pooja thube

Inspirational

4  

pooja thube

Inspirational

जिद्दीचा मार्ग

जिद्दीचा मार्ग

8 mins
1.0K


श्रीरंगपूर हे एक टुमदार गाव होते. चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेले. हिरवळीने नटलेले. गावातून सावित्री नदी वाहत होती. बारमाही पाणी असलेल्या सावित्रीने गाव सुजलाम सुफलाम केलं होतं. गावात अनेक कुटूंबे नांदत होती. जवळपास पाच एक हजाराची लोकसंख्या असेल. गावात स्वच्छता होती. गावकुसावरच्या विहिरीवर लेकीबाळी पाणी भरायला जात, पण भांडण तंटा होत नसे. गावात सरपंचांचा दरारा होता. शंकरराव त्यांचं नाव. वडिलोपार्जित सावकारकी चालत आलेली; पण कधी कुणाला त्रास नाही दिला. चार पैश्यासाठी तंटे नाही केले. शंकररावांबद्दल गावात आदर होता. त्यांची पत्नी पार्वतीबाई; अगदी त्यांना साजेशी. सगळ्यांना मदत करणारी. सरपंच कामानिमित्त तालुक्याला गेले की पार्वतीबाई सगळं व्यवहार बघत. हाताखाली कामाला गडीमाणसे असूनही स्वतः जातीने सारं पाहत. नोकरचाकरांना आपुलकीने वागवीत. सरपंचांच्या घरी सदासर्वदा लक्ष्मी पाणी भरत होती. अश्या ह्या सुखी दाम्पत्याला एकच दुःख होतं. त्यांना मुलबाळ नव्हतं. लग्नाला सात-आठ वर्षे झाली; पण सरपंचांच्या घरात काय पाळणा हलला नाही. शंकरराव कामाच्या नादात विसरून जात परंतु, पार्वतीबाईंच्या मनात ही सल कायम होती. अनेक रात्री त्यांचा डोळ्याला डोळा लागत नसे. साऱ्या गावाची माय बनलेली पार्वतीबाई स्वतः आई होऊ शकली नव्हती.

एके दुपारी सरपंच निवांत विडा कातरत बसले होते. शेजारी त्यांचा निष्ठावान रामू गडी काहीबाही काम करत होता. रामू हा सरपंचांकडे काम करणारा सगळ्यात जुना गडी होता. शंकररावांच्या वडिलांनी, सर्जेरावांनी, त्याला कामावर घेतलेला. एकदा उधळलेला बैल सर्जेरावांच्या अंगावर चालून आला, तर एकट्या रामूने त्याला स्वतःच्या अंगावर घेतला. तेव्हापासून साऱ्या पाटील घराण्याचा तो लाडका झाला. 

"अवो रामा काका, घ्या इडा घ्या." सरपंचांनी रामू गड्याला विडा दिला. बाकी कुणा गड्याच्या नशिबात हा मान क्वचितच येई. रामूने विडा घेतला नि तो ओसरीवर येऊन बसला. 

"मालक, रागवू नकासा, पर येक सांगू का?"

"बोला की काका."

"तुमी सदा तालुक्याला जात अस्ता. मी मालकीणबाईस्नी लय येळ उदास पायलंय. कधी कुणाचं पोर वाड्यापुढून जात असलं की त्याच्या हातावर कायतरी खाऊ ठेवत्यात. तवा काय आनंद असतुया मालकीणबाईंच्या चेहऱ्यावर."

"काका मला बी कळतया. पर नाही देवाजीच्या मना तिथं आपण तरी काय करणारे."

"मालक तुम्ही एखाद पोर दत्तक का नाही घेत?"

