खिडकितले झाड
खिडकितले झाड
आज मन खूप बैचेन होतं. काय करत होते काही कळत नव्हतं. पटकन झोपू म्हटले, गादीवर शरीराला फेकले म्हटले तरी चालेल... झोप काही येत नव्हती... नुसतीच चुळबुळ चालू होती...
बरेच चित्रविचित्र आवाज, भास होत होते... मी धापा लागत जोरात पळत होते... मध्येच थांबून आपण नक्की कुठे आहोत याचा कानोसा घेत होते... मनात नाना विचार वाऱ्याच्या वेगाने ये-जा करत होते. घरासमोरची ब्रिटिशकालीन कौलारू शाळा, नुकताच नवीन बांधलेला डांबरी काळ्या कुळकुळीत रस्त्यावरुन मी धावत नवीनच बांधलेल्या इमारतीकडे चालले होते. एकटीने अंधार पडल्यावर घराबाहेर पडायचे नाही म्हणून सक्त ताकीद आईने दिली होती. तरी पण...
नवीन बांधलेल्या त्या दोन मजली इमारती चांगल्या नाही. तिथे एका बाईचे भूत वावरते हे ऐकले होते. पण भूत म्हणजे काय हे समजण्याचे ते वय नव्हते. उलट कुतूहल ते काय असते हे जाणून घ्यायचे होते!
त्या इमारतीत लोक राहत होते ४ कुटूंब होते. नवीनच ओळख त्यांच्याशी झाली होती. खेळायला तिथली मुल-मुली येत असत... नवीन बांधलेला रस्ता आम्हाला खेळायला छान झाला होता... रहदारी नसल्यामुळे तासनतास आम्ही मुलं तेथेच खेळत असू...
नकळत मी आज त्या इमारतीकडे अंधार पडल्यावर चालली होती. काही पावले चालल्यावर खांद्यावर कोणाचा तरी हात आहे असे वाटले म्हणून मी इकडेतिकडे पाहात हात बाजूला केला. आजूबाजूला कोणीच दिसले नाही, पण हात बाजूला केला गेला. थोडी पावले पुढे गेल्यावर कोणीतरी मोठमोठ्याने हसत होते. हसण्याच्या आवाजाच्या दिशेने मी पाहिले तर माझी बोबडीच वळाली...
तिथे पांढरी साडी नेसलेली खूप उंच ८-१० फूट उंचीची, माझ्या उंचीपेक्षा डबल.. तेवढी उंच बाई मी कधी पाहिली नव्हती. लांब मोकळे सोडलेले केस... ते पण पांढरे... हसताना तिचे लालसर काळे लांबलांब दात... डोळे लालसर मोठेमोठे... तिने परत तिचा हात माझ्या मानेभोवती टाकला... मी मोठमोठ्याने ओरडत होते पण आवाजाला काय झाले होते तो बाहेरच पडत नव्हता... ती बाई मोठमोठ्याने हसत माझ्या मानेभोवतीचा हात घट्ट आवळत होती.
शाळा, तो रस्ता तर नेहमीचा होता... ही नवीन बाई कोणाकडे आली असा माझा बाळबो
ध प्रश्न मीच मला विचारला. पण उत्तर कोण देणार...
थोड्या वेळाने तो माझ्या मानेभोवतीचा हात बाजूला झाला... हसणेपण गायब... ती बाईपण नाही दिसली आजूबाजूला... माझीपण पावले परत घराकडे वळली...
धावतच मी घरी आले तर आईने माझ्या अवताराकडे बघत काय झाले म्हणून विचारले... मला काहीच सांगता आले नाही... माझे सगळे अंगावरचे कपडे दरदरून आलेल्या घामामुळे ओले झाले होते. अंगात तापपण भरला होता. आईपण घाबरली काय झाले म्हणून... डॉक्टरांना बोलवले, त्यांनी तपासले... काही निदान झाले नाही... शांत झोप लागण्यासाठी गोळ्या दिल्या...२-३ दिवसांनी ताप उतरला... तेव्हापण मला नक्की काय झाले होते २-३ दिवसांपूर्वी हे आठवत नव्हते.
पण शेजारच्या २-३ मुलींना पण माझ्यासारखाच ताप आला होता. माहिती नाही त्यांनापण ती बाई भेटली होती की नाही...
मला मी एकटी असताना रात्री दिसली होती व तेच आजारपण चालू होते काही महिने... कळतच नव्हते काय चालू आहे ते.. मला काही सांगतापण येत नव्हते, कोणाला विचारतापण येत नव्हते... तसा मी २-३ वेळा मैत्रिणींना विचारण्याचा प्रयत्न केला पण कोणीच काही बोलत नव्हतं. भितीने बहुतेक कोणी काही बोलत नसेल...
आज बरेच वर्षांनी, खिडकीतली झाडे हवेमुळे असेल कदाचित हालत होती... व त्यातून एक हसण्याचा आवाज येत होता.
जवळच्या तारेवर शेजारच्या काकुंची पांढरी साडी वाळत घातली होती, वाळली तरी ती काढायची त्यांना आठवण राहिली नसेल. ती साडी वाऱ्यावर हालत होती. झाडांची पानं वाऱ्यावर हलताना आवाज होत होता. खरंच कोणी हसतंय का? ती बाईतर परत आली नसेल नं... काही कारण नसताना तिची आठवण झाली... ही सगळी झाडे उद्या कापून काढून टाकू पहिले...
लहानपणीच्या अनुभवावरून आता ताप येणार आपल्याला असे वाटले...भास सगळा...
मग लक्षात आले... हा सगळा आपल्या मनाचा खेळ आहे... आपण घरातच आहोत....खिडकीतली झाडे आहे तिथेच आहेत... हसण्याचा आवाजपण येत नाही. काही वाचन, कोणाशी असं काही विचित्र बोलणंपण झाले नव्हते.
का कोणास ठाऊक मनाची चांगली समजुत घातल्या गेली व शांत झोपपण लागली.