लाख मोलाची पणती
लाख मोलाची पणती
"आई तुम्ही येताय ना मॉलमध्ये पणत्या घ्यायला" ""नाही ग, तू जा ,मी थांबते इथे .आत खूप गर्दी आहे." "ठीक आहे ,तुम्ही बसा कार मध्ये." रमाताई कारमधून पाहत होत्या. मॉल कचाकच भरला होता .त्यांनी हुश केले .त्यांची नजर समोरच्या फुटपाथवर बसलेल्या एका छोट्या मुलीवर पडली. तीही पणत्या विकत होती. केविलवाण्या नजरेने सगळ्यांकडे पाहत होती पण कोणीच तिच्याकडून पणत्या घेत नव्हते. रमाताईंना वाईट वाटले.
इतक्यात हाय हुश करत त्यांची सून मृदुला आली. "आई बरं झालं तुम्ही आला नाहीत ते .खूपच गर्दी आहे आणि पणत्यांचा स्टॉकही संपलाय." "मृदुला, मी काय म्हणते आपण त्या समोरच्या मुलीकडून पणत्या घेऊयात का. मृदुलाने त्या मुलीकडे पाहिले. "हो चालेल ना, " मी पण येते ""चला,". दोघी त्या मुली जवळ गेल्या "किती छान पणत्याआहेत ,खूपच सुंदर. ""हो गं" तिने पटापट पणत्या घेतल्या आणि घासाघीस न करता पैसे दिले .त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तिने तीनदा ती नोट कपाळाला लावली आणि दोघींकडे पाहून गोड हसली. ते हास्य पाहून त्या दोघींना समाधान वाटले .मृदुलाने एक मिठाईचा बॉक्स काढून तिच्या हातात दिला तिचा आनंद दुपटीने वाढला.
त्यांच्यासाठी त्या आता साध्या पणत्या नव्हत्या लाख मोलाच्या होत्या कारण त्यात कुणालातरी आनंद दिल्याचे समाधान होते.
सौ रेवती प्रशांत शिंदे.
