लॉकडाऊन डायरी #37
लॉकडाऊन डायरी #37
प्रिय डायरी,
दिवस सदतिसावा. दिवसभर ऊन-सावलीचा खेळ चालू होता. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. आता शाळांना-महाविद्यालयांना उन्हाळी नाही तर पावसाळी सुट्टी मिळणार आहे! आणि परीक्षा तर होणारच आहेत.
आज मटकीचा झणझणीत तर्रीवाला रस्सा बनवला होता. आणि सोबतीला बाजरीची भाकरी! वरून लिंबू पिळलं आणि आडवा हात मारला.
संध्याकाळी आभाळ भरून आलं. काळ्या ढगांनी गर्दी केली. टपटप करत थोडासा पाऊस येऊन गेला. काय माहित कुणाच्या प्रश्नांना उत्तरे देऊन गेला!
रात्रीचं जेवण झालंय. मातीचा सुगंध येतोय आणि किती उरात भरून घ्यावा असं वाटतंय. शेवटी कितीही महागडी अत्तरे, परफ्यूम्स वापरली तरी मातीच्या सुवासाने जसं मन प्रसन्न होते, त्याची सर कशालाच नाही. निसर्गाने बनवलेलं आपल्याला, निसर्गाकडेच खेचले जाणार आपण! आणि हे माणसाला जितक्या लवकर पुन्हा लक्षात येईल तेवढं बरं होईल!
शुभ रात्री!