जीवन एक संघर्ष - भाग १
जीवन एक संघर्ष - भाग १


मनोहरचं एक छोटंसं सर्व प्रकारच्या गाड्यांच्या रिपेरिंगचं दुकान..... गॅरेजच म्हणा नं.....
मनोहर हा अनाथाश्रमात वाढलेला, आपले आई-बाबा कोण हे त्याला माहीतही नाही. जसजशी समज आली तसतसा तिथले मुलं-मुली हेच आपले बहीण-भाऊ, तर आश्रम चालवणारेच आपले आई-बाबा असं त्याला वाटायचं.
वयाच्या 15 वर्षपर्यंत तो तिथेच वाढला, तिथल्याच workshop मध्ये तो गाड्यांच्या रिपेरिंगचं काम शिकला. स्वभावाने शांत, सरळ असा हा मनोहर, नेहमी हसतमुख व्यक्तिमत्व असणारा.
आता त्याने आपलं स्वतःचं छोटंसं गॅरेज टाकलं. स्वतः अनाथाश्रमात वाढलेला त्यामुळे त्याला गरीब, अनाथ मुलांविषयी खुप तळमळ, अशांना तो नेहमीच मदत करायचा.
एकदा असंच त्याचं काम सुरू होतं, तो आपल्या कामात व्यस्त होता, एवढ्यात त्याला एका मुलीच्या रडण्याचा आवाज आला... अठरा, एकोणविस वर्षाची ती तरुणी होती...
"काकू, नका ना हो मला मारू, मी पूर्ण काम करीन, खायला सुद्धा मागणार नाही, उपाशी राहीन, पण... पण मला घरातून नका हो काढू. कुठे जाईन हो मी, मला घरात घ्या, पाया पडते मी तुमच्या." खूप काकुळतीने ती विनवणी करत होती.
काकू - “कुठे पण जा, पण मी तुला घरात घेणार नाही, कुठून ही अवदसा माझ्या घरात आली! आधीच घरात खाणारी पाच तोंड, अन त्यात ही सहावी... माय बाप तर गेले, पण ही पाडली ना आमच्या माथी...”
अहो, ही शांताच, रोज मार खातेय, काकूंच्या हातचा... अनाथ ना ती आपली पोर मोठी होतेय, आता लग्न करायचंय तिचं, पण सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, डोक्यावर सावकाराचे कर्ज, या सर्वांना कंटाळून शांताच्या वडिलांनी आत्महत्या केली....
शांता आईबरोबर राहायची, पण दोन वर्षांनंतर तिच्या आईनेसुद्धा शेजारच्या शेतातील विहिरीत उडी मारून आपला जीव दिला....
बिचारी शांता एकटी पडली, पाठीशी ना बहीण ना भाऊ.... एक काका होते, त्यांनी तिला आपल्या घरी आणलं, काही दिवस चांगले गेले पण आता काकूने आपला रंग दाखविण्यास सुरवात केली.
सर्वप्रथम तिचं शिक्षण बंद केलं. आता घरची सर्व काम शांताच करायची. धुणी-भांडी, फरशी, पाणी भरण्यापासून स्वयंपाक... सगळं काही... पण तरीही खायला पोटभर जेवण नाही.
आज काकू बाहेर गेली हे पाहून तिने फळीवरचा लाडवाचा डबा काढला आणि डब्यातून फक्त एकच लाडू उचलला आणि तोंडात टाकणारच, तेवढ्यात पाठीत एक धपाटा बसला! अहो काकूच ती... लाडू हातातून खाली पडला...
बास...
एवढंच निमित्त... काकूने खूप मार मार मारलं, तिच्या केसांना धरून बाहेर ओढत आणलं. शांताने खूप विनवण्या केल्या, पण ऐकेल ती काकू कुठली? लोकांची गर्दी जमली, तेवढ्यात काका आले, "अग हे काय करतेस! तरणीताठी पोर कुठं जाईल, अगं ती माफी मागतेय ना! मग माफ कर तिला, सर्वच तर काम करतेय ती तुझं! तरी तू अशी वागतेस!”
काकांनी तिला परत घरी आणलं....(त्यांचं मन खूप दुखायचं) पण बायकोसमोर काही चालेना... मनोहरसुद्धा हे सर्व बघत होताच....
दुसऱ्या दिवशी मनोहरने एक निर्णय घेतला. सकाळीच तो शांताच्या काकांकडे गेला आणि शांताचा हात मागितला... काकांना खूप आनंद झाला. चला बरं झालं... आता तरी पोरीचे बरे दिवस येतील... कारण त्यांच्याच घराच्या बाजूच्या कॉम्प्लेक्समध्ये त्याचं गॅरेज होतं. काका त्याला ओळखत होतेच. काकूही तयार झाली, चला आता तरी ही अवदसा जाणार.
काकू - “आम्ही फक्त मुलगी देऊ, बाकी खर्च तुम्ही करा?”
मनोहर - “अहो, मला काहीही नकोय!”
अगदी साध्या पद्धतीने लग्न झालं. शांता मनोमन खूप आनंदली, आता तिला स्वतःचं हक्काचं घर मिळालं होतं आणि खूप प्रेम करणारा नवरा. खूप सुखाने संसार चालला होता त्यांचा.
दोन वर्षातच त्यांच्या संसार वेलीवर दिवाळीच्या दिवशीच जुळ्या मुलींचा जन्म झाला. घरात दोन लक्ष्मीचे आगमन झाले.
मनोहर आधीच मेहनती, आता पत्नी म्हणून शांताची सोबत आणि सोबत दोन छोट्या चिमुकल्या अनु आणि रेणू... छान चौकोनी कुटुंब...
(दुसरा भाग लवकरच)