STORYMIRROR

Nalini Laware

Inspirational Thriller Others

3  

Nalini Laware

Inspirational Thriller Others

वासोटा -जंगल दुर्गरत्न

वासोटा -जंगल दुर्गरत्न

4 mins
205

फिरण्याची आवड असल्याने छोट्या-मोठ्या ट्रीप ला जाण्यासाठी मी सदैव तयार असे .अशीच एक दोन दिवसाची ट्रिप ठरली शनिवारी सुट्टी आल्यामुळे शनिवार व रविवार हे दोन दिवस मिळाले आणि वासोटा किल्ला बघायला जायचे ठरले. माझ्या कॉलेजच्या जवळ जवळ 24 जणी तयार झाल्यामुळे आम्ही सर्व सविकृष्णा हॉलिडे ग्रुपचे प्रमुख सुशील पाटील आणि त्यांचे दोन सहकारी यांच्याबरोबर जायचे ठरवले. खूप सार्‍या शंकांचे निरसन सुशील दादा व त्याचे सहकारी (त्यांनाही आम्ही दादाच म्हणायचो) करीत होते. सकाळी साडेपाच वाजता सर्वांनी कॉलेजवरच जमायचे ठरले .सकाळी सकाळी उत्साह पूर्ण वातावरणात आम्ही गाडीत बसलो. थोडे अंतर गेल्यावर साधारणपणे साडेनऊ वाजता एका हॉटेलवर थांबून मस्तपैकी चहा नाश्ता केला. गाण्यांच्या भेंड्यांनी प्रवास किती झाला ते कळलेच नाही .रात्री साडेसहा वाजता ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो .तंबूत राहायचा अनुभव घ्यायचा असल्यामुळे उत्साहतच तंबू उभारणीची तयारी केली.

तंबू उभारून झाल्यानंतर कॅम्प फायर चा आनंद घेतला आणि सकाळी लवकर उठून आवरायचे म्हणून झोपण्यासाठी गेलो पण रात्री दोन वाजेपर्यंत गप्पाच संपता संपेना कसेबसे झोपेच्या स्वाधीन होतो न होतो तोच जाग आली .एक खट्याळ कुत्रा पंजाने तंबूला मारत होता .वाघ आहे की काय या भीतीने सर्वांची गाळण उडाली . सर्वजणी एकमेकींना आधार देत होत्या .कशीतरी रात्र घालवली पटकन उठून आवारlले व तिथल्याच एका हॉटेलमध्ये चहा पोहे घेतले आणि सर्वांना बरोबर घेत किल्ल्याकडे जाण्यासाठी निघालो. वन खात्याचे ऑफिस सकाळी आठ वाजता सुरू होत असल्याने किनाऱ्यावर मस्त फोटो काढले. कोयनेच्या पाण्याचा विस्तीर्ण जलाशय ,किनाऱ्यावर रांगेत उभ्या असलेल्या बोटी, बोट चालकांची लगबग, सूर्यबिंबाचे तसेच बोटीचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब असा नयनरम्य देखावा नजरेत व कॅमेऱ्यात साठवत होतो. बोटीने प्रवास करून साधारण दीड तासाने सर्वजण दुसऱ्या टोकाला पोहोचलो. या दीड तासाच्या प्रवासातील नजारा अत्यंत आल्हादायक होता. खरोखरच कोयनेचा हा जलसागर अतिशय शांत आणि निसर्गाची भरपूर देणगी लाभलेला आहे .बोट प्रवासानंतर थोडे चालत गेल्यावर आम्ही वन खात्याच्या परिकक्षेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो .कोणतेही प्लास्टिक नेण्यास परवानगी नसल्याचे माहित असल्यामुळे आमच्याकडे प्लास्टिकच्या वस्तू नव्हत्याच. त्यामुळे तपासणी करणे वन खात्यातील लोकांना सोपे झाले.