रामूचा हा प्रश्न पार्वतीबाईंना ऐकला. लगबगीने त्या बाहेर आल्या. सरपंच काही म्हणायच्या आतच त्या म्हणाल्या,"खरंच रामू काका, तुमी म्हणताय त्ये खरं हाय. आता कधी पोरं होईल माहीत नाही. वय पण सारून चाल्लया. वर्सामागून वर्स चालली पण घरात पाळणा हलेना"

पार्वतीबाईंचा सूर ऐकून शंकरराव म्हणाले,"तुमच्या दोघांचं पण खरं हाय. तालुक्याला अनाथाश्रम हाय. आपण पोर दत्तक घेऊ शकतो, पर आता निवडणूक जवळ आलीया. यंदा गाव पुन्हा माझं नाव सरपंचपदासाठी सुचवताया. त्यामुळं यंदा नाही जमायचं." आता शंकररावांपुढे कोण काय बोलणार. 

पार्वतीबाईंच्या चेहऱ्यावर नाराजी साफ दिसत होती. आपल्या धन्याला आपल्या मनातलं कसं कळत नाही ह्याच वाईट त्यांना वाटत होतं. असेच काही दिवस गेले. पार्वतीबाईंची धुसफूस वाढत होती. ना खाण्यात लक्ष, ना कामात लक्ष. फक्त रामू काकांचं बोलणं मनात फिरत होतं. एके दिवशी शंकरराव सकाळीच निवडणुकीच्या कामानिमित्त तालुक्याला गेले. तसे ते आधीही जात; पण चार-पाच वाजेपर्यंत परतत असत. आज सांज उलटून गेली तरी सरपंचांचा पत्ता नव्हता. पार्वतीबाईंचा जीव वर खाली होतं होता. नेहमीप्रमाणे शंकरराव माणसांना सोबत घेऊन न जाता एकटेच गेलेले, त्यामुळे तर त्या अधिकच चिंतेत  होत्या . अचानक बाहेर गाडीचा आवाज आला. पार्वतीबाई सगळी काम सोडून बाहेर आल्या, आणि त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. शंकरराव एकटे नव्हते. त्यांच्या हाताला एक छोटी, गोंडस पोर होती. पार्वतीबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 

"जावा, ओवाळणीच ताट घेऊन यावा. आपल्या नव्या पाहुणीचं स्वागत करायचं हाय का नाय?"

"चंपी, अगं चंपी, ओवाळणीच ताट करते म्या, तुम्ही गोडधोडाचं करायला घ्या. आज माझ्या बाळाचं स्वागत जागी झालंच पाहिजे."

पार्वतीबाईंना मुलीला उचलून तिचे पटापट मुके घेतले. अगदी नक्षत्रासारखी पोर होती. काळेभोर डोळे, मऊ-मऊ केस, गोबरे गाल. ती आल्याने पार्वतीबाईंना खूप आनंद झाला, म्हणून त्यांनी तीचं नाव ठेवलं आनंदी.

आनंदी शंकरराव आणि पार्वतीबाईंच्या छायेखाली मोठी होत होती. रामू गडी तिला रोज फिरवून आणायचा. शेतावर खांद्यावर घेऊन फिरताना त्याला लहानपणीचे शंकरराव आठवायचे. त्यांनाही तो असाच फिरवून आणत असे. आनंदीचं बागडणं, खेळणं सगळ्यांना आवडायचं. सगळ्यांची ती लाडकी होती. ती आली आणि सरपंच पुन्हा निवडून आले. तिचा पायगुण म्हणून शंकररावांनी साऱ्या गावात मिठाई वाटली. अभ्यासात हुशारही फार. गावच्या शाळेत सरपंचांनी तिचं नाव नोंदवलं. तिच्या हस्ते सगळ्या मुलांना शालेय साहित्य वाटलं. इतके वर्ष टीव्ही घरात नव्हता. पण आनंदीसाठी घरात टीव्ही आला. कार्टून पाहताना पार्वतीबाईही हसू लागल्या. जोमाने काम करू लागल्या. आनंदीच्या दहाव्या वाढदिवशी सरपंचांनी साऱ्या गावाला दहा दिवस जेवण दिलं. आनंदीमुळे त्यांची भरभराट होत होती.

