Poonam Arankale

Inspirational

1  

Poonam Arankale

Inspirational

लॉकडाऊनमधली कनेक्टिव्हिटी

लॉकडाऊनमधली कनेक्टिव्हिटी

4 mins
384


प्रिय रोजनिशी,


तुला तर माहित असेलच मी काय लिहिणार आहे ते. अगदी बरोबर. तोच संदर्भ आहे, मैत्रिणीसह आज झालेल्या फोनवरच्या संभाषणाचा. तुला तर माहितच आहे नं गं, माझी मोठी मुलगी असते अमेरिकेत आणि धाकटी आहे आता फ्रान्स मधे. मोठीचं लग्न होऊन ती नवऱ्यासह तरी आहे. धाकटी इथेच होती आत्तापर्यंत. पण नुकतीच गेलीये तिथे फ्रान्सला सहा महिन्यासाठी एका प्रोजेक्टकरता तिच्या कंपनींतर्फे गेलीये. तिनेक महिने झाले असतिल जेमतेम. आता या लोकडाऊन ने खूपच वैतागलीये. नुकतीच तिथे गेल्यामुळे अजून म्हणाव्या तशा ओळखी नाहीयेत. फ्रेंच फक्त हाय बाय इतपतच.  बरं, तिथे इंग्लीश बोलणारे कमीच. मराठी तर हातांच्या बोटावरच. सगळं असं व्हायरल वातावरण इतकं अस्वस्थ करतंय. तिथे तिला आणि तिच्याहून जास्त इथे आम्हाला.  प्रोजेकट तिथे मिळाला तेव्हा खूप आनंदलेली. करियरमधे योग्य वेळी संधी मिळाल्याने पण आता.... फोनवर होती माझी एक मैत्रीण. तिच्यातल्या आईचा काळजीयुक्त मायाळु स्वर संवाद साधत होता. संवादासाठी मैत्रीण तर हक्काचीच नं. अगदी काहीही करू शकत नसली या स्थितीत तरीही. नुसत्या संवादातूनही हलकं वाटून जातं.


तर मन हलकं होण्याकरता समोरच्याला बोलू देणंच योग्य असं कुठेसं वाचलेलं व्हाटसअप ज्ञान जाग झालं. आणि शांतपणे 'ऐकती' झाले. बघ नं , जवळपास सर्वच देशांनी आपापल्या सीमा लॉक केल्याच आहेत. तिला इथे निघून ये सांगता येत नाही. आम्हाला तिथे जाता येत नाही. संपर्कासाठी तेवढा एक नेटचाच आधार मोठा आहे आता. तिला बघू शकतो. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलतो. शब्दातून धीर देऊ शकतो. अगं खरं सांगायचं नं, तर सुरवातीला हे सगळं नेट वगैरे नव्याने शिकताना खूप वैतागलेले. काय झंझट आहे अशीच होती भावना. तिथल्या वेळा सांभाळा, नेटचं टेकनिक सांभाळा. पण मोठीचं लग्न होऊन ती अमेरिकेत गेली आणि धाकटीने हट्टाने नेट साठी ट्रेन केलंन, तेच आता उपयोगी ठरतंय बघ. हंSs खरंच !! तिला सांगतेसच आहेस धीर धरायला तसंच मी ही तुला सांगते आहे आता तू पण धीर धर, प्रियु. सगळंच गतिशील आहे असं ऐकलंय नं, ते खरंय मानलं तर ही स्थितीही बदलेलच असा ठाम विश्वास ठेव. हाच तुझा विश्वास शब्दातून, देहबोलीतून तिच्यापर्यंत पोचून खंबीर करेल तिलाही, असं म्हणत फोन ठेवला. पण मनात आलं खरंच आज कितीतरी घरातून हीच भावना असेल नाही नेटबद्दल. कारण बहुतेक पिल्लं पंख पसरत घरट्याबाहेर उडालीयेत. कमी अधिक उशिरा. कारणं वेगवेगळी शिक्षण, करियर, लग्न वगैरे वगैरे. कुणी देशातच वेगळ्या प्रांतात तर कुणी परदेशात. ट्रेन मधे बसून मुंबई पुणे मुंबई करावं तितक्या सहजतेने विमानातून न्यूयॉर्क, लंडन, पॅरीस, फ्रँकफर्ट, मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता करता येत होतं तोपर्यंत सगळं आलबेल होतं. भौगोलिक सीमांचाच नव्हे तर साता समुद्रांचाही अडसर जाणवत नव्हता. पण या करो-ना श्या 'न भूतो' स्थितीत आलो आणि चार ठिकाणी चार झालेल्या जिवलगांसाठी मनं हळवेपणाने झाकोळती झाली माझ्या मैत्रिणीसारखी. आत्ता तरी हा झाकोळ दूर करतीये ती नेट टेकनॉलॉजीच. किती घरातून धन्यवाद मिळत असतिल या टेकनॉलॉजीला. 


