाला म्हणाले.

        पुढं काय झालं कळलचं नाही, जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा आई अंगाला गरम केलेली हळद लावत होती, तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, अन ती रडत रडत दादांना म्हणत होती की, "इव्हडूसा जीव, उद्या काय कमी जास्त झालं असतं म्हंजी काय करायचं हुतं, तरी कुणाचीबी कामं करतंय पोरगं, परीक्षा हाय म्हणून उठला नाही जागचा म्हून काय असं मारत्याती," 

          पदराने डोळे पुसत आई मला म्हणाली, "असाच पडून राहा थोडावेळ, सूज कमी हुईल, झोप जरा."

मी तसाच पडून राहिलो. थोड्या वेळाने आई स्वयंपाक करत हुती. घरातलं समधं तीच करते. पहाटेपासून रात्री निजेपर्यंत तिचा हात कधी थांबत नाही. तासाभरानं मला झोपेतून जागं करत म्हणाली,"उठ कोरड्यास अन भाकरी खाऊन घी, उपासी झोपू नगं".

      मी उठून बसताच साऱ्या अंगातून वेदनांची कळ उठली, तसाच उठून बसलो.

"या इकडं तुम्हीबी, ताट  वाढलंय, घ्या खाऊन जरा." आई ताट करतच दादांना बोलली .

      दादा एक नाही की दोन नाही, भिंतीला टेकून ते स्थितप्रज्ञा सारखे बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव दाटले होते, आईने  पुन्हा हाक मारली.

    "मला भूख नाही खावा तुम्हीच," दादा एवढेच म्हणाले.

   "लेकरास्नी आधी गुरागत मारायचं आणि वरणं अशी थेरं". आई तावातावाने म्हणाली.

        अचानक दादाच रडू लागले आणि मला तर काय झाले तेच कळेना. आजपर्यंत दादांना कधीच रडताना मी पाहिले नव्ह्ते. आता दादांचा चेहरा एखाद्या गुन्हेगारासारखा वाटत होता. तेवढ्यात आजी आणि नाना घरात आले. आजीने सर्वांची समजूत काढली, बळेच सर्वांना जेवायला घातले, पण त्या दिवशी दादांनी अन्नाला स्पर्शच केला नाही. रात्री कधी झोप लागली कोणास ठाऊक.

        सकाळी उठलो तेव्हा दादा कामाला गेले होते. सकाळी आवरून नाना मला शाळेत सोडायला आले होते. माझे सारे अंग नवरदेवासारखे पिवळे झाले होते पण अंग सारखे दुखत होते, नाना शिक्षकांशी बराच वेळ बोलत होते नंतर निघून गेले.

        शाळेची घंटा झाली आणि मी वर्गात प्रवेश केला. थोड्याच वेळात इंग्रजीचा पेपर सुरु होणार होता  मात्र माझ्या मनात रात्रीचा सारा प्रसंग थैमान घालत होता. आईचं बोलणं, दादाचं उपाशी झोपणं, आजीचं समजावणं माझ्या डोळ्यासमोरून जात नव्ह्ते. सरांनी पेपर हातात दिला तसा मी भानावर आलो. कसातरी पेपर लिहिला, हाताला मार लागल्याने नीट लिहिताही येत नव्हतं, वेदना होत होत्या. मी काय लिहितो हे कळत नव्हतं पण लिहीत होतो. बेल झाली. सर पेपर घेऊन गेले.

       मी वर्गाबाहेर आलो तर समोर दादा माझी वाट पाहत होते. मला सायकलवरून घेरी घेऊन आले, सायकलला पिशवी होती ती घेऊन घरात आलो. त्या दिवशी दादांनी अर्धी रजा घेतली होती. दादांनी येताना पिशवीत चुरमुरे, शेव, गुडदानी आणली होती. दादा ओट्यावरच्या बाजंवर बसूनच म्हणाले, "इकडे ये, मी तुझ्यासाठी गुडदानी आणली आहे, खाऊन घे".

          मी गुडदानी हातात घेतली व प्रथम दादांच्या तोंडात घातली. कारण दादा कालपासून उपाशीच होते. दादांच्या डोळ्यात पाणी साठले, पण त्यांनी ते कळू देले नाही. मला जवळ घेऊन ते म्हणत होते की, "संतू, मला माफ कर ,आजपासून तुझा तू अभ्यास करायचा, खूप मोठा हो, माझ्यासारखा अडाणी राहू नकोस”. आई दारात उभी राहून आमच्याकडे बघत होती .

           नंतर बरेच दिवस कापरासारखे निघून गेले. सगळं व्यवस्थित चालू होतं. एक मे चा दिवस उजाडला होता, तो दिवस माझ्या नववीच्या पास नापासाचा कौल देणार होता. सकाळी लवकरचशाळेत गेलो. सगळी मुलं शाळेसमोर हजार होती. मीही 

उंचीनुसार केलेल्या रांगेत उभा होतो. मुख्याध्यापक शिंदे सरांनी भाषण केल्यानंतर सर्व वर्ग शिक्षकांनी पहिले आलेले तीन नंबर सागितले होते. माझे वर्ग शिक्षक चिंतामण सरांनी माईक घेतल्यानंतर माझ्या ऱ्हदयाचे ठोके वाढले होते, कारण इंग्रजीला मी नापास होण्याची भीती वाटत होती. पहिल्या तीन क्रमांकात माझे नाव नव्हते, मी निराश झालो. वर्गात गेल्यावर सरांनी चौथ्या क्रमांकाचे निकालपत्र हातात देले. आणि म्हणाले, "संतोष, अभ्यास कर, नाव कमावशील."

         मी चौथ्या क्रमांकाने पास झालो याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी घरी आल्याबरोबर आईच्या गळ्यात मिठी मारली. मी पास झालो म्हणून सागितले. आईने मला बराचवेळ तसेच पोटाशी धरून ठेवले होते. आणि आईचा प्रेमळ उजवा हात माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देत होता.Rate this content
Log in