आनंदी आता चौदा वर्षांची झाली होती. भराभर शिकत होती. एकदा उन्हाळयाच्या सुट्टीत गावातली पोर जमली आणि नदीवर पोहायला जायचे बेत बनवू लागली. सुट्ट्या लागल्या की गावातली पोर सावित्रीच्या काठावर जमत. नदीमध्ये सूर मारत. सावित्रीला खूप पाणी असे; पण कधी कुणी बुडाला नाही. पोटच्या पोराप्रमाणे ती गाव सांभाळत होती. सावित्री आणि तिच्या मैत्रिणीही पोहायला जायचं म्हणून सावित्रीकडे निघाल्या. आनंदी भलतीच शूर होती. आपल्या घाबरट मैत्रिणींना धीर देत होती.

"काही होतं नाही गं. आपली सावित्री आपल्याला कशी बुडू देईल. आणि मी आहेच की पट्टीची पोहणारी. घाबरू नका."

आनंदीचं बोलणं ऐकून सुमी म्हणाली," तू न पट्टीची पोहणारी? तू कवा शिकली गं ?"

"मला रामू बाबांनी शिकवलं. आमच्या शेतातल्या तळ्यात . तेव्हा मी फारच लहान होते. पण शिकले मी, आई-बाबांची नजर चुकवून! तुम्हाला पण शिकवेन मी ."

"असंय होय. पर आपण पोरीचं कायबी खरं नस्तय बग. आज हाये आपल्या घरी तर उद्या दुसऱ्याच्या घरी. तिथं फक्त रांधा, वाढा नि उष्टी काढा. तिथं असलं कायबी नाय चालत."

रंजी म्हणाली, "व्हय तर, तिथं आपण गपगुमान मान खाली घालायची. शिकून सवरून तर काहीच उपयोग नाय. म्हणून बा नं माझं शिक्षण बंद करायचं ठरवलंया."

हे ऐकून आनंदीला फार चीड आली. शंकरराव नि पार्वतीबाई आधुनिक विचारांचे होते. लवकर मुलीचं लग्न करून द्यावं असा त्यांना कधी वाटलं नाही. गावातही ते तसं सांगत पण लोक ऐकत नसत. 

"आणि शिक्षण बंद करून काय करणार आहेस?"

"लगीन दुसरं काय. बा ऐकत नाय. आवशी ने बोलून पाहिलं, पर तो म्हणतुया शेजारच्या गावचाच हाय पोरगा. पोर लय लांब नाय जायची आणि चांगली दहा एकर जिमीन बी हाय."

"अगं पण शिक्षणाचं काय? असा अर्धवट शिक्षण काय कामाचं आणि लग्नाचं वय तरी आहे का तुझं?"आनंदीला पटतच नव्हतं. 

सुमी म्हणाली, " तुझं पटतंय आनंदे, पर ही आवडी, हीच बी लगीन ठरलंय. आता आपण काय करणार ह्यांचे आई बापच ऐकेनात."

"मी बाबांशी बोलून पाहते." असं बोलून आनंदी निघाली ती तडक शेतावरच पोहचली. शंकरराव रामू गड्यासोबत गोठ्याची डागडुजी करत होते.

"आबा! मला तुमच्याशी बोलायचं."

"आनंदे, बोल की."

आनंदी ने शंकररावांना सारं सांगितलं. शंकररावांनी तिला गावात बोलण्याचं आश्वासन दिलं. रात्री जेवण झाल्यावर ते आनंदीला घेऊन गावात निघाले. रंजीचा बाप काय बांधला नाही. आवडीचा बाप नि मामा एकत्र येऊन बोलत होते. त्यांची तर लग्नाची तयारी चाललेली. काही उपयोग झाला नाही.

आनंदीला उन्हाळ्याच्या रात्रीं थंङ हवेत फिरणं फार आवडायचं. सुमीला सोबत घेऊन ती फिरत होती. 

"आनंदे, आज आवडीच्या लग्नात तू लय उदास दिसत होतीस."

"मला नाही पटत सुमे. मला खरंच पटत नाही."

"तू कायबी म्हण. पर एक दिस तुलाबी जावंच लागणार लग्न करून. सगळ्या पोरींना जावंच लागत. तू नं मी काय येगळे नाही. आपल्या गावातल्या समद्या पोरींना शिक्षण अर्धवट टाकून लगीन करावं लागलंय. त्यात तुझं आबा बी काय नाय करू शकणार. आपल्यालाबी पण ह्याच वाटेनं जावं लागणार."

सुमीच्या बोलण्यात तथ्य होतं पण आनंदी मानायला तयार नव्हती. बघता बघता तिच्या बरोबरच्या अनेक मुलींची लग्न झाली. सुमीचंही. आनंदी अठरा वर्षांची झाली. शंकररावांच्या घरी सुल्तानपूरहून पाहुणे आलेले. ते म्हणू लागले, "सरपंचराव, पोर लग्नाला आली, आम्हास्नी कवा बुंदी खायला देताया!" त्यांचं बोलणं आनंदीला खटकलं. पण पार्वतीबाई तिला आत घेऊन गेल्या. रात्री जेवताना आनंदीने विषय काढला. पार्वतीबाई म्हणाल्या, "आम्हास्नी तुला कधीच आमच्यापासुन येगळं करायचं नाय. पर हा नियमच हाय. पोरीच्या जातीला लगीन करावाच लागतं. तुझ्या मैत्रिणींची नाय का झाली? तुझं पण होईल आज नायतर उद्या."  

"आई, पण घाई काय आहे. लग्नाला नाही कोण म्हणताय. पण शिक्षण अर्धवट सोडून लग्न करणे मला पटत नाही. आणि आज आपल्या गावात मुली हेच करतायेत. एकामागून एक . सगळ्या एकच रस्त्यावर चालतायेत. असं नाही की गरिबीमुळे त्यांना शिकता आलं नाही. आबांनी अनेक सुविधा गावात आणलेल्या. मुलींना नि मुलांना दोघांनाही मोफत शिक्षण मिळण्याची सोय आहे आपल्या गावात. पण तरीही असं का. माझी तुम्हाला एकच विनंती आहे माझं इतक्यात लग्न करू नका. मला अजूनही पुढे शिकायचंय." एवढं बोलून आनंदी अर्धभरल्या ताटावरून उठून गेली. ती पाहत होती तिच्या वयाच्या मुलींना. ज्या बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या. काम करून पिचलेल्या. आयुष्य गहाण टाकलेल्या. एकत्र सावित्रीच्या पात्रात डुंबलेल्या, काहीही करू शकणाऱ्या त्या मुली, कमरेवर एक आणि हाताला एक पोर धरून वाड्यापुढून चालल्या की आनंदीच्या पोटात कालवाकालव होई. काही करू शकली नव्हती ती. ना तेव्हा आणि आताही नाही. 

त्या दिवशी आनंदी लवकरच उठली. शंकररावांसोबत गाडीतून जिल्ह्याला गेली. यायला उशीर झाला तेव्हा पार्वतीबाईंना कळलं की लेकीची कसलीतरी परीक्षा होती. आनंदीने शंकररावांच्या वाड्यात टेकनॉलॉजी चा वापर हुशारीने केलेला. आबांना फोन वापरायला शिकवलेला. पार्वतीबाईंची पाट्यावर वाटण करून दुखणारी कंबर मिक्सर ने थांबवली होती. रामू गड्याचं दूध काढायचं काम सोपं करायला मशीन होती. गावातल्या लोकांनाही ती समजून सांगत असे. फक्त कुणी चेष्ठेतही लग्नाचा विषय काढला की मग तिचा पारा चढे. 

आज आनंदी जरा टेन्शनमध्ये दिसत होती. पार्वतीबाईंना विचारलं पण सांगेना ती. अचानक शंकरराव आनंदीला हाक मारत आले. त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. आनंदीचा हात हातात घेऊन ते नाचत होते. 

"मालकीणबाई, वो मालकीणबाई. जरा बाहीर या. आपली लेक हाफिसर झाली."

पार्वतीबाई धावतच बाहेर आल्या. आनंदीने त्यांना पेढा भरवला. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि आनंद अश्या संमिश्रित भावना होत्या. 

"आई, मी IAS officer ची परीक्षा उत्तीर्ण झाले. आता मुलाखत पास झाले की बनलेच मी अधिकारी."

"अन ती तू होणारच. मला ग्यारंटी हाय." पार्वतीबाई काही इंग्रजी शब्द आनंदीने शिकवलेले.

काही दिवसातच मुलाखत झाली. आनंदीच्या हुशारीने मुलाखत घेणारे अधिकारी देखील चकित झालेले. सगळ्या गावाला शंकररावांनी पेढे वाटले. गावातर्फे आनंदीचा सत्कार आयोजित करण्यात आला. माहेरवाशिणी सुमी आणि रंजी सत्काराला हजर होत्या.

"मला खात्री होतीच आनंदे. तू मोठी होणार नि तू झाली." सुमी नि रंजीने तिची गळाभेट घेतली. 

आनंदीचा सत्कार झाला. पार्वतीबाई नि शंकरराव स्टेजवर बसले. आनंदी भाषण करायला उभी राहली.

"माझ्या मायबाप गावकऱ्यांनो, आज मी जी काही आहे ती फक्त माझ्या आबा नि आई मुळेच. आणि हो रामू बाबामुळे. त्यानेच मला पोहायला शिकवलं. इथेच मी शिकले मुलगा मुलगी भेद असं काही नाही. तुम्ही जे हवं ते करू शकता, फक्त मनात हवा विश्वास आणि मोठ्यांची साथ. माझ्या बरोबरच्या अनेक मैत्रिणींची लग्ने होत असताना मला शिकण्याचं पाठबळ मिळालं ते आबांमुळे. ऑफिसर होण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अनेकदा अपयश आलं. पण म्हणून आबांनी  माझं लग्न नाही लावून दिलं. दिलासा दिला. गावातल्या मुलींनी मला प्रेरणा दिली. हो. त्यांनी निवडलेले मार्ग न निवडण्याची. मानवी मनाची वृत्ती असते गर्दीच्या मार्गाने जाण्याची; परंतु जो योग्य मार्ग निवडतो तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. परीक्षेच्या तयारीसाठी मला शहरात राहावं लागले. घरापासून , गावापासून दूर. पण आबांनी कायम धीर दिला. आईने पाठिंबा दिला. मला माहितीये लोकांच्या बोलण्याला तिने अनेकदा तोंड दिलाय. आबा म्हणतात तू आली नि सगळा आनंदीआनंद झाला. माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, शिकू द्या मुलींना. काय झालं लग्न झालं म्हणून. तुम्ही कधीही शिकू शकता. अपयशाला घाबरू नका. प्रयत्नांवर विश्वास ठेवा. जिकडे सगळे जातात तोच मार्ग योग्य असं समजू नका. स्वतःचा मार्ग स्वतः निवडा. भलेही तो अवघड असेल. वळणाचा असेल. काटेकुटे असतील. पण तो तुमचा मार्ग असेल. जबाबदारी तुमची असेल आणि फळेही तुम्हाला मिळतील. अवश्य."

टाळ्यांच्या कडकडाटात आनंदी खाली बसली. शंकरराव आणि पार्वतीबाईंना पोरीचा खूप अभिमान वाटत होता. रामूच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. सगळ्या गावाच्या डोळ्यात लख्ख प्रकाश पडला होता. आनंदीमुळे गावातल्या सगळ्या मुलींचे भविष्य चांगलं बनणार यात काहीच संशय नव्हता! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational