लढ अर्जुना
लढ अर्जुना
सकाळची दहा साडे दहाची वेळ असेल बहुदा! पहाटेपासून आंघोळी,फराळ,शिकवण्या वगैरेची जी लगबग असते ती आता थांबलेली होती. हॉस्टेलमधील मुले शाळेत गेल्यामुळे सर्व खोल्यांमध्ये निरव शांतता पसरलेली होती. मुलांच्या आंघोळीपासून ते गृहपाठ पूर्ण करून घेण्यापर्यंतची सगळीच कामे हॉस्टेलवरील शिक्षक मंडळीच करत. मुले शाळेत जाऊन परत येण्यापर्यंतचा कालावधी हा शिक्षकांचा रेस्टिंग पिरियड असायचा !
पहाटेपासून झटणारी तरुण शिक्षक मंडळी लोळण्याच्या तयारीत होती.असं फराळ करून डुलकी घेणं हा त्यांच्या नित्य सवयीचा भाग होता. इतक्यात टेलिफोनचा कर्कश आवाज त्या शांततेचा भंग करत मधल्या खोलीत घुमू लागला. सगळे शिक्षक आळसाळलेल्या नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. दीर्घ श्वास घेत शेवटी अर्जुन उठला. फोन उचलताच तो खेकसला,
"हॅलो,सगळी मुलं शाळेत गेलेली आहेत चार नंतर फोन करा...!"
तिकडून एक काळजीयुक्त स्वर उमटला,
"अर्जुन...?"
तो आवाज ऐकताच त्याचा घसा कोरडा पडला.त्याचे हात पाय थरथरू लागले.त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला.तो काहीतरी बोलू इच्छित होता पण बोलू शकत नव्हता.त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. त्याच्या डोळ्यातून अश्रूधारांचा पूर ओसंडू लागला. त्याच्या सहकारी मित्रांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याचे अश्रु थांबतच नव्हते.कातरत्या आवाजात त्याने फक्त एकच शब्द उच्चारला,
" आई ..!"
अर्जुनचे डि.एड.होऊन पाच वर्षे झाली होती. त्याचे मार्क्स कमी आले होते. शिक्षक भरतीत अर्जुनचा नंबर लागत नव्हता. सततच्या अपयशामुळे हळूहळू त्याच्या मनात निराशा घर करू लागली होती.घरची परिस्थिती बेताचीच होती.त्यामुळे तो नैराश्याच्या विळख्यात पुरता अडकला होता. भविष्यात दिसणाऱ्या काळोखात तो स्वतः चे अस्तित्व गमावू लागला होता.एका दिवशी नैराश्येच्या भरात,कोणालाही काहीच न बोलता तो घरातून निघून गेला होता.
आज एका वर्षानंतर अर्जुनने आपल्या आईचा आवाज ऐकला होता.त्यामुळे त्याच्या भावनांचा उद्रेक झाला होता.अर्जुनचा शोध घेत त्याच्या आईवडिलांनी अहमदपूर गाठले होते. बसस्टॅन्डवर उतरून कॉइन बॉक्सवरून त्यांनी कॉल केला होता.
अर्जुनच्या सहकारी शिक्षक मित्रांनी त्याच्या आई वडिलांना बसस्टॅन्डवरून हॉस्टेलवर आणले.
"कसा हाईस बाळा?",आईने विचारले.
"ठीक आहे",अर्जुन ने घोगऱ्या आवाजात उत्तर दिले.
"तू काहीच न बोलता घरून निघून गेला तवापासून आमच्या जीवाला घोर लागला व्हता.आपल्या सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली ,तुझ्या जवळच्या मित्रांकडे पण चौकशी केली परंतु तुझा काही ठावठिकाणा लागत नव्हता. मनामध्ये अनेक वाईट विचार चमकून जात होते." अर्जुनचे वडिल एकाच दमात सर्व काही बोलू इच्छित होते.
"काल तुझा मामेभाऊ,प्रतिक घरी येऊन गेला. त्यानं तुझ्या हॉस्टेलच्या पांफ्लेट वर तुझं नाव वाचलं व्हतं. त्यानंच तुझ्या हॉस्टेलचा नंबर दिला.",वडिलांनी आपले बोलणे चालूच ठेवले.
"एवढा निराश का झालाईस बाळा तू?",आईने अर्जुनच्या केसांवरून मायेने हात फिरवत विचारले.
"काय करू मी आई?," अर्जुनने डोळ्यांचा कडा पुसत म्हटले.
"मला कळून चुकले आहे कि मला आता कधीच नोकरी लागणार नाही.सरकारी नोकरीसाठी माझे मार्क्स पुरेसे नाहीत आणि खाजगी संस्थेमध्ये डोनेशन देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. एखादा व्यवसाय करायचा म्हटले तरी भांडवल कुठे आहे? माझ्या भविष्यात भयाण अंधकार दिसतो मला.आशेचा एक किरणही मला सापडत नाही." अर्जुनच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरंगू लागले.
अर्जुनच्या आईने त्याला जवळ घेत विचारले,
"तुला आठीवतंय,मी तुला पवायला शिकविण्यासाठी तानाजी मामाच्या हीरीवर घेऊन गेले व्हते ? तू काय म्हणाला व्हतास ? मला तर चांगलंच आठीवतंय, तू म्हणाला व्हतास तुला पाण्याची लई भीती वाटते,तू कधीच पवायला शिकू शकणार न्हाईस.पाठीवर दुधगं बांधूनही पाण्यात उतरायची तुझी काई हिम्मत व्हत नव्हती.पण दुसऱ्या वर्षी झालेल्या पवायच्या स्पर्धेत तूच जिल्ल्यात पईला आला व्हतास .जगात अशक्य असं काहीच नसतंय हे तूच तर म्हणाला व्हतास बक्षीस वितरण कार्यक्रमात.."
"पोहायला शिकणे आणि नोकरीला लागणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आई ! नोकरीच्या जागा भरण्याचे काही नियम असतात आणि त्या नियमांत मी बसत नाही," अर्जुन उद्विग्न होऊन म्हणाला.
" बाळा,हे नैराश्य तुला जीवनाच्या लई भयाण अंधारात लोटून देईल.निंबाळकर महाराज सत्संगात म्हणाले व्हते, "काळ्याभोर रातीनंतर नेहमीच सोनेरी पहाट उगवत असतिया. संकटं जेंव्हा येतात तेंव्हा त्यांची एक मालिकाच सुरु होते.परंतु संकटांना धीरानं तोंड दिल्यावर सुखांची सुद्धा मालिकाच सुरु व्हते."
अर्जुन विचारी मुद्रा करून ऐकत होता.
"सरकारचे नियम परिस्थिती बघुन वेळोवेळी बदलत ऱ्हातात पोरा, काय माहिती एखाद्या नवीन नियमामुळे चमत्कार घडील अन तुला नौकरी लागंल.अन समज नाहीच लागली नोकरी तर काय आभाळ कोसळणार हाय व्हय तुझ्यावर ? मला तर कुटं हाय नौकरी? पण आपण जगतोयच कि न्हाई ?" वडिलांनी अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न केला.
"कसलं डोमल्याचं जगतोय बाबा आपण ? माझ्या शिक्षणासाठी पैसे जुळवताना दहा नातेवाईकांपुढे तुम्हाला हात पसरावे लागले होते.तर विचार करा शालीनी आणि भावीनीच्या लग्नासाठी पैसे जुळवताना काय अवस्था होईल आपली ? "
"आरं देवानं दिल्यात पोरी तर देवच सारल बी त्याईचं अन कसं का होईना शिक्षण झालयच की तुझं " वडील निष्काळजीपणाने बोलले.
"बाबा ह्या अशा दैववादी विचारांमुळेच आम्ही दरिद्री राहिलेलो आहोत.तुम्ही जीवनाविषयी इतके निश्चिण्त कसे काय राहता याचीच मला कमाल वाटते " अर्जुन चिडल्या स्वरात बोलत होता.
" मग माणसाकडे पर्यायच काय उरतो बाळा,जे आयुष्य वाट्याला आलंय त्याच्या बाबतीत सकारात्मक विचार करत पुढं चालण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग असतो का ? सांग मला " अर्जुनच्या आईने प्रश्न केला.
अर्जुन काहीच बोलू शकला नाही.तो शांतच राहिला.
"हे बघ बाळा,कोणत्याही व्यक्तीकडे नेहमी दोनच पर्याय असतात.एक तर संकटांना घाबरून पळ काढणे आणि दुसरा संकटाच्या तुफानात बी मजबूत पाय रोवून उभा राहणे.तुझ्याकड बी दोनच पर्याय हाईत एक निराशेच्या गर्तेत सापडून आयुष्य उध्वस्त करून घेणे अन दुसरा आशावादी राहत संकटांचा सामना करून जीवन समृद्ध करणे,"आईचा आवाज अधिकच गंभीर जाणवत होता.
अर्जुनला आईचे बोलणे पटत होते.तो शांतपणे आईच्या चेहऱ्याकडे पाहत सर्वकाही ऐकत होता.
" नौकरी लागलंच असा इस्वास मनात ठेव अन आपले प्रयत्न चालू ठेव बाळा.निराश होऊन खचून जाऊ नको.आमचे आशीर्वाद हाईत तुज्या पाठीशी.तुला इथंच राहून काम करायचं असंल तर कर पण आमच्या पासून संपर्क तोडू नको बाळा ! आरं हामी कोणाच्या तोंडाकडं बघून जगायचं तूच सांग..!"आईने आपल्या आतापर्यंत दाबून ठेवलेल्या अश्रूंना अखेर मोकळी वाट करून दिली.
अर्जुनच्याही अश्रूंचा बांध फुटला.तो आईच्या आणि वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागला.
खूपवेळ तिघेही रडतच होते.हॉस्टेलवरील शिक्षकांनाही गहिवरून आले.
आईने आपल्या पदराने अर्जुनचे अश्रू पुसले.
अर्जुनचा चेहरा गंभीर झाला.त्याच्या मनातील विचारांचा कल्लोळ थांबला होता. एका विलक्षण मन:शांतीचा अनुभव त्याला येत होता.अर्जुनची नजर भिंतीवर लावलेल्या पोस्टरवर पडली. त्यामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश करत होते.हळू हळू त्याची नजर धूसर होऊ लागली त्या पोस्टरवर भगवान श्री कृष्णच्या ठिकाणी त्याला आईचा चेहरा दिसू लागला. त्याच्या आईचे ते शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घोळू लागले,
"तू लढ अर्जुना...तुला लढावंच लागेल....
सकाळी नऊ साडे नऊ ची वेळ असेल बहुदा.अर्जुन फराळ करून एक डुलकी घेत होता.
"अर्जुन...अरे ऊठ ना...शाळेला जायची वेळ झाली...ऊठ लवकर.." बायकोच्या आवाजाने अर्जुनची तंद्री मोडली.
" ही कसली अजब सवय आहे रे तुझी..फराळ करून डुलकी घ्यायची " बायकोने जरा त्रासूनच विचारले.
" काही सवयी जपतो मी उगीच " अर्जुन ने बायकोला शून्यात पाहत म्हटले आणि बॅग घेऊन शाळेला निघाला.
" अरे तुझे ते चांद्रयान प्रोजेक्टची माहिती देणारे शैक्षणिक मॉडेल तरी घेऊन जा " बायकोने आठवण करून देत म्हटले.
"अरे हो, विसरलोच होतो मी " अर्जुनने टेबलावरील मॉडेल उचलत म्हटले आणि तो घाईघाईने शाळेत जायला निघाला तेंव्हा त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, शासनाने शिक्षक भरतीचे जुने नियम बदलून सीईटी अनिवार्य केली नसती तर....?