किल्ल्यावर जाताना तुमच्याकडे किती प्लास्टिकच्या पिशव्या,किती पाण्याच्या बाटल्या होत्या याची तिथे नोंद केली जाते आणि परत येताना तेवढ्याच वस्तू दाखवायला लागतात .त्यातील एक जरी वस्तू कमी असेल तर काही रक्कम दंड म्हणून द्यावी लागते .वन खात्याचा हा नियम खरंच प्रशासनीय आहे. म्हणूनच की काय हा जलसागर, पूर्ण वासोटा किल्ला व त्याचा परिसर अतिशय स्वच्छ आहे. घनदाट जंगलातून असणाऱ्या वाटेवरून चढण्यास सुरुवात केली. मधूनच येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे वाट चालण्यास सोपे होत होते .दाट झाडांमुळे उन्हाचा तडाखा जाणवत नसला तरी पायथ्यापासूनची चढण दमछाक करीत होती. मध्येच थोडा विसावा घेत आम्ही चढत होतो. फार चढण असल्याने काही जणींनी एका ठिकाणी थांबायचे ठरवले.मात्र आम्ही सात जणी एकमेकींना उभारी देत चढत होतो. हळूहळू चढत रहा स्टॅमिना टिकून राहील असा धिर देत आमचे लीडर आमचा उत्साह वाढवीत होते. तसेच मध्येच एखादा कॅन्डीड फोटो काढून हसवत होते. आमच्यासारखीच काही दुसऱ्याही ट्रेकची माणसे व काही शाळेतील मुलेही आलेली होती. त्या छोट्या मुलांचा उत्साह आमच्या मनाला उभारी देत होता. आमच्या चढण्याची गती बघून तुम्ही नेहमी ट्रेकला जात असाल ना असे त्यातील काही जणांनी विचारले. त्यामुळे थोडी कॉलर ताट झाली. पहिल्यांदाच आलो यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. कारण सर्वजणी 40 ते 50 च्या. बाकी चढणीपेक्षा गडाजवळच्या अंतिम टप्प्यातील चढण अतिशय कठीण व दमछाक करणारी होती .त्यात डोक्यावर तळपता सूर्य व दमट हवा भर टाकीत होते. शेवटच्या टप्प्यात खडकाळ टप्पा सुरू झाला .परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोहवणारी जांभळी किलवराची फुले (canscora diffusa) व सोनकाडीची पिवळी धमक फुले (पेंट्यानेमा इंडिकम )वाऱ्याच्या प्रत्येक झुळकी आपल्याच नादात स्वैरपणे डोलत होती .जणू आमच्या स्वागतालाच उभी. गडावर पोहोचल्यावर समोरचे स्वर्गीय सौंदर्य बघून डोळे अक्षरशः दिपून गेले .हे स्वर्गीय सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह न झाला तर नवलच . एवढ्या उंच व अवघड किल्ल्यावर पोहोचण्याचा आनंद अ वर्णनीय .मंदिरातील मारुतीला नमस्कार करून पुढे गेले की एक छोटेसे महादेवाचे मंदिर आहे .तिथे नतमस्तक होऊन पुढे गेले की गडाच्या एका टोकावरून नागेश्वर गुहेचे दर्शन होते. तिथे जास्त न रेंगाळता पुन्हा आल्यावाटेने परत फिरले की बाबू कड्याचे दर्शन होते. पूर्वीच्या काळी ही जागा कडेलोट करण्यासाठी वापरत असत .भगव्या झेंड्याला वंदन करून 'श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 'असा सर्वांनी जोरात जयघोष केला .शिवगर्जनेने अनामिक ऊर्जेची लहरच जणू सळसळत गेली असा भास झाला .परत एकदा तिथले विहंगम दृश्य नजरेत साठवून परत फिरलो.

लिमलेटच्या गोळ्यांनी थोडा आधार दिला असला तरी पोटात कावळे ओरडत होते .थोडे खाली उतरल्यानंतर एका थंडगार ओहळाशेजारी बसकण मारून येथेच जेवणावर ताव मारला . ओहळातील थंडगार पाण्याने फ्रेश होऊन चालायला सुरुवात केली. थकण्यापेक्षा किल्ल्यावर पोहोचण्याचा व तेथून निसर्ग अनुभवण्याचा आनंद निश्चितच जास्त होता .उतरणचा रस्ता चालत वन खात्याच्या ऑफिस जवळ येऊन पोहोचलो .पुन्हा तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून बोटीकडे मार्गस्थ झालो .तिथल्या घनदाट जंगलातील निसर्गाचा अनुभव पुरेपूर उपभोगता आल्यामुळे खाली राहिलेल्या आमच्या मैत्रिणींनाही खूप आनंद झाला .त्यामुळे किल्ल्यावर जाता न आल्याचे दुःख कमी झाले. किनाऱ्यावर असलेल्या बोटीत पटापट उड्या मारून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. बोटीतून उतरून चहाचा आस्वाद घेतला आणि लगेचच पुण्याच्या प्रवासासाठी बसमध्ये चढलो .तोपर्यंत साडेसात वाजले होते .जलसौंदर्य, वन सौंदर्य आणि गिरी सौंदर्य अशा तिन्ही सौंदर्याची उधळण करणाऱ्या अजिंक्य अशा शिवकालीन वारसा लाभलेल्या वासोटा उर्फ व्याघ्रगडाच्या रमणीय आठवणींमध्ये हरवून जात आम्ही रात्री साडेअकरा वाजता घरी पोहोचलो .येतानाच्या प्रवासात गाडीचे टायर पंचर झाले .पंचर काढून होईपर्यंत रस्त्याच्या कडेलाच आमच्या गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या. त्यामुळे किती उशीर लागला हे कळलेच नाही .सविकृष्णा हॉलिडे च्या सुशील दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळेच आमचा हा ट्रेक अतिशय सुंदर झाला. त्यांची साथ व त्यांनी सांगितलेली सर्व इत्यंभूत माहिती आमच्या ज्ञानात निश्चितच भर टाकणारी ठरेल. 40 ते 50 शी च्या सर्व महिलांना असा ट्रेकचा अनुभव देण्याचे चांगले काम त्यांनी केले .नैसर्गिक दुर्गमता लाभलेल्या जावळीच्या घनदाट जंगलातील या अनोख्या वासोटा उर्फ व्याघ्रगडाची अनुभूती दिल्याबद्दल त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.     



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational