लाॅकडाऊन - सक्तीची पण आनंददायी विश्रांती...
लाॅकडाऊन - सक्तीची पण आनंददायी विश्रांती...
सध्या करोनाचे संकट जगभर घोंगावत आहे..खूप लोकांना जीव गमवावा लागला आहे तर खूप जणांसाठी पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे..अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे... तरी पण ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे लाॅकडाऊन ने खूप चांगल्या गोष्टीही दिल्या...मंदिरे बंद झाली असली तरी डाॅक्टर, पोलीस, पॅरामेडिकल स्टाफ यांच्या रूपाने माणसातील देवाचे दर्शन झाले...सेवाभावी संस्था आणि समाजातील अनेक घटकांनी केलेल्या अन्नदान आणि इतर मदतकार्याने आणि पीएम फंडला मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसादाने दाखवून दिले की माणुसकीचा झरा अजूनही आटलेला नाही.. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या माणसाला जरा थांबायला लावून आतमध्ये डोकावून पाहायला लावले...गरीब असो वा श्रीमंत त्या एका शक्तीपूढे सर्व जण कसे समसमान आहेत हे दाखवून दिले...सर्वांना स्वावलंबन शिकवले... पैसा, घर, गाडी अशा गोष्टींचा माज बाजूला ठेवण्यास भाग पाडले.. ऐहिक गोष्टींमागे धावणाऱ्या आणि त्यात आनंद शोधणाऱ्या माणसाला खरा आनंद मिळवण्याची संधी प्राप्त करून दिली...सुंदर पहाट, आकाशात स्वछंदपणे उडणारे पक्षी हे खरे तर रोजचेच पण यांचा आनंद खूप जणांनी आता लाॅकडाउन च्या काळात घेतला असेल कारण एरवी वेळ आहे कोणाला... लेकरांना घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करणाऱ्या आईचा सहवास मिळवून दिला आणि आईला मुलांची माया... सूर्यनमस्कार, प्राणायम याने दिवसाची सुरुवात होऊ लागली... घरोघरी अंगतपंगत होऊ लागली आणि नात्यांमधला हरवलेला संवाद निर्माण होऊ लागला... वेळेअभावी दडून राहिलेले कलागुण बाहेर डोके काढू लागले...वर्किंग वूमन्सना आपले पाककौशल्य आजमावून पाहण्यासाठी वेळ मिळाला... या काळात केक आणि विविध रुचकर पदार्थ बनवले नाहीत असे एक पण घर सापडणार नाही..!!
माझेच सांगायचे झाले तर एरवी एक पण रविवार पूर्ण दिवस घरात पाय न राहणाऱ्या आणि माॅल, हाॅटेल अशा ठिकाणी आनंद शोधणाऱ्या मला खरा आनंद काय हे शिकवले...कित्येक वर्षे अपूर्ण राहिलेली माझी रामनाम वही सुफळ संपूर्ण झाली... ग्रंथपठण, स्तोत्रपठण, सायंकाळची उपासना, सुंदरकांड यांनी आध्यात्मिक बळ पुरवले... रामायण, महाभारत यांसारख्या अजरामर कलाकृतींचा आस्वाद घेता आला.. मोदींनी केलेल्या आवाहनानुसार केलेला घंटानाद, दीपप्रज्वलन सुंदर अनुभव देऊन गेला...एरवी वेळेअभावी लवकर बनेल असे पदार्थ बनवणाऱ्या मला केक, आईस्क्रीम आणि इतर अनेक पदार्थ बनवून खाऊ घालता आले... स्टारमेकरवर गुणगुणलेली गाणी आणि त्याला मिळालेली लाईक मनाला सुखावून गेली!!... खूप वर्षांनी हातावर मेंदी रेखाटताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या... लहान मुलीबरोबर अगणित खेळ खेळून तिच्याबरोबर परत लहानपण अनुभवता आले!!...देवाने या संकटाच्या काळातही आपले संरक्षण केले, आपल्याला काहीही कमी पडू दिले नाही या त्याच्या अकारण कारुण्याने उर भरून आला व प्रथमच देवाकडे काही मागण्यासाठी हात न जोडता त्याच्यासमोर नतमस्तक होऊन त्याला धन्यवाद द्यावे वाटले ते या लाॅकडाऊन मध्येच...!! आधी कधीही कविता, लेख काहीही न लिहिलेल्या मला लेखनाची गोडी लागली व लेखणीच्या रुपात एक नवीन मैत्रीण मिळाली ती ही या लाॅकडाऊन मध्येच...!!
हे करोनाचे संकट कधी जाईल माहित नाही पण या आठवणी मनाच्या कोपऱ्यात कायम राहतील...!!शेवटी एकच सांगेन काळजी घ्या पण घाबरु नका..पाॅझिटिव्ह रहा... आनंदी रहा.. मस्त खा आणि स्वस्थ जगा...!!!