STORYMIRROR

Nalini Laware

Classics Others

3  

Nalini Laware

Classics Others

#माझे गाव माझी कथा

#माझे गाव माझी कथा

4 mins
70

प्रत्येकाला माझा गाव म्हटले की भूतकाळातील कोणत्या ना कोणत्या आठवणीत मन गुरफटल्याशिवाय राहणार नाही, होय ना .आपल्या देशाला गावांचा देश म्हणतात कारण भारतातील दोन तृतीयांश भाग गावात राहतो. सरासरी प्रत्येक गावातील 90% लोक शेती व दुग्ध व्यवसायांवर अवलंबून आहेत आणि म्हणूनच देशाच्या विकासात ही गावे महत्त्वाची भूमिका बजावतात.


कोणीतरी म्हटले आहे की भारत देशाला ओळखायचे असेल तर गावांमध्ये जाऊन बघायला हवे .तिथे अजूनही आपली संस्कृती जिवंत आहे. याच गावांपैकी एक माझे गाव आहे. पुणे नाशिक महामार्ग या गावातून जातो असे सर्वधर्म समभाव जपणारे माझे गाव म्हणजे 'चंदनापुरी.' याच गावात मी मोठी झाले. खूप चांगल्या आठवणी मला या गावाने दिल्यात. एकजूटता आणि मिळून मिसळून राहण्याचा धडा याच गावातून मला मिळाला. आत्ताच्या घडीला गावात सर्व सोयी सुविधा आल्यात. आधुनिकीकरणाची सर्व साधने इथे उपलब्ध आहेत .


गाव आठवले की माझ्या आठवणींना पंख फुटतात तिथली काकड आरतीने सुरू होणारी रम्य सकाळ मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. गावात वेगवेगळे सांस्कृतिक उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे रहिवाशांमध्ये अभिमान व ओळख निर्माण होऊन भूतकाळाशी संबंध राखण्यास मदत होते. गावात मुळगंगा देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. प्रशस्त सभामंडप असल्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ सहज घेता येतो. देवीची यात्रा दोन दिवस चालते. बाहेरगावी स्थायिक झालेल्यांना या यात्रेचा मोह आवरता येत नाही. जंगी कुस्त्या तसेच करमणुकीचे कार्यक्रम यात्रेनिमित्त आयोजित केले जातात .गावात अगदी लांबच्या मळ्यात राहणारी माहेरवाशीन असो  किंवा सासूर्वशीन असो सर्वांना त्यांची माहिती असते. वडीलधाऱ्यांची आपुलकीने विचारपूस केली जाते .लग्न समारंभ, बारसे,वाढदिवस अगदी सर्वांना निमंत्रण देऊन साजरे केले जातात .अनोळखी असे कोणीच नसते .एखाद्याचा दूरवरून आलेला पाहुणा त्याचे स्वागत अगदी  घरच्या प्रमाणेच केले जाते.  चुकलेल्या वाटसरूलाही इतका आपलेपणा दिला जातो की क्षणभर का होईना त्याला स्वतःचा विसर पडावा .


माझ्या गावात पूर्वी शाळा दहावीपर्यंतच होती. आता अकरावी व बारावीचेही वर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आता शाळेची इमारत दुमजली आहे परंतु छोट्या छोट्या खोल्यांमध्ये( गावकऱ्यांनी दिलेली त्यांची घरे) भरलेल्या शाळेचे वातावरण काही वेगळेच होते. शाळेसाठी असे वेगळे क्रीडांगण नव्हते परंतु रिकाम्या जागेलाच क्रीडांगण करून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेने बक्षिसे मिळवली आहेत. दोरीवरच्या उड्यांची स्पर्धा किंवा पळण्याची शर्यत यासाठी आमचे क्रीडांगण म्हणजे पुणे नाशिक रोडची बाजूची जागा असायची. इतकी शिस्त होती की आता ते आठवले तरी वाहनांची रहदारी व अपघात याची भीती वाटते.


 सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणारी रांगोळी स्वतः घरी तयार करायचो. शिरगोळे शोधून ते वाटून त्याची पांढरी स्वच्छ रांगोळी तयार करायची. एखाद्या संस्कृतीक कार्यक्रमात भाग घेतला की आपले गाणे येईपर्यंत उत्सुकता ताणलेली राहायचे आणि गाणे संपले की दुसरा कार्यक्रम बघता बघता मैदानावरच तिथेच झोप लागायची बऱ्याच वेळा दुसऱ्याकडून आणलेला पोशाख हरवलेला असायचा.


 शेतातील पेरू ,काकडी ,हरभरा या रानमेव्याची चव मनसोक्त अनुभवण्याची मजा खरी गावातच. आपल्या शेतातील हरभरा न खाता दुसऱ्याच्या शेतातील हरभरा उपटून खायचा. त्यावेळी चोरी हा उद्देश नसायचा पण शेजाऱ्याला चिडवण्याची मजा वाटायची .गावरान आंबट गोड बोर ,चिंचा तर घरात टोपलीभर असायच्या. शहरातून आलेल्या पाहुण्यांना पिशवी भर वानोळा जायचा. प्रसन्न वातावरण आणि स्वच्छ व निर्मळ मनाची माणसे अवतीभोवती कायम असायची. एकटेपणाची चाहूल सुद्धा कधी फिरकायची नाही .दारासमोरच गाय, बैल ,शेळ्या बांधलेल्या असत. त्यांच्यासमोरच बाजूला आजोबा बाजेवर झोपत. शेजारीच मोती कुत्रा आपली कामगिरी इमानदारीने करायचा .वेगळी काहीतरी चाहूल लागली की मोती जोरजोरात भुंकत असे .त्यामुळे सर्वजण लगेच जागे होत. शहरासारखे कॅमेरे तेव्हा गावात नव्हते तरी चोर पकडला जायचा.


 पावसाळ्यात ओढ्यांना पूर आला की तो बघण्यासाठी कोणाला न सांगता आम्ही गुपचूप जायचो. त्यामुळे एकदा आमची चांगलीच पंचायत झाली. पूर बघायला गेल्यावर तो इतका वाढला की आम्ही तेथेच अडकून पडलो .रात्री उशिराने पुर  ओसरल्यावर आम्हाला काकांनी घरी सोडवले. तेव्हा घाबरलेल्या आईच्या डोळ्यात रागाऐवजी मुलं परत आल्याचा आनंद जास्त होता.पावसाने दडी मारलेली असली की देवीला कौल लावत. सात किंवा नऊ मुलांना ओलेत्याने घागरीला हात लावून बसवायचे. देवीला पाऊस येणार का अशी विचारणा करत. उजवा कौल म्हणजे पाऊस येणार, घागर उजव्या बाजूने फिरली तर आणि डाव्या बाजूने फिरली तर पाऊस येणार नाही असे भाकीत असे. सर्वजण उत्साहाने गावात जमा होत. हे दृश्य पाहण्यासारखे असायचे .हा सर्वांचा देवीवर असणारा विश्वास आणि श्रद्धाच नाही का !


माझे गाव म्हणजे एक कुटुंब आहे. गावात लोक एकमेकांना खूप मदत करतात. कोणत्याही प्रकारचा राग मनात न बाळगता एकोप्याने राहतात. मोठ्या कुटुंबाप्रमाणे एकमेकांची काळजी घेतात. त्यामुळे गावात ठरलेला निर्णय प्रत्येक घराघरात आपोआप पोहोचतो. स्वच्छ सुंदर ग्रामपंचायत असून प्रत्येकाच्या अडचणींवर येथे उत्तर असते. देवीच्या मंदिराबरोबरच गावात एक मस्जिद व महादेवाचे मंदिर पण आपला वारसा जपून आहे .रस्त्यांच्या दुतर्फा हिरवीगार झाडे असल्यामुळे मनाला प्रसन्न वाटते .


माझे गाव म्हणजे सौंदर्य शुद्धता व शांततेचे प्रतीक तसेच स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते .प्रत्येक घरातून एक तरी इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक अशा उच्च विभूषित  स्थानावर पोहोचलेला आहे तरी त्यातील प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ लागतेच ,अगदी माझ्यासारखी. त्यांनाही येथील स्वच्छ सुंदर वातावरण, पशुपक्षी, मोकळे आकाश, रानमेवा यांची ओढ गावाकडे खेचून आणतेच एकदा तरी.



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics