लहानग्यांची व्यथा-नाट्यछटा
लहानग्यांची व्यथा-नाट्यछटा
आई.. ए आई.. सांग ना गं माझी शाळा कधी सुरू होणार?? काय म्हणतेस?? कोरोना गेल्यावर..?? अगं पण कधी गं जाणार कोरोना...?? किती महिने झाले आमची शाळा बंद होऊन.. मला की नाही खूप कंटाळा आलाय.. काय म्हणलीस?? ऑनलाईन शाळा आहे की???? अगं ऑनलाईन शाळेत काही गंमत तरी येते का?? नुसतं आपलं मॅडम काय म्हणत आहेत ते ऐकायचं आणि शांत बसून मोबाईल स्क्रीनकडे बघत राहायचं... मित्र-मैत्रिणी नाहीत, दप्तर नाही, डबा नाही, खेळ नाही आणि म्हणे ऑनलाईन शाळा आहे की... अशी असते होय शाळा...?? अगं आम्ही शाळेत किती धमाल करतो माहितीये..?? मी, देवांश, परीक्षित आणि आर्यन आम्ही सगळे सोबत बसतो, एकत्र डबा खातो आणि एकमेकांच्या खोड्या पण काढतो... व्हॅनमध्ये तर काही विचारुच नकोस... आमची नुसती मस्ती चाललेली असते... मला सगळ्यांचीच खूप आठवण येतीय गं... माझ्या मित्र, मैत्रिणींची, आमच्या बाईंची, व्हॅनवाल्या काकांची, शाळेतल्या मैदानाची, आमच्या वर्गाची, माझ्या बेंचची आणि आख्ख्या शाळेचीच... आमच्या शाळेचं मैदान आमची किती वाट बघत असेल गं?? मुलांशिवाय ते बिचारे किती एकटे पडले असेल... आमचा वर्ग पण किती शांत शांत असेल गं.... आमची आठवण काढून तो बिचारा सारखा रडत बसला असेल..
आई... बघ... किती छान पाऊस आलाय... मी जाऊ का गं पावसात भिजायला.. काय?? जाऊ नको?? अगं का पण?? काय??कोरोना आहे म्हणून.. अगं सारखं काय गं... बाहेर जाऊ नकोस.. कोरोना येईल... आईस्क्रीम खाऊ
नकोस... कोरोना येईल.. सारखं कोरोना... कोरोना... कोरोना... काय गं हे चिनी लोक... त्यांनीच आणला ना गं कोरोना आपल्याकडे?? आणि सगळीच बंधनं आली गं आमच्यावर... बाहेर खेळायला जायचं नाही, बाहेरचं काही खायचं नाही, मित्र-मैत्रिणींना भेटायचं नाही... का तर आम्ही लहान ना? त्या चिन्यांमुळे सगळ्या जगाला किती त्रास होतोय गं.. किती लोकं रोज मरतायेत आणि किती आजारी पडतायत.. मी तर आता ठरवलंय चिनी खेळणी अजिबात मागवायची नाहीत... आपले पंतप्रधान मोदी आजोबा सांगतात ना मेड ईन इंडिया वस्तू वापरा म्हणून... आपण सगळ्यांनीच त्यांचं ऐकलं पाहिजे.. हो की नाही?? मी परवाच बाबांना सांगितलंय माझ्यासाठी ऑनलाईन खेळणी मागवायची असतील तर फक्त मेड ईन इंडियाच मागवा म्हणून.. आई.. एक सांगू... या कोरोनामुळे एक गोष्ट मात्र खूप चांगली झाली बघ...!! तू आणि बाबा दोघेही वर्क फ्राॅम होम करत होतात ना तेव्हा मला खूप छान वाटायचं गं... तुझ्याबरोबर पत्ते, कॅरम खेळायला, तुझ्या हातचे नवनवीन पदार्थ खायला, एकत्र गप्पा मारायला खरंच खूप मज्जा आली गं... पण सारख्या कोरोनाच्या बातम्या ऐकून ऐकून कान अगदी विटून गेलेत गं... रोज हजारो लोक या रोगामुळे आजारी पडतायत आणि कित्येक जणं मरतायत... मी तर रोजच देवाला प्रार्थना करतीय... देवा... प्लिज... या कोरोनाला कायमचं हाकलून दे... म्हणजे आम्हा छोट्या लेकरांना मोकळा श्वास घेता येईल... मनमोकळं बागडता येईल... देवा... ऐकशील ना रे एवढं माझं...