Pratibha Tarabadkar

Inspirational Others

3  

Pratibha Tarabadkar

Inspirational Others

जो करी स्तुती दुसऱ्यांची

जो करी स्तुती दुसऱ्यांची

3 mins
195


 सुमारे ३५/४० वर्षांपूर्वीचा प्रसंग!

शाळा सुटल्याची घंटा झाली होती, ज्योती दप्तर घेऊन घराकडे पळत सुटली.आज तिला मैत्रिणी,शाळेतील शिक्षकांच्या गमतीजमती या कशा कशात रस वाटत नव्हता.कधी एकदा घर गाठते असं तिला झालं होतं.घरी पोहोचताच तिने दप्तर,चपला दारातच भिरकावल्या आणि ओट्यापाशी काम करीत असलेल्या आईच्या कमरेला लोंबकळत ज्योती ओरडली,

'आई गं, माझं प्रगती पुस्तक आज मिळालं,माझा वर्गात ६वा नंबर आलाय.'

ओट्यापाशी काम करत असलेली आई ज्योतीकडे वळून खेकसली,'काय हे ज्योती, दप्तर,चपला जागेवर ठेवायला काय होतं?'

ज्योती हिरमुसली.निदान आजतरी आईने शिस्त बाजूला ठेवून तिच्या यशाचे कौतुक करायला हवे होते.

रात्री बाबांनीही प्रगतीपुस्तकावर सही करताना 'हे मार्क वार्षिक परीक्षेत टिकवा म्हणजे झालं 'असं म्हणत विषय तिथेच संपविला.

 ज्योतीची अपेक्षा फार जगावेगळी होती का? फक्त पाठीवर शाबासकीची थाप आणि कौतुकाचे दोन शब्द!पण थोडं जरी कौतुक केलं तर मुलं बिघडतात असा गैरसमज तर ज्योतीच्या आई वडिलांचा झाला नसेल?

आजच्या काळातही किती मार्क मिळाले यापेक्षा 'सिली मिस्टेक'मुळे अर्धा मार्क का गेला याबद्दल रागे भरणारे पालकही आहेतच की!

पण यामुळे मुलांचा हुरूप वाढण्याऐवजी त्यांचा हिरमोड होतो हे पालकांच्या लक्षात येत नाही का?

कौतुक,प्रशंसा कोणाला नको असते?अहो दोन वर्षाचे मुल सुद्धा आपले कौतुक होण्यासाठी नाना खटपटी लटपटी करून आपल्याकडे लक्ष वेधवून घेते.मात्र त्याच्या बोबड्या बोलांचे कौतुक करणाऱ्यांची वाक् गंगा इतरांच्या बाबतीत कोरडी का पडते?

विशेषतः मराठी माणूस कोणाचीही प्रशंसा करताना शब्दांची काटकसर करतो.का ?

   एखाद्या गृहिणीने तासभर खपून पदार्थ केला तर कोणी आपणहून अभिप्राय तर देतच नाही पण कसा झाला आहे या प्रश्नावर 'बरा झाला आहे 'इतपतच उत्तर येते.पण या थंड प्रतिक्रियेमुळे त्या बिचारीचा किती हिरमोड होतो हे कुणाच्या लक्षातच येत नाही.

प्रशंसा कोणाला आवडत नाही? अहो प्रत्यक्ष देवालाही आपली स्तुती प्रिय आहे.देवांची स्तोत्रे आरत्या , श्लोक म्हणजे दुसरे काय?

माणसांच्या सत्कार समारंभांचे उद्दिष्ट तेच असते.त्यांनी केलेल्या कामाचे ते प्रशस्तीपत्रकच ना! त्यामुळे त्यांचा हुरूप वाढून कार्य अधिक जोमाने करू लागतात.

एक रुपक कथा आहे.एक अतिशय श्रीमंत माणूस शहरातील दगदगीला कंटाळून चक्क निर्जन बेट विकत घेतो आणि त्या बेटावर आलिशान महाल बांधतो व त्यात रहायला जातो.पण थोड्याच दिवसात कंटाळतो. का?तर एव्हढा भव्य, सुंदर महाल बांधला पण त्याची भव्यता,सुंदरता पहावयास कोणीच नाही! त्या श्रीमंत माणसाला आपण महाल बांधण्यासाठी घेतलेली मेहनत व्यर्थ गेली असे त्याला वाटू लागते.

माझ्या मैत्रिणीची मुलगी नेहा घरीदारी, ऑफिसमध्ये सगळीकडे लोकप्रिय! तिला त्याचे रहस्य विचारले असता ती हसून म्हणाली 'अगं मावशी,त्यात रहस्य वगैरे काही नाही.माणसाने जर चार शब्द कौतुकाचे ऐकले तर त्याच्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं वाटतं,त्यांचा आत्मविश्वास वाढतो.मग आपण या गोष्टीचा फायदा घेऊन त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली तर?असा विचार करून मी एखाद्या व्यक्तीच्या नवीन पोशाखाचे कौतुक करते, कधी कोणाला स्पर्धेत यश मिळाले तर आवर्जून अभिनंदनाचा फोन करते तर एखाद्या काकूंनी पाठवलेल्या पदार्थाला दाद देते.समोरचा माणूस मग का बरं खूश होणार नाही? बरं ही माझी कृती अगदी साधी सोपी आहे.केवळ कौतुकाचे चार शब्द!बिना खर्चाचे अन् बिना कष्टाचे!मग त्याचा उपयोग करायला काय हरकत आहे?

मात्र एव्हढे भान ठेवायला हवे की प्रशंसा करताना त्याला तोंडपूजेपणाचे स्वरूप येता कामा नये.'नेहाने हसत हसत समारोप केला.

मात्र कौतुक करताना समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेऊन तारतम्य वापरावे.उदा.सुलभाताई त्यांच्या एका नातेवाईकांनी बांधलेल्या घराच्या वास्तूशांतीसाठी गेल्या होत्या.त्यांनी त्या नव्या घराचे तोंडभरून कौतुक केले तर त्या नवीन घराच्या शेफारुन गेलेल्या यजमानीणबाईंनी त्यांना शेलक्या अहेर करत म्हटले,'आम्ही ठरवलंच होतं, बांधायचं तर प्रशस्त घरच बांधायचं, तुमच्या सारखं कोंबडीचं खुराडं नको!'

इकडे सुलभाताई गार!

 तात्पर्य काय,बालक असो वा वृद्ध, श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येकाला अपेक्षा असते चार शब्द कौतुकाचे!

 मग मनावर घ्याल ना ? नक्की!



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational