Revati Shinde

Others

3  

Revati Shinde

Others

स्वेटर

स्वेटर

2 mins
13


"साठे, आज थंडी पडेल असे वाटतेय." "अहो थंडीचे दिवस आलेत मग थंडी पडणारच" "साठे,तसं नाही हो म्हणजे आता स्वेटर बाहेर काढावी लागतील " "काढावी लागतील, अहो आमची कपाटातून बाहेर आली पण. कालच आमच्या हिने मोलकरणी कडून धुवून घेतली." "हो, आमच्या सुनबाईंनी पण मशीन मधून काढलीत. "गोविंद काय रे तू गप्प का" "काही नाही. मी निघतो आता" गोविंदराव उठत म्हणाले. "तब्येत बरी नाही, आराम करतो."" बरं पण काही वाटलं तर फोन कर, थंडीचे दिवस आहेत काळजी घे तब्येतीची" "हो."

गोविंदराव घरी आले. रकमाने सकाळी खिचडी करून ठेवली होती तिच त्यांनी गरम करून घेतली.त्यांना आठवले, वासंती ताई म्हणजे त्यांच्या पत्नी थंडीत त्यांच्यासाठी गरम गरम सूप करायच्या. त्यांना त्यांच्या हातचे सूप खूप आवडायचे. गोविंदरावांनी एक निश्वास सोडला.

ते बेडरूम मध्ये आले .त्यांनी कपाट उघडले आणि ते स्वेटर बाहेर काढले. काळानुसार थोडे जुने झाले होते थोडी विणही सैल झाली होती. गोविंद रावांनी ते हृदयाशी धरले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. त्यांना वासंती ताईंची परत एकदा आठवण झाली. लग्न झाल्या झाल्या मोठ्या प्रेमाने ,हौसेने त्यांनी गोविंदरावांसाठी ते स्वेटर विणले होते. आतापर्यंत कितीतरी हिवाळे त्या स्वेटरने पाहिले होते. इतकच नाही तर गोविंद रावांच्या आयुष्याच्या चढउताराचे ते साक्षीदार होते

मुले परदेशात गेली. वासंतीताई त्यांना सोडून गेल्या. मुलांनी कितीतरी स्वेटर त्यांना पाठवली पण गोविंद रावांनी ते स्वेटर कधीच आपल्यापासून वेगळे केले नाही.

त्यांनी ते स्वेटर अंगात घातले. मायेची, प्रेमाची उब मिळाल्याचा त्यांना भास झाला. आता कडाक्याच्या थंडीची त्यांना मुळीच चिंता नव्हती कारण त्यांची वासंती आता थंडी संपेपर्यंत त्यांच्यासोबतच असणार होती.


प्रत्येक ऋतुच्या गतकाळातील आठवणी माणसाच्या सोबत असतात आणि त्याच ऋतुतील बदलाशी जुळून घेण्याची ताकद त्यांला देत असतात.


Rate this content
Log in