जिवंत विहीर
जिवंत विहीर
माफ करा खूप दिवस कामात व्यस्त होतो. जसा मोकळा झालो तस आपल्यासाठी कथा लिहली. ही पूर्ण कथा रात्री २ नंतर लिहायला सुरवात केली होती ४.३० लिहून झाली. पेंगणाऱ्या डोळ्यांकडून कुठे चुकी झाल्यास कृपया कंमेटमध्ये प्रतिक्रिया कळवावी.
जीवंत विहीर
आयुष्यात नकळत कधी कधी अशा गोष्टी घडून जातात की ज्या गोष्टींच आपण स्पष्टीकरण किंवा पुरावा देऊ शकत नाही. त्या गोष्टी आपल्या आयुष्यावर खूप मोठी छाप उठवून जातात. अशी छाप जी आयुष्याच्या शेवटपर्यत पुसू शकत नाही.ती गोष्ट, ती वेळ मी कधीच विसरु शकत नाही. मी नुकताच १० वीची परिक्षा देऊन मोकळा झालो होतो. मुंबईत असलो तरी दिवसभर उनाडक्या करण, केबल चित्रपट बघण, टीव्ही गेम खेळण आणि झोपा काढण हीच माझी काम. आई घरातली काम सांगून सांगून कंटाळायची पण मी ऐकली पाहिजे तरी ना. १० वी परिक्षेच्या मोठ्या सुट्टीनंतर माझ घरात राहण घरातल्यांना सर्वांना असहय झाल असाव म्हणून मला गावी पाठवण्याचा अवघड निर्णय घेण्यात आला. अवघडाच कारण मी घरात लहान मुलगा असल्यामुळे सर्वांचा लाडका होतो. मी घरात नसलो तरी घरात कुणाला करमायच नाही. मला गावी पाठवायच ठरलच त्याप्रमाणे बाबा मला सोडायला गावी आले. माझ गाव म्हणजे स्वर्गच जणू सातारा जिल्ह्यातल कृष्णा नदीच्या काठावरच, झाडांच्या खुशीतल, काळ्या मातीच्या वासातल सुंदर गाव. गावीपण माझे जास्त लाड व्हायचे. गावी आजी, काका, काकी आणि काकांचा मुलगा अभिदादा. आता मी आलो होतो. बाबा मला गावी सोडून निघून गेले.
गावी आल्यावर माझ वेळापत्रकच बदलल.
मुंबईत सकाळी १०ला उठायचो, तर गावी सकाळी ५.३० उठायल लागायच. मुंबईत काही काम करायची नाही पण इथ उठल्यापासून काम सुरुच.
मुंबईत रात्री १२ नंतर झोपायचो पण गावी संध्याकाळी ७ लाच झोपायच.
पाणी भरण शेतातली काम वैरण आणण, गुरांना रानात फिरवण. ही काम अभिदादासोबत चालू असायची. तसा मी खुप आळशी होतो पण काकांच्या भितीमुळे सगळी काम मी अभिदादासोबत जमेल तशी करायचो, आणि आमच्या वाड्यातल्या मुलांशी खेळायच. गावाचे दिवस लवकर संपतच नसायचा. शहरात रात्र कधी व्हायची कळायचच नाही.
आई बाबा किती चांगले आहेत हे मला आता चांगलच कळत होत. त्यांची खूप आठवण पण यायची तेव्हा अभिदादाच्या किंवा काकांच्या मोबाईलवरुन आई बाबांशी बोलताना डोळ्यातून अश्रु वाहायचे. काका पण वाईट नव्हतेच कारण त्यांच्यामुळे आता काम करायची आवड, आणि चांगल्या सवायी लागल्या होत्या.
मला येऊन महिना झाला होता आणि गावच वातावरण पण आवाडायला लागल होत. मी खूप बदललो होतो. रानात काम करुन भाकरी चटणी, दही भात खायाची मजा कळली होती. काम करुन थकल्यानंतर येणारी झोप कळली होती. दिवस अशेच चालले होते.
ऐकेदिवशी अभिदादाचे मित्र सुनिल, संजय, विवेक. आणि आम्ही दुपारच्या जेवल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो. आणि निघाला विषय भुताचाच. मी त्यांच बोलण शांतपणे ऐकत होतो. ज्या गोष्टीवर माझा तीळमात्र विश्वास नव्हता असा विषय निघाला होता. मित्रांच्या बोलण्यावरुन ती गोष्ट मला कळाली. आमच्या गावात एक विहीर आहे पाटलांची. नवऱ्यांशी भांडून एका बाईने त्या विहीरीत आपल्या दोन महिन्याच्या बाळासहत जीव दिला. तीन दिवसांनी गावकऱ्यांना उग्र वासामुळे कळल की त्या विहीरीत कोण तरी मेलय. पोलीसांना कळवण्यात आल. तीच प्रेत विहीतून क्रेनने बाहेर काढण्यात आल. तीच प्रेत पांढर शुभ्र पडल होत. अर्ध शरीर माश्यांनी खाल्ले होते, डोळे नव्हतेच. पण सर्वात भयानक गोष्ट ही होती की तीने लहान दोन महिन्याच्या बाळाला काखेत ठेऊन उडी मारली होती. ते बाळ अर्ध शरीरात तसच तिच्या काखेतच होत. तिच्या बोटांनी त्याला घट्ट पकडल होत.
तिच्यावर अंतिम संस्कार झाले, विहीर साफ करण्यात आली. पण रात्री दोन नंतर तिथे वेगवेगळे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ येतात. विहीरीच्या वाटेने जाणारी काही माणस हदयांच्या झटक्याने मरु लागली तर काही माणस वेडी झाली. विहीरीवरची वाट बंद करण्यात आली. गावात पूजा पाठ, बकरा बळी, सर्व उपाय झाले पण विहीरीच रहस्य उघडेणाच. दर अमवस्येच्या रात्री ती बाई त्या विहीरीत उडी मारते अस अभिदादांच्या मित्रांच बोलण होत. आत्ता त्या विहीरीवर कोणच फिरकत नाही, विहीरीचा मालक आणि विहीरीच्या आजूबाजूला शेती असलेला शेतकरी पण नाही.
सर्व ऐकून घेतल्यावर मी बोललो.
मीः अस काही नसत रे.
सुनिलः तुला कस ठावूक.
मीः तूम्ही स्वतः त्या बाईला पाहिलय का?
सर्वांनी माना नकारार्थी हलवल्या.
सुनिलः अरे मग ती माणस हदयाच्या झटक्याने मेली कशी, वेडी झाली कशी ?
मीः अरे माणसाला भास होतात, भासामुळे भिती वाढते. आणि त्या भितीमुळेच त्यांना हदयाचा झटका किंवा मानसिक आजार झाला असेल.
कुणाला माझ बोलण पटलच नाही. मी एका बाजूला आणि सगळे एका बाजूला झाले.
मी आव्हान दिल की तीन दिवसानंतर अमावस्या येतेय. मी तिथे जाणारच आणि तुम्हाला चुकीच ठरवणार. सर्वांनी मला सांगितल अस करु नको, पण मला चैन पडेनाच. शहरात भुतांना जन्म देणारे आम्हीच. मस्तीसाठी स्टोरी बनवून सर्वांना घाबरवायच.
आणि आता ही गावची पोर भुताच नाव घेऊन मला घाबरवतायत.
अमवस्येचा दिवस आला संध्याकाळ पर्यत घरातली काम आटपून मी घराच्या अंगणात बसलो होतो. आजीला पाहिल ती पूर्ण घराला दहीभाताच रिंगण घालत होती.
मीः आजी काय करतेस
आजीः अरे आज अमवस्या भूत बाहेर पडतात. कुठल्या भुताची वाईट नजर आपल्या घरी पडू नये म्हणून रिंगण घालतेय.
मीः आजी भूत असतात तरी का ग.
आजीः असतात बाळा. पण ह्या लाईटी आल्यापासून कमी झाली आहेत. तू आता कुठ लांब जाऊ नको घरात टीव्ही बघत बस.
मीः हो
आजी गेली आणि अभिदादा आला.
अभिदादाः आपण दोघ जाऊ.
मीः खर ना? तुला भिती वाटत असेल तर राहू दे.
अभिदादाः भिती वाटते पण चल बघू गावातली लोक खर बोलतात का खोट.
रात्री १२ नंतर आम्ही घरातल्यांच्या नजरा चुकवून मोटारसायकलवरुन त्या विहीरीजवळ गेलो.
विहीर खूपच शांत वाटत होती. पण थंड हवेमुळे हलणाऱ्या झाडांची कुझबुझ चालू होती, रातकिडे आणि विहीरीतून पाण्याबाहेर आलेल्या बेडकांच्या आवाजाने त्या शांततेत वेगळ वातावरण निर्माण केल होत. विहीर पूर्ण भरली नव्हती. विहीरीत पूर्ण शेवाळ पसरली होती. पण तरी विहीर स्वच्छ होती. चांदण्याच्या प्रकाशात विहीरीतल पाणी हिऱ्यासारख चमकत होत. विहीर वेगळीच वाटत होती. विहीरीच्याभोवती वाळूच रिंगण होत त्यानंतर आंबे, जांभूळ, नारळाच्या झाडांनी त्या वाळूच्या रिंगाला कुंपणच बनवल होत. आणि त्यांच्या बाजूला ऊस असलेली रानं होती.
खरच कुणालाही आवडेल आशा सुंदर जागेला लोकांनी भुताच नाव लावून वाळीत टाकल होत.
आम्ही दोघ तिथे शेकोटी करुन गप्पा मारत बसलो. मी खूप टिंगल करत होतो गावकऱ्यांची इतक्या सुंदर जागेला नाव ठेवत होते म्हणून.
अभिदादा भीला असला तरी चेहऱ्यावर दाखवत नव्हता. तितक्यात बाजूच्या उसाच्या रानातून आवाज आला. अभिदादा लगेच उठून उभा राहीला.
मीः अरे रानडुक्कर असेल किंवा साप, उंदीर असेल.
अभिदादाः दीड वाजला जाऊया घरी.
मीः थांब अजून अर्धा तास मग निघू.
अभिदादाची इच्छा नसताना तो बसला परत.
पावने दोन वाजले परत आवाज आला, आत्ता मी ओरडलो.
मीः कोण आहे तिथे. शूशू........ घाबरु नकोस अभिदादा ये आपण बघू तिथे काय आहे ते.
तिथे गेल्यावर अभिदादा सावरला. ते सश्याच पिल्लू होत. त्याला तसच उचलून आम्ही परत शेकोटीजवळ आलो. त्याच्यासोबत खेळायला लागलो.
अभिदादाः मी झोपतो जरा.
मीः बर झोप. मी बाई आल्यावर उठवतो तुला.
दोन वाजले
त्या विहीरीवरच्या वातावरणात जादू वाटत होती मला पण झोप यायला लागली. मी त्या सश्याच्या पिल्लाला रानात सोडत होतो तेव्हाच माझ्या खांद्यावर थंड हात पडला. मी दचकलो. आयुष्यात पहिल्यांदा भितीची जाणीव झाली. मागे फिरतोय तर कोणीच नव्हत आणि अभिदादा झोपला होता. मला भास झाला असावा. परत त्या सश्याला सोडायला खाली बसलो तोच माझ्या मागील बाजूच्या शेतातून कोण तरी पळत असल्याची चाहुल झाली. आत्ता मात्र भितीला सुरवात झाली. हातपाय थरथर कापू लागले. मी ती चाहुल बघण्याचा प्रयत्न करतोय. तोवर विहीरीत काय तरी पडल्याचा आवाज झाला. आत्ता तर माझ्या हदयांची धडधड वाढली होती. मी अभिदादा उठावल
मीः अभिदादा उठ दोन वाजले जाऊया घरी.
अभिदादा झोपेतच उठला. आणि आम्ही मोटारसायकलवरुन घरी आलो. घरी येऊन दादा झोपला. मी पण अंथरुणात शिरुन झोपायचा प्रयत्न करु लागलो. चादर अगाशी घट्ट बांधली होती. भितीमुळे अंग, चादर, कपडे घामाने भिजून गेले होते कारण आयुष्यात पहिल्यांदा भयानक भास झाला होता. जेव्हा विहीरीत काही पडल्याचा आवाज झाला तेव्हा मी विहीरीकडे पाहिल. विहीरीतून पाणी उडून बाहेर पडल पण जस मी विहीरीजवळ जाऊन विहीर पाहिली तर ती एकदम शांत होती. विहीरीबाहेरचे पाण्याचे शितोंडे पण नव्हते.
माझ्या मनात प्रश्नांनी घर केल होत.
मी खूप घाबरलेलो होतो कारण आयुष्यात पहिल्यांदा त्या नकारात्मक उर्जेशी माझा सामना झाला होता.
अभिदादा झोपला होता, माझ्या खांद्यावर त्या बाईचाच हात होता. तो एकदम थंड आणि ओला होता शिवाय तीच्या हाततल्या बांगड्या माझ्या खांद्याला जाणवल्या होत्या.
शांत उभा असलेला ते उसाच शेत अचानक आवाज करु लागल होत ती धावत जाणारी चाहूल त्या बाईचींच होती कारण तिचे पैजण वाजत होत आणि हाततल बाळ रडत होत.
विहीरीत काहीतरी पडल नसेल तर मग ते पाणी उडताना स्पष्ट दिसल होत. पण जवळ गेल्यावर विहिरीतल पाणी शांत होत. आणि दूरवरुन मला दिसलेल्या उडलेल्या पाण्याचा एक पण शिंतोडा तिथे नव्हता.
ती मला दिसली नसली तरी ती होती आणि तीच असण मला चांगलच जाणवल होत. माणूस मेल्यानंतर येणारा उग्र वास मला विहीरीजवळ आला होता.
मी कुणाला ही गोष्ट सांगू शकत नाही.
दुसऱ्यादिवशी सकाळी सर्वांनी मला विचारल ती होती का?
मीः नाही रे. तो फक्त आपला भास असतो. तिथे कोणी नव्हत.
नंतर दोन दिवसांनी मी ज्या बाईने आत्महत्या केली तिची माहिती काढून तिच्या घरी मी गेलो. ती एका झोपडीत राहते. तीथे गेलो तर कोणीच नव्हत. त्या घराच्या बाजूने एक आजी आली.
आजीः कोण र तू ?
मीः मी गावातलाच आहे. शहराकडे राहतो. पोलीसदादांचा नातू.
आजीबाईः बर मग इथ कशाला आला व्हतास?
मीः नंदाताई इथच राहतात का ?
आजीः इथच व्हती. नाव घेऊ नको त्या लावसटणीच. स्वतः विहीरीत उडी मारुन मेली आणि नातवालाबी खाल्ल माझ्या आण पोरालाबी मारल माझ्या.
मीः काय झाल होत.
आजीबाईः माझा लेक बेवडा व्हता घरी तमाशा करायचा पिऊन. बापावरच गेला व्हता. पण मी त्याच्या बापाला सहन केल ना? मग हीला काय धाड भरली व्हती. माझ्या लेकाशी भांडली आणि माझ्या नातवाला घेऊन हीरीत उडी मारली लावसटणीन. त्याच हिरीत माझ पोरग बुडून मेल.
मीः ते कस काय?
आजीबाईः ती आणि माझा नातू मेल्यावर माझ्या लेकान दारु सोडली. नंतर ते चांगल कामाला लागल. पण एक दिस तो मोऱ्यांच्या पिट्यांने सांगितल तुमच पोरग आमच्याबर त्या हिरीत पवत व्हत आन गाळात पाड आडकून मेल. माझ पोरग बुडून मरुच शकत नाय. ते पवण्यात हुशार व्हत. एकला नदीला पूर आला व्हता तवा आमच्या मोती कुत्राल्या गाळातन काढून वाचिवल व्हत.
आजीबाईच बोलण ऐकून मी निघून आलो. पण मला एक कळल नाही जर त्रास देणारा नवरा मेला असेल तर मग तिची आत्मा का भटकत असेल. खूप माहिती काढल्यावर कळाल की जेव्हा नंदाताईंचे अंतिम संस्कार झाले. तेव्हा त्या लहान बाळाला वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आल. मला वाटतय त्या मुलासाठीच नंदाताईची आत्मा फिरत असावी.
काही दिवसांनी मी घरी मुंबईला आलो. पण मला त्या जीवंत विहीरीची स्वप्न पडतात. अस वाटत मी त्या विहीरीत पडलोय आणि बिनाडोळ्याच्या पांढऱ्या पडलेल्या अर्धवट माश्यांनी खालेल्या अवस्थेत नंदाताई तशाच बाळाला काखेत घेऊन माझ्यासमोर उभ्या आहेत. आणि मला जाग आल्यावर पूर्ण अंग भिजलेल असायच.
हीच गोष्ट माझ्या आयुष्यावर छाप टाकून गेली.
जर सकारात्मक उर्जा या निसर्गात असू शकते तर नकारात्मक उर्जा असणारच या निसर्गात.
मी आज २७ वर्षाचा झालोय पण आजपण त्या विहीरीजवळ जायाला घाबरतो. ते अस सत्य आहे जे कुणाला खर वाटणारच नाही. लोकांनी आता विहीर बुझवली. विहीरीजवळची झाड मोडली. विहीरीच्या बाजूची वाट मोठी केली. विहीरीजवळ शेती असलेल्या लोकांनी तिथे एलईडीचे दिवे लावलेत. तरी पण ती विहीर जीवंतच आहे जी नंदाताईंच्या गुपित लपवायला नंदाताईंना मदत करते.
वरील पूर्ण घटना काल्पनिक आहे. कोणतीही अशी गोष्ट कधीच घडली नाही. ही भयकथा लिहली आवडल्यास आपली प्रतिक्रिया कळवावी.