Sayali Kulkarni

Others

3.8  

Sayali Kulkarni

Others

कौतुकाची थाप

कौतुकाची थाप

3 mins
500


"आई...! काय भारी झाली आहे पाणीपुरी..!!एकदम बढिया...!!"पाणीपुरीवर ताव मारता मारताच माझ्या मुलीने सहज सुंदर दाद दिली आणि माझा सकाळपासूनचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला...!! खरंच..! किती ताकद असते या कौतुकाच्या दोन शब्दांमध्ये..!!लहान असो वा मोठे सर्वांनाच ही कौतुकाची थाप कायम हवीहवीशी वाटते..!! "किती छान मार्क मिळवलेस..!! खूप मेहनत घेतलीस मुला..!!"असे आईवडीलांचे कौतुकाचे उदगार ऐकले की मुलांना आपल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळते आणि पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी बळ..!! श्रोते रसिक आणि उत्तम दाद देणारे असतील तर मेहफिल उत्तरोत्तर रंगत जाते आणि गाणाऱ्यालाही गाणे सादर करण्यास उत्साह संचारतो...!! याउलट श्रोत्यांनी दाद देण्यास कंजूसपणा केला तर ती नीरस आणि बेरंग वाटते.. "अग किती सुंदर दिसते आहेस..!! हा रंग तुझ्यावर खुपच खुलून दिसतोय!!!" असे अहोंचे उदगार ऐकले की तिच्या गालावर गुलाबी लाली उमटते आणि ती अधिकच सुंदर दिसायला लागते..!! आपल्या फेसबुकच्या एखाद्या पोस्टला जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळाले नाहीत की आपण निराश होतो...खूप लाईक आणि कमेंट्स मिळाले तर एकदम हवेत!!...एखाद्या नवीन हाॅटेलला जाताना पण आपण हमखास त्या हाॅटेलचे रिव्ह्यू वाचूनच जातो.. हे रिव्ह्यू म्हणजे या हाॅटेलसाठी कौतुकाची पोचपावतीच असते..!! सिनेमाचे यशही बऱ्याच अंशी त्याला मिळणाऱ्या स्टार आणि रिव्ह्यू वर अवलंबून असते.. हे स्टार म्हणजे आणखी काय...!कौतुकाची थापच..!! तर हा झाला कौतुकाचा महिमा..!! 


पण..प्रश्न असा आहे की अशी ही सगळ्यांनाच सुखावणारी अशी कौतुकाची थाप आपण किती वेळा देतो????...दुसऱ्यांच्या चुका आणि अवगुण शोधायची एकही संधी आपण सोडत नाही...मग कौतुक करताना कायम आखडता हात का??? बायको कडून एखाद्या दिवशी घाईघाईत भाजीत मीठ कमी झाले तरी आपण आवर्जून सांगतो...तर मग बायकोने केलेला एखादा पदार्थ छान झाला आहे हे सांगायला आपले ओठ का बरे शिवतात???आपल्याला बायकोने केलेला एखादा पदार्थ समजा खूप आवडला..तर मग सांगा ना खूप छान झालाय म्हणून....!!! तिचा कामाचा थकवा क्षणात निघून जाईल.. कधीतरी आपल्या आईजवळ बसा, तिचा हात आपल्या हातात घ्या आणि सांगा "किती दिवसरात्र राबतेस ग तू घरासाठी.. मला तू खूप आवडतेस..!! " तिच्या पाणावलेल्या डोळ्यात समाधानाची चमक दिसेल..!!!कधी सासूबाईंना सांगा "आई, तुमचे लोणचे म्हणजे केवळ लाजवाब..!! माझ्या लोणच्याला मुळी तशी चवच येत नाही.." त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तुम्हाला गोड हसू दिसेल...कधी नवऱ्याने प्रेमाने आणलेल्या साडी चे तोंडभरून कौतुक करा... त्याला खूप समाधान मिळेल... मैत्रिणीच्या नवीन हेअरकटला मनापासून दाद देत सांगा "खूपच शोभून दिसतोय तुला हा हेअरकट..!!"..ती खरच खूप सुखावेल..!!!कर्मचाऱ्यांना खूप वेळा चूका दाखवून दिल्या असतील... कधी त्यांची प्रशंसा करून त्यांना त्यांच्या कामाचे क्रेडिट देऊन तर बघा... !ते अधिक जोमाने काम करतील...! शब्द हे जसे जखम करून वेदना देतात तसेच मलम बनून जखमेवर फुंकरही घालतात... फरक पडतो तो शब्दांच्या निवडीने... तरी पण कौतुक हे कायम शब्दांतूनच व्यक्त करता येते असे काही नाही.. कधी कधी केवळ नजर आणि कृती ही शब्दांपेक्षा बरंच काही सांगून जाते..आॅफिस मधून थकून आलेल्या बाबांना चटकन थंडगार पाणी आणून द्या आणि त्यांची आपुलकीने विचारपूस करा.. त्यांना खूप बरे वाटेल...कामावरून आलेल्या सुनेच्या हातात फक्कड आले घातलेला चहा ठेवून बघा.. दिवसभराचा क्षीण विसरून लगेच कशी आनंदाने कामाला लागेल...देवाकडे पण सतत आपण तक्रारच करत असतो... कधी तरी त्याच्यापुढे नतमस्तक होऊन त्याचे आभार मानत त्याला म्हणा "खरेच तू आम्हाला सर्व काही दिलेस... मी तुझा खूप ऋणी आहे...पैसे, गाडी, घर, जीवासाठी जीव देणारे नातलग आणि मित्र...कशाची म्हणून कमी नाही..." तो पण नक्कीच सुखावेल...दुसऱ्याला आनंद दिल्याने आपला आनंद कधी कमी होत नाही.. उलट द्विगुणित होतो...!!! भावना ही मानवाला ईश्वराकडून मिळालेली एक नितांत सुंदर देणगी आहे...त्या व्यक्त करायला शिका... माणूस सोबत असताना त्याची किंमत ठेवा.. एकदा ओंजळीतून पाणी वाहून गेले की हातात काहीच शिल्लक रहात नाही... चला तर मग ही कौतुकाची थाप देऊन आनंदाचा अक्षय खजिना लुटायला करताय ना आजपासून सुरूवात..!!!


Rate this content
Log in