shubham gawade Jadhav

Romance

3.1  

shubham gawade Jadhav

Romance

लायब्ररी आणि ती

लायब्ररी आणि ती

6 mins
268


            प्रेम हा शब्द जरी छोटा असला ना त्यापाठीमाघे खूप मोठी भावना असतें .प्रेम हे कधीच शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही किंवा कधीच मोजून दाखवता येत नाही .व्यक्त करायला आणि मोजायला एकक ही अपुरे पडेल असतें ते निरागस ,निर्मळ ,निखळ प्रेम .त्याची ठराविक अशी परिभाषा नाही .जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आणि सोयीने त्याची परिभाषा बनवतो .प्रत्येकाच्या दृष्टीने त्याच प्रेम हे अगदी बरोबर आणि मनापासून असत .ती भावना अलगद मनात जागते आणि मग तिथून पुढे सुरु होतो एका नव्या जगण्याचा प्रवास मग त्यात त्या प्रेमातले गोड क्षण असतील ,काही न विसरता येणारे प्रसंग असतील किंवा धोका,भांडण असतील आणि नको असणारा शेवट किंवा गोड शेवट .


           पण हे प्रेम कधी ? कोणाला ? केव्हा ? आणि कुठे होईल सांगता येणार नाही .अगदी काही क्षणातही एका ओझरत्या अदेवरती एखाद्याला प्रेम होऊ शकत .अगदी काही क्षणापुरतं किंवा आयुष्यभरासाठी सुद्धा .


           मला सुद्धा प्रेम झालं एका लायब्ररीतल्या मुलीशी पण मला कधी ते प्रेम व्यक्त करता आलच नाही आणि माझं प्रेम हे त्या लायब्ररी पुरतच मर्यादित राहील .आणि आज ते प्रेम या कथेतून मी मांडत आहे .


           आयुष्यात माणसाला काही ना काही छंद असतात तसेच छंद मलाही होते .म्हणजे वाईट नव्हे बर का ? चांगले जसं की पुस्तके वाचणे ,कविता करणे ,कथा लिहिणे .त्यापैकी पुस्तके वाचणे हा माझा सगळ्यात आवडीचा छंद .आणि ज्याला छंद नाही तो माणूसच कसला ओ ? नवनवीन पुस्तके आणून वाचणे मला खुप आवडायचे .तशी जवळच एक लायब्ररी होती तिथेही पुस्तके वाचायला जायचो पण ते कधीकधीच .ती लायब्ररी खूप छान होती .जुन्या दगडी बांधकामातली. मोठ्ठा दरवाजा,प्रशस्त मोकळी जागा ,खुळ्या मोठ्या खिडक्या ,मोठमोठ्या लाकडी जुन्या मांडण्या आणि त्यातली पुस्तके,लाकडी माळवदाचं छत,आसपास भव्य अशी गार डेरेदार सावलीची वृक्ष .खरंच अगदी चित्ताची शांतता म्हणतात ना ती नक्कीच तिथे भेटली असती किंवा एखादे साधू बाबा जर समाधीला आले ना ते सहज समाधी लागावं अशी ती लायब्ररी होती .एखाद्या लेखकाला पूरक अस लिखाणास वातावरण म्हणजे ..नीलकंठ लायब्ररी .


त्या दगडी बांधकामाचा गारवा अंगाला आणि मनाला झोंबून जायचा .त्यात बसण्याची सुसज्ज आणि प्रत्येकाला वेगवेगळी व्यवस्था एवढं होत पण आम्ही आळशी कधीकधीच जाणारे .पण हा कधीकधी जाणारा अचानक रोज जाऊ लागला ...का ? ते वाचत राहाल तर समजेल .

            

  पावसाळ्याचे दिवस होते .मेघराज मन लावून बरसत होते .मला घरीही करमत नव्हतं मग अचानक विचार आला की चला आज नीलकंठ लायब्ररीत जाऊ आणि एखाद पुस्तक घेऊन येऊ कारण अशा वातावरणात कॉफी चा भरलेला मग आणि पुस्तक म्हणजे पावसाळ्यातला स्वर्ग च की .छत्री घेतली आणि निघालो. रस्त्यारस्त्याने पानी मार्ग शोधात आणि लाल रंग घेऊन धावत होतं .आजूबाजूला गढूळ पाण्याची छोटी मोठी डबकी साचली होती .मेघराज अचानक मोठ्ठी गर्जना करत होते .लायब्ररी जवळ आली.छत्री बाजूला करत नाव नोंदणी केल आणि पुस्तक शोधण्यासाठी निघालो .भव्य दिव्य अश्या नाजूक नक्षीकामाच्या जुन्या लाकडी मांडण्या चाळायला सुरुवात केली .पावसामुळे जो अत्तराचा एक अतिशय मंत्रमुग्ध वास दरवळत होता तो पुस्तकं वाचण्याची भूक वाढवत होता .लायब्ररीत गर्दी मोजकीच होती बहुतेक ती पावसामुळेच असावी .मांडण्या चाळत होतो कारण आवडणार पुस्तक सापडत नव्हतं .अचानक आवडणार भयानक कथांचं भलंमोठं पुस्तक दिसलं मी ते घेतलं तर तिथं एक रिकामी जागा झाली आणि पलीकडे एक सुंदर मुलगी त्यातुन दिसली .डोळ्यावर येणारी सोनेरी केसांची बट ती तिझ्या नाजूक मेहंदी लावून लाल झालेल्या बोटानी कानामाघे सारीत होती. आयुष्याला कलाटणी देणारा पॉइंटच समजायचा तो .मी तसाच तिझ्याकडे बघत होतो तिला त्याची जाणीवच नव्हती कारण ती पुस्तक वाचण्यात दंग होती .तिझ्याकडे कोणीतरी पाहत आहे तिला समजलंच नाही .मी अगदी मोहूनच गेलो .मनोमन तिझा होऊन गेलो .आम्हा दोघात मांडणी जणू आंतरपाटच वाटत होती .


            अचानक मेघराज जीव लावून गरजले आणि ती आणि मी दोघेही भानावर आलो .मी तिला न्याहाळत आहे हे तिझ्या लक्ष्यात येताच तिने पुन्हा केसांच्या बटा सावरल्या स्वतःलाही सावरून समोर बसण्यासाठी व्यवस्था केलेल्या टेबल खुर्ची वर ती जाऊन बसली .तिन स्वतःला सावरलं तसा चमकून मीही सावध झालो आणि का कोणास ठाऊक अपराध्यासारखी मान खाली घालून उभा राहिलो ती निघून जाईपर्यंत .तिने मला पाहिलं आणि मी तिझ्या डोळ्यात तर मला तिझ्या डोळ्यात प्रेमाचा अथांग सागर दिसत होता.


आता मी घरी जायलाच विसरलो . ती बसली त्या जागेपासून थोड्या अंतरावर मी टेबल खुर्ची वर बसलो .ती अगदी स्पष्ट दिसत होती मी मात्र तिला अगदी थोडासा.मी पुस्तक वाचायला घेतलं पण माझं मन काहीकेल्या वाचण्यात लागेनाच.मी न राहून पुन्हा पुन्हा तिझ ते तेजस्वी रूप न्याहाळत होतो .डोळ्यात तिला साठवण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो .तिला ही गोष्ट बहुतेक जाणवली असावी तिन माझ्याकडे बघितलं तसा मी चाचपडलो आणि लगबगीने पुस्तकाची पान चाळू लागलो. मला भांबावलेला पाहून ती गोड हसली. मी भांबवलेला आहे हे न दाखवता मीही बळच हसलो आणि मान खाली घालून वाचण्याचा खोटा खोटा प्रयत्न करू लागलो .या माझ्या हरकतीने ती जास्तच हसली .मग मात्र मी शरमेने लालेलाल झालो कानाच्या पाळ्या आपोआप गरम झाल्या पुन्हा मी वर पाहिलच नाही .मी वाचण्यात दंग झालो .बराच वेळानंतर वर मान केली आणि ती जिकडे बसली होती तिकडे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं जागा रिकामीच होती .माझ्या पोटातच गोळा आला कारण मला तीचं नावदेखील माहित नव्हतं .मी गरबडीत उठलो नाव नोंदणी करतात तिथं गेलो आणि रजिस्टर तपासू लागलो .माझी ही गडबड तिथे बसलेल्या लायब्ररीच्या आजोबांनी पाहिली आणि जवळ येऊन हाताने नावाजवळ बोट ठेवलं .बहुतेक आमच्या एकमेकांना पाहण्यापासून ते ती निघून जाईपर्यंतची चुळबुळ आजोबांनी पहिली असावी .कोमल हे तीचं नाव. खरंच नावाप्रमाणे होती ती कोमल .