जास्तीत जास्त मातृभाषांना सामावून घेतलेली ही टेकनोलोजी आज किती जणांना दिलासा देऊ करतेय! ते ही आपापल्या मायबोलीतून. वेगवेगळ्या बोलींतून संवाद साधता येण्याचा आनंद असतोच. पण मायबोलीतून आपल्यांशी संवाद आपुलकीचा ओलावा जागवतो. आता बघा तर आपल्या माय मराठीकडे. नवीनतेला सहजतेने अंगिकारत, किती सुंदरतेने वापरतिये या नव्या माध्यमाला ती. वेगळ्या बोलीच्या टेकनिकल शब्दांना सामावून घेत, ओळखीचं हसत, मायेने विचारपूस करतीये ती त्याच नेटवरून. अगदी सर्व लॉकडाऊन असताना आणि सोशल डिस्टन्स काटेकोरपणे राखत जीवलगांच्या शब्दांना थेट 'नेट'स्वार करवत भौगोलिक अंतर पुसते आहे ती आत्ता. सांत्वना / खुशाली कळवत एकमेकांशी जोडून ठेवते आहे. धीर धरायला, दिलासा द्यायला शिकवते आहे. करो - ना करण्यासाठी औषध येईलच आता लवकर सांगत विषाणूभीतीला दूर सारते आहे. समाजमन एकत्र गुंफत संवादपूर्तीची सम साधते आहे. नव टेक्निकचे नवे शब्द नवी चिन्ह वापरत, नव्याने समृद्ध होऊन सहज वावरते आहे. संवादीपण वाहतं ठेवत समजुतीचं हसते आहे. बघा बघा तर... आहात नं नेटकनेकट. पहा तर मोबाईल किंवा टॅब स्क्रीन आपापला. आपापल्या घरीच आहात पण एकटे नाही बरं. सतत संपर्कात आहे ती तुमच्या. किती परींनी ती संवादी ठेवतीये सगळ्यां आपल्यांसह. हवेसेच आहेत सगळे तिला म्हणून तर प्रेमाने सूचना देत काळजी घेतेय ती आपल्याच जिवलगांमार्फत. आ... आ... राजा अरे घरातच रहा बरं. बाहेर नका पडू . 🙌 तुम्हाला कोणाशी बोलावंसं वाटतंय तर मला सांगा. मी करते नं कनेकट्ट त्याच्याशी थेट्ट... बस युं झूमसे आणि अगदी बाहेर पडावच लागलं तर मास्क लावल्याशिवाय जाऊ नका. 😷 घरात रहा. सुरक्षित रहा. व्हायरल युद्ध जिंकायचं तर एवढी काळजी आपली आपण घ्याच काय!! आणि संवादी रहा, खुशालीत रहा.

काय पोचलाय नं संवाद तुमच्यापर्यंत असा. खात्री आहे मला घेईलच प्रत्येक जण काळजी आता, समजेलच प्रत्येकाला तिने नेटभाषेतून पोचवलेली जिवलगांची आर्तता. किंबहुना आता पोचवतीये ती एक जाणीव. दूर राहिलो तरी आपल्यातही आहे एक ओढ. आपल्यांशी संवादी राहण्याची. कौटुंबिक संलग्नता राखण्याची. ख्याली खुशाली विचारणाऱ्या मित्र परिवारासोबत भावनिक जोडून घेण्याची. तेच जाणवून तर शिकून घेतलीये मायमराठीनं ही भाषा. तिला माहित आहे वरवर कितीही दाखवला व्यवहारी पक्केपणा तरी अंतर्यामी वाहातच असतो प्रेमळ संवादी झरा. 👍 लॉकडाऊन मधल्या शांततेने सामोरी आणलीये आपल्यांशी कनेक्टिव्हिटी राखण्याची तीव्रता.  माझ्या मैत्रिणीसारखंच सुरवातीला झंझट वाटणारं नेट, आता सांगा बरं किती जणांना अजूनही वाटतंय झंझट आता. ऊलट सर्वदूर जिवलगांशी कनेक्शन चा दुसरा मार्गच नाही आता. एकतर एकवीस वर्षं मागे जा किंवा एकवीस दिवसांचा लॉकडाऊन ब्रेक घेऊन आपल्यांसह असलेली आपली कनेक्टिव्हिटी समजून घेत आणि राखत लढा देत पुढे चला. यातून लक्षात आलेली कनेक्टिव्हिटी पुढेही राखुयात. पोचवुयात एक कनेक्टेड प्रार्थना त्या सर्वसाक्षीला, सुरक्षितपणे करो-ना पार करवण्यासाठी.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational