माझी शाळा माझे विद्यार्थी
माझी शाळा माझे विद्यार्थी
आज कालच्या मुलांची शाळेची आवड बघता मोठे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्यांना शाळा फक्त इव्हेंट पुरतीच लक्षात राहते. मुलांचे दप्तर भरण्यापासून त्यांच्या अभ्यास करण्यापर्यंत सर्व गोष्टी पालक करत असतात. किंबहुना परीक्षेचे वेळापत्रकही मुलांपेक्षा पालकांच्याच जास्त लक्षात असते. असो.
मला मात्र माझी शाळा अजूनही आठवते. तिचे कधीच विस्मरण होणार नाही. शाळेत जायचे म्हटले की अगदी हुरूप असायचा .
पूर्वी दप्तर ठेवण्यासाठी सर्वांकडे पिशवी असायची. तीही असेलच असे नाही. जो तो आपापल्या परीने दप्तरासाठी पिशवी घ्यायचा. दप्तराची पिशवी म्हणजे शेताला खत टाकून झाले की त्या पिशव्या स्वच्छ धुऊन उन्हात वाळवायच्या आणि मग टेलर कडे जाऊन आपापल्या ऐपतीप्रमाणे पिशवी शिवून घ्यायची. मी ही सुरुवातीला अशीच एक पिशवी दप्तरासाठी शिवून घेतली. नव्या पिशवीत दप्तर नेताना मोठा अभिमान वाटायचा .असेच दप्तर म्हणून पिशवी दोन वर्ष वापरले. नंतर त्या पिशवीला कप्पे व मधे चार इंचाची जोड पट्टी ठेवून दुसरी पिशवी म्हणजे दप्तर शिवून घेतले .वह्या व पुस्तके वेगवेगळ्या बाजूने ठेवल्यामुळे पटकन शोधायला सोपे झाले .मग मात्र अजूनच उत्साहाने अभ्यास करायला लागले. तेव्हा सर्वांच्या पायात चप्पल असेलच असे नाही. असलीच तर ती विमान टायरची. जो नवीन चप्पल घालून येईल तीच चप्पल सर्वजण घालून बघत. तोही आनंद वेगळाच होता
दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याची तयारी रात्रीच करून ठेवायचे. सकाळी लवकर उठून आईला थोडीफार मदत करायचे. शनिवारची शाळा फक्त सकाळची .संस्कृतच्या बातम्या संपत्ती वार्ताहा सुरू झाल्या रे झाल्या की घरातून निघायचो आणि i ईती वार्ताह संपल्या की शाळेत पोहोचायचं. हेच आमचे घड्याळ .परंतु त्यावेळी घड्याळाची कमी जाणवली नाही. इतर दिवशी अकरा वाजता शाळा असायची. घराची सावली ओट्यावर ठराविक जागेपर्यंत आली की शाळेला निघायचं.
शाळेत काही कार्यक्रम असला की स्वागत गीत म्हणायला कायम पुढे. तेव्हा हुशार मुलांनाच जास्त संधी मिळायची. सरावासाठी वेळ द्यावा लागे. कदाचित हुशार मुलांचा अभ्यास बुडाला तरी ते भरून काढतील अशी शिक्षकांना खात्री वाटत असेल. म्हणून कोणी सुद्धा तक्रार करीत नसत .उलट हीच मुले छान म्हणतात म्हणून दुजोरा मिळायचा.
फळा फक्त सुविचार, वार व तारीख लिहिण्यासाठी. ज्या मुलाला सांगितले त्यानेच फळा वापरायचा. चूकूनही बाकीची मुले खडू फळ्याला हात लावायची नाहीत. एकदा एका खोडकर मुलाने वर्तुळ आणि त्रिकोण याचा विपर्यास करून मुलगा व मुलगीचे चित्र तयार केले. सरांनी ते पाहताच त्यांना राग अनावर झाला .कोणीही कबूल होईना. कारण त्याला तसे करताना कोणीही पाहिलेले नव्हते .सरांना वाटले माहीत असूनही मुलं सांगत नाहीत. त्यामुळे सरांनी मुले मुली सर्वांनाच वर्गाच्या बाहेर उभे केले आणि वेताच्या काठीने सर्वांना दोन्ही पायांच्या पोटऱ्यावर फटके मारले. सर्वांच्या पायावर काठीचे वळ उमटलेले दिसत होते कारण शाळेचा गणवेश म्हणजे मुलींना निळा स्कर्ट व पांढरा ब्लाउज आणि मुलांना पांढरा शर्ट व खाकी हाफ पॅन्ट. तेथून पुढे कुणीच चुक करण्याच्या फंदात पडले नाही. हीच आमची सर्वांची सामुदायिक, एकसमान व एकाच चुकीला मिळालेली पहिली व शेवटची शिक्षा. नेहमीप्रमाणेच खेळाचा तास सर्वांच्या आवडीचा असायचा .खेळाचे सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे. त्यांचे शिकवण्याची पद्धत, मुलांमध्ये समरस होऊन त्यांच्यापर्यंत आपले म्हणणे कसे पोहोचवता येईल ही धडपड पाहिली की अजूनही आपण कायम विद्यार्थीच रहावे असे वाटायचे. एकदम अवघड विषय सोप्या पद्धतीने शिकवल्यामुळे सर्वांना इंग्रजीची आवड निर्माण झाली.
सरांनी एखादा प्रश्न दिला की सर्वात आधी माझे उत्तर तयार असायचे. खूप छान वाटायचे आणि अभिमानही वाटायचा. कदाचित हाच अति उत्साह मला नडला. झाले असे की सहामाही परीक्षा सुरू होती .सर्वच विषयांचा अभ्यास चांगला झालेला होता. त्यामुळे पेपरही छान जात होते. इंग्रजीच्या पेपरला जरा गडबडत झाली. तीन तासाचा पेपर अडीच तासातच लिहून झाला. खूप सोपा पेपर गेला म्हणून खुश होते. बाकीच्यांना बहुतेक अवघड गेलाय असे वाटले कारण कोणीच बाहेर येत नव्हते .पेपर संपण्याची घंटा झाली .सर्व जण बाहेर येऊन माझ्याकडून उत्तरे बरोबर आहेत की नाहीत हे खात्री करून घेत होते. इतक्यात या उताऱ्याला तू काय नाव दिले, पत्र कसे लिहिले वगैरे असे विचारल्यानंतर उतारा, निबंध ,पत्र यावेळी काहीही आलेच नाही असे मी मोठ्या ह फुशारकीने सांगितले. पण दोघी तिघींनी सांगितल्यावर मी माझी प्रश्नपत्रिका पाहिली आणि गपकन खालीच बसले. मी शेवटचे पान पाहिलेच नव्हते. एकदम डोके सुन्न झाले .कारण तीस मार्कांचा पेपर मी सोडवलाच नव्हता .प्रश्नपत्रिकेची फक्त तीन पानेच मी पाहिली आणि अति उत्साहात तेवढेच लिहून झालेला पेपर तपासून दिला होता. नंतर मात्र दोन दोनदा प्रश्नपत्रिका बघून पेपर लिहिले. आता आपला पहिला नंबर येत नाही याची पूर्ण खात्री होती. कारण एवढे 30 मार्क्स भरून काढणे शक्यच नव्हते.
सहामाहीचे पेपर तपासून झाले की शिक्षक ते पेपर मुलांना दाखवीत. त्यातल्या चुका कशा सुधारता येतील हे समजावत .मला तर इंग्रजीचा पेपर बघायची हिम्मतच नव्हती. पेपर दाखवतात म्हणून शाळेला दांडी मारायची म्हणजे डबल शिक्षा .त्यामुळे कोणी दांडी मारायचा प्रयत्न सुद्धा करीत नसत .सर इंग्रजीचे पेपर घेऊन वर्गावर आले. सर्वांनी त्यांना गुड मॉर्निंग केल्यानंतर त्यांनी बसायला सांगितले. वर्गात एकदम शांतता. सरांची मराठीचा तास असल्यासारखे ताड ताड रागावून बोलायला सुरुवात. सर्वजण माना खाली घालून चुळबुळ न करता शांत बसलेले. नंतर एकेकाला बोलावून व त्यांना वेगवेगळ्या उपमा देऊन पेपर द्यायला सुरुवात केली. शेवटी दोनच पेपर राहिलेले .मला उभे केले .भरपूर समाचार घेतल्यानंतर खोचकपणे किती मार्क्स पडतील असे विचारले .70 सांगावेत तरी भीती आणि त्यापेक्षा कमी सांगावेत तरी भीती आणि नाही सांगावे तर आणखीन भीती .शेवटी लायकी निघायचीच. पण सांगितल्याशिवाय पर्याय नव्हता .शेवटी कसंबसं धीर करून पटकन 65 सांगितले. सरांनी नंतर आधी दुसऱ्या मुलीला पेपर दिला तिला पूर्ण पेपर सोडवून 65 मार्क्स पडले होते .मी चांगलीच घाबरले .आता मात्र माझी चांगलीच फजिती झाली .रडू कोसळणार तेवढ्यात सरांनी पेपर देत 67 मार्क्स मिळालेले सांगितले .जीवात जीव आला. छातीतली धडधड थोडी कमी झाली .इतरांना सूचना देत सरांनी माझ्यावर उपरोधिक का होईना कौतुकाचा वर्षाव केला. अशी झालेली फजिती मी कधीच विसरू शकले नाही. तेव्हापासून मी कधीही अतिउत्साह दाखवला नाही.
तेव्हा बहुतेक जण मळ्यात राहायचे. मळ्यातून एकटीने शाळेत जाताना कधी भीती वाटली नाही. कारण गावातील प्रत्येक जण ओळखीचा असायचा. छोट्यातली छोटी गोष्ट शाळेत झाली तरी ती गावभर पसरायची. शाळेतून निघून जायचा प्रश्नच येत नव्हता .चुकून कुठे गेलाच तरी गावातल्या कोणा न कोणाच्या नजरेस पडणारच .अख्ख गाव आणि गावातली माणसं आपली वाटायची. माझी शाळा म्हणजे एक सलग अशी इमारत नव्हती. मुख्य दोनच खोल्या .एक ऑफिस व दुसरी मुख्याध्यापकासाठी .इतर वर्ग गावातील पाच सहा घरांमध्ये भरायचे .धाब्याची घरे. खिडक्या छोट्या, त्यामुळे उजेडाचा अभावच .परंतु शाळा म्हणजे विद्येचे घर .त्यामुळे कुणाचीही तक्रार नसे .बेंचवरच्या जागा ह्या ठरलेल्या असायच्या. त्यामुळे उगीचच लवकर जाऊन जागा पकडायची असे होत नसे. पालकांनी तर मुक्तहस्तपणे आपल्या मुलांना शिक्षकांना दान करून टाकलेले. कोणत्याही शिक्षकांची तक्रार नाही की मुलांची शिक्षकांकडे तक्रार नाही .रस्त्याने समोरून शिक्षक येताना दिसले की तिरपे चालत जायचे. नाहीतर लपायचे. आदरयुक्त भीती कायम मनात भरलेली .मुले मुली एकत्र शिक्षण घेत असल्यामुळे कधीही कोणाविषयी वाईट भावना नव्हती. शाळेतली सर्व मुले मुली एकमेकांना ओळखीत असत . त्यामुळे कधीही अडचण होत नसे. किती लिहू... शब्दच अपुरे पडतात.माझ्यावर झालेले संस्कार विद्यार्थ्यांना देताना शाळेची आठवण न होणे अशक्य च.
प्रिय असे माझी शाळा मला नेहमी
संस्काराचा ठेवा नाही पडणार कधी कमी.