                 मी लगबगीने बाहेर पडलो आणि माझे निरागस डोळे तिला शोधत होते .पण ती कुठेच दिसत नव्हती .क्षणात होत्याच नव्हतं झालं अस वाटत होतं .हताश मनानं मी घराकडे निघालो .जाऊन न जेवताच शांत अंथरुणात पडून होतो .सारखा सारखा लायब्ररीतला प्रसंग आठवत होता .त्या गोड आठवणीत असताना कधी झोप लागली ते समजलंच नाही .सकाळची उन्हातली तिरीप माझ्या चेहऱ्यावरती आली तेव्हा मला जाग आली .बळजबरी उठलो आवरलं आणि निवांत बसलो पण कालचा प्रसंग माझी पाठ सोडतच नव्हता .पुन्हा मी अस्वस्थ झालो .नाश्ता केला आणि तिला पाहण्यासाठी कधीकधी लायब्ररीत जाणार आज पहिल्यांदा सलग दुसऱ्या दिवशी लायब्ररीत गेलो . काल नाव शोधताना मदत करणारे आजोबा मला पाहुन गालातली गालात गोड हसले आणि नजरेने मला कालच्या मांडणीकडे इशारा केला .माझा तंबुऱ्यासारखा फुगलेला चेहरा क्षणात आनंदाने बहरून आला .माझा आनंद गगनात मावेना .मी लगबगीने ती उभा आहे त्या मांडणीजवळ गेलो आणि बरोबर तिझा चेहरा दिसेल त्याजागच पुस्तक काढून जागा रिकामी केली .पुन्हा काल घडलं तस तिच्या सौंदर्याच दर्शन घडलं .तिझ ते रूप पाहुन मन आनंदून गेलं .ती टेबलाजवळ गेली आणि वाचण्यात गुंग झाली मग पाठोपाठ मीही गेलो यावेळी अगदी तिझ्या समोरच्याच टेबलावरती बसलो .दोघांचीही नजरानजर झाली गालातल्या गालात हसणं देखील झालं .आता रोज लायब्ररीत जाण हा जगण्याचा अविभाज्य घटकच बनला होता .तिझ ते माझ्याकडे लाजून पाहणं आणि हसणं मला खूप छान वाटत होतं .रोज त्या गोड हास्यासाठी मी जाऊ लागलो.


                    रोज तिला आवडणाऱ्या पुस्तकात मोरपंख ठेवणे ,गुलाबाच्या पाकळ्या ठेवणे अस चाळू होतं .कदाचित तिलाही ते आवडत असावं .कारण ती मोरपिसे घरी घेऊन जायची तिझ्या बॅग मध्ये घालून .रोजची नजारा नजर न चुकता घडायची .कदाचित माझ्या प्रेम नावाच्या आयुष्यातल्या धड्याला सुरुवात झाली असावी .तिझ ते हसणं हवंहवंसं वाटू लागलं .प्रत्येक वेळी तिला सोबती जाणवू लागलो .मी खरंच त्या परीसारख्या दिसणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो .आमच्या प्रेमात संवाद नव्हते की शब्द नव्हते .आमच्यात फक्त डोळ्यातल्या वाहणाऱ्या भावना होत्या .एकमेकांच्या नजरेत पाहून रोजचा संवाद होयचा .तीही फक्त त्याच कारणाने येत असावी तिलाही प्रेमाची गोडी लागली असावी .


                     एक दिवस मनाशी पक्का निर्णय घेतला की आज तिला माझ्या मनातलं सांगणार. आवरून लायब्ररीत गेलो पण आजोबांनी ती न आल्याचा इशारा केला. मला वाटल कदाचित आज तिला उशीर झाला असेल पण उशीर तर मला झाला होता .मी वाट पाहत बसलो आज, उद्या, परवा पण काही उपयोग झाला नाही .दिवसांमागुन दिवस गेले पण ती पुन्हा मला कधी दिसलीच नाही. माझी ती फक्त लायब्ररीपुरतीच मर्यादित राहिली .पुस्तकात बंद पडून रहावी तशी ती एक अपूर्ण प्रेमकहाणी बनून राहिली . पण तिचा ठसा ती माझ्या मनावर खोल उठवून गेली होती .तिला विसरणं आता माझ्यासाठी अशक्य बनून गेलं होतं .रोज लायब्ररीत जाणं आणि वाट पाहणं हे जणू अंगवळणी पडलं होतं .लायब्ररी तर जाग्यावरतीच होती पण मी हरवून बसलो होतो.

ती.....

माझ्या आयुष्यातला संपला होता तो भाग लायब्ररी आणि ती चा ....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance