Alka Jatkar

Inspirational

4.3  

Alka Jatkar

Inspirational

जीवनेच्छा

जीवनेच्छा

2 mins
22.8K


दुपारी पोटात चार घास कसेतरी ढकलून उषाताई चटईवर लवंडल्या. मुलबाळ नसलेल्या उषाताई यजमान देवाघरी गेल्यानंतर अगदीच उदास झाल्या होत्या. जगण्यातला त्यांचा सारा रसच निघून गेला होता. काहीतरी थोडेफार रांधायचे आणि आला दिवस ढकलायचा असे त्यांचे चालले होते. कधीतरीच घराबाहेर पडणाऱ्या उषाताईंना "कश्या आहात ?" असे कुणी विचारले कि त्या "अजून आहे बघा जिवंत." असे निराश उत्तर देत असत.

त्या चटईवर पडून झोपेची आराधना करत असताना दारावर टकटक झाली. बराच वेळ त्यांनी लक्षच दिले नाही तिकडे. "दुपारच्या वेळी कोण आलंय कडमडायला ?" त्या मनाशीच पुटपुटल्या. पण टकटक काही थांबेना. तशी अनिच्छेने त्यांनी दार उघडले. दारात एक फाटक्या कपड्यातली आठ दहा वर्षाची पोर उभी होती. "आक्का, काहीतरी खायला दे ना. दोन तीन दिवस उपाशी आहे." पोर कळवळून म्हणाली. "काही नाहीये घरात. हो पुढे." असे म्हणत उषाताईंनी धाडकन दरवाजा बंद केला आणि परत येऊन चटईवर लवंडल्या.

संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायला त्यांनी दार उघडले तर ती पोर तशीच बसून होती पायरीवर. उषाताई रागाने म्हणाल्या "तू अजून इथेच?" त्यावर पोर रडत म्हणाली "कुठे जाऊ? घरच नाहीये मला."

हे ऐकताच उषाताईंना दयाच आली तिची. "नाव काय तुझे? तुला आई बाबा कोणी नाहीये का?" त्यांनी प्रेमाने विचारले.

पोर रडत सांगू लागली "मी सुशी. मी आणि माझी माय, शेजारच्या झोपडपट्टीत राहायचो. आठ दिवसापूर्वी माझी माय गेली देवाघरी आणि झोपडीचे भाडे भरले नाही म्हणून मालकाने आज हाकलले झोपडीतून." सारे ऐकून उषाताईंना गलबलून आले. त्या पोरीला घरात घेत म्हणाल्या "आजच्या दिवस राहा माझ्या घरी. उद्या सोय लावते तुझी कोठेतरी."

उषाताई रात्रीचे जेवत नसत. "आता या पोरीसाठी काय करावे? घरात तर फक्त डाळ तांदूळ आहेत." मनाशी विचार करत त्यांनी खिचडी करायची ठरवली, आणि थोड्याच वेळात एका ताटात खिचडी व शेजारणीने दिलेले लोणचे घालून ताट सुशीला समोर ठेवले. "तू पण घे ना आक्का." सुशीला गोड आवाजात म्हणाली.

"मी रात्रीच जेवत नाही ग पोरी.तू खा."

"तू जेवलीस तरच मी जेवेन ."

सुशीच्या आग्रहाखातर त्याही बसल्या ताट घेऊन. आणि चक्क छान जेवण गेले कि त्यांना सुशी बरोबर गप्पा मारत.

जेवण होताच सुशीने मागचे सारे आवरले. उषाताईंनी तिला अंथरूण घालून दिले आणि त्याही जवळच गादी टाकून झोपल्या. मध्यरात्री कुठल्याश्या स्पर्शाने त्यांना जाग आली आणि डोळे उघडून बघतात तर काय... झोपेत सुशी त्यांच्या कुशीत शिरली होती. त्या स्पर्शाने त्यां एकदम मोहोरून गेल्या. आईच्या मायेने त्यांनी सुशीलाला आणखी जवळ ओढून घेतले. सकाळी जाग येताच त्यांना जाणवले कि किती वर्षात आपण असे गाढ झोपलो न्हवतो. आज त्यांना अगदी प्रसन्न वाटत होते.

चहा करता करता त्यांनी मनाशीच काही विचार केला. सुशी उठताच, आतुरतेने त्यांनी विचारले "तुला माझ्याजवळ राहायला आवडेल? माझी मुलगी म्हणून." सुशीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि ती पळत येऊन त्यांना घट्ट बिलगली.

"चला पटकन आवरून वाण सामान घेऊन येते. सुशीलालाही दोन नवे फ्रॉक आणूयात." उषाताईंच्या अंगात एकदम उत्साह संचारला. जणू पावसाचे चार थेंब पडताच जमिनीखालील मृत बिया जीवनेच्छेने तरारून उठतात तश्या उठल्या उषाताई...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational