लढा
लढा


सांजवेळ झालेली होती. देवासमोर लावलेल्या पणतीच्या समोर बसलेल्या तिचा चेहरा अधिकच उजळून निघाला होता.क्षणभर तिने डोळे मिटले तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळत होता.
नित्य घर झाडता झाडता अचानक तिच्या हातात गोळा उठला. तिने आत जाऊन बाम हाताला चोळला थोडयावेळात तिला बर वाटल.परत दुसरया दिवशी तोच प्रकार तिने दुर्लक्ष केल.मात्र एक दिवस तिच्या हातातून झाडू सुटला. घडलेला प्रकार प्रकाशच्या लक्षात आला.प्रकाशने स्मिताला सोफ्यावर बसायला लावले.ग्लासभर पाणी तिला
प्यायला दिले.स्मिताने हात पुढे करत सांगितले,“अहो काय सांगू हल्ली किनई माझ्या हातात असा गोळा येतो”.प्रकाशने तिचा हात जवळ घेतला आणि तो म्हणाला,“स्मिता आपल्या घरी एक सोडून तीन चार घरगडी आहेत मग तू का म्हणून घर झाडतेस” तेव्हा ती म्हणाली, “अहो तुमच खर आहे पण घरगडी उशिरा येतात कामाला मग तो पर्यंत घर तसच ठेवायच का मला एक तर देव पूजा झाल्याशिवाय काही बर वाटत नाही”. प्रकाश म्हणाला, “तुला माझ म्हणण पटणार नाही पण चल आज मला वेळ आहे आपण डॉक्टर कडे जावून येवू”.स्मिता पटकन तयार झाली. नासिकच्या एका स्री रोग हॉस्पिटल मध्ये प्रकाश तिला घेवून गेला डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक चेकप केल त्यांनी स्मिताला बाहेर बसायला सांगितलं आणि डॉक्टर प्रकाशला म्हणाल्या की ताबडतोब स्मिताच ऑपरेशन कराव लागेल प्रकाशच्या डोळ्यासमोर वीजच चमकली आणि तो रडायला लागला.
डॉक्टरांनी प्रकाशला धीर दिला आणि सांगितले की आधीच उशीर झाला आहे त्यामुळे वेळ घालवू नका आधी सगळ्या टेस्ट करून घ्या आणि मग आपण स्मिताला मुंबईला घेवून जावू.प्रकाशने डॉक्टरांना खोलात जावून विचारले पण डॉक्टरांनी त्यांना काही सांगितले नाही. प्रकाशने स्मिताला घरी आणले घरची सगळी मंडळी सासू सासरे मुलगा आशीष व मुलगी स्नेहा स्मिताची वाटच पहात होते. प्रकाशच्या चेहऱ्यावरचे खिन्न हावभाव पाहून घरची मंडळी चरकली. प्रकाशने स्मिताला दोन घास खावून घ्यायला सांगितले.भराभर त्याने स्मिताच्या सर्व टेस्ट करून घेतल्या. एक बायोप्सी टेस्ट मध्ये स्मिताला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले.
तातडीने स्मिताच ऑपरेशन ठरलं. घरात चिंतेच वातावरण होत. स्मिताचे दोन्ही चिमुकली तिला सोडायला तयार नव्हती प्रकाशने त्यांना समजावलं. आईला मुंबईहून बर करून आणतो अस त्याने मुलांना समजावून सांगितलं. स्मिताने सासू सासर्यांचा आशीर्वाद घेतला आणि ती प्रकाश बरोबर निघाली. मुंबईला टाटा मेमोरीयला प्रकाशने स्मिताला आणल दुसऱ्या दिवशी सकाळीच ८ वाजता डॉक्टरांनी ऑपरेशनला सुरवात केली अनेक वेळा स्मिताचा बी .पी कमी झाला त्यामुळे एका तासाच्या ऑपरेशनला ८ तास लागले प्रकाश ऑपरेशन रूम च्या बाहेर डोक्याला हात लावून बसला होता. त्याची जीवनसंगिनी साक्षात यमाशी लढत होती काही वेळाने डॉक्टर बाहेर आले त्यांनी प्रकाशच्या पाठीवर थाप ठेवत सगळ काही ठीक असल्याच सांगितलं. दहा दिवसानंतर स्मिताला घरी नेण्यात आल. फावल्या वेळात स्मिता मॉडेलिंगच काम करायची तिची आवड म्हणून प्रकाशने तिला पाठिंबाच दिला होता. ऑपरेशन नंतर केमोथेरपीला सुरवात झाली स्मिता सर्व काही करायला तयार होती पण आता तिचे केस झडून गेले होते भुवया व पापण्याचे केस देखील झडून गेले होते.
स्मिताने एक दिवस आरशात पाहिलं तेव्हा तिला रडूच कोसळलं. मॉडेलिंग म्हणजे सतत कॅमेरा समोर उभ राहायचं आणि आता हा विद्रूप चेहरा पण त्याला इलाज नव्हता. स्मिताच काम थांबल.पण तिने हार मानली नाही.सततच्या केमोथेरपीने चेहराही काळवंडला होता.ती तिचा लढा दयायला तयार झाली.लवकरच त्या शहरात मोडेलिंगचा मोठा शो होणार होता. स्मिताला या स्पर्धेत भाग घ्यायचा होता. तिने प्रकाशला सांगितल पण प्रकाश तयार नव्हता तिने हट्ट धरला आणि ती या स्पर्धेत उतरली. नामवंत मॉडेल या स्पर्धेत होत्या.
स्मिताने आरशासमोर उभ राहून तयारी केली. डोक्याला एक छानसा विग लावला. हलकासा मेकप व शोभेल असा गाऊन तिने घातला. जेव्हा ती स्टेजवर आली तेव्हा ती अतिशय सुंदर दिसत होती. खास तिच्या आग्रहास्तव तिचे सासू सासरे, प्रकाश व दोन्ही मुल पहिल्याच रांगेत सोफ्यावर बसली होती.ती आल्यावर टाळ्यांचा गडगडाट झाला. आवश्यक तेवढे हावभाव करत आणि स्मित हास्य करत ती राम्पवर चालत होती. स्पर्धेच्या तीन फेऱ्या झाल्यावर विजेत्यांची घोषणा झाली सगळे कान टवकारून ऐकत होते आणि जोरात अनौन्सिंग झाल “द विनर इज स्मिता देशमुख”. खचाखच भरलेल सभागृह टाळ्यांच्या गजरात स्मिताला अभिवादन करत होत. तिच्या मुलांनी तिला घट्ट मिठी मारली स्मिता हा लढा जिंकली होती.